@श्रीपाद कोठे
व्यक्तीच्या मनातच संकुचित व्यक्तित्वाची आणि विश्वव्यापी व्यक्तित्वाची दोन्हीची बीजे आहेत. किंबहुना एकाच बीजाचा तो क्रमविकास असतो. एकेका व्यक्तीच्या मनातील या विकास प्रक्रियेतूनच विश्व ऐक्य प्रत्यक्षात येऊ शकेल. बाह्य रचना, व्यवस्था, त्यासाठीच्या तडजोडी, चर्चा, भूमिका, खेळी यांनी विश्वाची एकता साध्य होऊ शकणार नाही; असा योगी अरविंद यांच्या चिंतनाचा सारांश आहे. 5 डिसेंबर 2025 रोजी श्री अरविंद यांच्या महासमाधीला 75 वर्षे पूर्ण झाली, त्यानिमित्त योगी अरविंदाच्या चिंतनशील विचारांवर प्रकाश टाकणारा लेख.
जग खूप जवळ आलं आहे, हे सामान्य मानवी व्यवहारातील वाक्य आता जुनं झालेलं आहे. संपूर्ण जग आता एक होण्याच्या दिशेने जात आहे. दोनेकशे वर्षांपूर्वी कोणी असा विचार मांडला असता तर लोक त्याला हसले असते. एवढेच काय कल्पनाशक्तीच्या भरार्या घेणार्या साहित्यात सुद्धा विज्ञान fantacy प्रमाणे; जगाच्या एकतेच्या सामाजिक, राजकीय fantacy लिहिल्या गेल्या नव्हत्या. अर्थात काही द्रष्ट्या मानवांनी जगाच्या एकत्वाची कल्पना केली होती. कार्ल मार्क्सने मानवीय करुणेपोटी वेगळ्या पद्धतीने जगाच्या एकत्वाची कल्पना केली होती. प्राचीन भारताने ’कृण्वंतो विश्वमार्यम’ किंवा ’वसुधैव कुटुंबकम’ अशा कल्पना मांडल्या होत्या. अगदी अलीकडे आचार्य विनोबा भावे यांनी ’जय जगत’ अशी घोषणा दिली होती. मात्र, हे नेमके कसे साध्य होईल? हे साध्य होईल अथवा नाही? साध्य झाले तरीही ते टिकेल अथवा क्षणजीवी राहील? या कशाचीही फार चर्चाही झाली नव्हती आणि तशी चर्चा करण्यासारखी परिस्थितीही नव्हती. परंतु मानवी जीवनाचा प्रवाह असा वाहत राहिला की, आज आपण संपूर्ण जगाच्या एकत्वाची चर्चा करू शकतो. विज्ञान, व्यापार आणि दळणवळण यांनी जग मोठ्या प्रमाणात एक होऊन गेलेलं आहे. पृथ्वीच्या पाठीवरील कोणताही मानव समुदाय आता अन्य जगापासून, अन्य समुदायांपासून फटकून जगू शकत नाही.
टोळी स्वरूपातील प्राथमिक स्वरूपाच्या मानवी समाजापासून जागतिक एकतेची स्वप्ने पाहाणार्या प्रगत मानवी समाजापर्यंतच्या या स्थित्यंतराचा विस्तृत आणि सखोल उहापोह योगी अरविंद यांनी केलेला आहे. योगी अरविंद यांनी आर्य मासिकात 1915 च्या सप्टेंबर महिन्यापासून 1920 पर्यंत; Ideal of human unity आणि थरी War and self determination या शीर्षकांनी दोन लेखमाला लिहिल्या होत्या. त्यात त्यांनी जगातील युद्धे आणि विश्व एकता या विषयांची सखोल मांडणी केली होती. छोट्या छोट्या व्यक्तीसमूहांना (टोळ्यांना) हळूहळू आकार देत प्रकृतीने राष्ट्र या घटकापर्यंत मानवी समूहांचा विकास घडवलेला आहे. हाच प्रवास पुढे सुरू असून तो जागतिक मानवी समुदाय प्रत्यक्षात येण्याच्या दिशेने सुरू आहे. जगभरात सुरू असलेले मानवी समूहांचे संघर्ष आणि त्यांच्यातील समन्वय या दोन्ही बाबी मानवाला त्याच दिशेने घेऊन जात आहेत. ही प्रकृतीचीच योजना आहे, असे त्यांचे प्रतिपादन होते.
भविष्यातील या जागतिक मानवी ऐक्याची दोन रूपे राहू शकतात. एक रूप विश्वराज्याचे राहू शकेल. ज्यात विद्यमान राष्ट्रे एका केंद्रीय सत्तेचे छोटे घटक राहतील किंवा दुसरे रूप विश्वऐक्याचे राहू शकेल, ज्यात प्रत्येक स्वतंत्र राष्ट्र आपले स्वातंत्र्य कायम राखून विश्व व्यवस्थेला साहाय्य करेल. अशा प्रकारच्या जागतिक मानवी एकतेकडील वाटचाल, त्याचे निरनिराळे पैलू, त्याची प्रक्रिया, त्यातील बलस्थाने व अडचणी, असे ऐक्य टिकाऊ होण्याची शक्याशक्यता आणि या विषयावरील स्वतःचे मत; असा विस्तृत आणि सखोल वेध योगी अरविंद यांनी घेतला आहे. या संदर्भात पहिल्या जागतिक महायुद्धानंतर स्थापन करण्यात आलेली League of Nations आणि नंतर उदयास आलेली United Nations Organisation यांचाही उहापोह त्यांनी या लेखमालेनंतर स्वतंत्र लेखातून घेतला होता.
