एखाद्या मुलाला लहानपणीच योग्य दिशा मिळाली तर काय बदल घडू शकतो, हे प्रथमेशच्या आयुष्याकडे पाहिले तर लक्षात येते. कलाकेंद्रात खितपत पडलेले आयुष्य ते संरक्षण क्षेत्रातील राज्य राखीव दलात कार्यरत असणे हे सहज घडले नाही. यामागे समाजाची कणव असलेल्या पद्मश्री गिरीश प्रभुणे यांच्या चिचंवड येथील पुनरूत्थान समरसता गुरूकुलम्चे भरीव योगदान आहे. भटके विमुक्त समाजासाठी आपले आयुष्य समर्पित करून त्यातून देशासाठी अनेक रत्ने घडविण्याचे कार्य गुरूकुलम्मध्ये सुरू आहे.
’चार पोट्टं देण्यापरिस त्यातल्या दोन पोट्ट्या जरी देवानं पदरी टाकल्या असत्या तर घर अलबेल झालं असतं’ हे अशिक्षित- अडाणी माऊलीचे शब्द पुढारलेपणाचे नसून दहा-पंधरा वर्षांपूर्वी गावराहट्यात जखडल्या गेल्याचे द्योतक होते. ती परंपरा होती, भटके विमुक्त समाजातील कोल्हाटी समाजाची. आणि वर ज्या माऊलीच्या शब्दांचा उल्लेख आहे ती माऊली होती तरुण तडफदार SRPF (राज्य राखीव पोलिस दल) मध्ये कार्यरत असलेल्या प्रथमेश मुसळेची.
भटका असलेला हा कोल्हाटी समाज कलाकेंद्राचं बस्तान जिथं जाईल तिथं भटकंती करणारा. जीवनात कायम अस्थिरता घेऊन हिंडणारा, इतर भटक्या समाजासारखंदेखील नाही की केलेल्या कामाचा, मजुरीचा मेहनताना मिळेल. यांची रोजी ठरणार ती आलेल्या हौशानवशा रसिकांवर (रसिक नावापुरते, खरं तर लचके तोडणारे लांडगेच ते). या समाजातील पुरुष तसा मेहनती, पण कलाकेंद्रातील बारीकसारीक कामातच दिवस सरत असे आणि सोबत पाचवीला पुजलेली दारू आहेच. अशा सामाजिक स्थितीत अनारोग्यही सोबतीला असतेच, नशीब बलवत्तर असेल तर पुढचं आयुष्य; नाही तर जगाचा निरोप. प्रथमेशच्या आईवडिलांबाबत दुर्दैवाने दुसरी गोष्ट खरी ठरली आणि चारही भावंडं अनाथ झाली. एकंदर या समाजातील मुलांचं भविष्य ते काय असणार? याहून वेगळ आयुष्य प्रथमेश आणि त्यांच्या भावंडांचंही नव्हतंच. पण नियती प्रत्येकाची भाग्यरेखा वेगळी लिहित असते, हे मात्र खरं.
‘आपल्या समाजातील लेकीबाळींना या नरकयातना नको, त्यांनी माणूस म्हणून जगावं या शुद्ध हेतूपोटी करमाळा तालुक्यातील नेरले गावात जिजीने समाजातील मुलामुलींसाठी स्वतःच राहतं घर देऊन वसतिगृह सुरू केलं आहे, ही मोलाची माहिती माझी आत्या माधुरी काळे आणि बाळासाहेब काळे यांनी दिली’, मग याच वसतिगृहात प्रथमेशचं पहिली ते सहावीपर्यंतचं शिक्षण झालं. मोठ्या भावाला लहानग्यांची सतत चिंता लागून राही. अशातच वसतिगृहातील कार्यकर्ते आणि शिक्षक असलेले बालाजी काळे यांनी त्यांच्या परिचयात असलेल्या चिंचवडच्या गिरीश प्रभुणे यांच्या पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् याबद्दल त्याला माहिती दिली. चार भावंडांपैकी एकाने शिक्षणाला राम राम ठोकलेला, पुढली दोघं तरी शिकतील या आशेने 2014 साली प्रथमेश आणि छोट्या भावाचा गुरुकुलम्मध्ये प्रवेश करून घेतला.
