बंध नात्यांचे - समाजातील प्रत्येक घटकांसमवेत

08 Nov 2025 17:17:46
@प्रमोद नरहर मुळे  9421509242
rss
नाशिकच्या ग्रमाविकासच्या कार्यकर्त्यांनी गारे काकांच्या पश्चात त्यांच्याकडून घेतलेल्या प्रेरणेने यंदाही वनवासी पाड्यात जाऊन भगिनींबरोबर भाऊबीज आणि स्नेहभोजन करून दिवाळी सण साजरा केला.
ग्रामविकास-नाशिक शहरातील कार्यकर्त्यांमार्फत या वर्षीचा भाऊबीज सोहळा बंधारपाडा, ता. सुरगाणा येथे साजरा करण्यात आला. ’गुरूंनी दिला संघसेवेचा वसा, आम्ही चालवू हा पुढे वारसा’ असे म्हणतात. खरं म्हणजे यंदाची दिवाळी अपूर्ण होती, कारण सर्वांचे मार्गदर्शक गारे काका ग्रामविकासाला पोरकं करून देवाघरी गेले. काकांची जागा कोणीही घेऊ शकत नाही. नाशिकच्या ग्रामविकासाच्या सर्व कार्यकर्त्यांनी नव्याने उभारी घेवून काकांना जसा अपेक्षित तसाच सण साजरा करुन त्यांची परंपरा अबाधित ठेवण्याचा निर्धार केला.
 
 
गेल्या 23 वर्षापासून भीमराव त्र्यंबक गारे काका यांनी सुरू ठेवलेला हा वारसा पुढे नेण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी दुःख बाजूला ठेवून एकत्र येण्याचे ठरविले व गुरुवार 23 ऑक्टोबर 2025 रोजी भाऊबीजेच्या दिवशी 53 बंधुभगिनींनी (25 महिला व 28 पुरुष) बंधारपाडा येथे वनवासी भगिनींबरोबर भाऊबीज साजरी करण्यासाठी दोन बसमधून प्रस्थान केले. अलभ्य लाभ म्हणजे आमच्याबरोबर मार्गदर्शन करण्यासाठी व आमचा सर्वांचा उत्साह वाढविण्यासाठी वनवासी कल्याण आश्रमचे अखिल भारतीय कार्यकर्ते गिरीशराव कुबेर व पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यकारिणी सदस्य दिलीपराव क्षीरसागर हे दोघे मान्यवर होते. ‘तू चाल पुढं’ असं म्हणायला गारे काकांच्या कुटुंबियांची उपस्थिती प्रेरणादायी होती. जयश्री गारे काकू, प्राची गारे, प्राजक्ता गारे या उपस्थित होत्या.
 
सकाळी 10 वाजता आम्ही उंबरपाडा येथे पोहोचलो. तेथे नाश्ता करून बंधारपाडा येथे दुपारी 12.00 ला पोहचलो. स्वागतासाठी गावभर संस्कारभारतीच्या रांगोळ्या काढल्या होत्या. तसेच गावाच्या वेशीजवळ सर्व गावकरी बंधुभगिनी जमले होते. स्वागतासाठी शेवंती हा पारंपरिक वनवासी स्वागत प्रकार पाहायला मिळाला.
 
