पहिल्या प्रेमाची हळवी आठवण जागवणारा ’96

विवेक मराठी    12-Dec-2025   
Total Views |
व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेकांशी संपर्क झाल्यावर, तब्बल वीस वर्षांनी, चेन्नई येथे शाळेतील मुलामुलींच्या बॅचचा रियूनिअनचा बेत ठरतो. त्यातीलच एक भेट असते ती, राम आणि जानकी यांची. नव्वदच्या दशकात सर्वांसमोर व्यक्त न होणारी त्यांची प्रेमकहाणी काही कारणास्तव न फुलताच संपून जाते. हे रियूनिअन असते 1996 मध्ये पासआऊट झालेल्या बॅचचे. चित्रपटाचे ’96 हे नाव त्यावरून ठेवले आहे.


96 movie

न कळत्या वयातले प्रेम म्हणजे चोरून झालेल्या भेटीगाठी, संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या साक्षीने एकमेकांना दिलेली वचने, मान खाली घालून, गालातल्या गालात हसत केलेला निरर्थक संवाद... आपण सोडून कुणाचीच जाणीवही नसते त्या वयात. असे असूनही, प्रत्येक प्रेमाची पूर्तता विवाहात होतेच असे नाही. उष्ण श्वासांची शिरशिरी आणणारा स्पर्श परस्परांस व्हावा इतक्या निकट येऊन गेल्यानंतर आयुष्याचे मार्ग वेगळे होतात. स्वप्ने संपतात, रखरखीत व्यवहार अंगवळणी पडतो.
 
दोघे आपल्या स्वतंत्र जगात रमतात. अशावेळी त्यांची भेट झाली तर!
2018 मध्ये प्रदर्शित झालेला प्रेम कुमार दिग्दर्शित ‘96‘ हा तामिळ सिनेमा म्हणजे पडद्यावर लिहिलेली राम आणि जानकीच्या आठवणींची कविता.
रामचंद्रन हा ट्रॅव्हल फोटोग्राफर आहे. वेगवेगळी ठिकाणे आपल्या कॅमेर्‍यात कैद करणे ही त्याची आवड. ही सततची फिरती, कुठेही न स्थिरावणे, ही त्याच्या एकटे असण्याची सबबही आहे. कोठेतरी स्थिरावण्यासाठी माणसाच्या आयुष्यात कुणीतरी असावे लागते. रामच्या आयुष्यात असे कुणीही नाही. काही घटनांनी, अधुर्‍या स्वप्नांनी रामला कैद करून ठेवले आहे. यातून बाहेर न पडणे ही त्याची मजबूरी आहे.
 
 
तंजावर येथे कामानिमित्त गेला असताना, येथे घालवलेले क्षण रामला साद घालू लागतात. त्याचे बालपण नजरेसमोर सरकू लागते. गावाबाहेरील बस स्टॉप, त्याचे पालक या शहरात स्थायिक होताना इथेच तर उतरले असतात, जन्म जिथे झाला ते हॉस्पिटल, शहरातले पहिले डिपार्टमेंटल स्टोअर, नदीवर बांधलेला जुना पूल आणि तो पार केल्यावर येणारी शाळा. आपल्याला कुणीतरी ओळखेल म्हणून कार थांबवण्यास नकार देणारा राम, शाळेकडे आल्यावर स्वतःला थांबवू शकत नाही.
 
 
ही जागा खास कारण इथेच तो आणि जानकी एकमेकांना भेटले आहेत. शाळेची भव्य इमारत, लांबलचक मार्गिका, शाळेबाहेरील मैदान, प्रशस्त वर्ग आणि तिथे घालवलेल्या क्षणांच्या स्मृती. वर्ग रिकामा पण फळ्याखाली असलेल्या खडूचा स्पर्श परिचित. इतकी वर्षे ठरवून एकटे राहिल्यानंतर, गप्पा-गोष्टी-मस्तीने भारलेला भूतकाळ सुद्धा परका भासतो पण आठवणींचा गंध एवढा उत्कट असतो की, राम कितीतरी वर्षांनी आपल्या मित्राला फोन लावतो. व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून अनेकांशी संपर्क झाल्यावर, तब्बल वीस वर्षांनी, चेन्नई येथे त्यांचा रियूनिअनचा बेत ठरतो आणि त्याची जानकीशी भेट होते.
 
 
हे रियूनिअन असते 1996 मध्ये पासआऊट झालेल्या बॅचचे. चित्रपटाचे ‘96‘ हे नाव त्यावरून ठेवले आहे.
 
