इकडे आड तिकडे विहीर

07 Nov 2025 17:24:03
Zohran Mamdani 
 
zohran-mamdani 
 राहुल गांधींसारखे लोक अपप्रचाराची राळ उठवीत असले तरी मोदी यांनी घेतलेली भूमिका ही राष्ट्रवादी समन्वयाचीच आहे. ममदानीच्या विजयाने नवा ओबामा असा त्यांचा उदो उदो होत आहे. पण त्यांची आर्थिक, वैचारिक, राजकीय भूमिका अमेरिकेत एका वेगळ्या टोकाचे ध्रुवीकरण करणारी आहे. ममदानी आणि ट्रम्प अशा दोन वेगळ्या ध्रुवात हेलकावणारा लंबक कोणत्याही टोकाला गेला तरी अमेरिकेसाठी ते दुर्भाग्याचेच ठरणार आहे.
अमेरिकेतील न्यूयॉर्क शहराच्या महापौरपदासाठी झालेल्या निवडणुकीत झोहरान ममदानी यांचा झालेला विजय फारसा अनपेक्षित म्हणता येणार नाही. यासाठी प्रभावी ठरलेल्या विविध घटकांनी त्यांच्या पदरात झुकते माप दिले आणि हा विजय झालेला आहे. ममदानींचा हा विजय डेमोक्रॅटिक पक्षाचा विजय मानला जात असून तो रिपब्लिकनांना पर्यायाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही हादरा मानला जात आहे. या दृष्टीने ममदानी अनेकांना आशेचा किरण वाटत असला तरी या विजयाची पार्श्वभूमी तसे कथन करीत नाही. अनेकदा मतदारांना समर्थ पर्याय नसताना उपलब्ध पर्यायामधून त्यातल्या त्यात बरा पर्याय निवडणे भाग असते, तसाच पर्याय ममदानींच्या रूपाने न्यूयॉर्क शहराच्या भाळी आलेला आहे. परंपरेने न्यूयॉर्क शहरावर डेमोक्रेटिक पक्षाचाच प्रभाव आहे आणि ममदानीच्या विरोधात उभ्या असलेल्या अपक्ष पण पूर्वाश्रमीचे डेमोक्रेटिक पक्षाचेच असलेले उमेदवार अँड्रयू कुओमी हे लैंगिक शोषणाच्या विवादास्पद आरोपाच्या घेर्‍यात सापडलेले होते व रिपब्लिकन उमेदवार कर्टिस सिल्व्हा निवडून येण्याची शक्यता नव्हती. डेमोक्रेटिक पक्षातूनच ममदानीऐवजी समर्थ पर्याय उभा करता न येणे ही यातील शोकांतिका होय.
 
 
काही जणांना हा विजय ऐतिहासिक वाटत असला आणि निवडून आल्यानंतर ममदानी यांनी पहिल्याच भाषणात पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या शैलीत नियतीशी करार याची आठवण करून देण्याचा आव आणला असला तरी त्यांचा विजय एका राजकीय अपरिहार्यतेमुळे सुकर झालेला आहे हे लपविता येणार नाही. ज्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात ममदानी उभे राहिले, त्यांच्या अनेक बाबतीतील अतिरेकी भूमिका आणि टोकाची वक्तव्ये यामुळेच ममदानीचा विजय सुकर झालेला आहे. पण हा विजय नाम्या नागवला आणि सख्या सजवला याच उक्तीत मोडणारा आहे. कारण एका अतिरेकी भूमिकेचे दुसर्‍या अतिरेकी भूमिकेत उत्तर शोधता येत नाही. त्याने समस्येचे समाधान होत नाही.
 
 
ममदानी यांनी क्रांतिकारी समाजवादाच्या विजयाचा आव आणत, वंचित, उपेक्षित, गरीब, श्रमजीवी, नोकरदार यांच्यासहित समाजातील विविध घटकांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्याची भूमिका मांडलेली आहेे. पण ही एका अर्थाने अमेरिकन भूमीवरील अरविंद केजरीवालची आवृत्ती भासत आहे. जेव्हा काँग्रेसकडून भारतीय जनतेचा भ्रमनिरास झाला होता आणि अन्य पक्षांचा तितकासा समर्थ पर्याय दिल्लीतील जनतेला उपलब्ध होत नव्हता तेव्हा ती पोकळी अरविंद केजरीवाल यांनी भरून काढल्याचा भास निर्माण झाला होता. पण आता केजरीवालांचे नेतृत्व पूर्णत: अर्थहीन झालेले दिसते आणि भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्याची प्रतिज्ञा करून सत्तासंपादन करणार्‍या केजरीवालांना भ्रष्टाचाराच्याच आरोपामुळे तुरुंगवारीही घडली व मुख्यमंत्रीपदही सोडावे लागले. न्यूयॉर्क हे सुद्धा दिल्लीसारखेच महत्त्वाचे शहर आहे हाही योगायोग मानावा. करोना काळानंतर कमी उत्पन्न गटातील नागरिकांच्या घरांची कर्जे थकल्यामुळे त्यांची मालमत्ता जप्त करण्यास प्रतिबंध करावा, यासाठी राबवीत असलेल्या उपक्रमात ममदानी यांनी सल्लागार म्हणून भूमिका बजावली. त्यासाठी बँकांशी त्यांनी संवाद आणि संपर्क ठेवला होता.
 
