राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आगामी काळातील कामासाठी घोषित केलेल्या पंचसूत्रीपैकी, ’सामाजिक समरसता’, या सूत्राभोवती साप्ताहिक विवेकने दीपावली विशेेषांक 2025 साठी ‘कथा समरसतेच्या’ ही कथालेखन स्पर्धा आयोजित केली होती. त्यातील प्रथम क्रमांक विजेती कथा..
गावाबाहेरच्या गावदेवीच्या मंदिरात भल्या पहाटे ब्राह्ममुहूर्तावर गावकरी जमू लागले होते. जो तो परंपरेनुसार आपापली कामे करण्यात व्यस्त होता. मंदिराची साफसफाई, विद्युत रोषणाई, ध्वनिक्षेपक, पूजा अभिषेकासाठीच्या वस्तूंची जमवाजमव वगैरे कामे पार पडली होती. फुलांच्या माळांची आकर्षक सजावट मन मोहवणारी होती. देवीसाठी नवे वस्त्र आणले होते. आज गावदेवीच्या उत्सवाचा मुख्य दिवस होता. बदलत्या काळानुसार पूर्वी दहा दिवस चालणारा उत्सव आता पाच दिवसांवर आला होता. आधी तीन दिवस, मध्येे मुख्य दिवस आणि शेवटच्या दिवशी सकाळी लळीताचे कीर्तन व दुपारी महाप्रसाद होत असे. धार्मिक विधी, अनुष्ठान, पारायण, प्रवचने, कीर्तने, भजने, छबिना पालखी, प्रदक्षिणा, मिरवणूक असे भरगच्च कार्यक्रम उत्सवात होत असत. लहान-थोर, स्त्री-पुरुष, गावकरी दैनंदिन कामातून वेळ काढून मोठ्या हिरीरीने उत्सवात सामील होऊन आनंद लुटत असत. काही जण तर चार दिवस मंदिरातच मुक्कामी राहत असत. गावावर देवीची कृपा आहे, हा प्रत्येकाचा अनुभव असल्याने उत्सवाचा उत्साह खूपच होता आणि आहे.
पहाटेच्या मंगलमय वातावरणात विद्युत दिवे आणि माळांच्या प्रकाशाने उजळलेल्या गावदेवीच्या मंदिराची शोभा काही औरच दिसत होती. सनई चौघड्याचे सूर आसमंतात घुमू लागल्यावर मंगलमयतेत आणखीनच भर पडली. गावातील लोक प्रतिनिधी, सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, आरोग्य अधिकारी सर्वच जमू लागले होते. जो तो आपापल्या अधिकार आणि उपलब्धतेनुसार पडेल त्या कामात सहभागी होत होता. पावणे सहा वाजले आणि गावच्या पाटलांनी मंदिराच्या भव्य प्रवेशदारातून मंदिरात प्रवेश केला. बाहेर दगडी तटबंदी, भव्य प्रवेशद्वार, तटबंदीमध्ये काढलेल्या ओर्या तसेच खोल्या, दरवाजातून आत येताच पुढे आणि मुख्य मंदिराभोवती वीस पंचवीस फूट मोकळी जागा, दीपमाळ, विहीर, ऐसपैस सभामंडप, मध्यगृह नंतर गाभारा आणि गाभार्यातील प्रसन्नवदन देवीची मूर्ती अशी मंदिराची चौरसाकृती रचना होती. मंदिराची भव्यता, शिखरावरील कलाकुसर, सुबक नेटके आणि टिकाऊ बांधकाम पूर्वजांच्या बुद्धिमत्तेची आणि कल्पकतेची साक्ष पटवणारे ह़ोते. मोकळ्या जागेतून पाटील सभामंडपात आले. सत्तरी गाठलेले तरीही तरुणाला लाजवेल असा उत्साह असणारे पाटील गावातील जुनेजाणते व्यक्ती होते. अडीनडीला कोणीही बोलवावे, जरूर तेव्हा योग्य तो सल्ला घ्यावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्याविषयी सर्वांच्या मनात आदरयुक्त भीती असे. गावच्या परंपरांचे उचित ज्ञान आणि त्या यथायोग्यपणे पार पाडण्याविषयी त्यांची आग्रही भूमिका असे.