 
सिनेमा आता वीस वर्षे मागे जातो. रामचंद्रन अभ्यासात यथातथाच, जानकी उर्फ जानू, संपूर्ण वर्गाची लाडकी. ती उत्तम गायिकादेखील असते. तिचे नाव सुद्धा एका प्रसिद्ध गायिकेच्या नावावरून ठेवलेले असते. राम थोडासा बुजरा तर जानकी खंबीर. एकदा ठरवले की आपल्या निर्णयांवर ठाम राहणारी अशी जानकी.
 
 
प्रेमात पुढाकार सुद्धा तिचाच. आपल्या भावना शब्दांत मांडण्याएवढे धारिष्ट्य राममध्ये नसते पण त्याची शाळेतली नव्वद टक्के हजेरी केवळ जानूला पाहण्यासाठी असते. अर्थात हे बहाणे ती ओळखून असते. काही हवे असल्यास मदत मागायची ती फक्त रामकडेच. रामसाठी तर ती आयुष्याचे दुसरे नाव असते.
 

96 movie 
 
हे नव्वदचे दशक. प्रेमप्रकरण ही कुजबुजण्याची गोष्ट. राम आणि जानूचे नाते जेव्हा त्याच्या जवळच्या मित्राच्या लक्षात येते तेव्हा एकही शब्द न बोलता त्यांचे विस्फारलेले डोळे किती काय-काय सांगून जातात. परीक्षा होते, सुट्ट्या लागतात... जेव्हा शाळा परत सुरू होते तेव्हा राम शाळेत येत नाही. कर्ज झाल्यामुळे त्याचे वडील घर विकून शहरात जातात आणि त्यांचा संपर्क तुटतो. एक प्रेमकहाणी न फुलताच संपून जाते.
 
 
रियूनिअनच्या निमित्ताने आज वीस वर्षांनी दोघे एकमेकांसमोर येतात. संध्याकाळी परिचित लोकांत असताना, अचानक पाठून हाक ऐकू येते. तनामनांत भरून राहिलेला गंध आज एवढ्या वर्षांनी परत त्याला बेभान करतो. मधली वर्षे निदान त्या क्षणापुरती पुसली जातात.
 
 
इतक्या वर्षांत एकमेकांच्या आयुष्यात नसताना जे घडले, ते सांगावे असेही नाही वाटत त्यांना. त्या वेळेपुरते तरी पूर्ण जग फक्त दोघांचे असते. पाहिलेली पण पूर्णत्वाला न गेलेली स्वप्ने सुद्धा सप्तरंगात झळाळू लागतात. निरागस डोळ्यातील निरागस स्वप्ने; या क्षणाला काळाचे बंधन नसते.
 
 
सिनेमाचा प्लॉट आता सुरू होतो. जानकी विवाहित असते. सिंगापूरला आपल्या मुली आणि नवर्‍याबरोबर संसार करत असते. आयुष्यात स्थिरावलेली असते. केवळ रियूनिअनसाठी, ती भारतात येते. दुसर्‍या दिवशी तिचे परतीचे तिकीट असते.
 
 
बरेच काही बोलायचे असते, एकमेकांना डोळ्यांत साठवून घ्यायचे असते, कदाचित यावर आयुष्यही काढायचे असते. हातात असते ती एक रात्र...
 
96 हा या रात्रीचा सिनेमा आहे.
 
त्या दोघांच्या मनस्थितीची मित्रमैत्रिणींना कल्पना असते. तरीही समाजाचे काही नियम असतात. रात्री तिला हॉटेलला सोडून परत येताना, राम एकटाच परत येत आहे ना, हे पाहायला त्यांची मैत्रीण फोन करते. रामच्या शेजारी जानू असते पण ती गप्प राहते. राम तिला अपेक्षित उत्तर देऊन फोन ठेवतो, पण क्रॉसचेकिंगसाठी ती परत जानूला फोन करून खातरजमा करून घेते. हा प्रसंग एवढा सुंदर चित्रित केला आहे. वावगे काही त्यांच्या हातून होणार नसतेच, तरीही आपण खोटे बोलत आहे ही जाणीव आणि एकाच वेळी थोडे ओशाळलेपण, थोडा खट्याळपणा आणि काळ धावतो आहे याची खंत.
 

