सारे भारतीय माझे बांधव आहेत!

06 Nov 2025 16:11:11
@डॉ. अविनाश भोंडवे
 9823087561
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेतील प्रथम आणि द्वितीय विजेत्यांच्या कथा दिवाळी अंकात प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. पारितोषिक प्राप्त उर्वरित दोन कथा नियमित अंकामध्ये प्रसिद्ध करत आहोत... त्यातील तृतीय क्रमांक प्राप्त डॉ. अविनाश भोंडवे यांची कथा...
india
त्या दिवशी मे महिन्याची पहिली तारीख होती. महाराष्ट्र दिन, जागतिक कामगार दिन, याबरोबरच विजयचाही वाढदिवस होता. त्या निमित्तानं विजयच्या पुण्यातल्या फ्लॅटमध्ये पाच-सहा जिवलग मित्र जमले होते. वाढदिवसाच्या सुग्रास भोजनावर सगळ्यांनी आडवा हात मारल्यानंतर, वेगवेगळ्या गोष्टींवर त्यांच्या गप्पा सुरू झाल्या.
 
 
देशातल्या नामवंत वास्तुविशारद कंपनीत काम करणार्‍या विजयनं, गप्पांच्या ओघात, देशामध्ये नुकत्याच घडलेल्या, सार्‍या भारतीयांना चिंतित करणार्‍या, एका दुर्दैवी घटनेचा विषय काढला. आतापर्यंत चेष्टामस्करी आणि विनोदात रंगलेल्या गप्पाष्टकाचा सूर बदलला आणि त्या विषयावर वादळी चर्चा सुरू झाली. एकेक मित्र मुठी आवळून आणि शिरा ताणून बोलू लागला. हसतखेळत चाललेली त्या मित्रांची चर्चा अचानक हमरीतुमरीवर घसरली.
 
 
“काश्मीरमध्ये अतिरेक्यांनी 26 भारतीयांना मारून टाकलं. निष्पाप, निरपराधी लोकांचे जीव घेऊन काय मिळवलं त्यांनी? त्या लोकांमध्ये माणुसकीचा अंशही नाही. त्यांना धडा शिकवायलाच पाहिजे...” विजयचा आवाज टिपेला पोचला होता. मनात अनेक समज, गैरसमज निर्माण झाले होते. इतर मित्रांच्या मनातही अनेक पूर्वग्रह होते आणि वर्तमानपत्रात, टीव्हीवर, फोनवर पाहिलेल्या, ऐकलेल्या, वाचलेल्या अनुभवातून सर्वांचीच मतं पक्की झालेली होती.
 
 
“आपल्याला काय करायचंय? त्यांचं ते बघून घेतील. आपल्या राज्यात असली जातीय आणि धार्मिक तेढ काय कमी आहे? तुझं बोलणं म्हणजे, आपलं झालं थोडं आणि व्याह्यानं धाडलं घोडं!” त्याचा जिवलग मित्र सुनील हसत म्हणाला.
 
चाललेली सारी चर्चा संजय शांतपणं ऐकत होता. एका मोठ्या कंपनीचा मार्केटिंग मॅनेजर असलेल्या संजयला कामासाठी भारतभर फिरायला लागायचं. देशातल्या वेगवेगळ्या भागांतल्या लोकांचा त्याला प्रत्यक्ष अनुभव होता.
 
“थांबा...” हाताचे दोन्ही पंजे वर करून, त्यानं सगळ्यांना शांत केलं आणि अधिकारवाणीनं त्या विषयावर तो बोलू लागला.
“विजय, केवळ ऐकीव माहितीवर लोकांबद्दल मत बनवू नये. अनेकदा प्रत्यक्षातली परिस्थिती काही वेगळीसुद्धा असू शकते... तुम्ही तयार असाल, तर आपण जाऊ या काश्मीरला. मी कामासाठी आजवर चार वेळा काश्मीरला जाऊन आलोय... दहा-दहा दिवस राहिलोय तिथं. त्या लोकांना जवळून पाहिलंय. मला विचारशील, तर अत्यंत कष्टाळू, प्रेमळ लोक आहेत ते. भारतीय पाहुण्यांशी कमालीच्या आदरानं, आतिथ्यशीलतेनं, निष्कपटपणे वागणारी लोकं आहेत ती...”
 