मानवी एकतेची हळूहळू आकार घेणारी ही प्रक्रिया; मानवाच्या परस्पर व्यवहारांवर, विचारांवर, भावनांवर, कल्पनांवर नकळत परिणाम करत असते. त्यातून नवीन मानवसमूह जन्म घेतो. आज आपण त्याचा अनुभव घेतो आहोत. पाश्चात्य जीवनविचार प्रमाण मानणारे भारतीय लोक भारतात पाहायला मिळतात आणि हिंदू जीवनविचार मानणारे अभारतीय लोक विविध देशांमध्ये पाहायला मिळतात. आपापला जीवनविचार घेऊन, आपापल्या प्रथा-परंपरा, सण-उत्सव, धारणा, कल्पना घेऊन; आपल्या मायभूमीपासून दूर राहाणारे लोक सर्वत्र पाहायला मिळतात. माणसांच्या या जगण्यातून भाषा, विचार, कल्पना, मूल्य यांचे अभिसरण होत राहाते. हे अभिसरण जगण्याच्या बाह्य रूपाला घाट प्रदान करते. एकीकरणाची ही अतिशय स्वाभाविक आणि विवेकपूर्ण प्रक्रिया आहे. परंतु यात अनेक अडचणी आणि अडथळे येतात. ते दूर करण्यासाठी त्या त्या ठिकाणच्या व्यवस्था प्रयत्न करतात. परंतु अनेकदा त्या व्यवस्थांना समस्यांचे आकलन होत नाही. अशा वेळी सामान्य मानवी प्रक्रियेवर व्यवस्था वर्चस्व गाजवते आणि एकीकरणाच्या प्रक्रियेला खीळ बसते.
मानवी टोळ्या एक होऊन त्यातून मोठे मानवसमूह आकारास येत असताना अपरिहार्यपणे राजकीय आणि सामाजिक व्यवस्था जन्मास आल्या. प्रथम या व्यवस्था लहान होत्या. गरज आणि परिस्थिती यांच्या पोटी त्यांचा विकास होत होता. लहानात लहान घटकाचा विचारही त्यात होत असे. असा विचार करणे स्वाभाविक होते आणि शक्यही होते. परंतु समूहांचे आकार वाढत गेल्यावर आणि व्यवस्था जटिल होत गेल्यावर माणसाचा विचार average पद्धतीने होऊ लागला. आज जगातील कोणतीही व्यवस्था या Personal पद्धतीनेच चालवली जाते. average पद्धतीने नाही. थोडक्यात म्हणजे लहान, सुटसुटीत व्यवस्थेत प्रत्येक माणसाचा स्वतंत्र माणूस म्हणून केला जाणारा विचार; मोठ्या, जटिल व्यवस्थेत व्यक्ती म्हणजे समाजाचा एक घटक एवढाच उरला. मानवी इतिहासाचे विश्लेषण करून या लहान व मोठ्या व्यवस्थांचे गुणदोष सुद्धा योगी अरविंद सांगतात. ते लिहितात, ’छोट्या राज्यांमध्ये अस्थिरता, विस्कळीतपणा आणि स्वसंरक्षणाची असमर्थता हे दोष होते. या दोषांनीच विशाल साम्राज्यांना जन्म दिला. सुव्यवस्था, शांतता, सुरक्षा, भौतिक सुखसुविधा; हे विशाल साम्राज्याचे, विशाल राजकीय संघटनेचे गुण आहेत. परंतु व्यक्ती, नगरे, प्रदेश यांना आपल्या स्वातंत्र्याचे बलिदान देऊन मोठ्या यंत्राचा एक भाग होऊन त्यात राहावे लागते; हा त्याचा दोष आहे. त्यामुळे मूलभूत जीवनाची समृद्धी, स्वातंत्र्य, विविधता, सृजनशीलता मोडीत निघतात. विशाल संघटन महानता प्राप्त करतात आणि व्यक्ती नगण्य होत जाते. या विशाल संघटनेचा मूळ घटक असलेला माणूस तुच्छ आणि दुर्बल झाल्याने हळूहळू या विशाल संघटना आपोआप मोडकळीस येतात. त्यामुळे जीवनाचा विकास खंडित होतो. रोमन साम्राज्य हे त्याचे ठळक उदाहरण आहे.’