 
एक महिला डोक्यावर साधारणतः 2 फूट उंचीचे तीनस्तरीय गोलाकार, रंगीबेरंगी माळा, त्याला आजूबाजूला शोभेसाठी काचेचे तुकडे व हाताने फिरविण्यासाठी ताटाला चाके लावलेली तसेच वर नवरात्रीचे घटासारखे तांब्या, कलश, नारळ असणारे लक्षवेधी अशी वस्तू. पारंपरिक वाद्यावर मिरवणूक टाळ, मृदुंग, पिपाणी, पावरी वाद्यावरील नृत्य, ज्ञानोबा-तुकोबांच्या नामघोषात भक्तीभावनेने सर्व गावकरी रंगून गेले होते. महिलांनी औक्षणाचे ताट घेवून आम्हा सर्वांचे स्वागत कार्यक्रम स्थळी केले.
बंधारपाडा हे गाव हिरव्यागार डोंगराच्या कुशीत वसलेले आहे. गावात पोहचण्यासाठी पूर्णपणे नागमोडी रस्ता आहे. बाजूने हिरवागार डोंगर, उंचावर रस्ता व खाली परत हिरवीगार झाडी असे विलोभनीय नैसर्गिक दृश्य आहे. बंधारपाडा गावासाठी ‘सुंदर माझे घर‘ ही स्पर्धा आयोजित केली होती. गावात साधारणतः 70 घरे आहेत व लोकवस्ती 400 ते 500 आहे. ‘सुंदर माझे घर‘ या संकल्पनेत सर्व 70 घरांचे निरीक्षण करायचे होते. या स्पर्धेसाठी 4 निकषांवर 60 पैकी गुण देऊन प्रथम तीन क्रमांक काढायचे होते. प्रत्येक निकषाला 15 गुण होते.स्पर्धेचे निकष - 1) परिसर, 2)स्वच्छता, 3) आरोग्य, व 4) धार्मिकता हे होते.
 
rss 
 
परिक्षणासाठी आम्हा कार्यकर्त्यांचे 4 गट केले गेले. प्रत्येक गटाला दोन गटप्रमुख व प्रत्येक गटात 7 ते 8 कार्यकर्ते परिक्षणासाठी गेले होते. प्रत्येक गटाला साधारणतः 17 ते 20 घरे परिक्षणांसाठी होती. तसेच घर दाखविण्यासाठी प्रत्येक गटात गावातील दोन-दोन कार्यकर्ते होते. स्पर्धेच्या निमित्ताने प्रत्येक घरासमोर तुळशी वृंदावन बांधले गेले होते. गावकर्‍यांना स्पर्धेची कल्पना महिनाभर आधी दिली गेली होती. ही स्पर्धा दुपारी 12.30 ते 2.00 या वेळेत पार पाडली. प्रत्येक घरात गेल्यानंतर घरासमोर भव्य रांगोळी व तुळशी वृंदावन हे दृष्टीस पडत होते. प्रत्येक घर हे अत्यंत नीटनेटके, स्वच्छता, टापटीप, सारवलेले व कोठेही पसारा नाही असे दिसून आले. प्रत्येकाचे स्वयंपाक घर हे घराच्या शेवटी आहे व स्वयंपाकघरात जाण्यासाठी मधल्या घरातून एक पायरी खाली उतरुन जावे लागते. यामागचे कारण म्हणजे अनेक घरात चुलीवर स्वयंपाक केला जातो व चुलीचा धूर मागच्या अंगणातून बाहेर जाऊ शकेल म्हणून अशी रचना आहे.
 
 
चार निकषांच्या आधारावर घरांचे परिक्षण केल्यावर घरातील माताभगिनींना साडीचोळी व फराळाचे पाकीट दिले गेले. त्यांच्याबरोबर फोटो काढले गेले व घरांचे निरीक्षण झाल्यावर माताभगिनींना कार्यक्रमस्थळी भाऊबीजेचे औक्षण करण्यासाठी निमंत्रित केले गेले. ही स्पर्धा साधारण 2 वाजेपर्यंत संपन्न झाली. 2 ते 2.30 पर्यंत कार्यक्रमस्थळी सामुदायिक भाऊबीज वनवासी भगिनींबरोबर झाली. गावातील सर्व माता-भगिनींनी आम्हा 30 बंधूंना ओवाळले व आमच्याबरोबर असणार्‍या 25 माताभगिनींनी गावातील 70 ते 80 उपस्थित बंधूंना ओवाळले असा विलक्षण असा भावस्पर्शी भाऊबीज कार्यक्रम झाला.
 
