धर्मचक्रप्रर्वतनाय - भारतीय राज्यघटना

24 Nov 2025 13:08:53



धर्म भारताचा आत्मा आहे आणि आपल्या संविधानाचा पाया प्राचीन भारतीय धर्मच आहे. आपल्या संविधान निर्माणकर्त्यांपैकी बहुतेकांना आपल्या प्राचीन धर्मविचारांचे चांगले ज्ञान होते. घटनासमितीत धर्माच्या सार्वभौमत्वावर चर्चा झालेली आहे. धर्माचे असे स्मरण करण्याचे कारण असे की, भारतीय आत्मतत्त्वाचे प्रतिबिंब राज्यघटनेत आलेले आहे, म्हणूनच 26 नोव्हेंबर या आपल्या संविधानदिनी आपली राज्यघटना काळानुसार धर्मचक्र फिरते ठेवणारी आहे, हे आपण जाणून घेतले पाहिजे

धर्म भारताचा आत्मा आहे, हे वाक्य फार प्रसिद्ध आहे, तसेच भारत ही धर्मभूमी आहे, हेदेखील वाक्य फार प्रसिद्ध आहे. वेदकाळातील ऋषींपासून ते आधुनिक काळातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर ते गाडगेबाबांपर्यंत प्रत्येकाने आपापल्या भाषेत हा आशय मांडलेला आहे. ‘माणसाला भाकरीइतकीच धर्माची गरज आहे.’ हेे बाबासाहेबांचे वाक्यदेखील प्रसिद्ध आहे. धर्माचे असे स्मरण करण्याचे कारण असे की, आपल्या संविधानाचा पाया प्राचीन भारतीय धर्म आहे.

धर्मासंबंधीच्या अनेक भ्रामक संकल्पना सामान्य माणसात नाही, पण विद्वानांत रूढ आहेत. साम्यवादी म्हणतात,“धर्म अफूची गोळी आहे.” तर पुरोगामी म्हणतात, धर्माने सांप्रदायिकता निर्माण होते. सेक्युलरवादी म्हणतात,“धर्म व्यक्तिगत आहे. त्याचे सार्वजनिक जीवनात स्थान नाही.”या सर्व विद्वानांना प्रणाम करून आपण पुढे जाऊया.

आपला धर्माचा अर्थ पूजापाठ, कर्मकांडे, जातीभेद, अस्पृश्यता, अनेक देवतांचे पूजन, व्रतवैकल्ये, तीर्थयात्रा असा अजिबात नाही. आपला धर्माचा अर्थ - धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे न्याय, धर्म म्हणजे सत्यवादिता, धर्म म्हणजे समभाव, आणि धर्म म्हणजे सदाचरण. तसेच धर्म म्हणजे समाज आणि सृष्टीची धारणा करणारे शाश्वत, अपरिवर्तनीय नियम. या सर्वांचे अतिशय उत्तम विवरण उपनिषदे, धम्मपद, त्रिपिटक, नानकवाणी, विवेकानंदवाणी, आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे धर्मविचार यातून आपल्याला माहीत होऊ शकते. आपले संविधान निर्माणकर्ते 289सभासद ज्यात 15 महिलादेखील आहेत, यातील बहुतेकांना आपल्या प्राचीन धर्मविचारांचे चांगले ज्ञान होते.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन हे आपल्या संविधान सभेचे विद्वान सभासद होते. 20 जानेवारी 1947ला संविधान सभेत त्यांचे भाषण झालेले आहे. भारताला लोकशाही राज्यपद्धती नवीन नाही, हा मुद्दा सांगताना त्यांनी एक उदाहरण दिले. उत्तरेकडून दक्षिण प्रदेशात काही व्यापारी गेले होते. तेथील राजाने त्यांना प्रश्न विचारला,“तुमचा राजा कोण?” त्याला त्यांनी उत्तर दिले,“केचिद देशे गणाधिना केचिद राजाधिना.” म्हणजे, आमच्यापैकी काहीजण राजाने शासित प्रदेशात राहतात, तर काही लोक गणराज्यात राहतात.

