राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, 'सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील द्वितीय क्रमांक विजेती कथा..
रेखा आज नेहमीप्रमाणे तासावर आली. ती आल्यावर मुलांचा गलका थांबला. नमस्ते झाल्यावर रेखाने सगळ्यांना विचारलं, ’मला “सांगा पुढच्या आठवड्यात काय आहे?’
‘’स्वातंत्र्य दिन...” पुढेच बसलेली केतकी म्हणाली.
‘’बरोबर...त्याच निमित्तानी आपण सगळ्यांनी प्रतिज्ञा पाठ करायची आहे.”
प्रतिज्ञा म्हणल्यावर मुलांच्या चेहर्यावर प्रश्नचिन्ह उभं राहिलं. रेखाला ते अपेक्षितच होतं. ती स्वतःशीच हसली आणि म्हणाली,
‘’मराठीचं पुस्तक काढा... त्याच्या तिसर्या पानावर प्रतिज्ञा असेल. ही अशीच तुम्हाला तुमच्या सगळ्याच पुस्तकात मिळेल...फक्त इंग्लिशच्या पुस्तकात इंग्लिशमध्ये लिहिलेली असेल आणि हिंदीच्या पुस्तकात हिंदीमध्ये.”
“मला माहिती आहे हे पान सगळ्यांनी वाचलं तर असणारच आहे. पण तरी आता परत एकदा सगळ्यांनी ही प्रतिज्ञा वाचा...पण त्याआधी मी तुम्हाला प्रतिज्ञा म्हणजे काय ते सांगते...” मुलांनी माना डोलावल्या.
‘’प्रतिज्ञा म्हणजे सोप्या शब्दात सांगायचं तर शपथ घेणे.... ही प्रतिज्ञा आपण सगळे घेतो. एक भारतीय नागरिक म्हणून. म्हणजे आपले विचार, वागणूक एक भारतीय नागरिक म्हणून कशी असली पाहिजे याचं मार्गदर्शनही प्रतिज्ञा करते, कळल...?”
मुलांनी माना डोलावल्या आणि ते सगळे प्रतिज्ञा वाचायला लागले. रेखाला अपेक्षित होतं तसंच प्रतिज्ञा वाचायला लागल्यावर सौजन्य, सौख्य अशा शब्दांचे अर्थ मुलांनी विचारले. सगळ्यांचं वाचून झालं आणि प्रश्नोत्तरंही झाल्यावर रेखा पुढे प्रतिज्ञेची माहिती द्यायला लागणार इतक्यात वर्गाच्या मागच्या बाकावरच्या राजदीपने हात वर केला...
‘’ताई, यात म्हणलं आहे की सगळे भारतीय माझे बांधव आहेत...म्हणजे आई बाबा, आणि तुम्ही सगळे पण? पण मग आई, बाबा, ताई, दादा असं कोणीच राहणार नाही का?” राजदीपचा आवाज आता रडवेला झाला होता.
पण वर्गात एकच हशा पिकला. रेखा पण हसू आवरत उत्तरली, ’‘अरे राजदीप, त्या ओळीचा अर्थ असा की सर्व भारतीय नागरिकांनी म्हणजे आपण, आपल्याला अनोळखी असणार्या लोकांशी पण चांगलं वागावं... जसं आपण आपल्या ओळखीच्या लोकांशी वागतो... म्हणजे असं बघ, की एखाद्या अनोळखी आजींना रस्ता क्रॉस करायला मदत करणं, कुण्या अनोळखीला रिक्षा पकडून देणं, कुणाला पाणी देणं...वगैरे वगैरे...या वागण्याला म्हणतात बंधुभाव... असं वागायचं...इतर कुठल्याही गोष्टीकडे न बघता ....”
‘’ताई, असं असेल तर परवा मला माझी आजी, लता मावशींना पाणी दिलं म्हणून का ओरडली? आणि परत म्हणाली की, मी त्यांच्यापासून लांब रहायचं... खरं तर आजी आल्यापासून ती लता मावशींना खूप ओरडते. ते बघून मला खूप रडायला येतं. लतामावशी माझे खूप लाड करतात...” स्वरा रडवेली होत म्हणाली.
रेखाला काही कळायच्या आत ईशा म्हणाली...‘’ताई, मी काल आमच्या चर्चमध्ये गेले होते तेव्हा आई म्हणली की चर्चमधल्या मुलींबरोबर जास्तीत जास्त राहायचं..... बाकींबरोबर कमी...”
