संकल्पसिद्धी नव्हे, युगारंभ

विवेक मराठी    26-Nov-2025   
Total Views |
अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या ध्वजारोहणाचा प्रसंग म्हणजे फक्त एका विशिष्ट ध्वजाचे आरोहण नव्हते. हा प्रसंग म्हणजे फक्त संकल्पसिद्धी सुद्धा नव्हती. या प्रसंगाचे महत्त्व, या सर्वांपेक्षा बरेच जास्त आहे. ही धर्मध्वजा फडकवण्याचा प्रसंग म्हणजे भारताच्या स्वतंत्र, सार्वभौमिक धोरणाची जाहीर ग्वाही आहे. हा प्रसंग म्हणजे देशासाठी सर्वार्थाने एक युगारंभ आहे. स्वाभिमानाचा, ‘स्व’बोध जागरणाचा, देशात निर्माण होत असलेल्या प्रचंड आत्मविश्वासाचा..!

rammandir
 
अयोध्येतील ते अत्यंत उत्साही आणि आल्हाददायक वातावरण. उत्तरेतल्या त्या गुलाबी थंडीत, हव्याहव्याशा वाटणार्‍या उन्हाचे उबदार आवरण. समोर श्रीराम मंदिराचा भव्य आणि विस्तीर्ण पट. मंदिराच्या प्रांगणात बसलेले, एकाग्र चित्ताने मंदिराच्या शिखराकडे एकटक बघणारे हजारो रामभक्त. ऐन दुपारचा अभिजित मुहूर्त...
 
मंगळवार. शुक्ल पक्ष पंचमी. विक्रम संवत 2082 चा मार्गशीर्ष महिना. (इंग्रजी दिनांकाप्रमाणे, 25 नोव्हेंबर 2025).
 
बरोबर 12 वाजून 3 मिनिटांनी, जेव्हा या देशाची सार्वभौम धर्मध्वजा, श्रीराम मंदिराच्या शिखरावर स्थापित झाली, तेव्हा काळ क्षणभर थबकला. तेथे उपस्थित असलेल्या अनेकांच्या डोळ्यांत तर आनंदाचे अश्रू आलेच, पण हा सोहळा जगभरातून बघणार्‍या कोट्यवधी हिंदूंनी कृतार्थतेचा जबरदस्त जल्लोष केला. अनेकांसाठी हा परम आनंदाचा ऐतिहासिक क्षण होता.
 
 
धर्मध्वजा स्थापित होण्यापूर्वीचे 3 मिनिटं 15 सेकंद हे रोमांचकारी होते. अवघं जग श्वास रोखून, डोळ्यात प्राण आणून हा ध्वजारोहणाचा सोहळा बघत होतं. वर जाणार्‍या धर्मध्वजाकडे एकाग्र चित्ताने बघणार्‍या सरसंघचालक डॉ. मोहनजींचा कृतार्थ चेहरा आणि भावनिकतेने प्रणाम करणार्‍या, मोदीजींचे थरथरणारे हात, हे सारं व्यक्त करत होते. या देशात खूप काही अद्भुत घडत होतं. देशाचे नेतृत्व करणारे दोन कर्णधार, हा सोहळा घडवून आणत होते. हे सार खूप सुखद होतं. आनंददायी होतं. ऐंशीच्या दशकात, जनजागरणातून सुरू झालेल्या श्रीरामजन्मभूमीमुक्ती आंदोलनाची ही सफल संकल्पसिद्धी होती. श्रीरामजन्मभूमी फक्त मुक्तच नाही झाली, तर तिथे देशातल्या कोट्यवधी रामभक्तांनी मिळून, एक प्रचंड असं भव्य श्रीराम मंदिर उभारून दाखवलं होतं. आज त्या मंदिर निर्माणाची पूर्णाहुती होती..!

rammandir 

धर्मध्वजा
25 नोव्हेंबरला फडकवलेली धर्मध्वजा ही मूळ अयोध्येच्या इक्ष्वाकू कुळाची धर्मध्वजा होती. काही हजार वर्षांपासून धर्मध्वजाची ही संकल्पना विस्मृतीत गेली होती. मात्र आत्मविश्वासाचं प्रतीक असलेल्या या परंपरेचं पुनरुज्जीवन होत आहे.

