सर्वसामान्यांच्या आरोग्याला सुपरबगचा शाप

विवेक मराठी    13-Dec-2025
Total Views |
@डॉ. अविनाश भोंडवे
9823087561
सुपरबग हा शब्द अनेक प्रकारच्या अँटिबायोटिक्सना प्रतिरोधक बनलेल्या सूक्ष्मजंतूंसाठी वापरला जातो. ई. कोलाय, क्लेब्सिएलान्यूमोनिइ, एमआरएसए यांसारखे जीवाणू आणि कँडिडा ऑरिससारखे बुरशीजन्य जंतू यामध्ये मोडतात. सुपरबग म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी गंभीर आव्हान आहे. भारतात 83 टक्के रुग्ण आधीच असे जीवाणू बाळगून आहेत. साहजिकच, औषधांचा गैरवापर जर थांबवला गेला नाही, तर भविष्यात साधे संसर्गही जीवघेणे ठरतील. जागरूकता, जबाबदारीने औषध वापर, स्वच्छता आणि संशोधन हेच या संकटावर मात करण्याचे मार्ग आहेत.
 
superbugs
 
गेल्या काही वर्षांत असे लक्षात आले आहे की, जीवाणूंच्या संसर्गाने झालेले अनेक आजार योग्य ती प्रतिजैविके देऊनही बरे होत नाहीत. काही वर्षांपूर्वी हीच प्रतिजैविके याच संसर्गांवर उत्तमरित्या लागू होत होती. उदाहरणार्थ, पूर्वी टॉन्सिल्सला जंतुसंसर्ग झाला, तर पेनिसिलीनने ते बरे व्हायचे, पण आज ते जीवाणू त्या प्रतिजैविकांना दाद देत नाहीत. त्यासाठी खूप नवे प्रतिजैविक वापरावे लागते. याला वैद्यकीय शास्त्रात प्रतीजैविकांना आलेला प्रतिरोध म्हणजेच ‘अँटिबायोटिक्स रेझिस्टन्स’ म्हटले जाऊ लागले.
 
 
सुरुवातीला हा प्रतिरोध काही ठरावीक जीवाणूंना एखाद्या प्रतिजैविकाबाबत होता, पण काही वर्षातच या जीवाणूंच्या पुढच्या पिढीत असे काही जीवाणू तयार होत गेले की, त्यांना नष्ट करणे कोणत्याही प्रतिजैविकाला शक्य होत नव्हते. अशा जीवाणूंना ‘सुपरबग’ किंवा महाशक्तिशाली जीवाणू म्हणून ओळखले जाऊ लागले.
 
 
सुपरबग म्हणजे कोणत्याही औषधाला दाद न देणारे जीवाणू किंवा बुरशीजन्य जंतू. या सर्वांचा परिणाम म्हणजे साध्या संसर्गांवरही प्रतिजैविक औषधे आता काम करत नाहीत. भारतात याचा धोका झपाट्याने वाढत असून, भविष्यात साधे आजारही जीवघेणे ठरू शकतात.
 
‘लॅन्सेट ई-क्लिनिकल मेडिसिन जर्नल’ या वैद्यकीय जगतात प्रमाणित समजल्या जाणार्‍या नियतकालिकामध्ये प्रकाशित झालेल्या एका नवीन, प्रमुख आंतरराष्ट्रीय अभ्यासपूर्ण अहवालात भारतातील सार्वजनिक आरोग्य संकटाची चिंताजनक स्थिती समोर आली आहे. यानुसार 83 टक्के भारतीय रुग्ण बहुऔषध-प्रतिरोधक जीवाणू (मल्टीड्रग रेझिस्टंट ऑर्गानिझम) म्हणजेच सुपरबग बाळगून आहेत.
 
 
‘अँटिमायक्रोबियल स्टीवर्डशिप वीक’ या भारतीय नियतकालिकात 18 नोव्हेंबर 2025 रोजी प्रकाशित झालेल्या अभ्यासात जाहीर करण्यात आले आहे की, भारत या सुपरबग स्फोटाच्या केंद्रस्थानी आहे आणि त्यासाठी तत्काळ धोरणात्मक बदल आवश्यक आहेत.
 
 
भारतीय लोकसंख्येमध्ये प्रतिजैविक प्रतिरोधकतेचे अभूतपूर्व संकट आहे आणि जर हे आटोक्यात आणले नाही तर भविष्यात किरकोळ संक्रमण देखील उपचार करण्यायोग्य नाही, ज्यामुळे देशात साथीच्या प्रकारची परिस्थिती निर्माण होईल, असे निरीक्षण संशोधकांनी नोंदवले आहे.
 

superbugs 
 
सुपरबग म्हणजे काय?
 
सुपरबग हा शब्द अनेक प्रकारच्या अँटिबायोटिक्सना प्रतिरोधक बनलेल्या सूक्ष्मजंतूंसाठी वापरला जातो. ई. कोलाय, क्लेब्सिएलान्यूमोनिइ, एमआरएसए यांसारखे जीवाणू आणि कँडिडा ऑरिससारखे बुरशीजन्य जंतू यामध्ये मोडतात. हे जीवाणू रुग्णालयात किंवा समुदायात पसरतात आणि मूत्रमार्गाचा संसर्ग, न्यूमोनिया, रक्तसंसर्ग, अतिसार यांसारखे आजार बरे होणे दुष्प्राप्य करून सोडतात.
 
सुपरबग निर्माण होण्याची प्रमुख कारणे
 
औषधांचा अति वापर: सर्दी-खोकल्यासारख्या व्हायरल आजारांवरही अँटिबायोटिक्स घेणे.
 
