निवड

विवेक मराठी    13-Dec-2025
Total Views |
@अंबरीष दीनानाथ पुंडलिक
9890531220
story writing
‘समता’ ही शासनाच्या अध्यादेशाने येत नसते संतोष. ती माणसा-माणसांतल्या प्रेमाने येत असते. एकमेकांबद्दल वाटणार्‍या आपुलकीतून येत असते. या आपुलकीलाच बाबासाहेबांनी बंधुता असं म्हटलं आहे. समतेचा रस्ता हा बंधुतेतून जातो हे लक्षात ठेव. सरकारच्या लाल फितीतून नाही. हे बाबासाहेबांचे विचार संत्याने ‘निवड’ करून सिद्ध केले.
कॉलेजच्या त्या भव्य फाटकातून आत शिरताना नाही म्हटलं तरी संत्याच्या मनात भीती उमटली होती. खेड्याकडून कॉलेजच्या मोठ्या शहराला सामान बांधून निघतानाचा प्रसंग त्याच्या डोळ्यांसमोर उभा राहिला.
 
 
”आता कशाची बी फिकीर करू नगंस संत्या,“ बा उत्साहाने बोलत होता, “माजं अन तुज्या आईचं हात चालत हायंत तंवर तुला पैका पाठवत र्‍हानार!“
 
 
संत्याचा बाप भीमा गावात डफडं वाजवत असे, अन आई सारदा शेतात मजुरी करून घराला हातभार लावत असे. पोरानं तरी या दुष्टचक्रात अडकू नये, शिकावं, नोकरी करावी, नाही हापिसर तर निदान कारकुनी तरी करावी आणि वर्षानुवर्षे सावकाराकडे अडकलेली खोपटाची जागा सोडवून घ्यावी; सुखाची एवढी छोटी कल्पना होती त्या जोडप्याची.
 
 
पांढूरसारख्या आडरस्त्यावरच्या खेडेगावातल्या ग्रामपंचायतीच्या शाळेत दहावी अन् तालुक्याच्या गावी परीक्षेपुरती अ‍ॅॅडमिशन घेऊन संत्या बारावी झाला. खूप हुशार म्हणून नावाजण्यासारखे नसले, तरी कॅटेगिरीमधून नंबर लागेल एवढे मार्क्स त्यानं मिळवले होते. कुठेही कलास न लावता पास झालेल्या आपल्या पोराचा भीमाला केवढा अभिमान वाटला होता. अ‍ॅॅडमिशन, हॉस्टेल, मेस ही सगळी व्यवस्था करायला पोरासोबत त्या अजस्त्र शहरातल्या अवाढव्य परिसरात फिरताना भीमा दिसणार्‍या प्रत्येकाला एकदा राम राम करी आणि दोनदा घाम पुशी.
 
 
“या कॅटेगिरीवाल्यांचं बरं असते. ना अ‍ॅडमिशनला पैसे लागत, ना राहायला-खायला!“ या कुजकट टोमण्याचा अपवाद सोडला, तर सगळे सोपस्कार पार पडायला त्याला काही कमी त्रास नाही झाला. संत्या फार हुशार नसला तरी हिमतीचा होता. त्यामुळे याला-त्याला विचारून, दहा खिडक्या फिरून त्यानं सगळ्या गोष्टी व्यवस्थित केल्या. मुख्य म्हणजे कागदपत्र एकही कमी पडलं नाही.
काम फत्ते करून बापलेकाची जोडी घरी आली, तेव्हाच सारदाला खोपटं ताब्यात आल्याचा आनंद झाला होता. होस्टेलवर लागणार्‍या सामानाची सगळी बांधाबांध करून जेव्हा संत्या घरून निघाला, तेव्हा अशिक्षित भीमा अवसान आणून म्हणाला,
“बाबासाहेबांच्या पुन्याईनं आता समता आली आहे संत्या! घाबरायचं न्हाई. मागं सरायचं न्हाई. फकस्त पुढे पुढे जात राह्याचं,“ सारदा म्हणाली, “घर सावकाराकडे गहान पडलंय हे तुला म्हाईतच हाये संत्या. तुला नोकरी लागेपर्यंत थांब म्हनलं पैशासाठी. बघू काय करतूय. ते पाहू आमी. पर तू चांगला अब्यास कर बाबा. तूच शेवटची आस आहे आमची.“
संत्या त्या अपेक्षेच्या ओझ्याने बावरून गेला होता. त्याला काय बोलावं समजत नव्हतं.
 
