बाँडीचा आक्रोश!

19 Dec 2025 17:52:16
Bondi Terror Attack
मुस्लिमधर्मिय असलेल्या दोघांनी बाँडी समुद्र किनार्‍यावरील हनुकाह हा सण साजरा करण्यासाठी आलेल्या यहुदी समाजातील भाविकांना लक्ष्य केले, हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छ आहे. तरीही डोळ्यावर कातड्याची पट्टी बांधून बसलेले या हल्ल्यास धार्मिक हल्ला मानत नाहीत, त्यांना नेहमीच सोयीस्कर भूमिका घेणे पसंत असते. ऑस्ट्रेलियाच नव्हे तर जगभरात या दहशतवादाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय; इच्छाशक्ती व कटिबद्धतेची गरज आहे, हा बाँडी समुद्र किनार्‍यावरील हल्ल्याचा सांगावा आहे.
ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहरातील बाँडी समुद्रकिनार्‍यावर गेल्या 14 डिसेंबर रोजी दोन हल्लेखोरांनी केलेल्या गोळीबारात सोळा जण ठार झाले व सुमारे 29 जण गंभीर जखमी झाले. जे मृत्युमुखी पडले ते यहुदी होते; त्यांत लंडनमध्ये जन्मलेल्या पण ऑस्ट्रेलियात वास्तव्य असणार्‍या एका 41 वर्षीय धर्मगुरूचा तसेच एका इस्रायली नागरिकाचाही समावेश होता. हनुकाह हा सण साजरा करण्यासाठी यहुदी भाविक तेथे जमले होते. इसवी सनपूर्व दुसर्‍या शतकातील घडामोडींशी हा सण संबंधित आहे. हिब्रू भाषेत या शब्दाचा अर्थ समर्पण असा होतो. बाँडी येथे जमून शेकडो यहुदी हा प्रकाशाचा सण साजरा करीत असताना दोन हल्लेखोरांनी तेथे पन्नास फैरी झाडत स्वैर गोळीबार केला. पोलिसांनी केलेल्या कारवाईत त्या हल्लेखोरांपैकी एक जण ठार झाला; तर दुसरा गंभीर जखमी झाला व त्याला पुढील उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती सुधारल्यानंतर या प्रकरणातील आणखी धागेदोरे उघड होऊ शकतील.
या हल्लेखोरांपैकी एकाचे वय 50 वर्षांचे; तर दुसर्‍याचे वय 24. त्यांची नावे अनुक्रमे साजिद आक्रम व नावीद आक्रम. त्या दोघांमधील नाते वडील-मुलाचे. तपासात आणखी काही बाबी स्पष्ट होतीलही; पण या दोघांनी यहुदी समाजालाच लक्ष्य केले हे सूर्यप्रकाशाइतके स्वच्छपणे दिसत असूनही जे या हल्ल्यास धार्मिक हल्ला मानत नाहीत ते भाबडे, मूर्ख, डोळ्यांवर कातडे पांघरलेले अथवा सोयीस्कर भूमिका घेणारे असू शकतात. पैकी पहिल्या दोन घटकांबद्दल सहानुभूती व्यक्त करणे इतकेच काय ते करता येऊ शकते; पण त्या नंतरच्या दोन घटकांत बसणार्‍यांना मात्र आरसा दाखविणे आवश्यक. हा हल्ला केवळ दोन माथेफिरूंनी केला येथपासून या हल्ल्यास इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांची धोरणे कारणीभूत येथपर्यंत युक्तिवाद करणारे केवळ पोकळ वैचारिकतेचे धनी नाहीत तर आपण गोंजारलेल्या सिद्धांतांना पुन्हा घासूनपुसून पाहण्याची इच्छा नसलेले बुरसटलेले आहेत, असेच म्हटले पाहिजे. अशा लोकांकडे दुर्लक्ष करून या घटनेच्या तपशिलात शिरणे व त्याचा अन्वयार्थ शोधणे इष्ट व गरजेचे.
