...त्याच्यामधल्या जिंदादिल वृत्तीनं मृत्यूवरही एकवार मात केली. 11 नोव्हेंबरला जेव्हा सर्वांनी त्याची आशा सोडली होती, तेव्हा यमराजाला झुकांडी देऊन तो परत आला. पण 24 नोव्हेंबर 2025 या दिवशी मात्र त्याच्यासारख्या बुलंद व्यक्तीलाही मृत्यूपुढे हार पत्करावी लागली. अभिनेता धर्मेंद्र हा एक खिलाडू वृत्तीचा आणि सुस्वभावी माणूस होता. जीवनमृत्यूच्या खेळात एकदा जीवदान मिळालं, त्यावर समाधान मानून त्यानं आपला ओरिजिनल ‘ढाई किलो का हाथ’ आयुष्याच्या हातातून सोडवून घेतला.
रुढार्थानं धर्मेंद्र स्टार नव्हता. प्रसिद्धीचा झगमगाट त्याच्या काळात वाट्याला आला तो राजेश खन्नाच्या. पण धर्मेंद्रला त्याची तमा नव्हती. रुबाबदार व्यक्तिमत्त्व, देखणा चेहेरा, उमदेपणा, बुलंद आवाज, खेळकर विनोद आणि आर्जवी पण समंजस रोमान्स एवढी सामग्री त्याला मॅटिनी आयडॉल बनायला पुरेशी होती. त्याच्या व्यक्तिमत्त्वात जो सहजपणा होता, एक स्वाभाविक निरागसता होती त्याच्या जोरावर त्यानं प्रेक्षकांना आपलंसं केलं होतं. स्टारपणाची लाट येते आणि जाते; धर्मेंद्रची लोकप्रियता मात्र तब्बल सहा दशकं टिकून राहिली.
धर्मेंद्र केवल किशन देवलचा जन्म 8 डिसेंबर 1935चा. पंजाबमधल्या नसराली नावाच्या छोट्याशा गावातून तो एकदम फिल्म इंडस्ट्रीत अवतरला, तो फिल्मफेअरच्या एका टॅलेंट स्पर्धेच्या माध्यमातून. ‘दिल भी तेरा, हम भी तेरे’ (1960) हा त्याचा पहिला चित्रपट. सुरुवातीला त्याला बराच संघर्ष करावा लागला खरा; पण ‘फूल और पत्थर’मधे मीनाकुमारीबरोबर तो पडद्यावर झळकला आणि त्याचं नशीब पालटलं. हा चित्रपट भारताबरोबरच सोव्हिएत युनियनमधेही गाजला.
या चित्रपटाचं एक वैशिष्ट्य म्हणजे त्यातील, धर्मेंद्र आपला शर्ट काढून थंडीने कुडकुडत असलेल्या भिकारणीच्या अंगावर घालतो ते दृश्य त्याच्यातील संवेदनशील वृत्तीचे दर्शन घडविणारे होते. मुख्य म्हणजे ह्या दृश्याची कल्पना त्याची स्वत:ची होती. एका विधवेच्या आयुष्यात एका तरण्याबांड, गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या जवानामुळे निर्माण होणारी वादळं, या मूळ विषयाला उठाव देणारी. तेव्हा पडद्यावर शर्ट उतरवणारा सलमान खान आजच्या पिढीला ठाऊक असला तरी असे प्रथम करणारा धर्मेंद्र होता. मात्र त्यामागची पार्श्वभूमी वेगळी होती. हिरोच्या व्यक्तिमत्त्वातल्या माणुसकीचे दर्शन त्यातून झाले होते. त्याच्या काळातले अभिनेते आपल्या शरीरयष्टीकडे फारसं लक्ष देत नसत. उत्तम शरीरसंपदा लाभलेल्या धर्मेंद्रला ते शक्य झालं, आणि भारतीय पडद्यावर मर्दानी सौंदर्याचा आविष्कार झाला. पुढे सलमाननं स्वत:च ‘द मोस्ट हँडसम लुकिंग मॅन’ अशा शब्दांत धर्मेंद्रची प्रशंसा केली.
