56 व्या 'IFFI'मध्ये बोंबिलवाडीच्या हिटलरची हवा!

विवेक मराठी    26-Nov-2025
Total Views |
bombilwadi movie
@अमोघ पोंक्षे 9421010971
गोवेकरांचा 'मु. पो. बोंबिलवाडी' चित्रपटाच्या IFFI मधील स्क्रिनिंगला हाऊसफुल प्रतिसाद
IFFI
गोवा येथे ’इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ (IFFI ) चित्रपट महोत्सव नुकताच पार पडला. या महोत्सवात विवेक फिल्मस् निर्मित मु. पो. बोंबिलवाडी या चित्रपटाने निश्चितच आपली एक वेगळी छाप सोडली आहे झाली. नजीकच्या भविष्यात विवेक फिल्मस्सारख्या नव्याने आपले अस्तित्व सिद्ध करू पाहणार्‍या चित्रपट निर्मिती संस्थेसाठी निश्चितच एक आश्वासक चित्र निर्माण करणारा एक मैलाचा दगड ठरेल.
2025 वर्षाची सुरुवात ज्या धमाल मराठी विनोदी चित्रपटाने झाली होती त्याच ’मु. पो. बोंबिलवाडी’ चित्रपटाने 56 व्या ’इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’चा गोव्यातील मंचसुद्धा निखळ हास्याने उजळून टाकला. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर या कालावधीत गोवा येथे नुकताच IFFIचा दिमाखदार सोहळा पार पडला. या दरम्यान ’मु. पो. बोंबिलवाडी’ या मराठी चित्रपटाची निवड ’इंडियन पॅनारोमा’ या विभागाअंतर्गत करण्यात आली होती.
 
 
’दुर्दम्य लोकमान्य’ आणि ’कालजयी सावरकर’ या दोन माहितीपटांच्या निर्मितीनंतर विवेक फिल्म्सचे व्यावसायिक चित्रपट निर्मितीत दमदार पहिले पाऊल मु. पो. बोंबिलवाडी चित्रपटाच्या निमित्ताने याआधीच अधोरेखित झाले होते. मात्र आता वर्षाच्या शेवटी चित्रपट सृष्टीत प्रतिष्ठित समजल्या जाणार्‍या ’इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’मध्ये मु. पो. बोंबिलवाडी चित्रपटाने स्थान मिळवत याआधी मिळवलेल्या निर्भेळ यशावर शिक्कामोर्तबच केले आहे.
 
 
मागील आठवड्यात 20 नोव्हेंबर रोजी ’इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया’ च्या 56 व्या सीजनचे दिमाखात उद्घाटन झाले. याच शृंखलेत 22, 23 आणि 24 नोव्हेंबर रोजी या महोत्सवाअंतर्गत ’मु. पो. बोंबिलवाडी’ या चित्रपटाचे एकूण तीन शोज गोव्यातील विविध मल्टिप्लेक्समध्ये पार पडले ज्याला प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. गोव्यातील स्थानिक प्रेक्षकांसह सदर चित्रपट महोत्सवाला उपस्थित असलेल्या अनेक परदेशी अमराठी प्रेक्षकांनीही हा चित्रपट सबटायटलसह पाहात आपल्या पसंतीची मोहर यावर उमटवली.
 
IFFI
 
22 नोव्हेंबर 2025 रोजी पार पडलेल्या मु. पो. बोंबिलवाडी चित्रपटाच्या पहिल्या विशेष स्क्रिनिंगसाठी चित्रपटाची टीम उपस्थित होती. यामध्ये चित्रपटाचे लेखक-दिग्दर्शक परेश मोकाशी, विवेक फिल्म्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी व निर्माते भरत दिलीप शितोळे, अभिनेत्री रितिका श्रोत्री आणि विवेक फिल्मचे कार्यकारी सदस्य कमलेश उदासी यांचा समावेश होता. चित्रपटाच्या स्क्रिनिंगआधी चित्रपटाच्या टीमचे रेड कार्पेटवर दिमाखात आगमन झाले. यानंतर प्रेक्षकांनी हाऊसफुल असलेल्या प्रेक्षागृहात सर्वांचा यथोचित सत्कार महोत्सवाच्या विशेष अधिकार्‍यांच्या हस्ते करण्यात आला.
 
 
या स्क्रिनिंगदरम्यान प्रमुख अतिथी म्हणून गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे कॅबिनेट मंत्री दिगंबर कामत यांनीही उपस्थित राहून चित्रपटाच्या टीमसह उपस्थितांशी संवाद साधला. चित्रपटाच्या स्क्रिनिंगनंतर प्रेक्षकांनीसुद्धा उपस्थित कलाकारांशी संवाद साधत चित्रपट आवडल्याची थेट पोचपावती दिली. अनेक प्रेक्षकांनी या चित्रपटातून केल्या गेलेल्या नर्मविनोदी शैलीचे कौतुक करत या चित्रपटाचा भाग-2 यायला हवा, अशी इच्छासुद्धा व्यक्त केली.
 
 
याच दिवशी चित्रपटाच्या संपूर्ण टीमला फिल्म बाजारमधील मुंबई फिल्मसिटीच्या स्टॉलला भेट देण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. यादरम्यान मुंबई फिल्मसिटीचे सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर यांनी मु. पो. बोंबिलवाडीच्या टीमचे स्टॉलवर स्वागत करत उपस्थित पाहुण्यांचा यथोचित सन्मान केला.
IFFI
23 नोव्हेंबर रोजी मु. पो. बोंबिलवाडी चित्रपटाच्या टीमसोबत उपस्थित पत्रकारांनी मुक्त संवाद साधला. मुख्यतः मंचावर उपस्थित लेखक दिग्दर्शक परेश मोकाशी आणि निर्माते भरत दिलीप शितोळे यांनी पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. या दरम्यान अभिनेत्री रितिका श्रोत्री यासुद्धा उपस्थित होत्या. या महोत्सवात संपूर्ण भारतातून सर्व भाषा मिळून फक्त वीस फिल्मस् निवडल्या जातात, त्यातून विवेक फिल्मस्निर्मित मु. पो. बोंबिलवाडी या चित्रपटाची निवड जाली, हे विशेष. आठ दिवस चालेल्या या चित्रपट महोत्सवात मु. पो. बोंबिलवाडी या चित्रपटाने निश्चितच आपली एक वेगळी छाप सोडली आहे. जी नजीकच्या भविष्यात विवेक फिल्म्स सारख्या नव्याने आपले अस्तित्व सिद्ध करू पाहणार्‍या चित्रपट निर्मिती संस्थेसाठी निश्चितच एक आश्वासक चित्र निर्माण करणारा एक मैलाचा दगड ठरेल, यात काही शंका नाही.