ग्रामीण जीवन आणि महानगरीय जीवन हा जो संघर्ष आज पाहायला मिळतो तो याचे उदाहरण म्हणता येईल. स्पृहणीय अशा कुटुंब व्यवस्थेचाही या अंगाने विचार करता येतो. शंभर एक वर्षांपूर्वीच्या कुटुंब व्यवस्थेच्या स्थितीचा विचार केला तरी हा मुद्दा स्पष्ट होतो. कुटुंब या व्यवस्थेला खूप जास्त महत्त्व आले होते आणि त्यात व्यक्तीचा विकास बाधित होत होता. त्याची एक विरोधी प्रतिक्रिया होत गेली आणि नव्याने कुटुंब व्यवस्थेने आकार घेतला. आजच्या आर्थिक व्यवस्था याचेच प्रत्यंतर आणून देतात. काय खरेदी करायचे, किती खरेदी करायचे, किती कर्ज घ्यायचे, सगळ्या आर्थिक व्यवस्थेतील खाचाखोचा, जाहिराती, प्रतिमांचा मारा; या सार्यात माणसाचे माणूसपण हरवत चालले असून जीवनासाठी पैसा हे सूत्र मागे पडले असून पैशासाठी जीवन असे स्वरूप प्राप्त झाले आहे. माणसांच्या वाटचालीला साहाय्य व्हावे यासाठी निर्माण होणार्या व्यवस्थाच माणसाच्या वाटचालीत अडचणी आणि अडथळे कशा निर्माण करतात आणि जीवनावर व्यवस्थांचे वर्चस्व कसे तयार होते याची अशी असंख्य उदाहरणे आढळतात. अखेरीस आपल्याच भाराखाली व्यवस्था कोसळतात. अमेरिकेतील महाकाय बँका ज्याप्रमाणे पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळल्या होत्या त्याची आठवण जग अद्याप विसरलेले नाही. योगी अरविंद त्याकडेच आपले लक्ष वेधतात.
असे होऊ नये म्हणून प्रकृती नेहमीच व्यक्ती आणि व्यवस्था यांच्यात सामंजस्य आणि संतुलन साधण्याचा प्रयत्न करीत असते. परंतु असे संतुलन अद्याप निर्माण झालेले नाही. दोहोंत संतुलन निर्माण होण्यासाठी व्यवस्थांनी व्यक्तीची पूर्णता मान्य करायला हवी आणि व्यक्तीने व्यवस्थांना पूर्णता प्रदान करण्याची जबाबदारी घ्यायला हवी. परंतु असे होत नाही. कारण व्यक्ती आणि व्यवस्था यांचे गुण, यांची प्रकृती, यांच्या विकासाची अवस्था वेगवेगळी असते. तसेच आपले स्वतंत्र अस्तित्व कायम राखण्याचा दोहोंचाही प्रयत्न असतो. कुटुंब, वंश, वर्ग, राष्ट्र यांच्या सीमा ओलांडून उत्तरोत्तर व्यापक होत जाण्याची उर्मी मानवी मनात निसर्गतः असतेच. समूह आणि व्यवस्था मात्र व्यक्तीला तसे करू देत नाहीत. परंतु समूहांनी आणि व्यवस्थांनी या उर्मीला बाधक होऊ नये, असा योगी अरविंद यांचा अभिप्राय आहे.
स्वतंत्र राहून अधिकाधिक शक्तीसंपन्न, व्यापक आणि प्रभावी होत जाण्याची व्यक्तिगत उर्मी आणि समूहाचा घटक म्हणून येणार्या मर्यादा यांचा संघर्ष नित्य सुरू असतो. कधीतरी एक काळ असा होता की, जेव्हा व्यक्तीवर कोणतीही बंधने नव्हती. त्यावेळी व्यक्ती बंधनमुक्त एकाकी जीवन जगत होती. अन् काळाच्या ओघात असा आदर्श विकसित झाला आहे की; अशी एक वेळ येईल जेव्हा, व्यक्ती बंधनमुक्त राहूनही सामुदायिक जीवन जगेल. परंतु हा आदर्श प्रत्यक्षात येणार कसा? कारण सुरक्षा, सुव्यवस्था आणि शांतता यांच्यासाठी उत्पन्न झालेला राज्य हा घटक स्वतःला अधिकाधिक प्रभावी करण्याचा, जीवनाची सगळी सूत्र आपल्या हाती एकवटण्याचा प्रयत्न करीत असतो. आपल्याला प्राप्त होणारी सुरक्षा, सुव्यवस्था आणि शांतता यांची किंमत म्हणून व्यक्तीने आपल्या ’स्व’चे पूर्ण विसर्जन करावे अशी अपेक्षा राज्यव्यवस्था करते. मानवी विकासाच्या प्रक्रियेत उत्पन्न झालेल्या कुटुंब, कुळ, वर्ण, वंश, नगर; या समूहांचे प्रतिनिधित्व करणार्या व्यवस्थांनी आजवर तेच केले. आता त्याहून मोठी अशी राज्यव्यवस्था व्यक्तीकडून तीच अपेक्षा करते आहे. उद्या संपूर्ण मानवी समाजाचे सामाजिक, राजकीय एकीकरण झाले तरी या अपेक्षेत फरक पडणार नाही. व्यक्तीची पूर्ण स्वतंत्रता आणि त्याचे सार्थक सामुदायिक जीवन हा आदर्श त्यामुळे साध्य होऊ शकत नाही.