हा गडी अजून थोडा कच्चा असला तरी, ‘लंबी रेस का घोडा’ आहे हे निर्मात्यांनी लगेच ओळखलं. एकदा मीनाकुमारीसारख्या उच्च श्रेणीतल्या अभिनेत्रीनं त्याला नायक म्हणून स्वीकारल्यावर त्या काळातल्या सर्वच गुणी अभिनेत्रींना साथ देण्याचा त्याला जणू परवानाच मिळाला. नूतन, नंदा, वैजयंतीमाला, माला सिन्हा, वहिदा रेहमान, तनुजा, आशा पारेख, सुचित्रा सेन, शर्मिला टागोर अशा सर्व आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर तो ताकदीनं उभा राहिला. यांतल्या बर्याच अभिनेत्री त्याच्यापेक्षा वयानं मोठ्या होत्या. पण त्याच्यापाशी जी सालस, समंजस परिपक्वता होती, तिच्या जोरावर त्यानं हे सर्व चित्रपट निभावून नेले. तो त्यांच्यापुढे फिका पडला नाही.
मुळात दारासिंगचा वारस शोभेल असा हा रांगडा वीर. ‘धरम करम’मध्ये या दोघा पहिलवान गड्यांनी पडद्यावर बरंच शौर्य गाजवलं होतं. त्यांची दाट मैत्रीसुद्धा होती. दारासिंग अत्यवस्थ असताना धर्मेंद्रनं ‘त्याच्यासाठी प्रार्थना करा’ असं आवाहन आपल्या चाहत्यांना केलं होतं. उमदी आणि दिलदार वृत्ती हे त्या दोघांमधलं साम्य होतं.

मात्र धर्मेंद्रला बिमल रॉय, हृषिकेश मुखर्जी, प्रमोद चक्रवर्ती, रमेश सिप्पी यांच्यासारखे कसलेले दिग्दर्शक लाभले. त्यामुळे तो एका साच्यात अडकला नाही. त्याच्या वाट्याला देमार किंवा पोशाखी चित्रपट कमी आले. त्यातही ‘आँखें’सारख्या बॉलीवूडच्या पहिल्यावहिल्या भव्य हेरपटात आपला रांगडेपणा बाजूला सारून, त्यानं जेम्स बाँडची स्टायलिश अॅक्शन सुरेख रंगवली आहे. रोमान्स, कॉमेडी आणि भावपूर्ण ड्रामा अशा विविध प्रकारचे चित्रपट त्यानं यशस्वी करून दाखवले.
हृषिकेश मुखर्जी यांच्या ‘सत्यकाम’ चित्रपटातली सत्यप्रिय आचार्य ही त्यानं साकारलेली एक उत्तम भूमिका. आयुष्यभर सत्याची कास बाळगणारा हा माणूस, आंतरिक संघर्ष आणि नैतिक तडफड यांना कसा सामोरा जातो ते रंगवताना धर्मेंद्रच्या अभिनयातली खोली जाणवते. या व्यक्तिरेखेतल्या अनेक सूक्ष्म छटा त्याला साकार करता आल्या. उत्तमकुमार या बंगाली अभिनेत्याची आठवण करून देणारी त्याची ही कामगिरी होती.
‘अनुपमा’ हा एक त्यालाच केवळ जमू शकला असता असा चित्रपट. त्याचा इमोशनल इंटेलिजन्स या चित्रपटात प्रकर्षानं जाणवतो. प्रेयसीला समजून घेणारा संवेदनाक्षम आणि हळुवार प्रियकर त्यानं संयमानं आणि भावसामर्थ्यानं रंगवला आहे. इथे कदाचित संजीवकुमार शोभला असता, पण नाही! त्याची बोजड शरीरयष्टी आड आली असती.

‘शोले’च्या यशामध्ये धर्मेंद्रचा खूप मोठा वाटा आहे. वीरूचा गमत्या स्वभाव, त्याचं शौर्य, त्याची दिलेर दोस्ती, त्याचे दुखरे कंगोरे हे सारं प्रेक्षकांनी अक्षरश: डोक्यावर घेतलं. वीरू पाण्याच्या टाकीवर चढतो ते दृश्य त्याच्या आग्रहावरून घेतलं गेलं. त्यात त्यानं खूप धमाल केली आहे.
