ऐतिहासिक विजय - नव्या तेजस्वी पर्वाची नांदी!

04 Nov 2025 18:07:13
World Cup 2025
भारतीय महिला क्रिकेट संघाने विश्वचषक जिंकल्याने त्यांना बर्‍याच वर्षांच्या संघर्षानंतर स्वत:ची ओळख मिळालीय. खरं तर त्यांची मागच्या दहा वर्षांतील कामगिरी बघितली तर विश्वचषकातील विजय हा कधी ना कधी त्यांच्या पदरात पडलाच असता. पण तो प्रत्यक्ष पडला की, भोवतालची परिस्थिती कशी बदलते याचा अनुभव आता महिला क्रिकेटपटूंना येईल. विराट आणि रोहितसारखे त्यांना लक्षावधी चाहते नसतील. पण, नवीन चाहता वर्ग आणखी वाढेल एवढं नक्की.
केलेले प्रयत्न कधी ना कधी फळाला येतातच आणि नशिबाचं दान आपल्या बाजूला पडतंच. भारतीय महिला क्रिकेटपटूंचं तसंच झालं आहे. तिसर्‍या प्रयत्नांत का होईना विश्वचषक भारतीय महिलांच्या नावावर झालाच. त्यासाठी आणखी चांगला दिवस असू शकला असता का? नाही. कारण, 40,000 प्रेक्षक साक्षीला होते. दिवाळीचे फटाके घरोघरी शिल्लक होते आणि 3.4 कोटी लोक टीव्हीवर त्यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवून होते. मैदानात आयसीसी अध्यक्ष जय शाह, मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर, रोहित शर्मा, क्रिकेट अकादमीचे प्रमुख व्ही.व्ही.एस. लक्ष्मण असे दिग्गज खेळाडू हजर होते. यापेक्षा विजेतेपदासाठी आणखी कुठला चांगला मूहूर्त मिळणार? विजेतेपदाचं स्थळ वेगळं असू शकलं असतं का? अजिबातच नाही. कारण, विजेतेपदाच्या दिशेचा प्रवास तीन वर्षांपूर्वी इथेच तर सुरू झाला होता.
 
 
2022 मध्ये नवी मुंबईतील डी.वाय.पाटील स्टेडिअमवर विमेन्स प्रिमिअर लीगची सुरुवात झाली होती आणि तेव्हापासून आतापर्यंत डी.वाय.पाटील स्टेडिअम महिला क्रिकेटच्या बाजूने कायम उभं राहिलं आहे. इंग्लिश संघाचं कसोटी मालिकेसाठी यजमानपद त्यांनी स्वीकारलं. त्यामुळे ही मालिका होऊ शकली. आताही याच स्टेडिअमवर महिला विश्वचषकातील सर्वाधिक सामने झाले आणि डब्ल्यूपीएलने तर महिला क्रिकेटमध्ये आमूलाग्र क्रांती केली आहे. खेळाडूंना स्पर्धात्मकता आणि आर्थिक स्थैर्य या लीगने दिलं. महत्त्वाचं म्हणजे महिला खेळाडूंनाही लोकप्रियता दिली.
 

World Cup 2025 
 
क्रांती गौड, शेफाली वर्मा, अमनज्योत सिंग, श्रीचरणी यासारख्या खेळाडू लीगमधून पुढे आल्या. शिवाय हरमनप्रीत, स्मृती मंढाणा, दीप्ती शर्मा यांचाही भारतीय घराघरांमध्ये शिरकाव या लीगमुळेच झाला. कारण लोकांच्या मनातील महिला क्रिकेट विषयीची नकारात्मकता या लीगने पुसली. महिला विश्वचषकापूर्वीच्या काही जाहिराती आठवा. सामन्याचं प्रसारण करणार्‍या स्टार समूहाने भारतातील पुरुष, विराट आणि रोहित प्रमाणे स्मृती आणि हरमनप्रीतची नावं असलेल्या जर्सी घालून महिलांचा सामना पाहायला निघाल्याचं दाखवलं होतं. तर स्पर्धा सुरू झाल्यावर, ‘धावांचा पाठलाग करण्यात जेमिमा विराटसारखी माहीर आहे,’ असं एका माजी जागतिक क्रिकेटपटूने म्हणताच, त्याला तिथेच थांबवण्यात आलं. समालोचन कक्षातील इतर दोघांनी, ‘विराटचं नाव वगळलं आणि महिला क्रिकेटमध्ये जेमिमा पाठलाग करण्यात सगळ्यात हुशार आहे,’ असं ते बदलून घेतलं. मग त्या माजी क्रिकेटपटूनेही हा बदल मान्य केला.
 