‘’ताई, परवा राजदीप आणि केदारमध्ये भांडण झालं.... तुम्ही यायच्या आधी.... की मोठा देव कुठला, बुद्ध का शंकर?...आता भाऊ म्हणल्यावर ही अशी भांडणं बरोबर नाही आहेत ना...?” समीरनी त्याचा प्रश्न विचारला...
‘’ताई, सगळं सेम सेम असताना माझ्या आईंनी सांगितलं आहे की रोज हिरवं काहीतरी बरोबर ठेवायचं आणि रोज डोळ्यात काजळ घालायचं...” चांद म्हणाला.
‘’ए, एकदम असंच मलाही आई म्हणली आहे... पण हिरव्याच्या ऐवजी केशरी आणि डोळ्यात काजळ नाही तर कपाळावर गंध लाव असं तिने सांगितलं आहे...”रोहन म्हणाला.
हळूहळू वर्गात सगळे बोलायला लागले.... गप्पा चालू झाल्या.... मुलांचे प्रश्न वाढत होते आणि अगदी तसंच रेखाच्या मनातली रुखरुख वाढत होती. तेवढ्यात तास संपल्याची घंटा झाली. सुटकेचा निश्वास सोडत रेखा वर्गातून बाहेर पडली. त्या दिवशी घरी येताना देखील ती सुन्नच होती. याच सगळ्या विचारात 15 ऑगस्ट कधी येऊन गेला तिला कळलंच नाही. सुदैवानी, हा विषय वर्गात परत कधी निघाला नाही. मुलं विसरून गेली पण रेखाच्या मनात मात्र सगळं तसंच्या तसं होतं. तिला काही राहवत नव्हतं. शेवटी तिने मुलांसाठी एक ट्रीप काढायचा विचार केला. तिचा निर्धार पक्का झाला. शाळेकडून परवानगी काढली. सगळ्या पालकांना चिठ्ठी पाठवली आणि मग ठरलेल्या दिवशी ती मुलांना ट्रीपला घेऊन गेली.
’‘ताई आता तरी सांगा...आपण कुठे चाललोय....”चांदने विचारलं.
‘’कळेलच थोड्या वेळात...” रेखा उत्तरली.
अखेरीस पाऊण तासाने ते सगळे ट्रीपच्या ठिकाणी पोहोचले. सगळी मुलं बसमधून खाली उतरली. रेखाने मुलांच्या दोन ओळी केल्या, आणि ती त्यांना समोरच्या कमानीतून आत घेऊन गेली. सगळी मुलं कुतूहलानी इकडे तिकडे बघत चालली होती. सगळीकडे असं स्मारकासारखं बांधलं होतं आणि त्यावर भरपूर नावं लिहिली होती. त्यातल्या मधल्या चौथर्यापाशी पोहोचल्यावर रेखा बोलती झाली.... “तर मुलांनो, तुम्ही मला बरेच दिवस विचारत होतात ना की ताई आपण कुठे चाललोय...तर आज आपण आलोय ’अमर जवान’ स्थळाला... हे आजपर्यंत शहीद झालेल्या जवानांचं आपल्या सरकारनी बांधलेलं स्मारक आहे...”
‘’ताई, शहीद म्हणजे काय?” समीरनी विचारलं.
‘’शहीद म्हणजे, ज्या जवानांचा आपल्या भारत देशाचं रक्षण करत असताना बळी जातो...ज्यांचे प्राण जातात...अशा सैनिकांना, अशा जवानांना आपण शहीद जवान असं म्हणतो...तुम्हाला सगळ्यांना उरीचा हल्ला आठवतो आहे का?”
‘’हो...” मुलं एका सुरात उत्तरली.
’‘त्यानंतर, आपण पाकिस्तानात जाऊन हल्ला केला. ज्यात आपले 40 जवान सामील होते असे म्हणतात... सुदैवाने त्यात कुणीही शहीद झालं नाही आणि आपले सगळे जवान सुखरूप परत आले. पण त्याआधी काही वर्षांपूर्वी मुंबईवर एक मोठा हल्ला झाला होता. जवळजवळ चार दिवस तो हल्ला चालू होता. दहशतवाद्यांशी आपले सैनिक लढत होते. अगदी सगळ्या पद्धतीनी आपण प्रयत्न करत होतो. आणि मग चार दिवसांनी आपल्याला यश आलं. आपण सगळ्या दहशतवाद्यांचा नायनाट केला. पण त्यात आपले खूप जवान शहीद झाले. त्यांचीच नावं इथे लिहिली आहेत.”