 
“आनं दारूबिरू पिऊ नगस बाबा तिथं. या दारूपाईच निसंतान झालं सगळं घराचं.“ सारदानं म्हणून घेतलं.
 
अशा चांगल्या वेळी भीमाला आपल्या बापाचा अप्रत्यक्ष उल्लेख बोचून गेला. त्यांना सारदाचं वाक्य तोडत म्हटलं, “बरं बरं! तेची गाडी चुकंल. चल रे. घे ते सामान!“
सामान घेऊन दोघं स्टॅन्डकडे निघाले. थोड्या वेळात एसटी आली. गाडीत फारशी गर्दी नव्हती. संत्याला व्यवस्थित जागा मिळाली. गाडी धूळ उडवत जात असतानाच भीमा न राहून होऊन ओरडला- “सांगितलेलं लक्षात ठेव संत्या - समता! समता!“
समता! समता!... तो सगळा प्रसंग आठवून संत्याला धीर आला. त्यानं धीरानं कॉलेजच्या आवारात पाऊल टाकलं. कॉलेजच्या त्या वातावरणात शिरताना बाकीच्या मुलांच्या डोळ्यासमोर वेगवेगळी मोरपंखी स्वप्नं तरंगत असतात. संत्याच्या डोळ्यासमोरही स्वप्नं होती, पण निराळी.
 
story writing 
 
तो आपला वर्ग शोधत पहिल्या मजल्यावरच्या एका खोलीत पोहोचला आणि सर्वात पहिल्या बेंचवर बसला.
 
 
“तू कसा काय बसला या बेंचवर?“ मागून आलेल्या या उद्धट प्रश्नामुळे संत्या गांगरून मागे पाहू लागला. ‘उठावं की बसून राहावं‘ हा विचार करत असतानाच त्याच्या होस्टेलवाले दोन-तीन पोरं जमा होऊन त्याच्या वतीने बोलू लागले.
 
 
“त्याची याच क्लासमध्ये अ‍ॅडमिशन झाली आहे म्हणून.“
“किती मार्क भेटले रे तुला?“ मघाचा तो उद्धट पोरगा पुन्हा बोलला.
 
“त्याच्याशी तुला काय करायचं आहे? त्याला या कॉलेजला अ‍ॅडमिशन मिळाली आहे एवढं पुरेसं नाहीये का?“ हॉस्टेल गँग पुढे पुढे येत होती.
 
 
“पस्तीस टक्के मिळवतात आणि कॅटेगिरीच्या भरोशावर अ‍ॅडमिशन मिळते.“
“अ‍ॅडमिशन मिळाली आहे ना पण! आणि कॅटेगिरीच्या विद्यार्थ्यांनी समोरच्या बेंचवर बसूच नये असं लिहिलं नाही ना कुठे? मी इथेच बसणार!“ संत्या निश्चयी स्वरात म्हणाला.
 
 
दोन्हीही गट आपापल्या दिशेने निघून गेले; पण वर्गात दोन गट पडले ते पडलेच. ज्या संघर्षाची ऐकून माहिती होती त्याची अशी पहिल्याच दिवशी गाठ पडली होती संत्याची.
 
 
रात्री पुन्हा हॉस्टेलवर त्याच गप्पा. सगळी मुलं संत्याला घेरून बसली होती. विषय एकच- ‘ते लोक आणि आपण लोक.‘
“त्या पोट्ट्याईशी आपलं जमूच शकत न्हाई. आपुन वेगळे आन ते वेगळे.“ एक अनुभवी पोरगा बोलला.
 
 
“संघर्षाशिवाय अधिकार मिळत नाही हे तर तू पाहिलंच.“ सकाळी एक सकाळचा साक्षीदार बोलला.
 