त्याची कॉमेडी इतरांपेक्षा जास्त सहज आणि तालेवार होती. तो कधी बावळट किंवा अतिरेकी आचरट वाटत नाही. आपल्याच एखाद्या गमत्या, थट्टेखोर मित्रासारखा वाटतो. सहजपणा, डेड पॅन आविर्भाव आणि अचूक टायमिंग ही त्याच्या विनोदाची बलस्थानं. ‘फांदेबाज’ हा चित्रपट त्याच्या विनोदी अभिनयासाठी पाहावा, इतका सुरेख जमलाय. त्यात असरानीबरोबरच्या एका दृश्यात त्यानं देव आनंदची कृत्रिम, वेगवान डायलॉग डिलिव्हरी आणि दिलीप कुमारची संथ, नाट्यपूर्ण डायलॉग डिलिव्हरी यांची नक्कल पाठोपाठ करून दाखवली आहे,
1997 मध्ये ‘फिल्मफेअर लाइफटाइम अचीव्हमेंट अॅवार्ड’ मिळेपर्यंत धर्मेंद्रच्या अभिनयगुणांची दाखल बॉलीवूडनं अजिबात घेतली नव्हती, याची त्याला खंत होती. पण या एका सन्मानानं त्याच्या उपेक्षेची भरपाई झाली. 2012 मध्ये त्याला पद्मभूषण सन्मान मिळाला, तो तर त्याच्यापेक्षा सरस असलेल्या त्याच्या अनेक नायिकांनासुद्धा मिळालेला नाही.
त्याच्या पडद्यावरच्या आणि पडद्याबाहेरच्या व्यक्तिमत्त्वात फारसा फरक नव्हता. आंतरिक शक्ती, सचोटी आणि संवेदनशीलता यांचा मिलाफ त्याच्या व्यक्तिमत्त्वात झाला होता.‘गरम धरम’ ही जरी त्याची ओळख असली तरी अंतर्यामी तो तितकाच नरमही होता. त्यामुळे प्रेक्षकांचं त्याच्याशी ताबडतोब नातं जुळून जात असे. बॉलीवूडमधले प्रवाह काळाबरोबर बदलत गेले, पण त्यांच्याशी जुळवून घेणं त्याला त्याच्या ह्या मूलभूत गुणांमुळे अवघड गेलं नाही. मीनाकुमारी आणि हेमामालिनी यांच्यासारख्या अनेक अभिनेत्रींबरोबर सहज जुळून गेलेली केमिस्ट्री हे त्याच्या यशाचं आणखी एक कारण होतं.

सध्याचा त्याचा गाजलेला चित्रपट म्हणजे ‘रॉकी और रानी की अजब प्रेमकहानी’. शबाना आझमी धर्मेंद्रची भूतकाळातली प्रेयसी असते. एका धुकाळ क्षणी, आता वार्धक्याने विकल झालेला धर्मेंद्र सर्वांच्या देखत तिचं चुंबन घेतो आणि त्याच्या कुटुंबात हलकल्लोळ माजतो. धर्मेंद्रच्या सध्याच्या वयाला आणि विस्मरणशील अवस्थेला सर्वथा योग्य अशी ही भूमिका त्यानं अगदी सहजपणे वठवली आहे. ऐंशीच्या घरात एखाद्या अभिनेत्याला असं गरम दृश्य करायला मिळणं हा एक विक्रमच! तो गरम धरमच्या नावावर जमा होणं हेही त्याला साजेसंच.
अखेरपर्यंत ‘पिक्चर अभी बाकी है’ या उक्तीला साजेसं जगलेल्या धर्मेंद्रचा एक चित्रपट अजून बाकी आहे. ‘इक्कीस’ ह्या चित्रपटात अमिताभ बच्चनच्या नातवाबरोबर त्यानं चंदेरी पडदा वाटून घेतला आहे. डिसेंबरमधे हा चित्रपट लागेल तेव्हा आपल्या चाहत्यांसाठी धर्मेंद्र एका अर्थानं पुन्हा परतून येईल!