औषधांचा अपुरा कोर्स: डॉक्टरांनी सांगितलेली पूर्ण मात्रा, पूर्ण दिवस न घेता, ती मध्येच थांबवणे.
 
स्वतःहून आपल्या मनाने औषधे घेणे : मेडिकल स्टोअरमध्ये विना प्रिस्क्रिप्शन औषधे मिळत असल्यामुळे लोक स्वतःच औषधे घेतात.
 
पशुपालन व शेतीत औषधांचा वापर: जनावरांना वाढीसाठी अँटिबायोटिक्स देणे, ज्यामुळे अन्नसाखळीत प्रतिरोधक जीवाणू पसरत जात आहेत.
 
 
रुग्णालयातील वातावरण: आयसीयु, व्हेंटिलेटर, कॅथेटर यामुळे जीवाणूंना औषधांचा जास्त संपर्क मिळतो.
 
 
अस्वच्छता व पाणीपुरवठा: दूषित पाणी, अपुरी स्वच्छता यामुळे संसर्ग वाढतो.
 
 
सुपरबगचे सध्याचे परिणाम उपचार अपयशी होणे: आयसीएमआरच्या अहवालानुसार मूत्रमार्ग, न्यूमोनिया, रक्तसंसर्ग यावर वापरली जाणारी औषधे झपाट्याने निष्प्रभ होत आहेत
 
मृत्युदर वाढणे: 2021मध्ये भारतात 2.67 लाख मृत्यू अशा प्रतिरोधक जिवाणूंमुळे झाले.
 
 
रुग्णालयात जास्त दिवस राहणे: जंतुसंसर्गाने बाधित झालेल्या, पण अनेक औषधांना प्रतिरोध असलेल्या रुग्णांना आयसीयुमध्ये जास्त काळ राहावे लागते. परिणामतः त्यांचा खर्चही वाढतो.
 
 
आर्थिक नुकसान: एका अभ्यासानुसार अनेक औषधांना प्रतिरोध असलेल्या, प्रतिरोधक जंतूसंसर्गबाधित रुग्णांचा खर्च, प्रत्येकी 4 ते 5 लाख रुपयांपर्यंत जातो, तर साध्या संसर्गात उपचारासाठी 70 हजार रुपयांपर्यंत उपचाराचा खर्च वाढतो.
 
 
संशोधनाला स्थगिती: आजमितीला कोणतेही नवे प्रतिजैविक संशोधित होऊन वापरात आले, की एक-दोन वर्षात त्याला प्रतिरोध येऊ लागल्यामुळे त्यांची निर्मिती थांबवावी लागते आहे. यामध्ये औषधांचे संशोधन करणार्‍या संस्थांचे आणि त्यांची निर्मिती करणार्‍या औषध कारखान्यांचे अपरिमित नुकसान होते आहे. साहजिकच त्यामुळे नव्या प्रतिजैविकांच्या संशोधनाला खीळ बसली आहे. परिणामतः अशी परिस्थिती येऊ शकेल की, कोणत्याही जीवाणूला नष्ट करू शकेल असे एकही प्रतिरोधक उपलब्ध नसेल.
 
 
भविष्यातील धोके
 
मृत्युदर: 2050पर्यंत सुपरबगमुळे जगभरात दरवर्षी 1 कोटी मृत्यू होऊ शकतात.
 
 
शस्त्रक्रिया व उपचार धोकादायक होणे: कॅन्सरथेरपी, अवयव प्रत्यारोपण, सीझेरियन यांसारख्या प्रक्रियांमध्ये संसर्गाचा धोका कमालीचा वाढेल.
 
अन्नसुरक्षा धोक्यात येणे: शेती व पशुपालनातील औषध वापरामुळे अन्नसाखळीत प्रतिरोधक जीवाणू पसरतील.
 
जागतिक अर्थव्यवस्थेवर परिणाम: प्रत्येक देशाचे जीडीपीमध्ये मोठं नुकसान होईल, आरोग्य खर्च प्रचंड वाढेल.
 
उपाययोजना
 
औषधांचा जबाबदारीने वापर: डॉक्टरांनी सांगितलेली औषधं पूर्ण कोर्सनुसार घ्यावीत.
 
स्वच्छता व सुरक्षित पाणीपुरवठा: संसर्ग कमी करण्यासाठी मूलभूत उपाय.
 
लसीकरण: संसर्ग टाळण्यासाठी प्रभावी मार्ग.
 
नवीन औषधांचा शोध: टायक्सोबॅक्टिन, नॅफिथ्रोमायसिनसारखी नवी औषधं आशादायक ठरत आहेत.
 
राष्ट्रीय धोरणं व जागतिक सहकार्य: जागतिक आरोग्य संघटनेच्या ‘अँटिमायक्रोबिअल रेझिस्टन्स सर्व्हिलन्स प्रोग्रॅम‘ सारख्या उपक्रमांना बळकटी देणे आवश्यक आहे.
 
 
सुपरबग म्हणजे आधुनिक वैद्यकशास्त्रासाठी गंभीर आव्हान आहे. भारतात 83 टक्के रुग्ण आधीच असे जीवाणू बाळगून आहेत. साहजिकच, औषधांचा गैरवापर जर थांबवला गेला नाही, तर भविष्यात साधे संसर्गही जीवघेणे ठरतील. जागरूकता, जबाबदारीने औषध वापर, स्वच्छता आणि संशोधन हेच या संकटावर मात करण्याचे मार्ग आहेत.