 
“तुझं ना नेहमी काही तरी वेगळंच असतं, संजय. आता तू म्हणतोयस, तर जाऊ आपण कधी तरी. पण जर गेलोच, तर फक्त हिमालयाचे डोंगर आणि सुरू, देवदाराची झाडं नाही बघायची, तिथल्या लोकांसोबत रहायचंय...समजून घ्यायचंय, की का एवढं त्यांचं भारतीयांशी वैर आहे? नंदनवनात राहणार्‍या त्या लोकांची मनं एवढी काळीकुट्ट का आहेत?” विजय तावातावानं संजयला म्हणाला.
 
 
“जा तुम्हीच. मी नाही येणार असल्या राक्षसांना बघायला. अरे, पहलगामला आपल्या 26 जणांना गोळ्या घातल्यावर, त्या नराधमांनी हवेत गोळीबार करून जल्लोष केला... काश्मिरी लोक म्हणजे माणुसकीला काळिमा आहेत...”आणखी एका मित्रानं त्याचं मत नोंदवलं.
 
 
संजयचा चेहरा थोडा गंभीर झाला. एकेक शब्द शांतपणं उच्चारत तो म्हणाला, “असं?... हे बघा, आपल्या लोकांना मारणारे ते लोक निर्दय होते, त्यांचं कृत्य राक्षसी होतं, मान्य आहे मला. पण ते काश्मिरी होते हे कुणी सांगितलं तुम्हाला? अरे, ते लोक भारताच्या शत्रूराष्ट्रानं पाठवलेले अतिरेकी होते. आणि तुम्ही त्यांना काश्मिरी म्हणताय? सार्‍या काश्मिरी जनतेला हृदयशून्य ठरवताय? खरं तर, आपण सारे भारतीय आहोत... राज्य कोणतंही असलं, तरी आपण सारे एक आहोत... बाबांनो, आपल्या शत्रूराष्ट्राला तेच हवंय... अतिरेक्यांनी केलेल्या कृत्यासाठी बिचार्‍या काश्मिरींना जबाबदार धरून, त्यांना आपल्या देशाच्या एकतेला तडा द्यायचाय... भारतीयांच्या समरसतेला दुभंगून टाकायचंय.”
 
 
या मित्रांमधले वाद, प्रतिवाद आणि चर्चा बराच वेळ सुरू राहिली. शेवटी संजय म्हणाला, “आपण सगळे गेले दोन तास भांडतोय. आपले विचार एकमेकांना पटत नसतानाही मांडतोय... अशी परस्परविरोधी विचारांची कुस्ती, आपण अनेकदा करतो, अनेक विषयांवर करतो... पण आपल्या मैत्रीमध्ये काही अंतर आलं का?” संजयनं सगळ्यांकडं प्रश्नार्थक नजरेनं पाहिलं. सगळ्यांनी मानेनंच, नाही... म्हणून सांगितलं.
 
 
त्यावर तो हसत म्हणाला,“कारण, आपण एकमेकांना लहानपणापासून ओळखतोय. अशा मतभेदांनी आपल्या मैत्रीत कधीच वितुष्ट आलेलं नाही. आपल्या एकूण एक देशबांधवांशीही आपण असंच वागलं पाहिजे. मग तो कोणत्याही राज्याचा असो, कोणत्याही धर्माचा असो, नाही तर वेगळ्या जातीचा असो. आपण आधी भारतीय आहोत आणि मग इतर... देशाबाबतची समरसता आणि मानवतेवरची श्रद्धा हीच महत्त्वाची असते.”
 
 
“तू फार फिलॉसॉफिकल बोलतोस... मला नाही पटत. आपले ते आपले, मित्र ते मित्र आणि शत्रू ते शत्रू... त्यांची तुलना होऊच शकत नाही...” विजय उपहासानं म्हणाला.
 
 
“ठीक आहे. मला आलेल्या अनुभवातून मी माझं मत सांगितलं... तुला अनुभव आल्यावर, तू ठरव, काय खरं आणि काय खोटं...” संजयनं शेवटचा टोला मारला आणि सगळे मित्र विजयला पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देत, खोलीतून बाहेर पडले.
 