याच संदर्भात संघटित समाजाचा राज्यसिद्धांत या विषयाची चर्चाही त्यांनी केलेली आहे. संघटित समाजाचा राज्यसिद्धांत काय आहे? असा प्रश्न उपस्थित करून योगी अरविंद म्हणतात की, ’यात समूहाच्या आर्थिक, राजकीय व सैनिकी अहंमध्ये व्यक्तीने आपला व्यक्तिगत अहं विसर्जित करावा अशी या सिद्धांताची अपेक्षा असते. राज्याची सूत्रे समाजातून एकत्रित झालेल्या प्रतिनिधींच्या हातात असतात. मात्र समाजाची संपूर्ण आणि सर्वोच्च बुद्धिमत्ता, सर्वोत्तम प्रेरणा, सर्वोत्तम आदर्श या प्रतिनिधींच्या रूपाने एकत्रित होतात असे मात्र म्हणता येत नाही. कोणताही राजकीय नेता त्या समाजाच्या आत्म्याचे प्रतिनिधित्व करतो असे म्हणता येत नाही. नेत्यांच्या मुखी असणारे उच्च आदर्श, उत्तम विचार हा फक्त प्रचाराचा भाग असतो. याने केवळ सामान्य माणसेच प्रभावित होतात असे नाही तर आक्रमक बोलणे आणि सत्तेची शक्ती यांच्या एकीकरणामुळे चांगले चांगले बुद्धिवंतसुद्धा राजकीय नेत्यांच्या बोलण्यामुळे भारावून जातात. परंतु राज्य हे आदर्श लोकांच्या हाती आहे असे समजले तरीही; राज्याच्या परिघाच्या बाहेरील समाजाचा विचार राज्याच्या कार्यकक्षेत फारसा होत नाही. एवढेच नाही तर व्यक्तीच्या व्यक्तिगत सर्जनशीलतेला त्यात वाव नसतो.’ अमेरिका, रशिया, युक्रेन, पाकिस्तान, बांगलादेश आणि अशाच अनेक देशांची उदाहरणे विचारार्थ घेता येतील. त्या त्या ठिकाणी राज्याची सूत्रे ज्यांच्या हाती आहेत ते त्या समाजाचे आदर्श आणि सर्वोत्तम लोक आहेत असे कोणीही म्हणणार नाही. जबरदस्तीने सैन्यभरती करून लोकांना मृत्यूच्या खाईत लोटणारे हे राज्यकर्ते व्यवस्थेसाठी जबरदस्तीने व्यक्तीच्या अहंच्या ज्या समर्पणाची अपेक्षा करतात ते योग्य म्हणता येईल का? हाच तो व्यक्ती आणि व्यवस्था यांचा संघर्ष.
एक ’पवित्र अहंभाव’ हाच सध्याच्या राष्ट्रांचा आदर्श आहे. त्यामुळे आक्रमणकारी राष्ट्रांना त्यापासून परावृत्त करणारी नैतिक शक्ती व लोकमताचा दबाव हा कुठेही पाहायला मिळत नाही. केवळ पराभवाची भीती आणि आर्थिक अरिष्ट या दोनच गोष्टी युद्धाच्या संदर्भात नियंत्रणाचे काम करतात. त्यात समूहाच्या सर्वांगीण विकासाचा विचार नसतो. गेली अनेक दशके अमेरिका ज्या पद्धतीने जगात युद्धखोरी निर्माण करीत आहे आणि शस्त्रास्त्रांच्या आधारे आपली अर्थव्यवस्था टिकवून ठेवते आहे; त्याविरुद्ध त्यांच्याच देशात लोक आणि संघटना काम करतात. परंतु त्या आपल्या राज्यकर्त्यांना त्यापासून परावृत्त करू शकत नाहीत. योगी अरविंद यांनी आधुनिक राष्ट्रवादाची जी मूलभूत मर्यादा सुमारे शंभर वर्षांपूर्वी दाखवून दिली ती आज जगाच्या प्रत्ययाला येत आहे.
या ठिकाणी मानवी जीवनातील एका मूलभूत तात्त्विक विषयाची चर्चाही ते करतात. ते लिहितात, ’सामूहिक अहंभाव हा मोठा जरूर असतो परंतु श्रेष्ठ नसतो. व्यक्तिगत श्रेष्ठ अहंभावापेक्षा तो अनेक अर्थांनी कनिष्ठ आणि टाकाऊ असाच असतो. परोपकार, आत्मत्याग, सहजीवन याचा अर्थ व्यक्तीने राज्यात विलीन होऊन जावे असा होत नाही. राज्ययंत्रणा हे मानवी विकासाचे सर्वोत्तम साधन आहे, हा राज्य सिद्धांताचा दावा निराधार आणि पोकळ आहे. मानवी विकासाच्या मार्गातील अडथळे आणि बाधा दूर करणे हेच फक्त राज्याचे काम आहे. परस्पर मानवी सहयोगाच्या शक्यता नाकारणे हा इंग्रजी व्यक्तीवादाचा दुबळेपणा होता. सामूहिक जीवनाच्या उपयोगितेच्या बहाण्याने या व्यक्तीवादाने लोकांवर राज्याचे संपूर्ण नियंत्रण लादण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मानवाचे स्वातंत्र्य, प्रेरणा, आणि गंभीर उन्नती दाबून टाकणारे एक दानवी यंत्र जन्माला आले.’