घटनेचे वस्तुनिष्ठ विश्लेषण गरजेचे
 
बाँडी समुद्रकिनार्‍यावर घडलेली घटना एकाकी नाही किंवा अचानक घडलेली नाही. गेल्या काही काळात ऑस्ट्रेलियात यहुदींना लक्ष्य करणार्‍या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. त्यांत याच बाँडी येथे एका ब्रुअरीला (दारूभट्टी) आग लावून देण्याचा काही व्यक्तींनी केलेल्या प्रयत्नाचा; 6 डिसेंबर 2024 रोजी मेलबर्नजवळील एक यहुदी उपासनास्थळावर झालेल्या हल्ल्याचा समावेश आहे. या शिवाय यहुदींची हॉटेले पेटवून देणे; यहुदींच्या शाळांच्या भिंतीवर धार्मिक द्वेष पसरवणार्‍या घोषणा लिहिणे; यहुदी व्यक्तीच्या मालकीच्या बेकरीवर धमकाविणार्‍या घोषणा रंगविणे अशा अनेक घटना गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या भागांत घडल्या आहेत. या सगळ्यांत साम्य म्हणजे त्यांत यहुदींना केले जाणारे लक्ष्य. 6 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर नृशंस हल्ला चढविला आणि त्यास प्रत्युत्तर देताना इस्रायलने गाझाला अक्षरशः भाजून काढले. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायल-गाझा युद्धविरामाची घोषणा केली असली तरी ती अत्यंत तकलादू आहे यात शंका नाही. विशेषतः इस्रायलने पुकारलेल्या युद्धाचे निमित्त करून जगभरात यहुदींवर इस्लामी दहशतवादी हल्ले करणार असतील तर ती शांतता अगदीच क्षीण ठरण्याचा संभव आहे.
ऑस्ट्रेलियात जे घडले त्यानंतर त्या देशाचे पंतप्रधान अँथनी अल्बनीज यांनी एकीकडे शस्त्र बाळगण्याचे नियम अधिक कठोर करण्याची हमी दिली असली तरी हा हल्ला म्हणजे दहशतवादी हल्लाच असल्याचेही मान्य केले आहे. तेव्हा ज्या बुद्धिवाद्यांना बाँडी समुद्रकिनार्‍यावरील हल्ला हा केवळ माथेफिरूंनी केलेला हल्ला वाटतो त्यांची कीवच करायला हवी. अर्थात मुद्दा तो नाही. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी या हल्ल्यास अल्बनीज यांनाच जबाबदार धरले आहे आणि हल्ल्याचे खापर ऑस्ट्रेलियाने पॅलेस्टिनला मान्यता देण्याच्या धोरणावर फोडले आहे. पॅलेस्टिनला मान्यता देणारा ऑस्ट्रेलिया एकमेव देश नाही. युरोपातील अनेक देशांनी अलीकडच्या काळात हा धोरणबदल केला आहे. त्यामागे त्यांची काही भूमिका असू शकते. नेतान्याहू त्यावर टीका करू शकतात; पण म्हणून दहशतवादी हल्ल्यांना केवळ ते धोरण करणीभूत आहे असे मानणे योग्य ठरणार नाही. इस्लामी दहशतवादाने जगाला ग्रासले आहे आणि यहुदीच नाही तर हिंदूंपासून अनेक धर्मांना लक्ष्य केले जात आहे. बाँडी येथे घडलेल्या घटनेकडे त्याच वस्तुनिष्ठपणे पाहिले पाहिजे.
पिता-पुत्राचे कारस्थान
 
ज्या दोघांनी हा हल्ला केला तो माथेफिरूपणे केला आहे असे मानण्यास जागा नाही. याचे कारण त्या हल्ल्याचे धागेदोरे जसजसे उलगडत जात आहेत तसतशी नवनवीन धक्कादायक माहिती उजेडात येत आहेच; पण हा हल्ला नियोजित होता हेही त्यातून स्पष्ट होत आहे. हल्ला करताना या दोघांनी काळे कपडे घातले होते. बंदुकीच्या पन्नासेक फैरी त्यांनी झाडल्या. यहुदींच्या प्रकाशाच्या सणालाच त्यांनी हा हल्ला केला. अहमद अल अहमद या सीरियन अरब मुस्लीम व्यक्तीने त्या दोघांपैकी एकाच्या हातातून बंदूक हिसकावून घेण्याचे धाडस दाखविले आणि म्हणून पुढील अनर्थ टळला असे म्हटले जाते. तेव्हा त्या अहमद अल अहमदचे कौतुक करण्यास प्रत्यवाय नसावा. पण म्हणून हा हल्लाच धार्मिक दहशतवादाची घटना नव्हती असे म्हणणे वावदूकपणाचे. याचे कारण या दोघांवर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेचा प्रभाव होता हेही आता उघड होत आहे. नावीद आक्रमच्या नावावर नोंदणी असणार्‍या वाहनात इस्लामिक स्टेटचे दोन झेंडे आढळून आले. घटना घडली तेथून जवळच स्फोटके असणारे वाहन आढळून आले. हे सर्व योगायोग आहेत असे मानणे बाळबोधपणाचे.