आता आपण एक काम करूयात मी ती नावं वाचते आणि मग तुम्ही सगळ्यांनी मला त्यांचा धर्म कोणता हे सांगा.. करायची का सुरुवात??”
‘’हो...” मुलं म्हणली.
“चला...शहीद करंबीर सिंग”
‘’शीख”
‘’शहीद संदीप उन्नीकृष्णन”
‘’हिंदू” - ’दक्षिण भारतीय’,दोन मुलांकडून ही दोन उत्तरं आली.
‘’अरे, दक्षिण भारतीय हा काही धर्म नाही आणि मुळात दक्षिण भारतीय म्हणजे दक्षिणेकडे राहणारे.” रेखा थोडी वैतागूनच म्हणली. ती पुढे म्हणाली,
‘’आता ही नावं बघा... खूप वर्षांपूर्वी आपलं पाकिस्तानबरोबर कारगिलमध्ये युद्ध झालं होतं. ही पुढची नावं त्यातली आहेत...शहीद विक्रम बत्रा”
‘’हिंदू”
‘’शहीद एन. केंगुरसे”
मुलं शांत झाली. या शहीद जवानाचा धर्म त्यांना काही ओळखता येत नव्हता.
‘’ख्रिश्चन...” रेखाच म्हणाली.
‘’अशी’ खूप नावं आहेत. ही फक्त काही उदाहरणादाखलच आहेत बरं का!!. आता मला सांगा या सगळ्यांमध्ये कोणती गोष्ट एकसारखी आहे, सेम आहे?”
‘’ते सगळे शहीद झाले आहेत...” केतकी उत्तरली.
‘’पण, ते कुणासाठी शहीद झाले???”
‘’आपल्यासाठी...”ईशानीने जरा बिचकतच उत्तर दिलं.
“बरोबर.... आता मला सांगा हे सगळे आपले जवान समोरच्याशी लढत असताना त्यांच्या डोक्यात मी हिंदू, मी शीख असा विचार आला असेल का?”
मुलं काहीच बोलली नाहीत. पण रेखा काही मागे हटली नाही. तिने आपला फोन काढला आणि एका इसमाचा फोटो मुलांना दाखवला.
‘’हे बघा. हा फोटो नीट बघा... हे आहेत थॉमस वर्गीस. मगाशी मी म्हणलं त्याप्रमाणे जो मुंबईला हल्ला झाला होता ना, त्याच्यामध्ये एका मोठ्या हॉटेलवर हल्ला झाला होता. तिथे त्या हॉटेलमध्ये हे थॉमस वर्गीस वेटरचं काम करत होते. हल्ला झाला त्यावेळी त्यांनी सगळ्या पाहुण्यांना सुखरूप ठेवलं आणि त्या सगळ्या पाहुण्यांना नंतर सुखरूपपणे हॉटेलमधून बाहेर पाठवलं. पण, सगळ्यांना बाहेर काढणारे थॉमस वर्गीस स्वतःला वाचवू शकले नाहीत. सगळ्या पाहुण्यांना बाहेर काढल्यानंतर जेव्हा ते स्वतः बाहेर पडत होते तेव्हा त्यांना दहशतवाद्यांनी गोळ्या घातल्या...”
आता मुलं एकदम शांत झाली होती.
‘’हा, आता सांगा.. मी आधी ख्रिश्चन लोकांना वाचवतो आणि मग हिंदू, मुस्लिम, शीख यांना वाचवतो असा विचार, केला असेल का या थॉमस वर्गीस सरांनी लोकांना वाचवताना....???”
‘’नाही...” मुलं एकसुरात म्हणाली.
रेखाला थोडं समाधान वाटलं. दोनपैकी एक गोष्ट तर मुलांना कळली होती. आता तिने दुसर्या गोष्टीकडे लक्ष वेधण्यासाठी मुलांना प्रश्न विचारायला सुरुवात केली.
’‘बरं मुलांनो, आता मला सगळ्यांनी आपापले आवडते रंग सांगा बरं...”
मुलं एकदम बुचकळ्यातच पडली. मुलांना कळेच ना की रेखा अचानक शहीद जवानांवरून आवडत्या रंगावर का आली आहे ते.