96 movie 
 
“तू अजून एकटाच आहेस, अस्पर्श आहेस?“ जानूने रामला विचारलेला प्रश्न अनपेक्षित आणि त्याचा काहीसा लाजूनच होकार हा मात्र अपेक्षित. त्याच्यासाठी काळ सरकलेला नाही. त्याच्या हळव्या भावना फक्त एका व्यक्तीसाठी राखीव आहेत.
“तू सुखी आहेस?“
या प्रश्नाला तिचे उत्तर आहे...
“माझी शांती मी मिळवली आहे...“
जे आहे ते तिने स्वीकारले आहे.
सगळ्याच गोष्टी मनासारख्या झाल्या नाहीत तरी जगणे सोडता येत नाहीच. अशावेळी अनेक जण काही कप्पे बंद करून, उघड्या डोळ्यांनी आयुष्याला सामोरे जातात. जे कप्पे बंद असतात, त्या भावना सुद्धा तिथेच पुरल्या जातात. गतकाळाच्या आठवणी कितीही सुखद असू दे, कितीही हव्याहव्याशा वाटू देत, त्यांना आयुष्यात स्थान देणे शक्य नाही हे लक्षात आले की, माणूस कणाकणाने रिकामा होत जातो. अधुरे आयुष्य जगतो.
जे आपले नसते ते धरून ठेवता येत नाही. त्याला आपल्या मार्गाने जाऊ देणे ही शक्ती अपार प्रेमच देऊ शकते. सिनेमा एवढा हळवा असूनही कुठेच मेलोड्रॅमॅटिक झाला नाही. यात राम भावनाविवश होतो पण दिग्दर्शक प्रेम कुमार कुठेही वाहत जात नाही. पावसात भिजल्यावर रामच्या घरी काही काळ घालवणे... घरात येताना, त्याने जानकीला उजवा पाय प्रथम आत ठेवायला सांगणे, कपडे भिजलेले असल्याने जानकीने रामचा शर्ट वापरणे, त्याच्या आवडीचे गाणे गुणगुणणे असे अनेक प्रसंग आहेत की, जिथे काहीतरी सनसनाटी करणे सहज शक्य होते पण दिग्दर्शकाने हा मोह टाळला आहे.
आता जानकीची परत जायची वेळ येते...
विजय सेतुपती आणि त्रिशा यांनी मुख्य भूमिका रंगवल्या आहेत. राम आणि जानकीच्या अंतरंगात शिरणे हा परकायाप्रवेश इथे सहज जमून आला आहे. त्यांची केमिस्ट्री नजरेतून, हालचालीतून स्पष्ट जाणवते, आवाजाचा पोत, घशात अडकलेला हुंदका, मागे घेतलेला स्पर्श आणि नजरेत दाटून आलेले प्रेम. मनात येते देव एवढा का निष्ठूर झाला असावा!
शेवट अपेक्षित.
स्वप्नांना काळाचे बंधन नसते पण काळालाही कशाचेच बंधन नसते. स्वप्ने मागे ठेवून तो पुढे जातो. हे रात्रीचे क्षण असेच चुकार, निसटलेल्या भूतकाळातून उधारीवर मिळालेले. ते वर्तमानाला जोडता येत नाही.
रामच्या घरी एक जुनी सुटकेस असते. सुटकेस भरून असतात त्या शाळेच्या दिवसातील रंगीत आठवणी. तिनेच शाई उडवलेला त्याचा शर्ट आणि तिचा रंगीत दुपट्टा. राम आणि जानकीचा भविष्यकाळ काहीही असो, ह्या दोन वस्तू मात्र त्यांच्या भूतकाळासहित सुटकेसमध्ये एकत्र राहणार असतात. हॅपीली एव्हरआफ्टर...
‘96 हा सिनेमा अमेझॉन प्राईमवर पाहायला मिळेल.

रवींद्र प्रभुदेसाई

पितांबरी प्रॉडक्ट्स प्रा. लि.ची सुरुवात 1989 मध्ये श्री रवींद्र प्रभुदेसाई आणि त्यांचे वडील स्वर्गीय श्री वामनराव प्रभुदेसाई यांनी लहान घरगुती व्यवसाय म्हणून केली होती. ती हळूहळू एक आघाडीची उत्पादन आणि विपणन कंपनी बनली आहे. होमकेअर डिव्हिजनमध्ये एफएमसीजी उत्पादनांसह सुरुवात करून, आता संस्थेकडे एकाच छताखाली 10 विभाग आहेत उदा; होमकेअर, हेल्थकेअर, अॅग्रीकेअर, फूडकेअर, सौर, धूप, परफ्युमरी, डिजीकेअर, कृषी पर्यटन आणि निर्यात विभाग.