 
या गप्पांनी संत्याच्या मनात विचारांचं एक नवीन दालन उघडून दिलं होतं; आणि या ‘ते लोक‘चा प्रतिनिधी होता त्या दिवशी बेंचवरून उठायला लावणारा मंगेश!
 
 
मंगेश! घरातली गरिबी. तरीही ओपन कॅटेगिरीमुळे पूर्ण फी भरावी लागणारा एक विद्यार्थी! वडील नाही. आई शिक्षिका. तीही विनाअनुदानित शाळेत. मंगेश-योगेश हे दोन भाऊ. मंगेश अभ्यासात हुशार. धडपड्या. आईची धावपळ पाहून तिला लवकर नोकरी सोडता यावी, आराम करता यावा, या जिद्दीने अभ्यास करून चांगल्या कॉलेजात प्रवेश मिळवला मंगेशने. आपल्यासाठी सरकार काही करत नाही. आपल्याला कोणती सवलत नाही. आपल्याला आपल्याच भरवशावर उभं राहावं लागणार. वेळेवर कोणी मदतीला येत नसतो. या विचाराने पेटलेला, चिडलेला आणि नोकरी मिळवण्याच्या ध्येयाने झपाटलेला.
 
 
योगेश वेगळा. माणसा-माणसातल्या आपुलकीच्या नात्यावर विश्वास असणारा. माणसाच्या वागण्यामागचं कारण शोधून मत बनवणारा. कथा, कादंबरी, गाणी यात रमणारा.
 
 
“चांगली खोड मोडली बाकी त्या मंग्याची काल! लय हुशारी दाखवत होता.“
संत्याचा ग्रुप हास्यविनोद करत कॉलेजमधून बाहेर पडत होता.
 
 
“ए बरं! आता काय?“
“पार्टी!“ कुणीतरी बोललं.
“केव्हा चलायचं?“
“आत्ता.“
या उत्तरावर सगळ्यांचे एकमत झालं.
 
 
“तुम्ही जा बाबा. मी नाही येत पार्टी-बिर्टीला.“ संत्या म्हणाला.
 
“अरे, असं कसं?“
“मी येणार नाही. बस.“
ग्रुपला सोडून संत्या निघाला. हॉस्टेलच्या दिशेने चालत राहिला.
 
डोक्यात उलटसुलट विचारांचं काहूर.
 
याला काय स्वातंत्र्य म्हणायचं? आपल्या आयुष्याला, घराला हातभार लावता येईल, दो घटकाचं आपलं हे लहानसं आयुष्य सुखी करता येईल, यासाठी प्रयत्न करण्याची मुभा असणं हे खरं स्वातंत्र्य!
 
संत्याच्या पायाची डोक्यातल्या विचारांच्या गतीशी स्पर्धा लागली. तो झपाट्याने चालत होता. कुठे? कुठेतरी. हॉस्टेलचं गेट लागलं तरी तो थांबला नाही.
 
कालच्या पहिल्याच दिवशी असं व्हायला नको होतं. आपण इथे अभ्यास करायला आलो आहे. या बाकीच्या पोरांचं माहीत नाही; पण आपल्याला शिक्षण पूर्ण करून लवकरात लवकर नोकरी मिळवायची आहे. घर सोडवायचं आहे.
 
 
विचार करत करत एका वाचनालयाच्या दारापाशी येऊन संत्या थबकला. पुस्तकांची संत्याला लहानपणापासून आवड! कादंबर्‍या, त्यातली पात्रं, त्यांच्या आयुष्यातली संकटं यात तो स्वतःच्या आयुष्याची कथा शोधे. त्या पात्रांनी जसं कर्तृत्व करून आपल्या कथेचा शेवट आनंदी केला, तसाच आपणही करू शकू, या विचारात तो हरवून जाई.
 
 
उत्कंठापूर्ण चालीने त्याने वाचनालयात प्रवेश केला. वर्तमानपत्रं, मासिकं टेबलावर पडलेली होती. संत्या गुंग होऊन वाचू लागला. अंधार पडला. दिवे लागले तेव्हा भान आलं. लवकर हॉस्टेलला गेलं पाहिजे, नाहीतर जेवण नाही मिळणार. संत्या झपझप पावलं टाकीत हॉस्टेल जवळ करू लागला.
 