या हल्ल्यापूर्वी हे पिता-पुत्र फिलिपिन्सला जाऊन आले होते हेही आता उजेडात आले आहे. ऑस्ट्रेलिया सरकारने तसा आरोप केल्यानंतर फिलिपिन्स सरकारने तपास केला आणि त्या आरोपांत तथ्य असल्याचे आढळून आले. त्यातही गोम अशी की साजिद आक्रमने भारतीय पारपत्रावर हा दौरा केला; तर नावीदने ऑस्ट्रेलियाच्या पारपत्रावर व्हिसा मिळविला. याचे कारण साजिद हा मूळचा भारतातील तेलंगणा राज्यातील. बी.कॉम.पर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यावर त्याने ऑस्ट्रेलियाला स्थलांतर केले आणि तेथे एका युरोपीय महिलेशी विवाह केला. गेल्या तीन दशकांत तो सहाएक वेळाच भारतात आला होता आणि आताही त्याचे येथील कुटुंबियांशी संपत्तीवरून वाद होते. त्याने भारतीय पारपत्र कायम ठेवले होते आणि फिलिपिन्सचा व्हिसा मिळविण्यासाठी त्याने त्याच पारपत्राचा वापर केला असा संशय आहे. नावीदचा जन्म ऑस्ट्रेलियात झाला. वडील फळविक्रेते होते तर मुलगा गवंडीकाम करीत असे. तेव्हा त्यांची आर्थिक स्थितीही सुबत्तेची असेलच अशी खात्री नाही. तरीही महिनाभर फिलिपिन्सला दोघांनी जाऊन येणे; बंदुकी बाळगणे हे सगळे शंका निर्माण करणारे.
मोठ्या कटाचा हिस्सा?
 
फिलिपिन्सला 1 ते 28 नोव्हेंबर या काळात त्या दोघांनी जाऊन येणे; आणि लगेचच 14 डिसेंबर रोजी हा हल्ला होणे हा योगायोग असू शकत नाही. त्याचे एक कारण म्हणजे व्हिसाच्या वेळी फिलिपिन्समध्ये आपण कोठे जाणार आहोत याची त्यांनी दिलेली माहिती. मिंडनाओ या दक्षिणी बेटावरील दवाओ हे शहर आपल्या फिलिपिन्स भेटीचे शेवटचे स्थळ असेल असे त्यांनी नमूद केले होते. मिंडनाओ येथे इस्लामी दहशतवादी गट फोफावले आहेत; त्यांतीलच एक म्हणजे ऑस्ट्रेलियाची गुप्तहेर संघटना ‘असियो’ने दहशतवादी संघटना म्हणून नमूद केलेली इस्लामिक स्टेट ईस्ट आशिया - जी मूळ इस्लामिक स्टेटची शाखाच मानली जाते. ज्या शहरातून तीनेक लाख नागरिकांनी पलायन केले तेथे या पिता-पुत्राचे काय काम हा प्रश्न कोणालाही पडू शकतो. तो प्रश्न तपास यंत्रणांना पडणे स्वाभाविक. त्यादृष्टीने आता तपास चालू आहे. साजिदकडे सहा बंदुकी होत्या. त्यांचे परवाने त्याच्याकडे असले तरी सामान्य माणसाला एवढ्या बंदुका का बाळगाव्याशा वाटाव्यात हा प्रश्न अप्रस्तुत नाही. तुरुंगवासाची शिक्षा झालेल्या दोघांशी संबंधांवरून 2019 मध्ये नावीदची ऑस्ट्रेलियाच्या तपास यंत्रणांनी चौकशी केली होती. 2019 मध्येच नावीदने एका इमामाकडून कुराणपठण व अरेबिक भाषेची शिकवणी लावली होती. अर्थात त्या दरम्यान तपास यंत्रणा किंवा त्या इमामाला नावीदमध्ये धार्मिक कट्टरतावादाची चिन्हे आढळली नव्हती. तथापि आता त्या या सर्व बाजूंनी तपास होईल यात शंका नाही. जे इस्लामिक स्टेटचे झेंडे आपल्या वाहनात ठेवतात ते कट्टरतावादी नाहीत; दहशतवादी मनोवृत्तीचे नाहीत तर कोण आहेत?