 
थोडक्यात काय, तर भारतीय महिला क्रिकेटचा आता टॉप गिअर पडलाय आणि त्यांना बर्‍याच वर्षांच्या संघर्षानंतर त्यांना स्वत:ची ओळख मिळालीय. खरं तर त्यांची मागच्या दहा वर्षांतील कामगिरी बघितली तर विश्वचषकातील विजय हा कधी ना कधी त्यांच्या पदरात पडलाच असता. पण तो प्रत्यक्ष पडला की, भोवतालची परिस्थिती कशी बदलते याचा अनुभव आता महिला क्रिकेटपटूंना येईल. विराट आणि रोहितसारखे त्यांना लक्षावधी चाहते नसतील. पण, नवीन चाहता वर्ग आणखी वाढेल एवढं नक्की. आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे 1983च्या कपिल देवच्या संघाने जसं सचिन, राहुल यांच्या मनात क्रिकेटचं बीज रुजवलं तसंच हरमनप्रीत आणि स्मृती हजारो भारतीय मुलींच्या मनातही क्रिकेटचं स्फुल्लिंग जागवतील.
 
 
हरमनप्रीतच्या या वाघिणींनी स्पर्धा ज्या पद्धतीने गाजवलीय त्यामुळे हे शक्य झालंय. सुरुवातीला भारताची फलंदाजांची फळी खरं तर जमून आली नव्हती. स्मृती मंढाणा आणि प्रितका रावल या दोनच सलामीवीर सातत्याने धावा करत होत्या. मधल्या फळीतल्या खेळाडू चाचपडतच होत्या. महत्त्वाचं म्हणजे कर्णधार हरमनप्रीतच्या धावा होत नव्हत्या आणि फलंदाजांच्या अपयशावर बोट ठेवावं तर गोलंदाजांनी आधी ऑस्ट्रेलिया आणि मग दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सपशेल नांगी टाकली. ऑस्ट्रेलियन महिलांना त्यांनी 331 धावांचा पाठलाग करू दिला. आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात नवव्या क्रमांकावरील नॅडिन डी क्लर्कने नाबाद 84 धावा करत आपल्या संघाला विजयी केलं. साखळीत आफ्रिका, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडकडून पराभवाची चव चाखल्यावर या संघाची पाठ भिंतीला टेकलेली होती. ‘महिला संघ स्थित्यंतरातून जातोय. नवीन खेळाडू अजून रुळले नाहीयेत,’ असं सांभाळून घेण्याचा काहींनी प्रयत्न केला. पण भिंतीला पाठ टेकलेली असताना तुम्ही फक्त पुढेच जाऊ शकता आणि भारतीय महिला क्रिकेटपटूंनी तेच केलं.
 
 
World Cup 2025
 
ज्यांच्यावर टीकेची झोड उठली होती, त्या प्रत्येकाने बॅट नाही तर चेंडूने उत्तर दिलं. स्मृतीने तर स्पर्धेत सर्वाधिक 434 धावा केल्या. प्रतिकाने 308 धावा करत तिला साथ दिली. प्रतिकाला दुखापत झाल्यावर संघात आलेल्या शेफालीने अंतिम फेरीत 84 धावा करत एक अनोखा विक्रम नावावर केला. आयसीसी एकदिवसीय स्पर्धेच्या अंतिम फेरीत सर्वाधिक वैयक्तिक धावा करणारी भारतीय क्रिकेटपटू आता शेफाली आहे. तिने विरेंद्र सेहवागलाही (82 धावा, 2007) मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्ध जेमिमा रॉड्रिग्जने केलेली नाबाद 124 धावांची खेळी तर कुणीही विसरणार नाही. तिची आतापर्यंतच्या कारकीर्दीतील सर्वोत्तम खेळी असावी. तिच्या त्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियाने 330 धावा करूनही साखळीत केलेल्या पराभवाचं उट्टं भारतीय संघाला काढता आलं, शिवाय अंतिम फेरीही गाठता आली.
 