पाटील येताच सर्वांनी त्यांना अभिवादन केले. पाटलांनी पूजेची, अभिषेकाची तयारी पाहिली. जे उणे होते त्याची पूर्तता करण्याच्या सूचना दिल्या. सहाला पाच कमी होतेे तरी पूजा सांगणारे गुरुजी अजून आले नाहीत हे लक्षात येताच पाटील महादा गड्याला म्हणाले,“ए महादू, जा अन् बग तरी दत्तू बामण का आला नाय. सहा वाजत आलं पूजा येळेत सुरु व्हायला नको व्हय?”
“व्हय जी, लगेच जातू...”महादू लगबगीने निघाला.
इतक्यात धोतराचा सोगा सावरत दत्तात्रय रामजी कुलकर्णी गुरूजी पळत येताना दिसले. गुरूजींना पाहताच महादू ओरडला, “आले नव्हं का काका...”
“उशीर केलासा!”... पाटलांच्या प्रश्नावर गुरुजी उत्तरले,“पहाटे तीनलाच गेलो होतो पलिकडच्या रामवाडीत. तिथे पूजा होती.”
“बरं... बरं...” पाटलांनी मान डोलवली.
गुरुजी गडबड करीत म्हणाले,“यजमान आचमन करा... केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः,.... ”
पूजा सुरू झाल्यावर गावातले व्यापारी भवरलालही आले. खिळ्यापासून तोळ्यापर्यंत जे हवे ते मिळणारे, गावात त्यांचे एकच दुकान होते. इनमिन पाचशे उंबर्याचे, अडीच तीन हजार लोकसंख्येचं गाव लक्ष्मणवाडी. गाव तस जुन्या वळणाचं, शहरी संस्कृतीपासून दूर. शेती हा तिथला मुख्य व्यवसाय. काही जणांकडे गायी, म्हशी होत्या. पाटलांचा जुना चिरेबंदी वाडा ही गावातील मोठी वास्तू. तटबंदी, दरवाजा, दिंडी दरवाजा, अंगण, तुळशी वृंदावन, वर्हांडा, बसायउठायच्या खोल्या, माजघर, स्वयंपाकघर, तळघर आणि देवघर असा सगळा थाट होता. पाटलांचा मुलगा उच्चशिक्षित असून परदेशी मोठ्या पदावर कार्यरत होता. तो ही पाटलांप्रमाणेच समाजाभिमुख वृत्तीचा सद्गृहस्थ होता. परदेश पाहिल्याने जगाची नवी दिशा तो जाणून होता. पाटलांनंतर मोठी इमारत होती भवरलालशेटची. वाडवडीलांकडून चालत आलेला धंदा तो प्रामाणिकपणे करत होता. गावात दुकाने, मुले, नातवंडे, नोकरचाकर गावातील सुखवस्तू असे त्याचे कुटुंब होते. पक्की; कच्ची घरे, काहींच्या झोपड्या अशी साधारण गावाची अवस्था होती. रस्ते, पाणी, दिवाबत्ती, शाळा, आरोग्य केंद्र व्यवस्था होत्या.