 
त्या नंतरच्या महिन्यात, विजयला त्याच्या कंपनीतर्फे काश्मीरमध्ये एका नव्या प्रकल्पाच्या आराखड्याच्या संदर्भात जाण्याबद्दल एक ईमेल आला. तो वाचताच विजयच्या मनात विचारांचं काहूर उठलं. वाढदिवसाच्या वेळी मित्रांबरोबर झालेली चर्चा आठवली. त्यानं मांडलेली मतंही आठवली... जावं? की जाऊ नये? तो अत्यंत द्विधा मनःस्थितीत सापडला. पण त्याला संजयचे शब्दही आठवले... “काश्मिरी लोक, येणार्‍या भारतीय पाहुण्यांशी अत्यंत आदरानं आणि निष्कपटपणे वागतात.” त्याला वाटलं, संजयचे शब्द खरे आहेत की खोटे? हे पडताळून पाहण्याची वेळ आता आली आहे.
 
 
मनातल्या असंख्य शंकाकुशंकांना तिलांजली देत, त्यानं कंपनीचा आदेश मान्य केला आणि एका रविवारी पहाटे श्रीनगरच्या भूमीवर पाय ठेवला.
 
 
डोळ्याचं पारणं फेडणार्‍या सौंदर्यानं नटलेल्या दाल सरोवराच्या किनार्‍यावरचं त्याचं हॉटेल, एक वास्तुरचनाकार म्हणून त्याला कमालीचं सुंदर आणि खूप सुरक्षित वाटलं.
 
 
दाल सरोवराला निसर्गाचं मनोरम काव्य का म्हणतात? हे त्याला समजलं. सरोवराचं नितळ निळंशार पाणी आणि त्यामध्ये उमटणारं, बर्फाच्छादित पर्वतरांगांचं आणि निळ्या आकाशाचं प्रतिबिंब, भूमीला आणि स्वर्गाला एकत्र विणत होतं. तलावात तरंगणारे रंगीबेरंगी शिकारे, वार्‍याच्या झुळुकीसोबत उडणारे त्यांचे पडदे, पाण्यामध्ये फुललेली कमळं... जणू एक निसर्गचित्रच जिवंत झालं होतं.
 
 
तो रविवारचा दिवस होता, त्याला दुसर्‍या दिवशीपासून काम सुरू करायचं होतं. म्हणून त्यानं एखादं ठिकाण बघायचं ठरवलं. हॉटेलच्या मॅनेजरनं त्याला शालिमार बागेत जायला, कार आणि ड्रायव्हर दिला.
 
 
बागेच्या भव्य दर्शनानं प्रवेशद्वारावरच त्याचं मन भारून गेलं. गगनाला गवसणी घालू पाहणारे, उंचच उंच चिनार वृक्ष, त्यांच्या छायेतून जाणार्‍या वाटा... त्याला वाटलं, शेकडो वर्षं कालचक्रातून मागे फिरण्याचा मार्ग शोधतायत.
 
 
दगडी रस्त्याच्या दुतर्फा, नक्षीदार आकारात लावलेल्या बोगनवेली. गुलाब, जास्वंदाची फुलझाडं आणि रंगीत मखमली शाल अंथरल्यागत दिसणारी त्यांची दिलखेचक फुलं... फुलांच्या सुगंधाचा सोहळा साजरा करतायत.
 
 
मध्यभागी असलेल्या कालव्यातल्या कारंजांतून उडणारे पाण्याचे उत्फुल्ल फवारे, नयनमनोहर नृत्य सादर करतायत. त्यांच्या दोन्ही बाजूंना फुललेल्या सफरचंदाच्या झाडातून जमिनीवर विखुरलेल्या गुलाबी पाकळ्या जणू युगायुगांच्या रम्यकथा सांगतायत.
सारं दृश्य डोळे भरभरून पाहताना, बागेच्या एका कोपर्‍यात, तिथल्या गुलाबांची रोपं विकण्यासाठी ठेवलेला एक छोटा स्टॉल त्याला दिसला. त्याच्या शेजारी एका चिनार वृक्षाखाली जमिनीवर छोटा रंगीत गालिचा अंथरून, एक वृद्ध काश्मिरी गृहस्थ बसला होता. चेहर्‍यावर मोजता येणार नाहीत इतक्या सुरकुत्या, डोक्यावर काश्मिरी टोपी, अंगात सैलसा पायघोळ अंगरखा आणि तितकाच सैल व रुंद पायजमा घातलेल्या त्या वृद्धाच्या बाजूला झाडं छाटायच्या पाच-सहा छोट्या आकाराच्या कात्र्या आणि पाण्याच्या झार्‍या ठेवल्या होत्या.
 