श्रीरामाच्या काळातील धर्मध्वजा ही त्रिकोणी आकाराच्या केशरी कापडाची होती. हा ध्वज 22 फूट लांब आणि 11 फूट रुंद आहे. या धर्मध्वजावर इक्ष्वाकू कुळाचे ऊर्जास्रोत, प्रतीक चिन्ह, भगवान सूर्यनारायण आहेत. आदिशक्तीचा उद्घोष, ॐ आहे. याशिवाय या धर्मध्वजावर ‘कोविदार वृक्ष’ अंकित केलेला आहे.
 
हा कोविदार वृक्ष म्हणजे मंदार आणि पारिजात वृक्षांच्या संकरातून तयार झालेला वृक्ष आहे. काश्यप ऋषींनी या दोन वृक्षांतून हा वृक्ष तयार केला असं म्हटलं जातं. हा वृक्ष देवतांना प्रिय असून, याच्या आजूबाजूला सकारात्मक शक्ती असते अशी मान्यता आहे. वसंत ऋतूच्या आगमनाच्या वेळेस कोविदार वृक्ष फुललेला, बहरलेला असतो.
 
वाल्मिकी रामायणात या कोविदार वृक्षाचा उल्लेख अनेक ठिकाणी केलेला आहे. मारुतीराया जेव्हा सीतेला शोधायला लंकेच्या अशोक वाटिकेत जातात, तेव्हा त्या वनात असलेल्या झाडांबरोबर कोविदार झाडांचाही उल्लेख आहे. त्याचप्रमाणे श्रीराम, सीता आणि लक्ष्मणासहित चित्रकूट पर्वतावर रहायला जातात, तेव्हाही वनातील वृक्षांमध्ये कोविदार वृक्षाचा उल्लेख येतो.

मात्र कोविदार वृक्ष हा अयोध्येच्या राज्यध्वजावर होता, हे वाल्मिकी ऋषींनी अत्यंत स्पष्टपणे लिहून ठेवलेले आहे. वाल्मिकी रामायणात अयोध्या कांड यामध्ये तसा स्पष्ट उल्लेख आहे. श्रीराम, जानकी आणि लक्ष्मण यांच्यासह चित्रकूटच्या वनात बसलेले असताना त्यांना दूरवर धुळीचे लोट उठलेले दिसतात, रानातले पशुपक्षी गोंधळून आवाज करायला लागतात. दुरून कुठून तरी प्रचंड मोठं सैन्य येतंय, असं श्रीरामांना वाटतं. ते लक्ष्मणाला शाल वृक्षाच्या वरच्या फांदीवर चढून, कोणाचे सैन्य येत आहे, ते बघायला सांगतात. लक्ष्मणाला दुरून उडणार्‍या धुळीतूनही रथावर फडकणारं राजचिन्ह दिसतं. त्या धर्मध्वजावरील कोविदार वृक्षाचं चित्र ही दिसतं. लक्ष्मण श्रीरामाला म्हणतो -

एष वै सुमहान् श्रीमान् विटपी सम्प्रकाशते ।

विराजत्युज्ज्वलस्कंध: कोविदारध्वजो रथे ॥

अर्थात, दूरवर जो वृक्ष दिसतोय, त्याच्याजवळ जो रथ आहे, त्यावर उज्ज्वल असा कोविदार वृक्षाने अंकित असलेला ध्वज दिसतो आहे. एक आणखी उल्लेख असा आहे -

दुरात्तु तु महत् सैन्यमायान्तम् भरतस्य तु ।
 
ध्वजाग्रं कोविदारस्य लक्ष्मणोऽद्भ्योरिवोत्तम् ॥

अर्थात, दूरवरून भरताचे विशाल सैन्य येताना दिसले. त्या सैन्याच्या ध्वजाच्या अग्रभागी असलेले कोविदार वृक्षाचे चिन्ह, लक्ष्मणाला जणू आकाशातील मेघाप्रमाणे दिसत होते.
 