आता संत्याला वाचनालयाचा चाळाच लागला. रोज कॉलेज संपलं की वाचनालयात येऊन बसायचं. वाचायचं. अंधार पडला की हॉस्टेलला जायचं. हा त्याचा दिनक्रमच होऊन गेला.
 
“गोष्टी वाचायला आवडतात वाटतं तुला?“ या प्रश्नावर संत्या दचकलाच. त्याच्याकडे हसून पाहात एक मुलगा उभा होता.
“अरे बावरतो काय असा? मी गेले काही दिवस तुला पाहतोय. मी पण इथेच येतो वाचायला मी योगेश.“
योगेशने हात पुढे केला. संत्याने तो आनंदाने पकडला.
 
 
“मी संतोष!“
 
आता पुस्तकांच्या बरोबरीने योगेशशी बोलण्याची ओढ संत्याला वाचनालयाकडे खेचून आणू लागली. ती दोघं वाचत. बोलत. गप्पा करत. भटकत. टपरीवर चहा पीत. विषय अनेक. इतिहास, खेळ, गाणी, सिनेमा...
 
“संतोष, उद्या माझ्या घरी जेवायला येशील? गौरी बसल्या आहेत त्याचा प्रसाद!“
“अरे, पण मी...“ संत्या अवघडला.
 
“ये रे. माझ्या घरच्यांशी ओळख होईल त्यानिमित्ताने.“
आढेवेढे घेत संत्या तयार झाला. घर शोधत शोधत बरोबर पोहोचला. ओळीने केळीची पानं मांडलेली. त्यावर चटण्या, कोशिंबिरीपासून ते पुरणपोळीपर्यंत असंख्य पदार्थ! संकोचलेल्या संत्याला योगेशने एका पानावर बसवलं. समोर गौरी बसलेल्या. उदबत्तीचा धूर आकाशात उठत होता. संत्याला हे वातावरण नवीन होतं.
 
 
तेवढ्यात आत काहीतरी आणायला गेलेला योगेशचा भाऊ बाहेर आला. संत्याची आणि त्याची नजरानजर झाली. मंगेश!!
“तू? इथे बसायची हिंमत?“
“मंगेश, त्याला मी बोलावलं आहे.“ योगेश मध्ये पडला.
 
 
“योगेश, तुला माहीत नाही हा...“
 
“तो कोणीही असला तरी माझा मित्र आहे.“
 
“त्याला मी हा प्रसाद घेऊ देणार नाही.“
“मग मीही घरी जेवणार नाही.“
असं म्हणून संत्याच्या हाताला धरून योगेश घराबाहेर पडला.
 
 
ठरलेल्या जागेवर येऊन दोघे बसले. बराच वेळ कोणी काही बोललं नाही.
संत्याला मंगेश हा योगेशचा भाऊ आहे ही नवीन माहिती मिळाली. जेव्हा हे सत्य समोर आलं तेव्हाच पुढे काय होणार हे संत्याला समजलं होतं. हे असंच राहणार. ते लोक आणि आपण लोक यामधली दरी ही अशीच राहणार. हे दोन्ही गट संघर्षासाठीच एकमेकांसमोर येत राहणार. बाकी समता वगैरे सगळं झूठ. कागदावर.
“माझ्यामुळे तुम्हा भावांमध्ये...“ संत्याने बोलण्याचा प्रयत्न केला.
“जाऊ दे रे.. दुसरं काहीतरी बोल. तसाही माझ्यामुळे तुझा अपमान झालाच आहे की.“
योगेश अजूनही धुमसत होता. आपल्या अपमानामुळे योगेशही दुखावला आहे, हे पाहून संत्या तशा स्थितीतही सुखावला. त्यानं धीर करून कॉलेजमधला पहिल्या दिवशीचा प्रसंग योगेशला संगितला.
“देशात समता आली तरी माणसाच्या मनात नाही आली अजून.“ त्या प्रसंगाच्या निमित्ताने संत्याच्या मनातला सल ओठावर आला.
“समता शासनाच्या अध्यादेशाने येत नसते संतोष. ती माणसा-माणसांतल्या प्रेमाने येत असते. एकमेकांबद्दल वाटणार्‍या आपुलकीतून येत असते. या आपुलकीलाच बाबासाहेबांनी बंधुता असं म्हटलं आहे. समतेचा रस्ता हा बंधुतेतून जातो हे लक्षात ठेव. सरकारच्या लाल फितीतून नाही.“
“आणि ही आपुलकी कशी निर्माण होईल?“
“फायदा-तोट्याचा विचार न करता माणसं एकमेकांकडे पाहतील तेव्हा...“
“आणि हे असं होईल असं तुला वाटतं?“ संत्याने अविश्वासाने विचारलं. योगेश ऐकत आहे हे पाहून संत्या पुढे बोलू लागला-
“आज आपण सहज गप्पा मारायला भेटतो. वेळ चांगला जातो. विरंगुळा होतो. पण जेव्हा व्यवहार, पैसा, प्रगतीच्या संधी या माध्यमातून आपण एकमेकांसमोर उभे राहू तेव्हा अशीच आपुलकी तू माझ्याबद्दल दाखवू शकशील?“
“आपुलकी काय करून दाखवू शकते हे कल्पनेवरून नाही ठरवता येत संतोष. त्या त्या वेळी माणसाच्या मनात उमटणार्‍या भावना या इमॅजिन नाही करता येत. त्या असाव्याच लागतात. जगाव्याच लागतात.“
योगेशचं म्हणणं संत्याला पटत नव्हतं.
 