याच भाषणात राधाकृष्णन पुढे म्हणाले, “प्रजेच्या सार्वभौमत्वाविषयी खूप काही बोलले गेले आहे. आमची अशी धारणा आहे की, अंतिम सार्वभौमत्व हे नैतिक कायद्याचे असते, मानवजातीच्या सदसद्विवेकबुद्धीचे असते. प्रजा त्याचप्रमाणे राजादेखील या धर्मापुढे दुय्यम असतो. धर्म म्हणजे सत्यवादिता आणि तो राजांचा राजा असतो.” ‘धर्मम् क्षात्रस्य शास्त्रम्’ घटनासमितीपुढे या प्रकारे धर्माच्या सार्वभौमत्वावर चर्चा झालेली आहे. त्याचप्रमाणे ‘धारणात् धर्म इत्याहु, धर्म धारयति प्रजा’ हा श्लोकही काही सदस्यांनी उद्धृत केलेला आहे.

आपले संविधान तीन मौलिक संकल्पनांवर आधारित आहे. या तीन मौलिक संकल्पना अशा - 1) कायद्याचे राज्य, 2) व्यक्तीचे स्वातंत्र्य आणि संरक्षण आणि 3) स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय ही जीवनमूल्ये. या तीन मौलिक संकल्पना संविधानिक कायद्याच्या भाग आहेत. संविधानिक कायद्याचा भाग झाल्यामुळे या संकल्पना महान आहेत असे नाही. कोणताही कायदा हा तेव्हा कायदा म्हणून प्रभावी ठरतो जेव्हा त्या कायद्यामागे प्रजेचे नैतिक समर्थन असते. प्रजेने स्वीकारल्याशिवाय कोणताही कायदा यशस्वी होत नाही. म्हणून व्यापक अर्थाने कायद्याचे राज्य म्हणजे प्रजेच्या नैतिक मूल्यांचे राज्य असा होतो.

हे कायद्याचे राज्य नीट चालावे म्हणून आपल्या घटनाकारांनी तीन प्रकारच्या संवैधानिक व्यवस्था निर्माण केल्या आहेत. त्या अशा - 1) कायदेमंडळ (विधीमंडळ), 2) कार्यकारी मंडळ (मंत्रिमंडळ), 3) न्यायपालिका. या प्रत्येकाची घोषवाक्ये आहेत. आपल्या विधीमंडळात म्हणजे संसदेच्या लोकसभा आणि राज्यसभेत कार्यकारी मंडळाचे म्हणजे मंत्रीमंडळाचे सदस्य उपस्थित असतात. तो लोकसभेचा सभासद असल्याशिवाय मंत्री होऊ शकत नाही. या लोकसभेत आपल्या राज्यघटनेच्या प्राणतत्त्वाचे दर्शन घडेल अशी वचने लिहिलेली आहेत. ती 31 आहेत. त्यातील चार वचने इथे देतो.

1) सभापतींच्या आसनाच्या मागे धर्मचक्र आहे आणि खाली लिहिले आहे,‘धर्मचक्रप्रवर्तनाय’ राज्यघटनेची अंमलबजावणी इथे करायची आहे. तर कशासाठी तर धर्मचक्र फिरते ठेवण्यासाठी.

2) राज्यघटनेची अंमलबजावणी करताना आपली समदृष्टी हवी, ती कशी हे सांगणारा हा श्लोक.

अयं निजः परोवेति गणना लघुचेतसाम्।
उदारचरितानां तु वसुधैव कुटुंबकम्॥

आपल्या राज्यघटनेची सुरुवात ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांपासून होते. आम्ही भारताचे लोक वसुधैव कुटुंबकम् मानणारे आहोत, असा याचा अर्थ आहे. यत्भूतहितं तत्सत्यमिति धारणा धर्म म्हणजे सत्यवादिता आणि सत्य म्हणजे ज्यात सर्व लोकांचे सर्व प्रकारचे कल्याण आहे. डोळ्याने पाहिले, कानाने ऐकले, स्पर्शाने जाणवले, एवढेच सत्य नसून आपली सत्याची व्याख्या त्याच्या पलीकडे जाते. जे लोककल्याणाला घातक ते सर्व असत्य असा याचा अर्थ करावा लागतो.