 
विजयनं त्याच्यापाशी जाऊन वेगवेगळ्या रोपांची माहिती आणि किंमत जाणून घेतली. आणि त्या वृद्धाच्या गडद निळ्या डोळ्यांमध्ये पहात विचारलं,“बाबा, तुम्ही इथले बागेचं माळीकाम करता का?”
 
 
“जी, हुजूर...” चेहर्‍यावरची एकही सुरकुती न हलवता, वृद्ध म्हणाला. त्याच्या आवाजात जुन्या ग्रामोफोन रेकॉर्डमध्ये यायची, तशी खरखर जाणवत होती.
 
“किती वर्षं काम करताय इथं?”
 
“झाली असतील पन्नास-पंचावन्न वर्षं... म्हणजे बघा... मी दहा वर्षाचा असताना, माझ्या अब्बुबरोबर इथं कामाला लागलो... मला तेव्हा काहीच काम येत नव्हतं...”डोक्यावरची टोपी नीट करत वृद्धानं उत्तर दिलं.
 
“अच्छा, म्हणजे तुमच्या वडिलांनी हे काम शिकवलं तुम्हाला.”
 
“नाही. अब्बू फक्त कारंजाचं काम बघायचे, ”अचानक वृद्धाच्या निर्जीव डोळ्यात एक विलक्षण चमक आली. डोळे किलकिले करत त्यानं विजयकडं पाहिलं आणि उजव्या कानाच्या पाळीला स्पर्श करत म्हणाला, “मी हे काम शिकलो पुण्याला. पुण्याच्या शेतकी कॉलेजमध्ये मी एक वर्षं ट्रेनिंगला होतो... इथली अनेक झाडं, गुलाबाची रोपं आम्ही पुण्याहूनच आणली आहेत.”
 
 
विजयला धक्काच बसला. जगातल्या सर्वात सुंदर बागांपैकी एक मानल्या जाणार्‍या शालिमार बागेतले, डोळ्यांना सुखावणारे गुलाब पुण्याहून आले होते... आणि तिथल्या माळीबाबाचं प्रशिक्षणही पुण्यात झालं होतं. विजयला त्याच्या वाढदिवसाच्या दिवशीची चर्चा आठवली. त्याला वाटून गेलं, की ही बाग आणि इथले गुलाब म्हणजे विविधतेने नटलेल्या भारताच्या एकतेचं प्रतीक आहेत. त्या विचारात त्यानं बागेच्या पार्श्वभूमीवर माळीबाबांसोबत एक सेल्फी काढला, त्यांना झुकून नमस्कार केला आणि तो हॉटेलवर परतला.
 
 
दुसर्‍या दिवशी विजयला, कामाच्या साईटवर जायचं होतं, कामासंबंधीच्या मिटींग्ज घ्यायच्या होत्या. पण निसर्गाच्या मनात काही वेगळंच होतं. त्या दिवशी, अचानक ढगफुटी होऊन, अभूतपूर्व पाऊस पडला आणि संपूर्ण श्रीनगरमध्ये पुराची स्थिती निर्माण झाली. त्याचं हॉटेलही जलमय झालं. इतर पर्यटक आणि स्थानिक लोकांसोबत, हॉटेलच्या कर्मचार्‍यांनी विजयला एका उंच भूभागावरच्या शाळेत आश्रयासाठी हलवलं.
 
 
त्या शाळेत त्याला रफिक अहमद हे श्रीनगरमधले एक वृद्ध शिक्षक, त्यांची डॉक्टर मुलगी आयेशा आणि तरुण मुलगा आमीर भेटले. रफिक सरांचं राहतं घर पुरात वाहून गेलं होतं, पण तरीही, शांतपणं आणि कर्तव्यदक्षतेनं ते सारं कुटुंब, सर्वांच्या आश्रयाचं आयोजन करत होतं. त्या तिघांच्या चेहर्‍यावरचा उत्साह, डोळ्यातली करुणा, ओठांवरलं आश्वासक हास्य आणि स्फूर्तिदायक बोलणं, त्यांच्या अपरंपार मानसिक शक्तीची साक्ष देत होतं.
 
हॉटेलवरून येताना विजय भिजून चिंब झाला होता आणि मनातून पूर्ण हादरला होता. काश्मीरसंबंधी ऐकलेल्या गोष्टींनी त्याचे हातपाय कापत होते.
 