 
अंधार पडला तरी दोघं बसून होते. तेवढ्यात समोरून कुणीतरी येताना दिसलं. योगेशला चाल ओळखीची वाटत होती. आई!
आईनं डब्यात वडे, पुरणपोळी आणली होती. योगेश आणि संतोष खात होते, आई बोलत होती-
“तू मनाला लावून घेऊ नको हो संतोष. तू योगेशचा मित्र आहेस ना म्हणजे मला योगेश सारखाच आहे. खा पोटभर!“
आईच्या त्या प्रेमाच्या शब्दांनी संत्याचा विषाद कुठल्या कुठे पळून गेला. जायला उठला तेव्हा बराच अंधार झाला होता.
हॉस्टेलला गेला तर बाचं पत्र! कोणाकडून तरी लिहून घेतलेलं - सावकार आठ दिवसात पन्नास हजार भरा म्हनतुया... नायतर खोपट्याची जागा गेली. तुझी आई आता डबल काम करत आहे. मी घरोघरी जाऊन डफडं वाजवून जादा कमाई करत आहे. पर ते पुरनार न्हाई. तुजी काय ती कालरशिप येनार हाये, त्यातले पाटवता आले तर...
 
 
स्कॉलरशिप बरोबर पुढच्या हप्त्यात येणार होती. बाला पत्र वगैरे न लिहिता एकदम पैसेच नेऊन द्यावे. अन त्याच्या चेहर्‍यावरचा आनंद पहावा. असा विचार करून संत्या झोपी गेला.
 
“स्कॉलरशिप मिळणार म्हणे! आणि करणार काय त्या पैशाचं? तर दारू पिणार! पार्टी करणार!“
मंगेश वर्गात मोठ्याने बडबड करत होता.
 
“ओपनवाल्यांकडे तर झाड आहे ना पैशाचं? आणि ते आजारीही पडत नाहीत.“
संत्याने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं. तो आता यापुढे ‘आपण बरं आणि आपला अभ्यास बरा‘ हे धोरण अवलंबणार होता. त्यात मंगेश योगेशचा भाऊ होता. आपल्यामुळे योगेशला वाईट वाटायला नको.
 
पण योगेश गेला कुठे? भेटला नाही खूप दिवसात? वाचनालयातही आला नाही. एकदा घरचं काम आटोपलं की योगेशला भेटलं पाहिजे.
 
‘उद्या पैसे मिळणार. दुपारी दोनची एसटी चार तासांत गावात पोहोचेल. गेल्या गेल्या सावकाराकडे जाऊन एकरकमी पन्नास हजार त्याच्या हाती टेकवायचे. मग घरी.‘ अशी आखणी करून संत्या हॉस्टेलला गेला.
 