भवरलालच्या शेजारीच दत्तू ब्राह्मणाचे घर होते. आसपासच्या पाचदहा गावात हे एकमेव ब्राह्मण कुटुंब होते. पाचदहा गावांची भिक्षुकी असल्याने दत्तूच्या पायाला सतत भिंगरी लागलेली असायची. दत्तूचे तीन खोल्यांचे साधे घर होते. घराच्या अंगणात जाईजुईचा वेल, मोगरा, अबोली, गुलाब फुलझाडे होती. भवरलालच्या दारातील प्राजक्तांच्या फुलांचा सडा दत्तूच्या अंगणाची शोभा वाढवत असे. मागच्या दारात अंब्याचे मोठे झाड होते. दत्तू आणि त्याची पत्नी लक्ष्मी दोघेच होते. दोन वर्षापूर्वी दत्तूची आई गेल्याने आणि त्याआधी वडील गेल्याने घरात वडिलधारे असे कोणी उरले नव्हते. वडीलच दत्तूचे गुरू होते. त्यांच्यानंतर भिक्षुकीची जबाबदारी त्याच्यावर आली होती. वडिलांनी त्याला शिकवून तयार केल्याने तो पूजा, शांती आदि धार्मिक विधी करण्यात तरबेज झाला होता. लक्ष्मीही अतिशय समजूतदार गृहकर्तव्यदक्ष पत्नी होती. मिळेल त्यात आनंदाने राहून ती सुखाचा प्रपंच करीत होती. ‘हेच पाहिजे, तेच पाहिजे’, असा तिचा मुळीच हट्ट नसे. कधी वाकडे बोलणे नाही, का कधी आवाज चढला नाही. तुटपुंज्या उत्पन्नामुळे लक्ष्मीसारख्या गुणी पत्नीची आपण काहीच हौसमौज करू शकत नाही याची दत्तूला नेहमी खंत वाटे. त्यातच लग्नाला चार-पाच वर्ष झाली तरी अजून पोटी अपत्य नसल्याचे दुःख दोघांनाही होते. व्रतवैकल्ये, उपासतापास, कोणी काही सांगितले की तो उपाय असे सगळे सुरू होते. लक्ष्मी तर देवाला रोज साकडे घालत होती. दिवसामागून दिवस जात होते.
एके दिवशी शेजारच्या काकूंनी लक्ष्मीला सांगितले,“जवळच्या शहरात भागवत कथेच्या निमित्ताने काशीचे प्रसिद्ध ज्योतिषी आले आहेत. त्यांना जाऊन पत्रिका दाखव.” झालं... बुडत्याला काडीचा आधार! दत्तू आणि लक्ष्मी दोघेही शहरात आले. त्या पंडितांचा पत्ता शोधला. पत्रिका दाखवली. पत्रिका पाहून त्यांनी दत्तूला श्रीगणेशाची उपासना करण्यास सांगितली. रोज ठरावीक माळा गणपतीचे नामस्मरण आणि रोज श्रीगणपती अथर्वशीर्षाचे पाठ करण्यास सांगितले. दरवर्षी एक झाड लावून त्याची जोपासना करायला सांगितली. तसेच भिक्षुकीचे शिक्षण देऊन विद्यार्थी घडवल्यास त्या पुण्यलाभाने पुत्रप्राप्ती होईल असेही सांगितले. जप काय कितीही करता येईल. अथर्वशीर्षाचे पाठ करणे अवघड काम नाही. दर वर्षी झाड लावणे आणि पाणी घालून ते जोपासणे काही कठीण नाही. मात्र विद्यार्थी घडवणे अशक्यच आहे. दत्तूच्या मनात विचारचक्र सुरू झाले. हात दाखवून अवलक्षण असाच हा प्रकार घडला. ‘आता एकतर संपूर्ण पंचक्रोशीत आपले एकच ब्राह्मण कुटुंब. भिक्षुकी शिकवणार तरी कोणाला?’ दत्तूला मोठा प्रश्न पडला. काम होणार नसले की असे अवघड उपाय करायला सांगतात. तेव्हा आपल्या नशिबी अपत्यसुख नाही याची दत्तूला खात्री पटली. त्याने तसे लक्ष्मीला बोलूनही दाखवले. लक्ष्मी मात्र खूपच आनंदित झाली होती. ज्योतिषी महाराजांच्या उपासनेच्या तेजाने आणि मधुर ओघवत्या निग्रही वाणीने ती प्रभावित झाली होती. त्यानी सांगितलेला उपाय केला की आपले काम नक्की होणार असा तिला विश्वास वाटत होता. दत्तू साशंक मनाने तर लक्ष्मी आश्वासित मनाने घरी आले.
