भारत हा विद्वानांचा देश आणि काशी ही विद्येची नगरी. काशीच्या पवित्र मातीत 12 ऑक्टोबर ते 30 नोव्हेंबर या कालावधीत एक ऐतिहासिक आध्यात्मिक साधना सुरू होती. शुक्ल यजुर्वेद माध्यंदिन शाखेतील सुमारे दोन हजार मंत्रांचे अत्यंत कठीण दण्डक्रम पारायण महाराष्ट्रातील अहिल्यानगर येथील 19 वर्षांच्या देवव्रत महेश रेखे याने पूर्ण केले. वय वर्षे अवघे 19, म्हणजे हल्लीच्या भाषेत ‘जेन झी’चा प्रतिनिधी. एवढ्या लहान वयात अतिशय कठीण असणारे हे पारायण पूर्ण करून त्याने संपूर्ण देशभरातील तरुण पिढीसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. 200 वर्षांनंतर दण्डक्रम पारायण पुन्हा भारतात पार पडले असून या ऐतिहासिक विक्रमामुळे तरुण देवव्रतची देशभरात चर्चा सुरू आहे. सुमारे दोनशे वर्षांपूर्वी नाशिकच्या वेदमूर्ती नारायणशास्त्री देव यांनी हे पारायण पूर्ण केले होते. या निमित्ताने दण्डक्रम पारायण म्हणजे काय? गुरू-शिष्य परंपरा, वैदिक परंपरांचं महत्त्व याविषयी कै. अंबादास श्रीकृष्ण जोशी, वेदाध्ययन ज्ञानपीठ, माहूरगडचे निलेश वसंत केदारे गुरुजी यांच्याशी साधलेला संवाद.
दण्डक्रम पारायण म्हणजे वेदाचे एका विशेष क्रमाने पाठ (पारायण) करणे. दण्ड म्हणजे एक विशेष विधि किंवा नियम. ही एक जटिल आणि अनुशासित वेदपठण पद्धती आहे. वेदपठण करण्याच्या आठ पद्धती आहेत, ज्यांना अष्टविकृती म्हणतात. अष्ट म्हणजे आठ आणि विकृती म्हणजे विशेष कृती, विशेष पद्धती. ज्यामध्ये मंत्रांचा क्रम बदलून उच्चार केला जातो. या पद्धतींमुळे वेदांचे मूळ स्वरूप आणि अर्थ जतन करण्यास मदत होते. या आठ पद्धती म्हणजे जटा, माला, शिखा, रेखा, ध्वज,दंड,रथ आणि घन.
आता दण्ड आणि क्रम या विधीने एकाच वेळी मंत्र म्हणायचा म्हणजे दण्डक्रम. याचा अर्थ एका मंत्रात 90 शब्द असेल तर एकच मंत्र 90 वेळा मोठ्याने वैखरीने म्हणावा लागतो. याचे परीक्षण करणारा एक परीक्षक समोर बसलेला असतो, ज्याला श्रोता म्हणतात. दण्ड किंवा क्रम जर चुकला तर श्रोता ताबडतोब दुरुस्ती करतो. शुक्ल यजुर्वेदाच्या माध्यंदिन शाखेतील सुमारे दोन हजार मंत्र निश्चित क्रमाने, विशेष स्वरपद्धतीने आणि अत्यंत शुद्ध उच्चारणासह सलग पठण करण्याच्या कठीण साधनेला दण्डक्रम पारायण असे म्हणतात.