पृथ्वीतलावरील मानवाच्या एकीकरणाची समस्या दोन रूपांत आपल्यापुढे येते. एक म्हणजे आजवरच्या वाटचालीत जे सामूहिक अहंकार स्वाभाविकपणे विकसित झाले आहेत त्यात सुधारणा करता येतील का किंवा ते सामूहिक अहंकार संपवून टाकता येतील का? आणि त्या जागी एक विशाल बाह्य एकता मानवी जीवनात निर्माण करता येईल का? दुसरी समस्या ही की, अशा प्रकारचे बाह्य एकत्व निर्माण केले तर त्याखाली स्वतंत्र मानवी जीवनाचा बळी दिला जाणार नाही का? मानवी जीवनाची यथार्थ एकता राजकीय, आर्थिक व प्रशासकीय एकतेच्याच आधारे निर्माण करता येऊ शकते का? हाही एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मानवी इतिहासात आजवर निर्माण झालेली सामूहिक अहंकाराची सगळ्यात मोठी वस्तू राष्ट्र ही आहे. साम्राज्यांच्या आधारावर मानवी ऐक्य निर्माण करण्याचे प्रयत्न भारतासह संपूर्ण जगात झाले. परंतु या प्रयत्नांना यश आले नाही कारण साम्राज्यांचे प्रयत्न हे पूर्णतः बाह्य स्वरूपाचे होते. त्यात आंतरिक जिवंतपणा नव्हता. त्यामुळेच साम्राज्यांचे प्रयत्न सर्वत्रच कोसळले. त्यासंबंधी जगातील विविध साम्राज्यांच्या स्थापनेचे आणि विलयाचे विवेचन योगी अरविंद यांनी विस्ताराने केलेले आहे. या प्रयत्नांमधून आजवर राष्ट्र हीच सगळ्यात मोठी जिवंत सामूहिक निर्मिती असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.
राजकीय ऐक्य ही काही आवश्यक गोष्ट नाही. राजकीय ऐक्य नसतानाही राष्ट्र आपली प्रगती आणि आविष्कार सतत चालू ठेवतात. राजकीय ऐक्य समाप्त झाले तरीही राष्ट्र संपत नाही. राष्ट्राची अप्रतिहत वाटचाल सुरूच राहते. राष्ट्र नावाच्या या जिवंत वस्तूला विलीन होण्यासाठी त्याहून अधिक व्यापक, सशक्त आणि जिवंत असे एखादे तत्त्व गवसत नाही तोवर असेच चालू राहील. संपूर्ण मानवजातीसाठी सार्वभौम, व्यापक आणि आदर्श सभ्यता निर्माण करण्याच्या दिशेने आता पृथ्वीचा प्रवास सुरू झाला आहे. या प्रयत्नात सगळ्या आधुनिक आणि प्राचीन संस्कृती आपापले योगदान देतील. हे नवीन परिवर्तन परस्पर विनिमय आणि अनुकूलता याकडे संकेत करते. परंतु हे परिवर्तन एखाद्या विशाल, विस्तृत, संघबद्ध साम्राज्याला जन्म देईल का? त्यात असंख्य प्रकारच्या विविधतांचे स्थान काय राहील? मुख्य म्हणजे अशा प्रकारचे कृत्रिम साम्राज्य; मानवजातीचे स्वाभाविक आणि मानसिक ऐक्य म्हणून विकसित होईल का? हे प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात.
पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर युरोपातील विविध राष्ट्रांचा विकास, त्यांच्यातील सहकार्य, आदानप्रदान, त्यांचे हेतू, त्यांच्यातील विसंवाद आदींचा आढावा योगी अरविंद यांनी घेतला आहे. संपूर्ण मानवजातीच्या ऐक्याची जी भावना जगात निर्माण झाली; त्या पार्श्वभूमीवर आशिया, युरोप, अमेरिका, आफ्रिका या विस्तृत भूभागावरील घडामोडींचे विश्लेषणही त्यांनी केले. स्वतंत्र राष्ट्रांच्या परस्पर सहकार्यातून जागतिक मानवी एकता निर्माण होईल का? होऊ शकेल का? या प्रश्नांच्या अनुषंगाने त्यांनी विश्लेषण केले आहे. परस्पर सहकार्यातून विशाल साम्राज्याची शक्यता मात्र त्यांना वाटत नाही. कारण त्यासाठी आवश्यक असलेली मानवी मनाच्या सांस्कृतिक, नैतिक, आध्यात्मिक उन्नयनाची अवस्था अद्याप मानवाने गाठलेली नाही. दरम्यानच्या काळात विविध क्षेत्रीय संघटना आकारास येतील आणि त्या त्या क्षेत्राचे ऐक्य साधण्याचा प्रयत्न करतील. परंतु राष्ट्रीय अहंकार आणि परस्पर सहकार्य यांच्यात असलेली तफावत हे प्रयत्न सफल होऊ देणार नाहीत; हे योगी अरविंद यांचे विवेचन नंतरच्या काळाने सत्य सिद्ध केले आहे. सार्क अथवा नाटो यासारख्या क्षेत्रीय संघटना कशा गतार्थ झाल्या हे आज आपण अनुभवतो आहोत. त्यांच्या जागी नवीन संघटना स्थापन करणे हे समस्येचे आकलन अपूर्ण असल्याचे निदर्शक ठरते. आधुनिक संस्कृती आणि विज्ञानाचे नवनवे शोध मानवाला जवळ आणत असले तरी मानवाची आंतरिकता मात्र अजून त्या जवळीकीला अनुकूल झालेली नाही. प्रभुत्वाची आकांक्षा आणि विस्ताराची अभिलाषा मानवी मनावर आजही मोठ्या प्रमाणात वर्चस्व गाजवते आहे. जोवर या भावना समूळ बदलत नाहीत तोवर स्वतंत्र राष्ट्रांच्या संघटना फार काही करू शकणार नाहीत, असा त्यांचा अभिप्राय आहे.