 
अंतिम फेरीत शेफालीबरोबर दीप्ती शर्माही उभी राहिली. प्रत्येकीने किमान 20 धावा केल्या आणि त्याच्या जोरावर 298 धावांचा डोंगर उभा राहिला. फलंदाजांनी निम्मं काम केलं आणि उर्वरित कामासाठी गोलंदाज उभे राहिले. फिरकीला खेळणं तसंही आफ्रिकेला कठीण जातं. दीप्ती, श्रीचरणी असा दुहेरी मारा सुरू झाल्यावर आफ्रिकन संघ 246 धावांत कोलमडला. दीप्तीने अष्टपैलू कामगिरी करताना अर्धशतक आणि 5 बळीही घेतले.
 
 
आधीच्या दोन विश्वचषकाच्या अंतिम फेर्‍या गमावल्यानंतर यावेळी महिलांनी आपलं काम चोख केलं. महिला क्रिकेटमध्ये एकदिवसीय विश्वचषकाची सुरुवात 1973 साली झाली. पण, तुम्हाला आश्चर्य वाटेल, 2000 सालचा एक अपवाद वगळला, तर कायम इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचेच संघ जिंकले आहेत. भारतीय महिला यापूर्वी दोनदा अंतिम फेरीत पोहोचल्या. पण एकदा इंग्लंड आणि दुसर्‍यांदा ऑस्ट्रेलियाने आपला विजयाचा घास हिरावून नेला. अखेर भारतीय महिलांनी या दोन्ही संघांना जशास तसे उत्तर देऊन विजेतेपद पटकावलंय. म्हणूनच म्हटलं, भारतीय महिलांसाठी आता जागतिक क्रिकेटमध्ये नवीन ओळख आणि जागा तयार झाली आहे.
 
 
आणखी एका व्यक्तीचं योगदान यात न विसरण्यासारखं आहे. भारतीय महिला क्रिकेटमधील कबीर खान अर्थात, अमोल मुझुमदार. एकेकाळी सचिनचा वारसदार म्हणून त्याच्याकडे पाहिलं जात होतं. पण भारतीय संघात खेळण्याची संधीही त्याला मिळाली नाही. मग विश्वचषक जिंकणं तर दूरच. पण महिला क्रिकेट संघाला मात्र त्याने योग्य दिशा दाखवली. असं ऐकलंय की, ड्रेसिंग रुममध्ये तो एकच वाक्य रोज लिहायचा, ‘लक्षात ठेवा प्रतिस्पर्धी संघापेक्षा फक्त एक धाव आपल्याला जास्त करायची आहे. विजय आपलाच असेल.’ हाच मंत्र भारतीय महिलांसाठी उपयोगी ठरलाय. अमोल मुझुमदारने करंडक जिंकल्यावर खेळपट्टीच्या एका कडेला तिरंगा मैदानात रोवला. रोहित शर्माच्या टी-20 विजयानंतरच्या कृतीची पुनरावृत्ती म्हणून याकडे पाहिलं जातंय. पण दोघांचीही संघ जिंकण्यासाठी असलेली आस एकच होती, हे यातून समजतंय.
 
 
कर्णधार हरमनप्रीतबद्दल काय सांगायचं? नॅडिन डी क्लर्कचा शेवटचा झेल तिने शिताफीने घेतला आणि भारतीय विजयावर शिक्कामोर्तब झालं हे विधिलिखितच असावं. अंतिम सामन्यापूर्वी ती म्हणाली होती, ‘अंतिम सामन्यात पराभवाचं दु:ख आम्ही यापूर्वी पचवलंय. आता रात्र आनंदात घालवायची आहे.’ खरंच होतं ते. ती समरसून खेळली. खेळाडूंना कायम धीर दिला आणि मैदानातील तिची कॅप्टन म्हणून कटिबद्धता स्वत:च्या धावा होत नसतानाही अतुलनीय होती.
 