श्रीगणेशाच्या जपाची जबाबदारी लक्ष्मीने स्वतःकडे घेतली. साहजिकच अथर्वशीर्षाचे पाठ करण्यास दत्तूने सुरुवात केली. दोघांनी मिळून गावच्या उजाड टेकडीवर एक झाडही लावले. त्याला रोज पाणी घातले जाईल अशी व्यवस्थाही केली. आता उरलेली एकच गोष्ट... विद्यार्थी घडविण्याचे कसे जमणार? या दत्तूच्या शंकेवर लक्ष्मीने त्याला उत्तर दिले, “श्री गजानन योग्य तो मार्ग दाखवतील.” दत्तूनेही लक्ष्मीच्या विश्वासावर विश्वास ठेवला आणि रोज दत्तूच्या खड्या आवाजातील अथर्वशीर्षाचे स्वर वातावरणात घुमू लागले. आजूबाजूच्या लोकांना आपोआपच श्रवणभक्तीचा लाभ घडत होता. लक्ष्मीही ठरलेला जप नियमाने करीत होती. दिवसामागून दिवस जात होते.
साधारण दोन वर्षाचा कालावधी लोटला असेल. एक दिवस दत्तू सकाळ दुपारची कामे आटोपून साधारण चार-पाचच्या सुमारास घरी परतत असताना अचानकपणे त्याच्या कानावर शब्द आले,
“हरीः ॐ नमस्ते गणपतये...”
श्रीगणपती अथर्वशीर्ष कोण म्हणतंय? दत्तूला काहीच कळेना. आवाज तर लहान मुलाचा आहे. जरा पुढे जाऊन पाहिले, तर काही मुले गोट्या खेळताना त्याला दिसली. त्यात एक सात-आठ वर्षांचा छोटा मुलगा गोट्याचा नेम लावताना म्हणत होता,“हरीः ॐ नमस्ते गणपतये....” ते ऐकून आश्चर्यचकित झालेल्या दत्तूने त्या मुलाला जवळ बोलावले आणि विचारले,
“अरे, तू हे काय म्हणतोयस?”
“अहो काका, तुम्हीच तर म्हणता ना रोज संध्याकाळी. ते ऐकून पाठ झालंय माझं...” असे म्हणून तो पुन्हा खेळू लागला.
दत्तूही काहीही न बोलता घरी आला असला तरी त्याच्या मनात काही गोष्टी घर करू लागल्या. मुलाचा शुद्ध स्वर आणि आपल्यासारखे जसेच्या तसे म्हणण्याची क्षमता पाहून दत्तूला खूपच आश्चर्य वाटले होते. त्याचबरोबर त्याच्या मनात एक पुसटसशी आशा निर्माण होऊ लागली होती. कोण आहे हा मुलगा? किती शुद्ध आहे याची वाणी! याला शिकवले तर हा निश्चितच शिकू शकेल. त्याचे वयही योग्य आहे. काय करावे? शिकवावे काय याला? विद्यार्थी म्हणून घडेल का हा? प्रयत्न करायला काय हरकत आहे. दत्तूचे मन काही निर्णय घेत होते.
दुसर्या दिवशी घरी येताना त्या मुलाला दत्तूने जवळ बोलवले.
”बाळ तुझे नाव काय?” दत्तूच्या प्रश्नावर तो उत्तरला,
‘’गोपाल परशुराम वायदंडे...”
“शाळेत जातोस का?”
“हो, तिसरीत आहे...”
“तू हे जे माझे ऐकून म्हणतोयस ते काय आहे तुला माहीत आहे का?”
“नाही...”
“पुन्हा म्हण बरं...”असे दत्तूने सांगताच,
हरीः ॐ नमस्ते गणपतये
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि
त्वमेव केवलं कर्त्ताऽसि
त्वमेव केवलं धर्तासि
त्वमेव केवलं हर्ताऽसि........
संपूर्ण अथर्वशीर्ष गोपालने म्हणून दाखवले.