‘’सांगा...सांगा”
मग मात्र मुलांनी पटापटा आपले आवडते रंग सांगायला सुरुवात केली. गुलाबी, निळा, जांभळा, पिवळा, पांढरा, काळा असे वेगवेगळे रंग मुलांनी सांगितले. मग रेखानी ज्या सगळ्या मुलांचा एक आवडता रंग आहे अशा मुलांचा एक गट तयार केला. एक गट झाला निळा रंग आवडणार्या मुलांचा. एक गट झाला पिवळा रंग आवडणार्या मुलांचा. एक गट झाला गुलाबी रंग आवडणार्या मुलांचा आणि एक गट झाला काळा रंग आवडणार्या मुलांचा. गट पाडल्यानंतर रेखानी मुलांना गटाप्रमाणे उभं राहायला सांगितलं आणि सगळ्यांचा खेळ घ्यायला सुरुवात केली. हा खेळ होता ’शिवाजी म्हणतो’. ’शिवाजी म्हणतो’ हा मुलांचा अत्यंत लाडका खेळ. एकावर राज्य येतं. राज्य घेणार्यानी बाकीच्या खेळाडूंना आज्ञा देऊन त्यांना काही गोष्टी करायला लावायच्या असतात. खेळाडूंनी ही आज्ञा तेव्हाच ऐकायची असते जेव्हा राज्य घेणारी व्यक्ती आज्ञेची सुरुवात ’शिवाजी म्हणतो’नी करते.
हा खेळ खेळता खेळता अर्धा पाऊण तास कसा गेला कुणालाच कळलं नाही. रेखाचं लक्ष जेव्हा घड्याळाकडे गेलं तेव्हा जेवणाची वेळ झाली होती. तिने मुलांना डबे काढायला सांगितले. डबे काढल्यावर सगळी मुलं आपापल्या मित्रमंडळींजवळ बसायला गेली. ते बघितल्यावर रेखा म्हणाली....
‘’आपण डबा खाऊच, पण त्याआधी मला जरा काही प्रश्नांची उत्तरं द्या बरं...”
मुलं एकमेकांकडे बघायला लागली...
‘’मला सांगा शिवाजी म्हणतो खेळताना मी काय बोलत होते ते सगळ्यांना समजत होतं??”
मुलं गोंधळली पण त्यांनी माना डोलावल्या.
‘’डबा खायला तुम्ही आपापल्या मित्र-मैत्रिणींमध्ये बसताय त्यातले काही मगाशी खेळ खेळताना वेगवेगळ्या गटात होते, होते ना?”
मुलांनी परत माना डोलावल्या.
’तुमच्या मित्र-मैत्रिणींचा आवडता रंग वेगळा आहे हे कळल्यावर तुम्हाला त्यांचा राग आला का?”
आता मात्र मुलं पूर्ण गोंधळात पडली होती. शेवटी केदारने हात वर केला आणि त्यानी विचारलं,
‘’ताई आमच्या मैत्रीचा आणि आमच्या आवडत्या रंगांचा काय संबंध आहे?”
‘’हो ना ताई...” बाकी मुलं पण म्हणायला लागली.
’‘नाहीच आहे, मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं की आवडता रंग वेगवेगळा असला तरी तुम्हाला सगळ्यांना खेळात वापरलेली भाषा येत होती, समजत होती. तसंच आपला खेळ संपल्यावर तुम्ही गट मोडून आपापल्या मित्र- मैत्रिणीकडे गेलात आणि तसेच आत्ता डबा खायला एकत्र बसताय. म्हणजे काय तर आवडते रंग वेगळे असले म्हणून काही तुमच्या एकमेकांबरोबरच्या वागणुकीत फरक पडला...”
“...नाही ” मुलं एका सुरात म्हणाली.
रेखा स्वतःशीच हसली ती पुढे म्हणाली...
’‘सांगण्याचा मुद्दा काय, तर वेगळे धर्म असल्याने फरक पडत असला तरी तो खूप मोठा असतोच असं नाही. आता हेच बघा मगाशी आपण ज्यांची नावं वाचली ते जवान लढताना त्यांच्या गणवेशात होते. त्यांनी ना निळं घातलं होतं, ना केशरी घातलं होतं, ना हिरवं घातलं होतं, ना पांढरं घातलं होतं. घातला होता तो फक्त त्यांचा गणवेश.. म्हणजे सांगायचं काय तर आपल्या धर्माच्या, आपल्या जातीच्या आधी आपण सगळेजण भारतीय आहोत.... कोण आहोत??”
’‘भारतीय”... मुलं जोरात ओरडली.
’‘चला तर मग, आधी या सगळ्यांच्या साक्षीने आपण प्रतिज्ञा आणि राष्ट्रगीत म्हणून त्यानंतर आपले डबे खाऊ...”
‘’भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत...”
मुलं प्रतिज्ञा म्हणत होती..
आणि ती प्रतिज्ञा ऐकताना रेखाचे डोळे का कुणास ठाऊक आपसूकच भरून येत होते.