 
न्यूयॉर्कमधील राहणीमानाचा खर्च कमी व्हावा ही भूमिका महापौरपदाची निवडणूक लढवताना त्यांनी घेतली. दिल्लीप्रमाणेच वेगवेगळ्या समस्यांचा विळखा न्यूयॉर्कभोवती पडलेला असताना ममदानी यांनीही मोफत बसप्रवास, सरकारी शिधावाटप दुकाने इत्यादी लोकप्रिय घोषणांचे गाजर दाखवून मतदारांना भुरळ पाडली हाही समान धागा या विजयात दिसतो. न्यूयॉर्कमधील कामगार वर्ग त्यांनी डोळ्यासमोर ठेवला. त्यामुळे तरुण आणि कामगार वर्गातून मोठा पाठिंबा त्यांना मिळाला. या लोकांचे जीवनमान उंचावण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे. पण निवडणूक काळात दिली गेलेली आश्वासने प्रत्यक्षात पूर्ण करताना कशी पुरेवाट होते आणि कशी राजकीय फरफट होते, हे केजरीवालांच्या रूपाने भारतीयांनी अनुभवलेले आहे.
 
 
मनमोहन सिंहासारख्या नेतृत्वाच्या काळात आपची जादू जनमानसावर चालली पण जेव्हा नरेंद्र मोदी यांच्यासारखा संयमी आणि समर्थ पर्याय देशाला उपलब्ध झाला तेव्हा जनतेमागचे दुर्दैवाचे फेरे संपले. मात्र एक महासत्ता अशी ख्याती असलेल्या अमेरिकेचे न्यूयॉर्क हे शहर दुर्दैवाच्या फेर्‍यात अडकण्याची सार्थ भीती ममदानी यांच्या विजयाने निर्माण झालेली आहे. ममदानींच्या मुस्लीम असण्याने अशी भीती व्यक्त केली जात नसून त्यांचा वैचारिक लंबकही एका टोकाला झुकलेला आहे हे त्याचे खरे कारण आहे. ट्रम्प यांचा अतिरेक वेगळ्या प्रकारचा होता तर ममदानी याचा अतिरेक वेगळ्या प्रकारचा आहे. आपण पॅलेस्टाईन समर्थक आहोत आणि ज्यू लोकांचे विरोधक आहोत हे ममदानी यांनी कधीच लपवून ठेवलेले नाही. ट्रम्प यांनी ‘मेक अमेरिका ग्रेट अगेन’ असा नारा दिला आणि अमेरिकेत आधीपासून असलेले स्थलांतरित आणि नव्याने अमेरिकेत येण्यास उत्सुक असणारे अन्य देशांतील नागरिक यांच्या विरोधात कडवी भूमिका घेतली. आता ममदानी यांनी अशी टोकाची भूमिका घेतली आहे की, आताच्या विजयानंतर न्यूयॉर्कचे नेतृत्व स्थलांतरितच करणार आहेत. न्यूयॉर्क हे स्थलांतरितांचे शहर राहील. या शहराची बांधणी स्थलांतरितांनी केली, उर्जा स्थलांतरितांनी दिली आणि आज या शहराला नेतृत्वही स्थलांतरित लाभले आहे. हासुद्धा टोकाचा अतिरेकी विचार झाला. ममदानी यांनी ट्रम्प यांचा देशाचा विश्वासघात करणारे म्हणून उल्लेख केला आहे. आज भारतात मोदी यांच्याविरोधात राहुल गांधींसारखे लोक अपप्रचाराची राळ उठवीत असले तरी मोदी यांनी घेतलेली भूमिका ही राष्ट्रवादी समन्वयाचीच आहे. ममदानीच्या विजयाने नवा ओबामा असा त्यांचा उदो उदो होत आहे. पण त्यांची आर्थिक, वैचारिक, राजकीय भूमिका अमेरिकेत एका वेगळ्या टोकाचे ध्रुवीकरण करणारी आहे. ममदानी आणि ट्रम्प अशा दोन वेगळ्या ध्रुवात हेलकावणारा लंबक कोणत्याही टोकाला गेला तरी अमेरिकेसाठी ते दुर्भाग्याचेच ठरणार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरही सध्या समन्वयात्मक भूमिकेवाचून अन्य सकारात्मक पर्याय नाही. अमेरिकेला तसे नेतृत्व न लाभल्यास त्यांचे दुर्दैवाचे दशावतार संपणार नाहीत, हेच खरे.
Powered By Sangraha 9.0