प्रजासुखे सुखं राज्ञः प्रजानां चा हिते हितम्।
नात्मप्रियं हितं राज्ञः प्रजानां तु प्रियं हितम्॥

शासनाच्या तिन्ही अंगांनी आपले कर्तव्य पार पाडताना कोणता विचार केला पाहिजे, हे वरील श्लोकात सांगितले आहे. आपली राज्यघटना एका पक्षाचे राज्य निर्माण व्हावे किंवा एका राजघराण्याची सत्ता निर्माण व्हावी अथवा राजकीय टोळक्यांची सत्ता यावी, यासाठी निर्माण झालेली नाही. तिचा अंतिम हेतू प्रजेच्या कल्याणाचा आहे. या श्लोकात म्हटले गेले आहे की, लोकांच्या सुखात राजाचे सुख आहे. प्रजेच्या हितात राजाचे हित आहे. त्याने स्वतःच्याच सुखाचा विचार करू नये. ज्या गोष्टीमुळे लोकांना सुख आणि समाधान मिळेल. त्या गोष्टीपासून त्यानेही सुख, समाधान प्राप्त केले पाहिजे. दुसर्‍या भाषेत, सत्ता आल्यानंतर स्वतःचे घर भरण्याचा उपक्रम करू नये.

न सा सभा यत्र न सन्ति वृद्धा,
वृद्धा न ते यो न वदन्ति धर्मम्।
धर्मः स नो यत्र न सत्यमस्ति,
सत्यं न तद्यच्छलमभ्युपैति॥

महाभारतातील हा श्लोक माझ्या मते घटनेतील पवित्र उद्देश फार सुंदर रितीने सांगतो. आपल्या घटनाकाराने संसदेची दोन सभागृहे केली आहेत. राज्यसभेत वयाने ज्येष्ठ सभासद असतात. या श्लोकाच्या भाषेत ती वृद्धांची सभा आहे. त्यांच्याकडून एक अपेक्षा व्यक्त केली गेली आहे, ती म्हणजे त्यांनी नेहमी धर्माचाच पक्ष घेतला पाहिजे आणि ज्या धर्मात सत्य नाही, तो धर्मच नव्हे. आणि सत्यदेखील कसे पाहिजे तर ते व्यक्तीला दुराचारापासून दूर खेचील.

आपल्या घटनाकारांना हे अपेक्षित आहे की, आपले राज्यकर्ते नीतिमान असावेत, सत्य बोलणारे असावेत, सत्याचे आचरण करणारे असावेत, प्रजेच्या हितासाठी निरंतर कष्ट करणारे असावेत, त्यांनी सत्यधर्माची वृद्धी करावी. सर्वच राज्यकर्ते या कसोट्यांवर खरे उतरणार नाहीत, हे जसे खरे आहे तसे या कसोट्यांवर खरे उतरणार्‍यांची संख्यादेखील कमी नाही. समाजात काळे-गोरे राहते. नीतिमान माणसे असतात, तशी अनीतिमान माणसे असतात. राजकारण त्याला अपवाद नाही.

सर्वोच्च न्यायालय हे न्यायपालिकेचे अंतिम पीठ आहे. त्याचे घोषवाक्य आहे,‘यतो धर्मस्ततो जयः’ म्हणजे जेथे धर्म आहे, तिथे विजय आहे. न्यायदान म्हणजे धर्माचे काम. धर्माचे काम म्हणजे कोणताही भेदभाव न करता न्याय करणे. धर्माचे काम म्हणजे भय, प्रीती, लाभ, यांचा विचार न करता जे सत्य आहे, तेच न्यायातून प्रकट होणे. असे झाले म्हणजे धर्माचे रक्षण होते आणि विजय होतो.

आपल्या राज्यघटनेला 77वर्षे झाली. ती चांगल्या प्रकारे कार्यरत आहे. याचे श्रेय भारतीय आत्मतत्त्वाचे प्रतिबिंब राज्यघटनेत आलेले आहे, याला आहे. डॉ. बाबासाहेबांनी म्हटल्याप्रमाणे राज्यघटना चांगली की वाईट हे राज्यघटना राबविणार्‍याच्या नियतीवर अवलंबून असते. आपण प्रजा म्हणून याबाबतीत सदैव जागरूक असायला पाहिजे. चांगले काय आणि वाईट काय हे जसे प्रत्येक व्यक्तीला समजते, तसेच सामूहिक बुद्धीलाही समजते. ही सामूहिक बुद्धी निरंतर जागी ठेवावी लागते. आपणच आपले शत्रू अथवा मित्र असतो. आपल्या सर्वांची इच्छा आपली राज्यघटना काळानुसार धर्मचक्र फिरते ठेवणारी असावी. ती लवचीक आहेच, परंतु त्या लवचीकतेचा गैरफायदा घेतला जाणार नाही, याकडेही आपले लक्ष हवे.
Powered By Sangraha 9.0