काका आपल्या मुलाशी बोलत आहेत, हे भवरलालच्या घरातून रखमाने पाहिले आणि आपला मुलगा काही चुकला तर नसेल ना? त्याने काही खोडी तर केली नसेल ना? या विचाराने ती बेचैन झाली. हातातील काम तसेच टाकून आले असं मालकिणबाईंना सांगून ती दोघांजवळ आली. दत्तूला उद्देशून तिने विचारले,
“काय झालं जी? काय चुकला का माझा गोपू, कार्टं वांड हाय. दोन धपाटं हाणलं की व्हिल सरळ.”
“अगं रखमा थांब थांब.... गुणी आहे तुझं पोरगं. असं कर... तुझं काम झालं की घरी जाताना माझ्या घरी ये. थोडं काम आहे.”
“व्हय जी... येतू...” असे म्हणून ती गोपालला घेऊन निघून गेली.
रखमा भवरलालच्या घरी केरवारे धुणीभांडी पडेल ते काम करणारी मोलकरीण. चांगली आठवीपर्यंत शिकलेली. नववीत असताना बापानं तिचं लग्न लावून दिलं आणि तिचं शिक्षण संपलं. नवरा परशुराम ग्रामपंचायतीत सफाई कामगार. तीन पोरींवर तिला झालेला हा गोपाल अशी चार मुलं. लग्नानंतर काही वर्ष चांगली गेली. परशुरामला दारूचं व्यसन लागल आणि सगळं बिघडलं. पगार पुरेना झाला. चार पोरं सांभाळायची जबाबदारी, मग काय करणार? कुठेतरी काम करून पैसा मिळविण्याशिवाय तिला पर्यायच नव्हता. भवरलालशेटकडे तिला काम मिळालं आणि पोरांच्या पोटात दोन घास जाऊ लागले. त्यांच्या शाळेचा खर्चही भागू लागला. रखमाचे काम झाल्यावर ती घरी जाताना दत्तूकडे आली. गोपाल सोबत होताच.
तिला पाहताच,“ये...ये...”दत्तू म्हणाला.
“आलो जी... काय काम हूतं?”
“काही नाही...उद्यापासून तू कामावर आलीस की गोपालला आमच्या घरी सोडत जा. हुशार आहे तो.”
“अवं पन लान हाय जी गोपाल. त्येला नाय जमायच काम...”
“अगं, रखमा कामासाठी नाही...त्याला शिकवण्यासाठी बोलवतोय. बघूया त्याला जमते का. का कंटाळा करतोय ते...”
“नाय जी शिकल की...कटाळा कसा करंल‘”
“काय रे...गोपाल येशील ना शिकायला?” आपला रोख गोपालकडे वळवून दत्तूने विचारले.
“हो. येतो उद्यापासून...”गोपाल हिरीरीने म्हणाला.
दत्तूनेही हा विद्यार्थी घडवायचे ठरवले.
दुसर्या दिवशीपासून गोपालचे शिक्षण सुरू झाले. गोपालला चालणे, बोलणे, वागणे शिकवण्यापासून दत्तूने सुरुवात केली. बुद्धीची क्षमता आणि सतेजता वाढावी यासाठी योग्य तो आहार विहार याचेही शिक्षण दिले. गोपाललाही सर्व गोष्टी शिकण्यात विशेष रस वाटत होता. सरस्वती मातेचाच जणू आशीर्वाद त्याला मिळाला होता. गोपालच्या स्वभावाची आणि वागण्याची खात्री पटल्यावर उचित मुहूर्तावर दत्तूने त्याची मुंज केली आणि गोपालचे शिक्षण सुरू झाले. शाळेतही गोपालची प्रगती वाखाणण्याजोगी होती. एका पाठोपाठ एक स्तोत्रे, मंत्र, पूजाविधी दत्तूने शिकवलेले सगळे गोपाल मुखोद्गत करीत होता.