अयोध्येची ही धर्मध्वजाची परंपरा, कुरुक्षेत्र युद्धापर्यंत होती. या युद्धात अयोध्येचा राजा, इक्ष्वाकुवंशी बृहद्बल, कौरवांच्या बाजूने लढला. युद्धानंतर हा मरण पावल्याने आणि एकूणच महाभारत युद्धात बराच विनाश झाल्याने, अयोध्येची स्थिती वाईट झाली होती आणि त्यामुळे धर्मध्वजाची परंपरा खंडित झाली होती, जी पुनरुज्जीवित करण्यात आली.
 
 
हे काही सहज घडलेलं नाही. याला इतिहास आहे पाचशे वर्षांचा. पाचशे वर्षांच्या संघर्षाचा, लढ्याचा आणि अगणित बलिदानांचा.
आपल्याच देशात, आपल्याच आराध्य दैवताचं, आपल्याच राष्ट्रपुरुषाचं स्मारक, मंदिररूपाने उभारण्यासाठी या देशाच्या कोट्यवधी लोकांना शेकडो वर्षे संघर्ष करावा लागतो. हे फक्त भारतातच शक्य आहे..!
आणि मंदिर तरी कोणाचं..?
प्रभू श्रीरामांचं.
फक्त भारतातच नाही, तर संपूर्ण दक्षिण-पूर्व आशिया आणि जगातल्या अनेक देशांमध्ये श्रीराम आजही आराध्य दैवत आहे. काही शे वर्षांपूर्वी पर्यंत, पुरुषपूर (अर्थात पेशावर) ते पापुआ न्यू गिनीपर्यंत, श्रीरामाची गाथा रोज गायली जात होती. रामायण, महाभारत, वेद, उपनिषद, पुरुषसूक्त, श्रीसूक्त आदी या सर्व देशांच्या रोजच्या दिनचर्येचा भाग होते. त्यामुळे अर्थातच प्रभू श्रीरामाबद्दल प्रचंड आस्था होती.

अभिजित मुहूर्त

अभिजित मुहूर्त हा हिंदू पंचांगातील सर्वांत उत्तम आणि सर्वांत शुभ मानला जाणारा मुहूर्त आहे. याला ‘सर्वसिद्ध’ किंवा ‘सर्व कार्यसिद्ध’ असा दर्जा दिलेला आहे.

हा मुहूर्त मध्यान्ह वेळेचा आहे. सूर्योदय आणि सूर्यास्त यांच्या मधल्या कालखंडाचा नेमका मध्यबिंदू, म्हणजे ‘अभिजित मुहूर्त’. साधारणपणे हा 48 मिनिटांचा असतो. 25 नोव्हेंबरला अयोध्येत सूर्योदय 6.28 ला झाला, तर सूर्यास्त 5.28 ला झाला. त्याप्रमाणे मध्यकाल हा 11.47 आला होता. अभिजित मुहूर्त हा 11.21 ते दुपारी 12.11 पर्यंत, अर्थात 48 मिनिटे होता.
 

rammandir 
 
जगातील सर्वात जास्त मुस्लीम लोकसंख्या असलेला देश आहे, इंडोनेशिया. याला त्यांच्या भाषेत दिपांतर (समुद्रापारचा भारत) म्हणतात. या इंडोनेशियात, प्रभू श्रीरामावर रोज नृत्यनाटिका सादर केली जाते. रामलीलेचं मंचन होत असतं. हे सर्व कार्यक्रम करणारे आणि यात भाग घेणारे मुसलमान असतात. पण त्यांना आपल्या ’विरासत’बद्दल आस्था असते. ते मुस्लीम असले तरी आजही, श्रीराम हे राष्ट्रपुरुषाच्या रूपात त्यांचे आराध्य आहे. थायलंडच्या राजवंशाने तर आपल्या नावात रामाचा समावेश केलेला आहे. बँकॉकच्या मुख्य रस्त्यांना रामा-1, रामा-2 अशी नावं देण्यात आलेली आहेत.
 
 
मलेशिया, मॉरिशस, त्रिनिदाद, फिजी, लाओस, कंबोडिया, म्यानमार, श्रीलंका... या सर्व देशांच्या लोकजीवनात, समाज जीवनात, समाजमनात श्रीराम पूर्णपणे स्थापित झालेले आहेत. दुर्दैवानं आपल्या भारतात मात्र 2014च्या पूर्वी, श्रीरामाचे अस्तित्वच नाकारण्यात आले होते.
 
