कर्नाटक राज्य नेहमीच आपल्या राजकीय कर’नाटकी’ पणामुळे चर्चेत असतं.. देशात ज्या तीन राज्यांत काँग्रेसची सरकारे आहेत त्यातील बहुमताने अगदी मजबूत असलेले सरकार म्हणजे कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार! सर्वत्र दारुण पराभव होत असतांनाच काँग्रेसला कर्नाटकात साथ मिळाली.. ही साथ काँग्रेससाठी खरंतर एक संजीवनी होती. देशभरातील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसाठी उत्साह निर्माण करणारी होती. पण हा विजय काँग्रेस जास्तकाळ टिकवेल असे दिसत नाही. कारण ज्यांनी या यशासाठी अहोरात्र महेनत घेतली त्या डी. शिवकुमार यांंना मुख्यमंत्रीपदी न बसता, ज्येष्ठ नेते सिद्धरामया यांना बसवले आहे. आता पक्षाकडे त्यांना बाजूला करण्याची ताकद नाही. त्यामुळे तेथे अधूनमधून मुख्यमंत्रीपदासाठी संघर्ष दिसून येत असतो. नुकताच कर‘नाटकी‘ महाप्रयोग दिसून आला.. त्याचे विश्लेषण करणारा लेख...
कर्नाटकात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी ‘भारत जोडो यात्रा‘ काढली होती. ही यात्रा काय होती, त्यात काय काय झाले हे आता पुन्हा सांगायला नको. कर्नाटकमध्ये विधानसभा निवडणुका असल्याने ही यात्रा कर्नाटकातून जास्त फिरविण्याचा कार्यक्रम आखला होता. याचे अत्यंत काटेकोर नियोजन काँग्रेसचे नेते डी. शिवकुमार केले होते. यामुळे काही कालवधीनंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदा झाला. त्यामुळे या विजयाचे श्रेय शिवकुमार यांनाच जास्त द्यायला हवे. पण काँग्रेसची संस्कृती तशी नाही. विजय झाला तर तो हायकमांडमुळे आणि पराभव झाला तर स्थानिक पातळीवर नेत्यांमुळे या सूत्रानुसार बिचार्या शिवकुमार यांच्या नियोजनाला, मेहनतीला फारसे महत्त्व दिले गेले नाही. यात्रेची फलश्रुती विधानसभा निवडणूकीत दिसून आली. काँग्रेस पक्षाला 225 पैकी 136 जागा मिळाल्या, बहुमताने सरकार निवडून आले. घराणेशाहीच्या भाटगिरीमुळे विजयाचे श्रेय राहुल गांधी यांना देण्यात आले.. आजवरच्या काँग्रेसच्या परंपरेनुसार काही वेगळी अपेक्षा नव्हती. पण या विजयाचे शिल्पकार डी. शिवकुमार हेच होते, विजयासाठी त्यांनी घेतलेली मेहनत, त्यांची रणनीती व मतदारांना दिलेला विश्वास यामुळे काँग्रेसला अगदी सहज विजय प्राप्त करता आला होता हे अगदी सुस्पष्ट दिसत होते. त्यामुळे कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार आले तेव्हाच मुख्यमंत्रीपदासाठी शिवकुमार यांच्या नावाची जोरदार चर्चा झाली होती. अनेक राजकीय विश्लेषकांनी सुद्धा शिवकुमार यांचेच नाव घेतले होते. पण काँग्रेसच्या हायकंमाड मात्र वेगळाचा निर्णय घेतला. पक्षश्रेष्ठींनी वयोवृद्ध सिद्धरामय्या यांना मुख्यमंत्री करण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय काँग्रेसच्या संस्कृतीला साजेसाच होता. आजवरचा काँग्रेसचा अनुभव पाहता, हे धक्कातंत्र नव्हते तर अपेक्षितच होत. पण हे एका नव्या संघर्षाला जन्म देणारे होते. ज्या कारणांमुळे काँग्रेसचा देश पातळीवर अस्त होत आहे तीच चूक पुन्हा काँग्रेसने केली होती. याचे परिणाम आगामी काळात दिसून येणार होते. नाराज झालेले डी. शिवकुमार हे अधेमध्ये आपली सुप्त महत्त्वाकांक्षा दाखवत असतात. काही दिवसांपूर्वीही त्यांनी मुख्यमंत्रिपदासाठी जोरदार प्रयत्न केले. सिद्धरामय्या यांच्या सरकारला नुकतीच अडीच वर्षे पूर्ण झाली आहेत. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना आपल्या मंत्रीमंडळात फेरबदल करायाचे होते तर दुसरीकडे शिवकुमार यांना मुख्यमंत्रीपदी बसायचे होते. त्यासाठी आपल्या समर्थक आमदारांचा एक गट घेऊन दिल्लीला जाऊन जोरदार लॉबिंगही केली होती. त्याला काँग्रेस पक्षाने केराची टोपली दाखवली. संतापलेल्या शिवकुमार यांनी आपला राग मिडियावर काढला. आमच्यात कोणतेही मतभेद नाहीत असे उसने अवसान आणणारा निर्वाळा दिला. मिडियाने आमच्यात फूट पाडू नये अशा शब्दांत मिडियावर आगपाखडही केली. जरी त्यांनी मिडियासमोर सर्वकाही आलबेल आहे असे दाखवले असले तरी प्रत्यक्षात मात्र वस्तुस्थिती वेगळी आहे, हे कोणी नाकारू शकत नाही. त्यामुळे आगामी काळात कर्नाटकात डी. शिवकुमार यांनी मुख्यमंत्रीपदासाठी वेगळा निर्णय घेतला तर नवल वाटायला नको.
काँग्रेस पक्षाच्या अधोगतीस आपल्या पक्षाचे युवराज व काँग्रेसची रणनीती जबाबदार आहे हे अजूनही पक्षाला समजत नाही. आपण आपल्या पक्षातील भावी युवा नेत्यांना प्रोत्साहन देण्याऐवजी काँग्रेस आपल्या ज्येष्ठांचाच अधिक सन्मान करते असेच दिसून येते. कर्नाटकातही सिद्धरामया हे मूळचे जनता दलातील आहेत. ते काँग्रेसमध्ये आले आहेत तर डी. शिवकुमार हे अगदी पंचायत स्तरापासून काँग्रेसच्या विधानभवनापर्यंत आलेले नेते आहेत. मूळ काँग्रेसी आहेत. तरीही काँग्रेस त्यांचा विचार न करता सिद्धरामय्या यांनाच झुकते माप देत असते. यामागे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांचाही सुप्त पाठिंबा असण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यापूर्वी मध्यप्रदेशात काँग्रेसचे काठावर सरकार आले होते. अपेक्षेप्रमाणे तेथे नवे नेतृत्व म्हणून युवा नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना संधी देणे क्रमप्राप्त होते. पण काँग्रेसने तसं न करता तेथे पुन्हा वयोवृद्ध कमलनाथ यांना संधी दिली. अगदी वर्षभरातच काँग्रेस फुटली. ज्योतिरादित्य यांनी 22 आमदार फोडले आणि भाजपाला पाठिंबा दिला. असचाच पण फसलेला प्रयोग राजस्थानातही घडला. राजस्थानमधील विधानसभा निवडणूकीत काँग्रेसच्या विजयात युवा नेते सचिन पायलट यांच्यातील यांचा मोठा वाटा होता. पण काँग्रेसने वयोवृद्ध अशोक गेहलोत यांना पुन्हा मुख्यमंत्री बसून पायलट यांचा भ्रमनिरास केला होता. त्यामुळे अनेकवेळा काँग्रेस सरकारमध्ये गेहलोत आणि पायटल यादवी पाहण्यास मिळाली. पायलट यांनी बंडही केले पण ते फसले. आसाममध्येही असेच दिसून आले. काँग्रेसचे युवा नेते हेमंत बिस्व शर्मा यांनाही राहुल गांधी यांनी अत्यंत अपमानास्पद वागणूक दिली. त्यामुळे त्यांनीही काँग्रेसपक्षाला राम राम ठोकला होता. अशी अनेक उदाहरणे देता येतील. एकेकाळी देशातील सत्ताधारी पक्ष असलेला पक्ष आज बिहार, उत्तर प्रदेशसारख्या मोठ्या राज्यातून नामशेष होऊ लागला आहे. पण यावर कोणतेही चिंतन न करता उलट ईव्हीएम मशीन, मतदारयादी घोटाळा आहे असे भ्रामक कथ्य तयार करून जनतेची दिशाभूल करण्यात काँग्रेस पक्ष मशगूल आहेे.