पैसे हाती पडायला बाराच वाजले. संत्यानं पैसे व्यवस्थित प्लास्टिकच्या पिशवीत ठेऊन ती बॅगेत कपड्यांच्या खाली ठेवून दिली. तो चालतंच स्टॅन्डकडे निघाला. डोळ्यासमोर नाचत होती खुरपं घेऊन डबल काम करणारी आई आणि कानात घुमत होता बाच्या डफड्याचा आवाज!
 
घाईघाईने चालत तो बस स्टॅन्डच्या रस्त्यावर आला. आता एक वळण घेतलं की स्टॅन्डच्या आवारात. तोच त्याला सरकारी दवाखान्यासमोर गर्दी दिसली. थोडं जवळ गेला तेव्हा संवाद ऐकू आला -
“डॉक्टर साहेब, मी पैशाची व्यवस्था करतो नं! तुम्ही ऑपरेशनला सुरुवात तर करा...“
“आधी पूर्ण पैसे भरा त्याशिवाय ऑपरेशन होणार नाही. घेऊन जा या बाईंना.“
संत्याला उशीर होत होता. पण नेमकं काय झालंय हे पाहायची उत्कंठा त्याला निघू देईना. आसपास गर्दी वाढत होती. त्यानं पाठवरच्या बॅगेतून कोणी पैशाचं पुडकं लंपास करू नये, म्हणून बॅगेतून पुडकं हाती काढून घट्ट धरलं आणि आणखी समोर सरकला.
 
थोडं समोर जाऊन पाहिलं, तर स्ट्रेचरवर योगेशची आई बेशुद्धावस्थेत पडली होती. खाली मंगेश काही न बोलता डोकं धरून बसला होता. योगेश डॉक्टरांना गयावया करत होता.
 
“योगेश, काय झालं आहे आईला?“ योगेशने मान वर करून पाहिलं तर समोर संत्या.
 
“ट्यूमर! आत्ताच्या आत्ता ऑपरेट करावे लागेल म्हणताहेत...“
“किती रुपये कमी पडत आहेत?“
“पन्नास हजार!“
संत्याच्या डोक्यात डफड्याचा आवाज घुमला.
 
खोपटं, खुरपं चालवणारी आई, डफडं वाजवणारा बा ही दृश्यं डोक्यात फेर धरून नाचू लागली.
 
योगेशचा निरोप घेऊन निघावं का?... पण त्याचा पाय निघेना.
 
आपला अपमान झाल्यावर योगेशचं हाताला धरून घराबाहेर पडणं, वाचनालयाच्या बाकावर बसून खाल्लेली पुरणपोळी आणि ती प्रेमाने खाऊ घालणारी योगेशची आई- ‘जसा माझा योगेश तसाच तू‘ म्हणणारी.. समोरच्या स्ट्रेचरवर पडलेली...
 
डाव्या हातातल्या पुडक्यात पन्नास हजार रुपये..
 
खोपटं की आई?
 
आई की खोपटं?
 
निवड करायचा क्षण...
 
डोक्यात जोरात डफडं वाजत होतं.
 
खोपटं पुन्हा उभं करता येईल पण आई पुन्हा मिळणार नाही.
 
एका तिरीमिरीसरशी संत्याने हातातलं पुडकं डॉक्टरांसमोर आपटलं.
 
“हे घ्या! आता तरी होईल ना ऑपरेशन?“
 
पैसे मोजले गेले. बरोब्बर पन्नास हजार...
 
“यांना ओटीमध्ये घ्या...“
 
डॉक्टर, नर्सेस स्ट्रेचर घेऊन लगबगीने आत गेले. जसे डॉक्टर आत जायला वळले तसा संत्या घाईघाईने स्टॅन्डकडे निघाला. योगेश कृतज्ञ नजरेनं संत्याकडे फक्त पाहात होता. असंही होऊ शकतं यावर मंगेशचा विश्वास बसत नव्हता. संत्याचं कशाचकडे लक्ष नव्हतं. त्याला दिसत होते घरातली भांडीकुंडी जमा करणारे आई आणि बा आणि कानात शब्द घुमत होते - बंधुता! बंधुता!