हा इतिहास घडण्यासाठी दोनशे वर्षांचा कालावधी का लागला याविषयी बोलताना निलेश केदारे गुरुजी म्हणाले की,‘वेदांमध्ये अष्टविकृती म्हणण्याची पद्धत अत्यंत कठीण आहे. या प्रकारचे पारायण वेदाभ्यासातील अत्यंत उच्च पातळीचे साधन मानले जाते. यासाठी दीर्घकाळ एकाग्रता, मेधा शक्ती , शारीरिक आणि मानसिक सहनशक्ती तसेच गुरुकृपा पण असावी लागते. ती मेधा शक्ती असल्यानंतर सुद्धा म्हणण्याचे धैर्य अंगी असणे आणि विद्वानांसमोर ते प्रकटीकरण करण्याचे धारिष्ट्य असावे लागते. 200 वर्षांचा कालावधी का लागला असं म्हणत असताना त्यामागे अनेक कारणे आहेत. एक म्हणजे गुरुकुलाचे रक्षण करण्यासाठी आपल्या ऋषिमुनींनी किंवा आपल्या पूर्वजांनी जे काही कष्ट घेतले त्याच्यामध्ये अर्थार्जन, विद्यार्थी घडवणे, विद्यार्थ्यांकडे लक्ष देणे, कौटुंबिक व्यवस्था लावणे या गोष्टी होत्या. या परंपरेचा वारसा पुढे नेत असताना तितके मेधावी शिष्य मिळणे आणि त्या शिष्यांचे अध्ययन शेवटापर्यंत जाणे हे सुद्धा गरजेचे असते. शिकल्यानंतर ती पारायणाची पद्धती विद्वानांमध्ये जाऊन म्हणणे यासाठी प्रचंड त्याग आणि संघर्ष करून हे पूर्णत्वास जाते. 200 वर्षांचा कालावधी लागत असताना संपूर्ण अध्ययन करण्यासाठी तशी पिढी घडवणे त्याच्यासाठी दोन्ही पिढ्यांनी प्रचंड त्याग केलेला आहे. त्याग केल्याशिवाय या विद्या प्राप्तच होऊ शकत नाहीत. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याकडे बौद्धिक आक्रमणे झाली. बौद्धिक आक्रमणामध्ये या विद्यांचे रक्षण करण्यासाठी काही प्रयत्न कमी जास्त प्रमाणात झाले असतील त्यामुळे एवढा काळ लागला. 200 वर्षांपूर्वी नारायणशास्त्री देव यांनी जे केले ते अत्यंत स्तुत्य होते आणि कदाचित नारायणशास्त्री देव यांच्या कृपेने ही परंपरा पुढे जगली. नारायणशास्त्री देव यांनी दण्डक्रमाची परंपरा जपली, तिचे रक्षण केले. त्यामुळे आज आमच्यापर्यंत ती परंपरा पोहोचली. दण्डक्रम पारायणाच्या परंपरेचे जतन करण्याचे मेरुतुल्य कर्तृत्व हे वेदमूर्ती नारायणशास्त्री देव यांचे आहे.’
भारतीय परंपरेतील गुरु शिष्य परंपरेविषयी ते म्हणाले, ‘आपल्याकडे गुरुशिष्य परंपरा श्रुती परंपरेने जपल्या गेल्या आहेत. आज पदपाठापर्यंत ग्रंथरूपाने उपलब्ध आहेत. पुढील ग्रंथांचे काम सुरू आहे. गुरूंच्या जवळ राहून अत्यंत परिश्रमपूर्वक गुरूंची सेवा करून ही विद्या गुरू शिष्य परंपरेने जपली जाते आणि गुरूंकडून शिष्याकडे परत शिष्य गुरू रूपाने आपल्या शिष्यांकडे, पुढचा शिष्य गुरु रूपाने आपल्या शिष्यांकडे अशी अनादी काळापासून ही परंपरा सुरू आहे. अतिशय कष्टसाध्य अशी परंपरा आहे. युवा पिढीने कुठल्याही क्षेत्रामध्ये जात असताना अत्यंत परिश्रम केल्यानंतर ध्येय साध्य होऊ शकते, अशा सगळ्या आपल्या आर्ष विद्या आहेत.’

आजच्या युवा पिढीसाठी देवव्रत हा रोल मॉडेल ठरलेला आहे. देवव्रतने आजच्या आधुनिक जगामध्येसुद्धा अन्य उपकरणांचा सीमित उपयोग करून आपल्या जीवनाला उज्ज्वल करण्यासाठी कशा पद्धतीने लहानपणापासून जीवन जगायचे याचा एक आदर्श घालून दिला आहे. आधुनिक तंत्रज्ञान वापरत असतानासुद्धा त्याच्या आहारी न जाता आधुनिक तंत्रज्ञानाचा आजच्या युगामध्ये कशा पद्धतीने उपयोग करून घेता येईल आणि त्या आधुनिक तंत्रज्ञानालाच सर्वोच्च न मानता परमेश्वराने दिलेले बुद्धिजन्य ज्ञान जर अशा पद्धतीने समाजासमोर मांडले तर समाज कसा पुढे जाईल? राष्ट्राचा गौरव कसा पुढे वाढेल? आणि राष्ट्राचा गौरव यातच आपल्या संस्कृती परंपरेचा गौरव आहे. याचा आदर्श देवव्रतने घालून दिला आहे. त्याच्या या अतुलनीय कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी देवव्रतचा सन्मान केला. अन्य तरुणांनीसुद्धा आपापल्या क्षेत्रात कशा पद्धतीने पुढे जायला हवे याचा एक सुंदर पायंडा देवव्रतने घालून दिला. त्याच्या पावलांवर पाऊल टाकत जर आपण चाललो तर एक देवव्रत नाही तर अनेक देवव्रत वेगवेगळ्या क्षेत्रात तयार होतील हा विश्वास आहे.