 
भारतावर आक्रमण करून आलेल्या मुस्लीम आक्रमकांचा उद्देश स्पष्ट होता. त्यांना हिंदूंच्या सर्व पंथातील श्रद्धास्थानांना नष्ट करायचं होतं. ते त्यांनी केलं.
 
 
 
15 ऑगस्ट 1947 ला, खंडित स्वरूपात का होईना, पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आपल्या गौरवशाली इतिहासाची, आपल्या सांस्कृतिक, आध्यात्मिक वारशाची पुनर्स्थापना आवश्यक होती. त्यातून देशाचा ’स्व’बोध जागृत झाला असता. देशात आत्मविश्वास निर्माण झाला असता.
 
जगातील अनेक देशांनी स्वतंत्र झाल्यावर, आपल्या पाठीवरचं, आक्रमकांच्या परंपरांचं, संस्कृतीचं जोखड काढून फेकून दिलं होतं. आपलं ’स्वत्व’ परत मिळवलं होतं. स्पेनवर सन 711 मध्ये मुस्लीम सैन्यांने आक्रमण केलं आणि पुढल्या दहा-बारा वर्षांत, संपूर्ण स्पेन, पोर्तुगाल इत्यादी देशांवर, त्यांना परास्त करून ताबा मिळवला होता. स्पेन मधली मुस्लीम सत्ता 781 वर्षे टिकली. स्पेनवर राज्य करणारे शेवटचे मुस्लीम म्हणजे ग्रानाडाचे नासरीड साम्राज्य होते. या ग्रानाडा साम्राज्यातील राजांनी चर्चेस पाडण्याचा धडाका लावला होता. संपूर्ण आयबेरिया (स्पेन आणि पोर्तुगीज) चा 90 ते 95% भूभाग हा मुस्लीम आक्रमकांच्या ताब्यात होता. पण 1492 मध्ये, म्हणजे ज्या वर्षी कोलंबस भारत शोधण्याच्या नादात अमेरिकेत पोहोचला होता त्याच वर्षी, फर्डिनांड आणि इसाबेला या कॅथोलिक राजांनी इस्लामी सैन्याचा दारूण पराभव केला. त्यांना स्पेन, पोर्तुगाल येथून हाकललं. पण इतक्यावरच ते थांबले नाहीत. आक्रमकांनी चर्चेस पाडून ज्या मशिदी उभारल्या होत्या, त्या सर्व, म्हणजे 500 पेक्षा जास्त महत्त्वाच्या मशिदी पाडून तिथे परत चर्चेस उभारले...
 
मुळात आपलं स्वत्व, आपला ’स्व’ परत मिळवणं, ही तर जगाची रीत आहे. मात्र आपण ही रीतभात विसरून गेलो होतो.
 
 
... आणि म्हणूनच गेली पाचशे वर्षे आपण श्रीरामजन्मभूमीची मुक्तता व्हावी म्हणून संघर्ष करत होतो. या संघर्षात लाखो लोकांनी आत्मार्पण केलं. कोणाकोणाची नाव घ्यावी..? सारेच परम रामभक्त. राममंदिर तोडायला आलेल्या मीर बाकी आणि जलाल शाहशी निधड्या छातीनं भिडणारे बाबा श्यामनंदन जी, मंदिराचं रक्षण करत बाबरच्या चतुरंग सेनेशी लढत देत, बलिदान देणारे भीटीचे राजा महताबसिंह आणि त्यांचे 74 हजार वीर सैनिक, 90 हजार राम भक्तांची फौज तयार करून वीरगतीला गेलेले पंडित देवीदिन पांडे, हंसवरचे राणा रणविजय सिंह आणि कमांडो शैलीने लढून वीरमरण पत्करलेले त्यांचे वीस हजार सैनिक, पतीच्या मृत्यूनंतरही राम मंदिरासाठी गनिमी काव्याने इस्लामी आक्रमकांशी लढणारी राणा रणविजय सिंहांची पत्नी जयराजकुमारी... महेश्वरानंद, बलरामचारी, सरदार गजराज सिंह, राजा जगदंबा सिंह, कुंवर गोपाल सिंह, बाबा वैष्णवदास आणि त्यांची ती प्रसिद्ध ’चिमटा वाली सेना’, या बाबा वैष्णवदासांची मदत करणारे शीख गुरू, अमेठीचे राजा गुरुदत्त, पीपरपुरचे राजकुमार, बाबा रामचरण दास... या सर्वांपासून तर 1990 मध्ये अयोध्येत मुलायमसिंहाच्या आज्ञेने झालेल्या गोळीबारात हुतात्मा झालेले, कोलकाताचे कोठारी बंधू, राम कोठारी आणि शरद कोठारी... किती नावं घ्यायची?
 