 
दुपारी 2.30 ते 3.30 सर्व गावकरी व आम्हा सर्वांचे एकत्रित भोजन झाले. भोजनात वरणभात, भाजी व बुंदी असे पक्वान्न होते. दुपारी 4 ते 6 असा मुख्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमासाठी सर्व बंधारपाडा ग्रामस्थ व आजूबाजूच्या पाड्याचे ग्रामस्थ आले होते. उपस्थिती 600 ते 700 होती. त्यात महिला व तरुण यांची संख्या लक्षणीय होती.
 
 
सुरुवातीला गिरीशराव कुबेर व दिलीपराव क्षीरसागर यांचे स्वागत करण्यात आले. तसेच प्रभुजी पाठक, भिंतघर गोशाळेचे प्रमुख, कुबेर तुकाराम पोपटी काका, दिनेशजी राजगिरे, महानुभवपंथीय घनश्याम बाबा या सर्वांचे स्वागत केले गेले. तसेच आम्हा सर्वांचे देखील पुष्प देऊन स्वागत केले गेले. त्यानंतर एक तासभर असा मंत्रमुग्ध करणारा वनवासी चालीरिती सांगणारा वनवासी गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. एकूण 12 प्रकारचे सांस्कृतिक कार्यक्रम झाले.
 
 
सर्वप्रथम वीर बजरंगबलीचे रूप धारण केलेल्या युवकाने ‘अंजनीच्या सुता तुला रामाचे वरदान, एक मुखाने बोला जय जय हनुमान’ या गीतावर नृत्य केले. उमरेमाळ पाड्यावरील 6 कलाकारांनी आदिवासींची परंपरा दर्शविणारे अप्रतिम नृत्य सादर केले. बंधारपाडे गावातील कलाकारांनी वसुबारसचे गाणे आदिवासी परंपरेनुसार सादर केले. तसेच, बंधारपाडा गावातील 6 छोट्या बालकांनी शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचे ‘दैवत आमचे छत्रपती, नाही कुणाची भिती’ हे गीत सादर केले. चिंचपाडा येथील 6 जणांच्या - 3 मुले व 3 मुली - समूहाने ‘आम्ही जातीचे शेतकरी खातो कष्टाची भाकरी‘ हे शेतकरी गीत सादर केले. ‘चावडीचा पाडा‘ या पाड्यावरील 4 मुलांनी ‘पावरी आदिवासी नृत्य‘ सादर केले. ‘भूमिका ग्रूप माळेगाव‘ येथील 2 मुलींनी पारंपरिक आदिवासी नृत्य सादर केले. ‘जगदिश ग्रूप भिंतघर‘ येथील 8 जणांनी ढोलनृत्य सादर केले. यात 4 मुले व 4 मुली 2 ढोलवादक व 3 गायक असा समूह होता. ‘लावरे ग्रुप चावडीचा पाडा‘ यांनी वनवासी नृत्य सादर केले. ‘बंधारपाडा‘ येथील 8 महिलांनी ढोल व टाळ यांच्या साथीने ‘सप्तश्रृंगीच्या डोंगरावर, अंबा बसली डोंगरावर‘ हे सप्तश्रृंगीदेवीचे गीत सादर केले. ‘जनकल्याण गोशाळा भींतघर‘ यांनी ‘बाबू एक पैसा दे दे, ओ जाने वाले बाबू‘ हे गीत प्रेक्षकांतून एंट्री घेत भिकार्‍याचा वेष परिधान करून, त्यांच्याबरोबर त्यांचे वृद्ध आईवडील यासह 4 जणांच्या समूहाने सादर केले व प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
 