अशा व्यक्ती या कोणत्या तरी मोठ्या दहशतवादी संघटनेशी थेट संबंधित नसल्या तरी वैयक्तिक स्तरावर त्या संघटनांच्या ‘विचारधारेने’ प्रभावित झालेल्या असतात. त्यातून मग भिन्न धर्मियांबद्दलचा द्वेष उत्पन्न होतो; वैयक्तिक स्तरावर हिंसक घटना घडवून आणल्या जातात.
यहुदींवरील हल्ल्यांत चिंताजनक वाढ
 
अमेरिकेतही विशेषतः ऑक्टोबर 2023 नंतर यहुदींवरील हल्ले लक्षणीय प्रमाणात वाढले आहेत. ‘अँटी डीफेमेशन लीग’ ही संस्था यहुदींवरील हल्ल्यांची नोंद गेली 46 वर्षे ठेवत आली आहे. त्या संघटनेच्या आकडेवारीनुसार अमेरिकेत यहुदींवरील हल्ल्यांत 2023 च्या तुलनेत 2024 मध्ये 5 टक्के वाढ झाली आहे. या घटना म्हणजे केवळ गोळीबाराच्या घटना नव्हेत; अगदी जाळपोळीपासून धमक्यांपर्यंत सर्व घटनांची मोजदाद यात होते. एकट्या अमेरिकेत अशा 9354 घटना 2024 मध्ये घडल्या; याच आकडेवारीनुसार गेल्या पाच वर्षांत अमेरिकेत यहुदींना लक्ष्य करणार्‍या घटनांमध्ये 344 टक्के वाढ झाली आहे; तर गेल्या दशकभरात ती वाढ तब्बल 893 टक्के आहे. तेव्हा आता झालेल्या हिंसक घटनांना गेल्या दीड-एक वर्षांत नेतान्याहू यांचे धोरण कारणीभूत असल्याचा दावा करणार्‍यांनी या आकडेवारीवर कोणता युक्तिवाद करणार, याचा पूर्वग्रहविरहित विचार करावा.
ऑस्ट्रेलिया यास अपवाद नाही. ‘एक्झिक्युटिव्ह कौन्सिल ऑफ ऑस्ट्रेलियन ज्यूअरी’ या संघटनेने दिलेल्या आकडेवारीनुसार त्या देशात ऑक्टोबर 2023 नंतर यहुदींवरील हल्ल्यांच्या प्रमाणात सरासरीपेक्षा पाचपट वाढ झाली आहे. 1 ऑक्टोबर 2024 ते 30 सप्टेंबर 2025 याच काळात अशा हिंसक घटनांची (आर्सन) संख्या 1654 इतकी आहे. तेव्हा केवळ बंदूक बाळगण्यावर नियंत्रण आणून या समस्येवर तोडगा निघेल असे नाही, कारण बंदूक हे हिंसाचाराचे केवळ माध्यम आहे; त्यामागील प्रयोजन नव्हे. ते प्रयोजन दहशतवादी संघटनांच्या विचारधारेने प्रभावित होऊन मिळत असते. तेव्हा लक्ष्य करायचे तर ती विघातक विचारधारा निपटून काढण्याचे असायला हवे. या दोन हल्लेखोरांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंध कोणत्या दहशतवादी संघटनेशी आहे का याचाही उलगडा तपासातून होईल. वास्तविक ऑस्ट्रेलियाला हिंसक घटनांचा अनुभव नवा नाही. सर्वांत भीषण घटना म्हणजे 1996 मध्ये पोर्ट आर्थर येथे झालेली घटना; एका बंदूकधारी हल्लेखोराने 35 जणांना ठार केले होते. त्यानंतर ऑस्ट्रेलियात शस्त्र बाळगण्याचे नियम अधिक कडक करण्यात आले होते. आता ते आणखी कडक करण्यात येतील अशी घोषणा अल्बनीज यांनी केली आहे. यहुदींना लक्ष्य करणार्‍या ठळक घटना 2018 मध्ये पिट्सबर्ग येथे; 2019 मध्ये कॅलिफोर्नियात व त्याच वर्षी जर्मनीत घडल्या होत्या. तेव्हा इस्लामी दहशतवादाचा अनुभव सर्व देशांनी घेतलेला आहे आणि म्हणूनच त्याच्याशी मुकाबला हा सर्वांनी मिळूनच करायला हवा; भारतासारखे देश जेव्हा त्याचे लक्ष्य ठरतात तेव्हा त्याविरोधात लढणार्‍या भारताला पाठिंबा मिळायला हवा. जी-20 च्या नुकत्याच झालेल्या परिषदेत जारी झालेल्या घोषणापत्रात सर्व प्रकारच्या दहशतवादाचा निषेध करण्यात आला होता; ती भूमिका किती योग्य होती, याचा प्रत्यय बाँडी घटनेनंतर आला असेल.