मानवी समूहांच्या आर्थिक, राजकीय व प्रशासकीय एकतेची गरज जगात उत्पन्न झालेली आहे हे खरे आहे. त्यासाठी अनेक करार, देवाणघेवाणीचे मसुदे इत्यादी तयार होत राहतील. या प्रक्रियेत महिला आणि श्रमिक यांचा फायदा होईल. मात्र, या प्रवासात कोणकोणते संघर्ष, असफलता, सामाजिक प्रवृत्ती, बंडखोरी, धार्मिक आंदोलने हस्तक्षेप करतील याचे निदान करणे अवघड आहे; हे योगी अरविंद यांचे विवेचन; भारतासह संपूर्ण जगभरात सहअस्तित्वाच्या संबंधात जे लहानमोठे संघर्ष सुरू आहेत त्यांनी वास्तव सिद्ध केले आहे. ऐक्याच्या बाह्य आणि यांत्रिक पद्धतींचा विकास होतो तेव्हा जुन्या समूहांच्या आंतरिक जाणिवा संकुचित होत जातात. कारण नवीन व्यवस्थेत आपल्या स्वतंत्र अस्तित्वाची त्यांना चिंता असते. त्यामुळेच आजवरची सैनिकी आणि आर्थिक साम्राज्ये मानवी मूलभूत एकता निर्माण करू शकली नाहीत. स्वतंत्र अस्तित्वाची खात्री देणारी बाह्य विशाल व्यवस्था अद्याप जन्माला आलेली नाही. जगातील विविध राजतंत्रीय आणि जनतंत्रीय राज्यपद्धतींचा आढावा योगी अरविंद यांनी या संदर्भात घेतला आहे. अमेरिकेला तिच्या आर्थिक स्वातंत्र्याच्या चिंतेने कसे पछाडले आहे हे आज सारे जग अनुभवत आहे. एवढेच नाही तर त्याचे परिणामही जगाला भोगावे लागत आहेत. जागतिकीकरणाच्या नावाखाली एकछत्री आर्थिक साम्राज्य निर्माण करण्याची तिची स्वप्ने तर धुळीला मिळालीच, परंतु संपूर्ण जगाचा आर्थिक विकास आणि एकीकरण हेही त्याने साध्य होऊ शकले नाही.
छोट्या मानवी टोळ्यांच्या राष्ट्र या घटकापर्यंतच्या प्रवासाला आणखीन पुढे नेताना योगी अरविंद त्याचे तात्त्विक विवेचन करताना म्हणतात, ’राष्ट्राची निर्मिती फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठी नसते. मानवाच्या बृहत् विकासाच्या प्रवासाला मदत करणे हे त्याचे प्रयोजन असते. यासाठी आवश्यक व्यवस्थांची उभारणी होईपर्यंत त्या मानवी समूहाच्या आंतरिक प्रेरणा निष्क्रिय राहतात. परंतु एकदा आपल्या अस्तित्वाची खात्री झाली की, आंतरिक विस्ताराची भूक डोके वर काढते. त्यावेळी जुन्या मर्यादा टाकून देण्याची प्रवृत्ती उफाळत राहते. राजकारण, अर्थकारण, प्रशासन अशा सर्वच अंगात ही प्रक्रिया अपरिहार्यपणे घडते. त्यावेळी सगळ्याच क्षेत्रांना मानवाची महत्ता, क्षमता आणि ’स्व’ विचारात घ्यावेच लागतात. न्यायपूर्ण सामाजिक व्यवस्थेत स्वातंत्र्य आणि समानता असायला हवेत ही मानवी मनाची मागणी आहे. आजवर कोणत्याही आर्थिक, सामाजिक, राजकीय, धार्मिक व्यवस्थांनी ती मागणी पूर्ण केलेली नाही. कोणत्याही व्यवस्था ती मागणी पूर्णही करू शकत नाहीत. कारण त्यासाठी आवश्यक तत्त्वांनी मानवी आत्म्यातच जन्म घ्यावा लागेल. मानवाच्या अंतरातील गुप्त आणि दिव्य सखोलतेतूनच त्यांचा आविर्भाव व्हावा लागेल.’ पंडित दीनदयाल उपाध्याय यांनी मांडलेल्या एकात्म मानव दर्शनावर भाष्य करताना प्रसिद्ध चिंतक स्व. दत्तोपंत ठेंगडी यांनी ज्या अखंड मंडलाकार अवस्थेचे विवेचन केले आहे त्याची येथे आठवण होते. व्यक्तीचा एक व्यक्ती म्हणून सुरू झालेला प्रवास विश्वव्यापी होताना सुद्धा त्याची प्रेरणा विश्वात बाहेर कुठे राहणार नाही तर ती व्यक्तीच्या अंतरातच जन्माला येईल. व्यक्तीच्या मनातच संकुचित व्यक्तित्वाची आणि विश्वव्यापी व्यक्तित्वाची दोन्हीची बीजे आहेत. किंबहुना एकाच बीजाचा तो क्रमविकास असतो. एकेका व्यक्तीच्या मनातील या विकास प्रक्रियेतूनच विश्व ऐक्य प्रत्यक्षात येऊ शकेल. बाह्य रचना, व्यवस्था, त्यासाठीच्या तडजोडी, चर्चा, भूमिका, खेळी यांनी विश्वाची एकता साध्य होऊ शकणार नाही; असा योगी अरविंद यांच्या चिंतनाचा सारांश आहे.