इथपर्यंतच्या प्रवासाबद्दल प्रथमेश सांगत होता,“गुरूकुलात येण्याआधी रेल्वे स्टेशनला पाण्याच्या बाटल्या विक, काहीबाही विक, तर कधी हॉटेलात कामाला जायचो या सार्यात भविष्याची वाट दूरवर दिसत नव्हती ही खरी गोष्ट. पण नव्याने गुरूकुलम्मध्ये आल्यावर काबाडकष्टाचे ते दिस पण भारी वाटत होते. गुरूकुलम्मध्ये आल्यावरदेखील त्या दिवसांच्या आठवणीने मन कोमेजून जात होते. दिवसामागून दिवस सरत होते, शिक्षण चालू होतं, तिथल्या माणसांना ओळखून घेत होतो, चुकत होतो-धडपडत होतो, सावरत होतो, अर्थात हे सारं गुरूकुलम्च्या साथीने चालू होतं. गुरूकुलम्मध्ये येऊन दोन वर्ष झाली तरी भेटायला कुणी येणं नाही की, उन्हाळा-दिवाळी सुट्टीत घरी जाणं नाही. अनाथच होतो नव्हं, मोठ्या भावाला तरी काय बोल लावणार त्याची परिस्थिती माहीत होती.” प्रथमेशच्या बोलण्यातून वस्तुस्थिती स्वीकारल्याची जाणीव होत होती.
फाटलेल्या आभाळाला मायेची पाखर मिळाली ती गुरुकुलम्मधील गिरीश प्रभुणे आणि मुख्याध्यापक पूनम गुजर-भिसे आणि तेथील सर्वच माणसांची. पूनम मॅडमने तर ‘आजपासून मी तुमची आई’ असं फक्त म्हणाल्या नाहीत तर आईच्या मायेप्रमाणे अभ्यासाबरोबर आवश्यक असणार्या इतर गोष्टींची काळजी घेतली. सुट्टीचे दिवसही नंतर त्यांच्याच घरी साजरे होत होते.
त्याशिवाय आयुष्यातील संघर्षाचा सामना करण्यासाठीच्या शहाणपणाच्या चार गोष्टीदेखील त्यांनी सांगितल्या. आम्ही आतापर्यंत जगत आलो त्यापेक्षा वेगळं जग गुरुकुलम्मध्ये होतं, त्यामुळे सुरुवातीला गांगरलोही. अनाथ असल्यामुळे माणूसपणाचे दैनंदिन व्यवहाराचेही अज्ञान होते. अशा भरकटलेल्या वाटेत साथ दिली ती गुरुकुलम्मधील सज्जन माणसांनी. गुरुकुलम्मधील दैनंदिनी ठरलेली असे, त्यामुळेच आम्ही संस्कारित झालो. शालेय अभ्यासासोबत भारतीय जीवनमूल्याचे पाठही कसोशीने विद्यार्थ्यांकडून इथे गिरवले जात होते.
इथे भटक्या समाजातील सर्व जातीवर्गातील मुले शिकायला होती. गावाकडे चालणारे जातीजातील भेद इथे औषधालाही नव्हते. गुरूकुलम्च्या कुटुंबकबिल्यात बंधुभाव ओतप्रोत होता. शाळेच्या नावातील ‘समरसता’ गुरुकुलात प्रत्यक्ष नांदत होती. भटक्या असलेल्या समाजात परिस्थितीमुळे शिक्षणाबाबत औदासीन्य असतेच. मात्र भटक्या समाजात उपजत कला-कौशल्य असतात, त्याला योग्य दिशा दिली तर ते भविष्याचं सोनं करू शकतातं, हे गिरीशकाकांच ठाम मत. त्यामुळे गुरूकुलम्मधील विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासोबत कौशल्याधारित शिक्षणाची जोड दिली गेली. शिक्षण कमी झालं या कारणाने कोणताही विद्यार्थी जीवनाच्या शर्यतीत मागे राहता कामा नये, आपलं पोट भरू शकेल एवढं शिक्षण गुरूकुलम्मध्ये दिलं जातं. प्रथमेश सांगत होता,‘मीही वेल्डिंग, बांधकाम गुरूकुलम्मध्येच शिकलो.’
प्रथमेश पुढे म्हणाला,‘गिरीशकाकांच्या कामाचा आवाका आणि समाजाबद्दलची कणव पाहिली तर थक्क व्हायला होतं. आपलं आयुष्य समर्पित करणं म्हणजे काय याचा वस्तुपाठ म्हणजे गिरीशकाका आहेत. काकांच्या समाजकामाची उंची एवढी विशाल पर्वतासारखी आहे, त्याला गवसणी घालणे मला शक्य नाही. पण काकांकडून एक शिकलो की, आपल्याबरोबर आपल्या समाजाचा विचार करावा, सहवेदना असली की समाजाची दुःखे दिसतात. माझ्या हातून याबाबत नखाएवढं काम झालं तरी खूप. काकांची दिनचर्या व्यग्र असली तरी गुरूकुलम्मधील प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी ते वेळ द्यायचे. कुटुंबापासून दूर आलेल्या मुलांना एकटेपणाची जाणीव होऊ नये म्हणून नेहमी ते प्रयत्नशील असत’, हा माझा अनुभव.