 
“आता पुढे काय होणार? काही वेडंवाकडं तर घडणार नाही ना?”या विचारात तो शाळेच्या एका खोलीच्या कोपर्‍यात उभा होता. त्याच्या डाव्या पायाच्या पोटरीतून असह्य वेदनेच्या कळा येत होत्या.
 
 
गुलाबी अंगकांतीची, सरळ धारदार नाकाची आयेशा, तिथल्या सगळ्यांना तपासत विजयपाशी आली.
 
“गुड आफ्टरनून. सर, तुम्ही ठीक आहात?” तिनं काश्मिरी हेल असलेल्या हिंदीत विचारलं.
 
“होय. मी बरा आहे... मला काहीही होत नाहीये...” आयेशा तिथून निघून जावी, या उद्देशानं विजयनं प्रत्युत्तर दिलं आणि तो दुसर्‍या खोलीकडं जाऊ लागला. विजय चालताना लंगडतोय हे आयेशाच्या लक्षात आलं.
 
“बरा काय म्हणता? तुमच्या डाव्या पायाला केवढी मोठी जखम झालीय. चला, बसा या स्टुलावर....” विजयचा पाय तिनं तपासला आणि त्याच्या पोटरीला झालेल्या खोल जखमेकडं बोट दाखवत म्हणाली,“जखमेतून रक्त वाहतंय, त्यात माती पण गेलीय. अशानं जखमेत इन्फेक्शन होऊ शकतं, पण घाबरू नका, आपण उपचार करून तो बरा करू.” तिच्या आवाजात अद्वितीय आत्मीयता होती.
 
 
विजयला संकोच वाटला, पण तिच्या मदतीशिवाय कोणताच पर्याय त्याला उपलब्ध नव्हता. तिच्या कुशल उपचारांनी आणि आस्थेमुळे त्याच्या मनावर जमा झालेले भीतीचे सावट, बर्फाची लादी विरघळून जावी तसे वितळत गेले.
 
 
आश्रय घेतलेल्या लोकांचे पुढचे सात दिवस परीक्षा पाहणारे ठरले. अन्नाची कमतरता, मरणाची थंडी आणि अज्ञात भविष्याची चिंता, प्रत्येकाला गलितगात्र करून सोडत होती. एका संध्याकाळी, रफिक सर आणि आयेशाची गंभीर चर्चा विजयच्या कानावर पडली.
 
 
“अब्बू, आपली सर्व पुस्तकं... आपला गेल्या अनेक पिढ्यांचा इतिहास...” आयेशाचा आवाज कापरा झाला होता.
रफिक सर तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणत होते, “बेटा, पुरात काय गमावलं याचा विचार नको... पण इथं असलेली माणसं, त्यांना लागणारी मदत, त्यांचे प्राण वाचवून मिळणारं समाधान, हाच खरा आपला खजिना आहे. एक सच्चा भारतीय म्हणून संकटकाळात एकमेकांच्या पाठीशी उभं राहणं हे आपलं कर्तव्य आहे.”
 
 
रफिक सरांचे हे शब्द विजयच्या कानात गुंजत राहिले. त्यानं पाहिलं. आश्रय घेणार्‍या लोकांत, काश्मिरी, पंजाबी, बंगाली, तामिळ, मराठी, कानडी सर्व भाषिक होते. पण या अस्मानी संकटाचा मुकाबला करायला सारे एक झाले होते. वेगवेगळ्या संस्कृतींमधली भिन्नता विसरून एकमेकांची काळजी घेत होते. एकेका रोटीचे छोटे छोटे तुकडे ते वाटून घ्यायचे, आपल्या आधी दुसर्‍यांना घास द्यायचे आणि एकमेकांना धीरही द्यायचे.
 
 
रफिक सरांचा मुलगा आमीर विजयजवळ येऊन बसला आणि त्याला काश्मीरच्या लोककथा सांगू लागला. विजयच्या चेहर्‍यावर एक प्रसन्न स्मित उमटलं. त्याच्या मनातील भीती आणि काश्मिरी लोकांबाबतच्या संशयाची भिंत कोसळत चालली होती.
आठव्या दिवशी, पाणी कमी झाल्यावर, बचाव दल आलं. पुरामध्ये अडकलेल्या सर्वांना परत त्यांच्या घरी पाठवण्याची व्यवस्था केली गेली. विजयला मात्र त्याचं काम सुरू न करताच, परत जावं लागणार होतं.
 