वैदिक परंपरेचा हा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी देवव्रत याचा विक्रम किती महत्त्वाचा आहे याविषयी बोलताना ते म्हणाले की,‘देवव्रत मुळात विक्रम करण्यासाठी काशीत आलेला नव्हता. आपल्या गुरूपरंपरेचं ज्ञान हे गुरुपरंपरेला समर्पण करण्यासाठी आला होता. कारण देवव्रतने बोलण्यात ज्या गुरू परंपरेचा वारंवार उल्लेख केला ते सर्व भारतात ज्यांच्याविषयी आदर आहे असे श्रीकृष्णशास्त्री गोडसे गुरुजी. हे मूळ काशीतले होते. गुरू परंपरेच्या तत्त्वाला नमन करण्यासाठी देवव्रत काशीला आला होता. गोडसे गुरुजींचा कार्यकाळ हा विशेषतः द्वारका आणि नाशिकमध्ये गेला. नाशिकमध्ये त्यांनी अनेक शिष्यांना घडवले आणि या परंपरेला नमन करावे असे देवव्रतला वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी वाटले. देवव्रतचे वडील म्हणजे वेदरत्न घनपाठी महेश रेखे. महेश रेखे यांनी 23 वर्षांपूर्वी श्रीक्षेत्र वाराणसी येथील वैदिक जगतातील प्रसिद्ध अध्ययन-अध्यापनाचे मुख्यालय म्हणजे ‘सांग वेद विद्यालयातून ‘एकाकी घन पारायण पूर्ण केले होते. त्याच सांगवेद विद्यालयात देवव्रतने रामजन्मभूमीचे निर्णयकर्ता गणेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी यांच्यासमोर हे पारायण सादर केले. त्याचबरोबर विश्वेश्वरशास्त्री द्रविड गुरुजी हे सुद्धा पूर्णवेळ तिथे उपस्थित होते. भारतवर्षातून अनेक क्षेत्रातील विद्वानांनी येऊन या पारायणाचे परीक्षण केले. यात मुख्य श्रोता होते जळगाव येथील ब्रह्मचैतन्य गुरुकुलाचे देवेंद्र रामचंद्र गढीकर. त्यांना यासाठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते.
या पारायणाचे मुख्य आयोजक श्रुती-स्मृती ज्ञानमंदिर वेदपाठशाळा अहिल्यानगरचे प्रधानाचार्य श्री महेश चंद्रकांत रेखे गुरुजी होते. कै. अंबादास श्रीकृष्ण जोशी वेदाध्ययन ज्ञानपीठ, माहूरगडचे निलेश वसंत केदार गुरुजी यांच्या मुख्य संयोजनात हा कार्यक्रम झाला. या 50 दिवसांच्या काळात काशीवासीयांचा मोठा उत्साह पाहायला मिळाला. काशीच्या लोकांनी देवव्रतची शोभायात्रा काढत मोठा गौरव केला. शृंगेरी शंकराचार्यांनी सुवर्णकंकण प्रदान केलं आणि त्याच्या गुरुपरंपरेला सव्वा लाखांची दक्षिणा प्रदान केली.
देवव्रतला अनेकांचे शुभाशीर्वाद
महत्त्वाची गोष्ट म्हणजे सांगवेद विद्यालयाने सुवर्ण पदक देऊन आणि शुक्लयजुर्वेदालंकार या पदवीने विशेष गौरव केला. गणेश्वरशास्त्री द्राविड गुरुजी, विश्वेश्वरशास्त्री द्राविड गुरुजी यांनी शुभाशीर्वाद दिले. समारंभाचे अध्यक्ष पूज्यपाद श्री महेश चैतन्य ब्रह्मचारीजी महाराज म्हणाले की संपूर्ण कंठस्थ दण्डक्रम पारायण करणे हे एक कठीण काम आहे. हे केवळ देवी भगवतीच्या कृपेने शक्य झाले. पुण्याहून आलेले स्वामी श्री नृसिंह आश्रमजी महाराज म्हणाले की देवव्रतांनी एक अपवादात्मक कठीण काम पूर्ण केले आहे. त्यांची बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती आणि संयम कौतुकास्पद आहेत. श्रुती स्मृती ज्ञानमंदिर वेदपाठशाळेकडून नवरत्न मंडित सुवर्ण कंकण, रजत मुकुट व दण्डक्रमविक्रमादित्य उपाधीसहित सन्मानपत्र प्रदान करण्यात आले. पंडित पतंजली मिश्रा यांनी महेश रेखे आणि देवव्रतला सन्मानित केले. पारायणाचे मुख्य श्रोता श्री देवेंद्र गढीकर आणि पारायणाचे मुख्य संयोजक श्री निलेश केदार यांनी देवव्रतला चांदीचा रजत धर्मदंड प्रदान केला. श्री संत छोटेजी महाराज यांच्या भक्तांनी तसेच आळंदी येथील सरला जोशी यांनी देवव्रत यांचा गौरव केला.