यहुदींमध्ये असुरक्षिततेची भावना
बाँडी हल्ल्याने ऑस्ट्रेलियातील यहुदींच्या असुरक्षिततेच्या भावनेत आणखीच भर पडली असेल यात शंका नाही. ऑस्ट्रेलियाच्या पावणेतीन कोटींच्या लोकसंख्येत यहुदींचे प्रमाण एक-सव्वा लाख आहे; म्हणजेच एक टक्क्यापेक्षाही कमी. परंतु त्या देशात त्यांना आजवर सुरक्षित वाटत होते. याचे एक कारण इतिहासाशी निगडित आहे. सतराव्या-अठराव्या शतकात जरी यहुदी ऑस्ट्रेलियात आले असले तरी प्रामुख्याने विसाव्या शतकात ते प्रमाण जास्त होते. दुसर्‍या महायुद्धाच्या वेळी आणि हिटलरने आरंभिलेला यहुदी वंशसंहार, छळछावण्या यांतून बचावलेल्या तीसेक हजार यहुदींनी स्थलांतर करण्यासाठी ऑस्ट्रेलियाची निवड केली होती. तत्पूर्वी 1933 पासूनच हे स्थलांतर सुरू झाले होते आणि ऐंशी हजार निर्वासित ऑस्ट्रेलियात पोचले होते. ऑस्ट्रेलिया निवडण्याचा मुख्य हेतू म्हणजे युरोपपासून शक्य तितके दूर जाणे हा होता. ऑस्ट्रेलियाने देखील यहुदींना सामावून घेतले. मात्र आता त्याच देशात यहुदींना इस्लामी दहशतवादी लक्ष्य करीत आहेत हे चिंताजनक आहे. यहुदी कोणत्याच देशात पुरेसे सुरक्षित नाहीत ही भावना अशा हल्ल्यांमुळे प्रबळ होऊ शकते. यहुदींच्या सणावाराच्या काळात त्यांच्यावर हल्ले करण्याचे इस्लामी दहशतवाद्यांचे मनसुबे या घटनेने अधोरेखित केले आहेत. कट्टरतावादी विचारधारेच्या संघटनेशी औपचारिक संबंध नसूनही त्या विचारधारेने प्रभावित होऊन एखादी व्यक्ती हिंसाचार करू शकते, याचाही अनुभव या घटनेने आला आहे. अशा प्रवृत्ती शोधून काढणे तपास व गुप्तहेर संघटनांना कठीण असते. तथापि त्यामुळेच नागरी जीवनात प्रत्येकाने भोवताली घडणार्‍या घटनांविषयी सजग राहणे किती निकडीचे आहे, हेच या घटनेने सिद्ध केले आहे.
इच्छाशक्तीची निकड
 
ऑस्ट्रेलिया प्रशासन व यंत्रणा आता या घटनेच्या मुळाशी जाऊन गुन्ह्याचे धागेदोरे शोधून काढतीलच. यामागे इराणचाही हात असू शकतो ही शक्यता नाकारता येत नाही. तीन महिन्यांपूर्वीच ऑस्ट्रलियाच्या पंतप्रधानांनी त्या देशात त्या पूर्वी घडलेल्या किमान दोन यहुदींविरोधी हल्ल्यांच्या घटनांमागे इराणचा हात असल्याचे सज्जड पुरावे मिळाल्याचा दावा केला होता. असे हल्ले घडवून आणण्यासाठी भाडोत्री गुन्हेगारदेखील इराण वापरत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियाने केला होता. ऑस्ट्रेलियाने यहुदीविरोधी दहशतवादाला वेसण घालण्यासाठी गेल्या वर्षीच्या डिसेंबर महिन्यात एका कृतिदलाची स्थापनाही केली होती. पण ते पुरेसे नाही; केवळ ऑस्ट्रेलियाच नव्हे तर जगभरात या दहशतवादाशी लढण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर समन्वय; इच्छाशक्ती व कटिबद्धतेची गरज आहे, हा बाँडी समुद्र किनार्‍यावरील हल्ल्याचा सांगावा आहे.
Powered By Sangraha 9.0