 
निरोप घेताना, रफिक सर विजयजवळ आले. त्यांच्या डोळ्यात आसवं तरळत होती, आवाजात कंप होता... ते म्हणाले, “विजय बेटा, तू पाहिलंच असशील... संकटामध्ये जात, धर्म, प्रदेश, सर्व राज्यं... सारं सारं दुय्यम ठरतं. तुझा धर्म वेगळा, राज्य वेगळं, माझं वेगळं. पण बेटा, शायर इक्बाल म्हणतो, मजहब नहीं सिखाता आपस में बैर रखना, हिंदी हैं हम, वतन है हिंदोस्तां हमारा... प्रत्येकानं जर माणुसकीची जपणूक करायची जबाबदारी उचलली, तर हे जग आणखी सुंदर होईल.
 
 
गंगेचं आणि झेलमचं पाणी वेगळं असतं, पण दोन माणसांच्या हृदयाची धडधड मात्र एकसारखीच असते.. देश म्हणजे केवळ भूगोलातला नकाशा नसतो, अनेकतेत एकता जपणारी भावना असते. सारे भारतीय माझे बांधव आहेत, हे केवळ शब्द नाहीत; तो आपल्या आत्म्याचा आवाज आहे, विसरू नकोस.”
 
 
विजयच्याही डोळ्यांत पाणी आलं. त्याला शब्द फुटत नव्हते. त्यानं रफिक सरांचे हात घट्ट धरले. आमीरनं त्याची गळाभेट घेतली. आयेशानं त्याला काश्मिरी गुलाबाच्या फुलांचा गुच्छ दिला.
 
धन्यवाद, विजय फक्त एवढंच बोलू शकला.
 
घरी परतलेला विजय, एक अंतर्बाह्य बदललेला माणूस होता. त्याला साक्षात्कार झाला होता, नवा दृष्टीकोन मिळाला होता... त्यानं आपल्या सार्‍या मित्रांना पुन्हा घरी बोलावलं. सगळ्यांनी तो प्राणगंभीर संकटातून वाचल्याबद्दल, त्याच्या धाडसाचं कौतुक केलं.
 
 
विजयनं त्याला काश्मीरमध्ये आलेल्या अनुभवांचं वर्णन केलं. त्यानं शालिमार बागेतले माळीबाबा, रफिक अहमद, डॉ. आयेशा, आमीर... सार्‍यांबद्दल सांगितलं. त्यांच्या नि:स्वार्थ सेवेबद्दल, त्यांच्या साहसाबद्दल बोलून, त्यानं रफिक सरांच्या शब्दांचा पुनरुच्चार केला, “मित्रांनो, आपला भारत म्हणजे अनेकतेत एकता जपणारी भावना आहे. सारे भारतीय आपले बांधव आहेत... हा आपल्या आत्म्याचा आवाज आहे. आपल्या देशाची ताकद आपल्या वैविध्यात आणि वैविध्यातून उमलणार्‍या एकात्मतेत आहे,” विजय सद्गदित झाला होता.
 
 
एवढा वेळ विजयचं बोलणं शांतपण ऐकणारा संजय पुढं आला. त्यानं विजयला मिठी मारली आणि म्हणाला, “आता तू सच्चा भारतीय म्हणून शोभतोयस. लक्षात ठेव, ही भावना आपण जपलीच पाहिजे. कारण खरा भारतीय तोच असतो, ज्याच्या मनामध्ये प्रत्येक भारतीय त्याचा बांधव असतो.”
 
 
क्षणभर खोलीत गंभीर शांतता पसरली. काही क्षण सारे स्तब्ध झाले. पण हळूहळू प्रत्येकाच्या चेहर्‍यावर प्रसन्न हसू उमटू लागलं. विजयच्या शब्दांनी सर्वांच्या मनात भारताच्या खर्‍या सार्वभौमत्वाची ज्योत पेटवली होती. ही ज्योत भेदाभेदांपेक्षा खूप मोठी, ऐक्य आणि समरसतेच्या सूत्राने सर्वांना एकत्र बांधणारी होती.
 
 
पुढच्या क्षणी सगळ्यांनी एकमेकांचे हात धरले आणि गोलाकार फिरत ते म्हणू लागले, ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत...’
Powered By Sangraha 9.0