 
World Cup 2025
 
भारतीय महिला क्रिकेटचा हा प्रवास जवळून अनुभवल्यामुळे एक छोटी आठवण सांगते. 2007 च्या चॅलेंजर क्रिकेट या देशांतर्गत महिला स्पर्धेत मी वार्ताहर म्हणून गेले होते. मी मिताली राजला सर्वप्रथम तिथे पाहिलं. तोपर्यंत टेस्ट क्रिकेटमध्ये एका इनिंगमध्ये दोनशे रन करण्याचा विक्रम तिने केलेला होता. तिचं महिला क्रिकेटमध्ये नाव होतं. पण मी जेव्हा तिला म्हटलं, ‘तू महिला टीममधली राहुल द्रविड आहेस’, तेव्हा ती चक्क लाजली होती. कसंनुसं वाटून अविश्वासाने हसली होती. तिच्या त्या हसण्यात राहुल द्रविड कुठे आणि मी कुठे असा भाव होता. कारण क्रिकेट फॅन्सच्या मनात पुरुषांचं क्रिकेट कुठे आणि महिलांचं कुठे असा पूर्वग्रह होता. महिला क्रिकेटला भारतातही गर्दी व्हायची नाही. 2013 चा विश्वचषक भारतात झाला तेव्हा जगप्रसिद्ध ब्रेबॉर्न स्टेडिअमवर फक्त 100-200 प्रेक्षक बघितल्यावर मला खूपच वाईट वाटलं होतं.
 
 
या पार्श्वभूमीवर, या अंतिम सामन्यासाठी डी.वाय.पाटील स्टेडिअमवरचा प्रतिसाद बघता महिला क्रिकेट खूप पुढे गेलंय याची खात्री पटते. मिताली, झुलन यांनी सुरू केलेली एक मोहीम ताज्या दमाच्या स्मृती मंढाणा, हरमनप्रीत कौर, पूनम राऊत, वेदा कृष्णमूर्ती यांनी सुरू ठेवलीय. शेफाली, प्रतिका, जेमिमा या नवीन खेळाडू तर यशाची कमान उंचावत आहेत. महिलांच्या अंतिम सामन्याची उत्सुकता एवढी होती की, भारतीय पुरुषांनी होबार्टमधील सामना संपल्यानंतर ड्रेसिंग रुममध्येच टीव्ही लावला महिलांचा सामना पाहण्यासाठी!
 
 
2008 मध्ये भारतीय महिला क्रिकेटची धुरा महिला क्रिकेट असोसिएशनकडून बीसीसीआयकडे आणि जागतिक महिला क्रिकेटची धुरा आयसीसीकडे आल्यानंतर अनेक सकारात्मक बदल हळूहळू का होईना महिला क्रिकेटमध्ये झाले आहेत. सरावाची आणि सामन्यांची अद्ययावत केंद्रं मिळाली, आर्थिक प्रगती झाली आणि खेळात खर्‍या अर्थाने व्यावसायिकता आली. या संधीला महिला क्रिकेटपटूंनीही न्याय दिला.
 
 
आता जमलं तर बीसीआयने आणखी एक गोष्ट करावी. 2024 चा टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर पुरुषांच्या संघाला बीसीसीआयने 125 कोटी रुपयांचं बक्षीस दिलं होतं. आता महिलांसाठी त्यांनी 51 कोटी रुपये देऊ केले आहेत. ही असमानता पुसून टाकावी. आणि पुरुषांसाठी मुंबईत मरिन लाईन्सच्या किनारा रस्त्यावर भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. आता बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी तसं आश्वासन दिलंय खरं, त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी करावी. महिला क्रिकेटपटूंनी स्वत:ला सिद्ध केलंय. आता त्यांना त्यांचा मान मिळावा. कारण हा संघ फक्त विश्वचषक विजेताच नाहीये. तर 1997 पासून कायम विश्वचषकाच्या बाद फेरीत पोहोचलेला संघ आहे. हे तर पुरुषांच्या संघालाही नाही जमलेलं!
Powered By Sangraha 9.0