प्रेरणास्वरूप - वसंतराव देवधर

    01-Dec-2025
Total Views |



वसंतराव देवधरांचे कार्य प्रेरणास्वरूप असेच होते. समर्पित स्वयंसेवक म्हणून त्यांचा आदर्श आहेच, त्यासोबत त्यांनी अनेक संस्थाना मूर्त रूप दिले आणि त्यांच्या विस्तारासाठी कायम आग्रही व प्रयत्नशील राहिले.

वसंतराव देवधर - एक स्वयंसेवक ते चालतेबोलते बँकर, तरी एक निरलस कार्यकर्ता... वसंतरावांना मी अनेक बिरुदे लावली आहेत ती त्यांना साजेशी अशीच आहेत. त्यांचे 19 नोव्हेंबर 2025 रोजी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. त्यांना तसे रूढार्थाने दीर्घायुष्य लाभले व त्यांनी त्याचे सोने केले असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. जसे ते संघाचे घोषातले स्वयंसेवक होते तसेच ते 1978 ला स्थापन झालेल्या सहकार भारतीचे पहिले सरचिटणीस होते. तसेच जनसेवा बँकेत कार्यकारी संचालक म्हणूनही त्यांनी काही काळ काम केलेले असले तरी सहकार भारतीच्या कामात खंड पडू दिला नाही. त्यांनी सहकार भारतीचे काम वाढविण्यासाठी देशभरातील अनेक राज्यांत सतीश मराठे यांच्याबरोबर प्रवास केला व आसामसारख्या एक टोकाला असणार्‍या राज्यात सहकारी बँक स्थापन करण्यासाठी यशस्वी प्रयत्न केले. जिथे मोजक्याच 10-12 बँक आहेत तिथे वीस वर्षाहून अधिक काळ एक सशक्त बँक म्हणून काम उभे आहे.

वयाची सत्तरी ओलांडल्यानंतरही त्यांनी बँकांना मार्गदर्शन करण्याचे काम चालू ठेवले व अनेक बँकांना सशक्त बनविण्यास मदत केली. बँक कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण आदी घेण्यासाठी ते सतत प्रयत्नशील राहिले व त्यातून येणारे मानधन ते आसाम-बंगालसारख्या राज्यांना देत असत. वसंतराव नंतरच्या 20-30 वर्षात एकटे होते तरी ते गृहस्थ होते आणि बँक हाच त्यांचा संसार होता. असे असले तरी त्यांचे पुतणे भाजपाचे त्रिपुराफेम सुनील देवधर, आनंद व विवेक देवधर (हे ही प्रसिद्ध पत्रकार विसुभाऊ देवधर यांचे सुपुत्र) यांनी त्यांना एकटे वाटू दिले नाही. एवढेच नव्हे तर त्यांचा 80 वा वाढदिवस (सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा) मोठ्या थाटात साजरा केला. या कार्यक्रमाला तत्कालीन सरकार्यवाह भैयाजी जोशी उपस्थित होते.

सहकार भारतीचे काम करीत असताना त्यांनी खाजगी साखर कारखान्यांना केलेली मदत ही अद्वितीय अशीच आहे. वसंतरावांच्या निधनानंतर श्रद्धांजली अर्पण करताना नॅचरल शुगरचे ठोंबरे यांनी वसंतरावांनी कुणाकुणाला कशी मदत केली याची जंत्रीच दिली आहे त्यात प्रामुख्याने आजीमाजी अनेक प्रमुख नेत्यांचीही नावे घ्यावी लागतात. त्या काळात सरकार काँग्रेसचे असल्याने साखर कारखान्यावर शरद पवारांचे वर्चस्व असल्याने अन्य साखर कारखान्यांना मदत मिळणे कठीण होते. अशावेळी समविचारी सहकारी बँकांना एकत्र करून सामुदायिक कर्जवितरण (कान्सरसियम) मुळे तयार केलेल्या व ज्या कारखान्यांना संभाव्य अडचणीतून बाहेर काढले ते सर्व कारखाने त्यांचे ऋणी आहेत.

2001 साली सहकार भारतीच्या रौप्यमहोत्सवी कार्यक्रमानिमित्त मला त्यांच्याबरोबर एक महिना राहण्याचा योग आला तेव्हा त्यांच्याबरोबर फिरताना त्यांच्यातला एक कार्यकर्ता मला अनुभवायला मिळाला. त्यांच्या सान्निध्यात भालचंद्र कुलकर्णी यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते तयार झाले.

जळगाव जनता सहकारी बँकेवर त्यांचे विशेष प्रेम होते. धुळे बँकेला सांभाळून घ्यायला त्यांनी मदत केली व कर्मचारी अधिकार्‍यांना विस्तृत प्रशिक्षण दिले. वसंतरावांचे कार्य आज प्रेरणास्वरूप झाले आहे.

- विष्णू बोबडे
9820862368