सध्या जगात सर्वत्र लोकशाही पद्धती अस्तित्वात आहे. परंतु खर्या अर्थाने लोकशाही मात्र कुठेही नाही. लोकशाहीच्या नावाखाली भांडवलदार, व्यावसायिक आणि मध्यमवर्ग हेच सत्ता नियंत्रित करतात. त्याचप्रमाणे आंतरराष्ट्रीय संघटनांच्या माध्यमातून मोठी साम्राज्येच आपली सत्ता चालवतात. या मोठ्या साम्राज्यांना वेसण घालण्यासाठी छोटी राज्ये व्यापारविषयक इत्यादी युक्त्या उपयोगात आणतील. तरीही सामान्य मानवी जीवन पूर्वीप्रमाणेच यश अपयशाच्या झुल्यावर झुलत राहील. यावर उपाय म्हणून संपूर्ण जगाला काही मोठ्या साम्राज्यांमध्ये विभागता येईल. त्यामुळे शांतता आणि परस्पर करार अधिक सुलभ होतील. तसेच व्यापक विचारांकडे जाण्यास अवकाश प्राप्त होईल. मात्र, सैनिकी बळाच्या आधारे कोणतेही राष्ट्र संपूर्ण विश्वावर सत्ता गाजवू शकत नाही. धार्मिक, आर्थिक, श्रमिक, वांशिक या कसल्याही आधारावर कोणालाही जगाला एक करता आलेले नाही. एवढेच नव्हे तर दोन जागतिक महायुद्धांनी केलेली मानवाची ससेहोलपट जागतिक मानवी समुदायात मोठ्या प्रमाणात भय उत्पन्न करून गेली. परंतु त्या भयानेही जगाला एकत्र आणले नाही. उलट मानवी समुदाय अधिकाधिक संकुचित, मर्यादित, भयग्रस्त आणि आक्रमक होत गेले. गेल्या शे-दोनशे वर्षांचा इतिहास याचा साक्षी आहे.
जागतिक शांततेच्या संदर्भात, सैनिकी शक्तीच्या संबंधातही योगी अरविंद यांनी सखोल चिंतन मांडले आहे. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर हे विचार मांडले असले तरीही ते आजही लागू होतील इतके मूलभूत आहेत. तत्कालीन परिस्थितीतील जर्मनीचे उदाहरण देऊन ते लिहितात की, ’जर्मनीच्या सैनिकी महत्त्वाकांक्षेला जर्मन सैन्याचा पराभव हेच एकमेव उत्तर आहे असे मानणे चुकीचे आहे.’ याविषयी मूलभूत चिंतन मांडताना योगी अरविंद अतिशय धाडसाने असा विचार मांडतात की, ’युद्धाच्या स्थितीला जागतिक परिस्थिती आणि राष्ट्रीय मनोविज्ञान कारणीभूत असतात. देशभक्तीच्या पवित्र भावनेच्या नावाने राष्ट्रीय अहंभावाला प्रधानता आणि त्या अहंभावाची पूजा हे या राष्ट्रीय मनोविज्ञानाचे व्यवच्छेदक लक्षण आहे.’ आज संपूर्ण जगात देशभक्तीच्या नावाने जे सुरू आहे ते पाहिले की, योगी अरविंदांचे द्रष्टेपण जाणवल्याशिवाय राहत नाही. आज युद्धरत असलेले रशिया, युक्रेन, इस्रायल, पॅलेस्टाइन; किंवा राष्ट्रवादाच्या नावाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प जी धोरणे आणि विचार राबवत आहेत आणि त्यासाठी देशातील जनतेने आपल्या पाठीशी उभे रहावे ही अपेक्षा करत आहेत; ती योगी अरविंदांच्या मूलभूत चिंतनाची साक्षच देतात. जोवर राजकीय आणि व्यापारी उन्नतीची स्पर्धा सुरू राहील आणि राष्ट्रीय अहंभावाला पावित्र्य देण्यात येईल तोवर जगात युद्धाची संभावना नेहमीच जिवंत राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. राष्ट्राराष्ट्रात शांतता प्रस्थापित करण्यासाठी एखादा शांतिसंघ स्थापन झाला तरीही तो युद्ध थांबवू शकणार नाही ही त्यांची भविष्यवाणीही सत्य ठरल्याचे जग अनुभवत आहे. श्री अरविंद यांनी आपले विचार मांडले तेव्हा League of Nations किंवा United Nations Organisation यांची स्थापनाही झालेली नव्हती. परंतु या दोन्ही जागतिक संघटनांचा अनुभवदेखील जगासाठी फारसा उत्साह वाढवणारा नाही. या संस्था जगातील युद्धासहित अनेक समस्या संपवू शकलेल्या नाहीत. अथवा त्यावर काही सार्थक उपाय करू शकलेल्या नाहीत हे वास्तव आहे.