प्रभू श्रीरामांकरता आपलं तारुण्य, आपलं पूर्ण जीवन उधळून टाकणारे असे लाखो रामभक्त आहेत, ज्यांनी संघर्षाची ही ज्योत तेवत ठेवली. या रामभक्तांच्या, कारसेवकांच्या रक्ताने शरयू नदी पवित्र झालेली आहे. अयोध्येच्या कणाकणांत या बलिदानी रामभक्तांच्या अगणित कथा दडलेल्या आहेत. या सर्व कारसेवकांचे, रामभक्तांचे, अशोकजी सिंघल, मोरोपंत पिंगळेंसारख्या श्रीराममंदिराचा ध्यास घेतलेल्या पुण्यात्म्यांचे आत्मे, स्वर्गातून अत्यंत कृतार्थ भावनेने हे सारं विलक्षण दृश्य डोळ्यात साठवून घेत असतील. या सर्वांचे आशीर्वाद, या रामजन्मभूमीच्या कार्यकर्त्यांना निश्चितच मिळत असतील.
 
 
मुळात ध्वजारोहणाचा हा प्रसंग म्हणजे फक्त एका विशिष्ट ध्वजाचे आरोहण नव्हते. हा प्रसंग म्हणजे फक्त संकल्पसिद्धी सुद्धा नव्हती. या प्रसंगाचे महत्त्व, या सर्वांपेक्षा बरेच जास्त आहे. ही धर्मध्वजा फडकवण्याचा प्रसंग म्हणजे भारताच्या स्वतंत्र, सार्वभौमिक धोरणाची जाहीर ग्वाही आहे. हा प्रसंग म्हणजे देशासाठी सर्वार्थाने एक युगारंभ आहे.
 
 
बरोबर 351 वर्षांपूर्वी, रायगडच्या तख्तावर छत्रपती शिवाजी महाराजांनी हेच घडवून आणले होते. जेष्ठ शुद्ध त्रयोदशी, अर्थात 6 जून 1674 ला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक करवून घेतला. हे फार आवश्यक होतं. सामान्य प्रजाजन, देशोदेशींचे राजे-राजवाडे, या सार्‍यांच्या मनी हा आत्मविश्वास निर्माण करणं आवश्यक होतं, की हे हिंदवी स्वराज्य म्हणजे फक्त आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही यांच्या विरुद्ध पुकारलेलं बंड नाही, तर हे स्वराज्य म्हणजे एक सार्वभौम सत्ता आहे, जिथे आपल्या भाषेत व्यवहार होईल. आपल्या पद्धतीने न्यायनिवाडा होईल. आपणच आपल्या राज्यकारभाराचे निर्णय घेऊ शकू. छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदूंची अशी सार्वभौम सत्ता निर्माण केली. पुढे पार 1818 पर्यंत मराठ्यांची ही सत्ता अबाधित राहिली.
 
 
याचप्रमाणे, 25 नोव्हेंबरला केलेले ध्वजारोहण फक्त एक धार्मिक सोहळा नाही. श्रीराम मंदिराच्या पूर्णतेची संकल्पसिद्धी सुद्धा नाही. तर हा एक ’युगारंभ’ आहे, स्वाभिमानाचा, ’स्व’बोध जागरणाचा, देशात निर्माण होत असलेल्या प्रचंड आत्मविश्वासाचा..!