rss 
 
त्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते वनवासी कल्याण आश्रमाचे पूर्णवेळ कार्यकर्ते गिरीषजी कुबेर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. गिरीशजी म्हणाले, ‘आताच्या सांस्कृतिक कार्यक्रमात आपण आपली संस्कृती व परंपरा यांचे प्रकटीकरण केले. हिंदू संस्कृतीची परंपरा वनवासी भागातच पाहता येईल. वनवासी भागात येणे म्हणजे आपल्या पूर्वजांच्या घरी येणे. वनवासी भागातील मुले कधीही आपल्या आईवडिलांना वृद्धाश्रमात पाठवत नाही हे आपण अनुभवतो. वनवासी समाजाने धर्म, संस्कृती, परंपरा जपलेली आहे. विज्ञानाच्या अनेक गोष्टी वनवासी बांधवांना माहीत आहेत. याचे वैज्ञानिक उदाहरण म्हणजे वनवासी बांधव आंबा पिकल्यावर त्याचा नैवेद्य देवाला दाखवून नंतरच खातात. तसेच त्यांनी छत्तीसगड, बस्तर या भागातील परंपरा विज्ञानाला धरून असल्याचे सोदाहरण स्पष्ट केले.
 
 
आपल्या भाषणात पुढे ते म्हणाले की, इंग्रजीत याला ङ्गखछऊखअछ घछजथङएऊॠए डधडढएचङ्घ असे म्हटले जाते. प्रकृतीने दिलेले आहे ते सर्वांचे आहे. माझ्या एकट्याचे नाही ही परंपरा वनवासी बांधव पाळतो. वनवासीचे जीवनही पर्यावरण पूरक आहे व पर्यावरण पूरक जीवन ते जगत असतात. भारताचे वास्तविक दर्शन म्हणजे वनवासी समाज राहतो तो भाग, नृत्य म्हणजे मनोरंजन नाही तर ती आमची जीवनपद्धती आहे. हे नृत्यातून दाखविले जाते. घोटळ म्हणजे संस्कार केंद्र होते ती एक जीवन शिक्षण शाळा आहे. ‘तू मै एक रक्त‘ हे वनवासी कल्याण आश्रमचे बोधवाक्य आहे. देशात 12 कोटी जनजाती समाज आहे. परंतु सर्वांची वनवासी परंपरा, संस्कृती वेगळी नाही. समरसतेचे काम हे सर्व समाजाला जोडणारे काम आहे. नगरवासी व वनवासी यांचा संपर्क सातत्याने कायम राहील हा विचार आपण केला पाहिजे. आपण एकमेकांना समजून घेऊन या देशाला परमवैभवाला न्यायचे आहे.
गिरीशजींच्या मार्गदर्शनानंतर मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण समारंभ झाला. ‘सुंदर माझे घर‘ या स्पर्धेतील 4 गटातील प्रत्येक गटातील 3 क्रमांकांना घरगुती वस्तूंचे बक्षिसाच्या रूपाने वितरण करण्यात आले. तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचे जे वेगवेगळे 12 प्रकार झाले त्यातील प्रथम तीन विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. आभारप्रदर्शन व सामुदायिक पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुनिल कान्नव, योगिनी चंद्रात्रे, स्मिता जोशी, उल्का क्षीरसागर, योगीता अमृतकर, सुनिता नरगुंद, अशोकराव गवळी व मधुकर पाटील यांनी परिश्रम घेतले.
 
 
गेल्या 23 वर्षापासून वनवासी पाड्यावर वनवासी बंधुभगिनींबरोबर भाऊबीज साजरी करणे व एका पाड्यावर लागोपाठ तीन वर्षे भाऊबीज साजरी करण्यासाठी जाणे, हा पायंडा भिमराव गारे काकांनी पाडला आहे. बंधारपाड्याचे हे प्रथम वर्ष होते. अशा दिवसभराच्या भारावलेल्या वातावरणातून सायंकाळी 6 वाजता आम्ही सर्व नाशिककडे निघालो ते पुढील भाऊबीजेपर्यंत बंधारपाड्यातील भाऊबीजेच्या आठवणी वर्षभर मनात रेंगाळत ठेवण्यासाठी...
 
 
लेखक मालेगाव जिल्हा सेवाप्रमुख आणि सा. विवेकचे नाशिक-ग्रामीण जिल्हा प्रतिनिधी आहेत.
Powered By Sangraha 9.0