‘मातृभाषेतून शिक्षण, संस्कारांमधून घडतात विद्यार्थी’
आजच्या तंत्रज्ञानाधिष्ठित, वेगवान आणि स्पर्धात्मक युगात केवळ पाठ्यपुस्तकी शिक्षण पुरेसे नाही. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास घडवून आणायचा असल्यास पाठ्यपुस्तकी शिक्षणाबरोबर भारतीय मूल्यविचार, संस्कृती, समाजाभिमुख शिक्षण देणे आवश्यक आहे. हा सर्वांगीण विचार करून डोंबिवलीतील महात्मा गांधी विद्यालय (प्राथमिक विभाग) या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळून आजघडीला महात्मा गांधी विद्यालयाची ओळख एक संस्कारक्षम, मूल्याधिष्ठित आणि आदर्श शैक्षणिक संस्था म्हणून केली जात आहे. या शैक्षणिक संस्थेतील शिक्षकवृंद, कर्मचारीवर्ग आणि अन्य सहयोगी अथक प्रयत्नांती ही शैक्षणिक संस्था भविष्यातील सुजाण आणि राष्ट्रहितैषी नागरिक घडविण्याचे कार्य नेटाने करीत आहेत.

महात्मा गांधी विद्यालय, डोंबिवली शैक्षणिक संस्था अनेकांच्या सहकार्याने आणि तेथे राबवित असलेल्या अनेक धोरणांमुळे आदर्श विद्यालय म्हणून डोंबिवलीत नावारूपाला येत आहे.
प्रेरणादायी नेतृत्व - प्रा. अजयकुमार जोगी
मुख्याध्यापक प्रा. अजयकुमार जोगी यांनी दि. 1 जुलै 2022 रोजी विद्यालयाचे प्रमुखपद स्वीकारल्यानंतर शिक्षण, संस्कारक्षम शिक्षणाचा आदर्श केंद्र - महात्मा गांधी विद्यालय, डोंबिवली ‘मातृभाषेतून शिक्षण, संस्कारांमधून घडतात विद्यार्थी’ संस्कार आणि आधुनिकतेचा उत्तम संगम साधला आहे. संस्कारक्षम पिढी घडविणे या संकल्पनेला त्यांनी कृतीरूप दिले आणि संकल्पना वास्तवात साकारून यशस्वी केले. शिस्त, सुसंस्कार आणि आत्मविेशास यांच्या आधारे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक नव्हे तर सामाजिकदृष्ट्याही जबाबदार नागरिक म्हणून घडविण्याचे कार्य त्यांच्या नेतृत्वाखाली होत आहे.

मूल्यनिष्ठ शिक्षण - संस्कारांची वाटचाल
महात्मा गांधी विद्यालयात केवळ पुस्तकाधारित शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्वगुण, वक्तृत्व, सहकार्य, शिस्त, देशप्रेम आणि सामाजिक जबाबदारी विकसित व्हावी यासाठी विविध उपक्रम राबवले जातात. कीर्तनकार सौ. आशावरी काळे यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेत मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व या विषयावर प्रबोधनपर कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये संस्कृती, अध्यात्म आणि मूल्यशिक्षणाचा संस्कार दृढ झाला आहे. तसेच शाळेचे पालक किर्तनकार श्री. राजाराम मिरगल यांचे शाळेच्या दिंडी सोहळ्यात वेळोवेळी मार्गदर्शन लाभते.
समाजातील दातृत्व आणि सहकार्य
शाळेच्या प्रगतीत समाजातील दातृत्व शक्तींचा मोठा वाटा आहे. माजी विद्यार्थी श्री. प्रल्हाद म्हात्रे यांनी तीन वर्षांपासून आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांची फी भरून त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्याचे कार्य केले आहे. तसेच श्री. विश्वास भोईर (माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष) आणि रिक्षाचालक श्री. प्रदीप एरंडे यांचे वेळोवेळी मिळणारे सहकार्य शाळेच्या सामाजिक भिंतीला अधिक मजबूत करते. रिक्षाचालक बांधवांच्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीतला सहभाग समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे.
रेल चाईल्ड संस्था - सामाजिक शिक्षणाची पायाभरणी
1955 साली स्थापन झालेली रेल चाईल्ड संस्था ही सामाजिक जबाबदारीचे उत्कृष्ट उदाहरण आहे. झोपडपट्टी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलांना शिक्षणाची नवी दिशा देण्याचे कार्य या संस्थेमार्फत करण्यात येते.संस्थेचे अध्यक्ष श्री. उल्हास झोपे, उपाध्यक्ष श्री. विवेक द्याहाडराय, कार्यवाह श्री. दिलीप झरकर, कोषाध्यक्ष श्री. श्रीधर पटवर्धन, शाळा समिती अध्यक्ष श्री. प्रदीप गवळी, आणि मार्गदर्शक श्री. मंगेश देशपांडे यांच्या प्रेरणेमुळे ही संस्था अधिक भक्कमपणे पुढे चालली आहे.