बघता बघता दहा वर्ष लोटली. गावाबाहेरच्या टेकडीवर बारा झाडे डौलाने उभी होती. पहिल्या वर्षी लावलेले झाड बारा वर्षाचे झाले होते. गोपालही शिकून तयार झाला होता. दहा वर्षात गावाची दशा आणि दिशा बदलली होती. झोपड्यांच्या जागी पक्की घरे, घरोघरी वीज, नळाने पाणी, स्वच्छ इंधन, प्रशस्त रस्ते, आरोग्य केंद्र, शाळा सुधारणा झाली होती. किसान सन्मान निधी, मुफ्त राशन योजनेमुळे गरिबांच्या ताटात हक्काचा घास आला होता. देशाच्या प्रगती सोबत गावही बदलत होता.
गावदेवीच्या उत्सवाचे हे विशेष वर्ष होते. पाटलांनी ऐंशी पार केली होती. पाटलांचा मुलगा सेच्छानिवृत्ती घेऊन परदेशातून आला होता. यावर्षी पुढे होऊन तो सर्व निर्णय घेत होता. म्हणलं तर पाटलांची जागा त्याने घेतली होती. उत्सवाचे तीन दिवस आनंदात पार पडले होते. दत्तू सोबत गोपालही धार्मिक विधीत अंतर ठेवून भाग घेत होता. मात्र त्याची उपस्थिती काहींना खटकत होती. मुख्यत्वे पाटलांना.
“हा मुलगाच आहे माझा. त्याचे वागणे पहा. ओळखून सगळे करतो. नियम पाळतो. धोतर, शेंडी राखतो. जन्माने नसला तरी कर्माने त्याला हक्क आहे...” दत्तूच्या स्पष्टीकरणाने सगळे गप्प होते. उद्या उत्सवाचा मुख्य दिवस होता. उद्या लवकर येऊन अभिषेक करायचा या विचारात रात्री कीर्तन ऐकून घरी जात असताना अघटीत घडले. दत्तूला चक्कर आली आणि तो कोसळला. रक्तदाब वाढल्याचे निदान डॉक्टरांनी केले. दत्तूची स्थिती घरी सोडण्यासारखी नाही या डॉक्टरांच्या बोलण्यावर पाटील म्हणाले,
“आता देवीचा अभिषेक कोण सांगणार?”
चक्करेच्या धक्क्याने घाबरलेला दत्तू क्षीण आवाजात म्हणाला,
“गोपाल आहे ना...”
हे ऐकताच पाटील तडकले. प्रसंग ओळखून मुलाने पाटलांना बाहेर नेले आणि तो त्यांना समजावू लागला,
“बाबा काळ बदलाय. आज योग्यतेने मोठे होण्याची समान संधी सर्वांना आहे. हीच वेळ आहे पुस्तकात शिकलेली समानता प्रत्यक्षात उतरवण्याची. आज अभिषेकाची परंपरा राखली पाहिजे. ती आपण राखू शकत नाही. मग जो ती राखू शकतो त्याला नाकारण्यात काय अर्थ आहे?”
मुलाचे बोलणे ऐकून पाटील विचारमग्न झाले आणि म्हणाले,
“करा काय करायचे ते. पन आम्हांस्नी हे पटत नाय...”
रागाने का होईना पाटलांनी परवानगी दिली आणि अभिषेक उर्वरित कार्यक्रम होऊन उत्सवाची सांगता झाली.
यावेळी गोपालला गाभारा प्रवेशच मिळाला नाही तर अभिषेकाचा अधिकारही मिळाला होता आणि सार्या गावाने अनुभवली होती समरसतेची नवी दिशा. दत्तूही बरा होऊन घरी आला. तिनीसांजेच्या वेळेस असाच बसला असताना दत्तू लक्ष्मीला सहजच म्हणाला,
“इतके दिवस मी एकट्याने हा भिक्षुकीचा गाडा ओढला, पण आता या पंचक्रोशीत दोन भिक्षुक झाले आहेत...”
यावर लक्ष्मी म्हणाली,“अहो दोन नाही... तीन...”
“मी नाही समजलो!”
“अहो तुम्हाला चक्कर आली ना तेव्हा मलाही चक्कर आली होती...तिसर्या भिक्षुकाच्या आगमनाची चाहूल देणारी...”