पृथ्वीवरील मानवी जीवनाची हजारो वर्षांची वाटचाल, सुव्यवस्थित आणि सुखी मानवी समूह स्थापन करण्याचे नानाविध प्रयोग, त्या दरम्यान झालेले संघर्ष आणि समन्वयाचे प्रयत्न, त्यातून आकाराला आलेले विचार, या प्रवासात मानवी जाणिवांनी घेतलेले व्यक्तिगत आणि सामूहिक आकार; या सार्याचा आढावा आणि वेध योगी अरविंद यांनी घेतला आहे. हा प्रवास कुठवर आलेला आहे त्याचीही नोंद त्यांनी घेतली आहे. त्यांच्या या चिंतनानंतर आणि त्यांनी या जगाचा निरोप घेतल्यानंतर देखील हा प्रवाह पुढे वाहतो आहे. मानवी अथवा नैसर्गिक आपत्तींच्या वेळी जागतिक मानवी समुदायाने घडवलेले एकतेचे दर्शन; कला, साहित्य, संस्कृती यांच्या माध्यमातून होणारी जागतिक स्तरावरील मानवी भावभावनांची, विचारांची, संवेदनांची देवाणघेवाण; असंख्य क्रीडा प्रकार आणि त्यांच्या स्पर्धांच्या निमित्ताने निर्माण होणारे देशादेशांचे संबंध; जीवनाच्या अनेक अंगांच्या अनुषंगाने होणार्या परिषदांमधील मैत्रीपूर्ण सामंजस्य; अनेक सामयिक विषयांबाबत निर्माण झालेली वैश्विक जाणीव; हा वर्तमान मानवी जीवनाच्या अनुभवाचा भाग झालेला आहे. माणसे आपला देश सोडून अन्यत्र कायमस्वरूपी राहू लागली आहेत. व्यवसाय, उद्योग, आरोग्य यांच्या बाबतीत सार्थक सहकार्य घडू लागले आहे. जागतिक संघटनांच्या जोडीला सार्कसारख्या किंवा अलिप्त चळवळीसारख्या संघटना अथवा आघाड्या काम करीत असतातच. त्याच वेळी सर्वत्र भय निर्माण झालेले आहे. शस्त्रास्त्र स्पर्धा वाढीस लागली आहे. अविश्वास थैमान घालतो आहे. राजकारण म्हणजे फक्त कुरघोड्या असे समीकरण झालेले आहे. जगभर लहानमोठी युद्ध संपता संपत नाहीत. आर्थिक विषमता भयावह आहे. पर्यावरणाचे प्रश्न मानवी अस्तित्वाला आव्हान देऊ लागले आहेत. असहिष्णुता वाढते आहे. कायदे, नियम अपुरे पडताना पहावे लागतात. असे का? मानवी ऐक्याच्या उदात्त भावनेची वाटचाल अशी भलत्याच वळणावर का जावी? योगी अरविंद यांनी याचेही विश्लेषण केले आहे.
ते म्हणतात - ’मानवी जीवन एक प्रकारचा विशाल सागर असून त्याच्या पृष्ठभागावरील गोष्टी समजण्यास सोप्या असतात. परंतु मानवाच्या गहन समस्या सोडवण्यास ते पुरेसे नसते. त्यासाठी खोलात उतरावे लागते. माणूस तसा प्रयत्न करतो देखील. परंतु ते अतिशय कठीण काम असल्याने पुन्हा पृष्ठभागाकडे परत येतो. मात्र आपल्याला जीवन समजून घ्यायचे असेल तर त्यातील सखोल, गूढ, अदृश्य बाबी समजून घ्याव्याच लागतील. मानवाचे सामाजिक आणि सामूहिक जीवन अतिशय अस्पष्ट असते. समाजशास्त्र किंवा इतिहास या गोष्टी आम्हाला हे सामाजिक व सामूहिक जीवन समजून घेण्यास मदत करू शकत नाहीत. कारण ही शास्त्रे वरवरच्या घटना, व्यक्ती आदींचाच विचार करतात. मनुष्य जीवनाच्या निरंतर प्रवाहाचा वास्तविक अर्थ या शास्त्रांना आकलन होत नाही. या उथळ शास्त्रांच्या आधारे मानव; लोकशाही, स्वातंत्र्य, समूहवाद, व्यक्तिवाद, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, राज्य, समाज, भांडवलशाही, श्रमवाद इत्यादी इत्यादी चर्चा करतो. त्याआधारे एकांगी व्यवस्था निर्माण करतो. परंतु ज्या सिद्धांतांचे मानव आवेशाने समर्थन करतो; ते सिद्धांत थोड्याच काळात असफल झालेले पाहून त्याला सोडून द्यावे लागतात. याचे कारण समूह जीवनाबाबतचे आमचे विचार उथळ आणि सामान्य अनुभवांवर आधारित असतात.’
त्यामुळेच व्यवस्थित अथवा अव्यवस्थित, सूत्रबद्ध अथवा असंघटित; अशा राज्यांच्या एकत्रित येण्यामुळे किंवा एका विश्वराज्याच्या स्थापनेमुळेही मानवी एकतेचा आदर्श प्रत्यक्षात येऊ शकणार नाही. जोवर संपूर्ण मानवजात नैतिक आणि आध्यात्मिक स्तरावर आंतरिक एकत्व प्राप्त करत नाही तोवर मानवी एकता हे एक दिवास्वप्न राहील.