आरोग्य, सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी
शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी क.डों.म.पा डॉक्टर मंडळ तसेच अग्रवाल हॉस्पिटल, डोंबिवली येथील डॉक्टरांकडून मोफत आरोग्य व नेत्र तपासणीचे आयोजन केले गेले. सायबर गुन्ह्यांविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी डॉ. नीता मांडवे (पोलीस निरीक्षक, ठाणे) यांनी पालक सभेत प्रभावी मार्गदर्शन केले. या उपक्रमांमुळे विद्यालय हे शिक्षणासोबत समाजविकासाचे केंद्र बनले आहे.
विद्यार्थ्यांची यशोगाथा
शाळेतील कु. अर्जुन राठोड (इ. 4 थी) या विद्यार्थ्याने आपल्या कल्पक प्रयोगांनी बाल वैज्ञानिक म्हणून सर्वत्र लौकिक मिळवला आहे. शाळेने त्याला सर्वतोपरी प्रोत्साहन दिले असून त्याच्या कार्याचे अनेक ठिकाणी कौतुक होत आहे.
मराठी माध्यमाचा गौरव - संस्कृती आणि मूल्यांचे जतन
संस्थेने सन 2000 मध्ये सेमी-इंग्रजी माध्यम सुरू करून पालकांच्या अपेक्षा ओळखल्या, तरीही मराठी माध्यमाचा गौरव अबाधित ठेवला आहे. मातृभाषेतून शिक्षण घेतलेले विद्यार्थी अधिक आत्मविश्वासी, विचारशील आणि संवेदनशील नागरिक बनतात, याचे प्रत्यंतर शाळेच्या 99% निकालात आणि वाढत्या विद्यार्थ्यांच्या संख्येतून मिळते. तसेच श्री. बाळकृष्ण वाघ (माजी एसीपी अधिकारी) हे वेळोवेळी मराठी शाळा वाचवण्यासाठी शाळेसाठी विशेष सहकार्य दिले आहे.
संस्कृतीप्रेमी शिक्षण व्यवस्था आणि पालकांचा विश्वास
शाळेत सण-उत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम, शिस्तबद्ध उपक्रमांद्वारे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, सामाजिक जाण, आणि नेतृत्वगुण विकसित केले जातात. पालकांचा शाळेवर दृढ विेशास निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकणारे अनेक पालक आता मराठी शाळेत प्रवेश घेण्यासाठी पुढे येत आहेत - हे परिवर्तन शाळेच्या गुणवत्तेचे निदर्शक आहे. विविध स्पर्धा व उपक्रम - सर्वांगीण विकासाची दिशा संस्थेमार्फत आयोजित अभ्यासवर्ग, स्पर्धा, मार्गदर्शन सत्रे यांमुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधला जात आहे. शिक्षक वर्ग यामध्ये आपली भूमिका अत्यंत समर्पणाने पार पाडत आहेत. मुख्याध्यापक, शिक्षक, पालक आणि विद्यार्थी यांचा परस्पर विेशास, सहकार्य आणि प्रयत्न यामुळे विद्यालयाचा एकात्मिक विकास साध्य झाला आहे.
वाढती विद्यार्थ्यांची संख्या - यशाची साक्ष
आज शाळेतील विद्यार्थीसंख्या सातत्याने वाढत आहे. हे यश विद्यालयाच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणपद्धतीचे, शिक्षकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे आणि पालकांच्या विेशासाचे फलित आहे.
पालकांचा सत्कार - मराठी माध्यमाचा अभिमान
इंग्रजी माध्यमाचा सामाजिक दबाव असताना आत्मविेशासाने मुलांना मराठी माध्यमात दाखल करणार्या पालकांचा सत्कार हा मराठी शाळांच्या विकासाचा प्रभावी मार्ग ठरला आहे. ही संकल्पना अनिल गोरे (मराठीकाका) यांनी 2013 मध्ये मांडली. त्यांनी सांगितल्याप्रमाणे ज्या शाळांमध्ये पालकांचा सत्कार झाला, त्या शाळांमध्ये पुढील वर्षी 20% ते 45% पटसंख्या वाढली. हे केवळ उपक्रम नव्हे, तर मातृभाषेच्या अभिमानाचा उत्सव आहे.
उज्ज्वल भविष्याकडे वाटचाल
महात्मा गांधी विद्यालय हे केवळ शिक्षणसंस्था नसून संस्कारांचे मंदिर आहे. मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक आणि समाजाचे सहकार्य यामुळे ही शाळा संस्कारक्षम शिक्षणाचा आदर्श केंद्र म्हणून ओळखली जाते. शालेय शिक्षण म्हणजे फक्त परीक्षेत उत्तीर्ण होणे नव्हे तर एक सजग, सुसंस्कारित आणि जबाबदार नागरिक घडविण्याची प्रक्रिया आहे. महात्मा गांधी विद्यालय हे कार्य निष्ठेने आणि समर्पणाने करीत आहे.
श्री. कृष्णात कदम
मंत्रालय प्रतिनिधी
मोः- 95949 69635