गुरूकुलम्मध्येच मला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख झाली. संघशाखेतील खेळांकडे आकृष्ट झालेल्या माझ्यात संस्कार, स्वयंशिस्त, व्यक्तीनिर्माण, सामाजिक भान, पर्यावरण अशा अनेक गोष्टींचे बीजारोपण झाले. संघ शिबिरातही मी भाग घेतला. संघ ही समाजाची एक अजोड साखळी आहे असं मला वाटतं. समाजातील कुठल्याही घटकात बिघाड झाला की, संघ मदतीला धावून येतो आणि साखळी अखंड राहण्यास सज्ज असतो, हे मी पाहिलं आहे. संघाच्या अनेक कार्यक्रमात मी सहभागी असतो, त्यामुळे समाजाच्या प्रत्येक घटकाशी संघ जोडला जात आहे याचे दर्शन होते.
दहावीपर्यंत गुरूकुलम्मध्ये शिक्षण झाल्यावर पुढे अकरावी-बारावीपर्यंतचे शिक्षण क्रांतिवीर चापेकर समितीत झाले. हे सगळं चालू असतानाच जायबंदी व्हावी तसे कोरोनाचे सावट आले. सगळ्यांच्याच जीवनमानात बदल झाले, तसं मलाही पुणे सोडून भावाकडे सोलापूरला जावं लागलं. घर न् दार अशा स्थितीत कलाकेंद्रातील एका ओळखीच्या ताईंनी (आमच्याच कोल्हाटी समाजातील) आम्हा भावंंडांना आसरा दिला. त्यांची मुलगी पोलिस आणि आर्मी भरतीच्या प्रवेश परीक्षेची तयारी करताना पाहून मलाही आपणही असं काहीतरी शिकावं ही प्रेरणा मिळाली.
शिकण्याची इच्छा दर्शवल्यावर आम्ही ज्यांच्या घरी राहयचो त्या ताईंनी आणि त्यांच्या आईने ‘शिकतोय तर शिक, मोठ्ठा हो, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी‘ अशी खंबीर साथ दिली. आर्थिक भारासोबत, सरावासाठी लागणार्या वेळेचे नियोजन, अकलूजला शिकवणी, शैक्षणिक साहित्य असं सारं सारं काही कोणतंही नातं नसताना स्वतःच्या मुलाप्रमाणे केलं. त्यांनी दाखवलेल्या विश्वासाने आणि खंबीर पाठींब्यामुळेच आज मी SRPF (राज्य राखीव पोलिस दल) मध्ये कार्यरत आहे.
मी ज्या क्षेत्रात आहे ते नागरिकांना संरक्षण देण्याचे कार्य करते. आतापर्यंत आमच्या समाजाने अन्याय सहन केला, त्याचे मूळ कारण तो अशिक्षित होता. परंपरेच्या जोखडात बांधला गेला होता. पुनरूत्थान समरसता गुरूकुलम्, रा. स्व. संघ यांच्या संस्काराने मला समाज निरोगी रहावा यासाठीचे कार्य करायचे आहे. आमचा कोल्हाटी समाज आता सुधारत आहे. माझ्या परिने या सुधारणेत खारीचा वाटा उचलण्याचा प्रयत्न करणार आहे. अजून मी सामाजिक काम करण्याएवढा सक्षम झालो आहे असं वाटतं नाही. परंतु माझ्या परिचयातील भाऊबंद-नातेवाईक यांना कलाकेंद्राच्या पाशात अडकू नका, शिक्षण घ्या, प्रगती करा असं सांगत असतो.
समाजकार्याचं ध्येय मोठं आहे, पडत्या काळात ज्या कुटुंबाने आम्हाला साथ दिली, त्यांच्या ऋणात आम्ही कायम राहू इच्छितो.
गुरूकुलम्च्या छत्रछायेत जीवनाला दिशा मिळाली, त्याचे ऋण कायम ठेवून, संघ संस्काराच्या साथीने स्वतःसोबत समाज उत्थानाचं कार्य करण्याची इच्छा प्रथमेश मुसळे याने कृतज्ञतापूर्वक बोलून दाखविली.