दीपोत्सव... जगाचा सांस्कृतिक वारसा

19 Dec 2025 17:58:42
UNESCO
UNESCO
आर्थिक व लष्करी शक्ती ही झाली देशाची ’हार्ड पॉवर,’ जी महत्त्वाची असतेच. पण सांस्कृतिक प्रतीकं ही देशाची ’सॉफ्ट पॉवर’ असते, जी जागतिक पातळीवर देशाचा प्रभाव निर्माण करण्यात फार महत्त्वाची भूमिका पार पाडते. कारण या प्रतीकांमधूनच दिसून येतो देशाचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल न्यूनगंडाची भावना आणि गुलामगिरीतून निर्माण झालेली मानसिकता बदलण्याचे महत्त्वाचे कार्य ही प्रतीकं करतात. दिवाळी या भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वपूर्ण सणाला, अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त अशा ’अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी’त स्थान मिळाल्याचा आनंद यामुळेच अधिक उजळून निघाला आहे.
दिल्लीतील लाल किल्ला येथे पार पडलेल्या युनेस्कोच्या सांस्कृतिक वारसा समितीच्या परिषदेने दिवाळी या भारतीय संस्कृतीतील अतिशय महत्त्वपूर्ण सणाला, अत्यंत प्रतिष्ठाप्राप्त अशा ’अमूर्त सांस्कृतिक वारसा यादी’त स्थान दिले आहे. भारतीयांची मने उजळून टाकणार्‍या दीपोत्सवाच्या सांस्कृतिक महत्तेवर सार्‍या जगाने अशाप्रकारे मान्यतेची मोहर उमटवली आहे.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
 
अर्थात अनिवासी भारतीयांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा जगभर उमटविल्यानंतर, संपूर्ण जगात भारतीय संस्कृतीविषयी प्रेम आणि आदर यांत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताची प्राचीन संस्कृती आणि ज्ञानपरंपरा यांची जगाला ओळख करून देण्यासाठी जी पावले उचलली त्यांच्यामुळेही ही प्रक्रिया अधिक गतिमान झाली आहे. 2014 पासून सार्‍या जगातील 190हून अधिक देशात साजरा होणारा जागतिक योग दिन असो किंवा फेब्रुवारी 2024मध्ये उद्घाटन झालेले अबू धाबीतील भव्य हिंदू मंदिर असो, भारतीय संस्कृतीच्या जगभर वाढत असलेल्या प्रभावाच्या या पाऊलखुणा आहेत. या प्रभावामुळेच दिवाळीचा सणही ब्रिटिश राजघराण्याचे वास्तव्य असलेल्या बकिंगहॅम पॅलेसमध्ये, टेन डाऊनिंग स्ट्रीट या ब्रिटिश पंतप्रधानांच्या व व्हाईट हाऊस या अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवासस्थानांमध्येही नियमितपणे साजरी केली जाते.
 
UNESCO 
 
1945 साली स्थापन झालेल्या युनेस्को (United Nations Educational, Scientific and Cultural Organisation) या संस्थेचे मुख्यालय पॅरिस येथे असून जगभरातील 194 देश युनेस्कोचे सभासद आहेत. ही संस्था शिक्षण, विज्ञान आणि संस्कृतीच्या माध्यमातून जगात शांतता आणि सुरक्षा प्रस्थापित व्हावी यासाठी काम करते. मानवी सभ्यतेला ललामभूत ठरणार्‍या सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारशाचे जतन आणि संवर्धन हे युनेस्कोचे एक प्रमुख वैशिष्ट्य आहे. 1972 साली झालेल्या युनेस्कोच्या ’वर्ल्ड हेरिटेज कन्व्हेन्शन’मध्ये अशा वारसा स्थळांची यादी करण्याचे ठरले. या यादीत होणारा समावेश अत्यंत महत्त्वाचा आणि प्रतिष्ठेचा मानला जातो. यापैकी सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये मंदिरे, प्राचीन इमारती, संस्कृतींचे भग्नावशेष, उत्खननात आढळणारे ऐतिहासिक अवशेष इत्यादींचा समावेश होतो. भारतातील हंपी, सांची स्तूप, मराठा साम्राज्याचे गड-किल्ले, अजंठा-वेरूळ येथील लेणी अशा अनेक ठिकाणांचा समावेश या यादीत केला गेला आहे.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
 
नैसर्गिक स्थळांच्या यादीत सौंदर्य आणि पर्यावरण या दृष्टीने महत्त्वाची असलेली ठिकाणे, अरण्ये, नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या प्राणी व पक्षी यांच्या प्रजाती इत्यादींचा समावेश होतो. भारतातील काझीरंगा अभयारण्य, ग्रेट हिमालयन नॅशनल पार्क, वेस्टर्न घाट्स इत्यादींचा समावेश या यादीत झाला आहे.
 
UNESCO 
 
याबरोबर, मानवी सभ्यतेच्या अमूर्त सांस्कृतिक वारशाची (Intangible Cultural Heritage - ICH) अशीच एक यादी प्रसिद्ध केली जाते. ज्यात प्राचीन परंपरा, रितीरिवाज, उत्सव, मौखिक परंपरा, परंपरागत ज्ञान, कलाकौशल्य, संगीत, नृत्य यांचा समावेश केला जातो. यात भारतातील वैदिक मंत्रपठण, रामलीला, योग, कुंभमेळा, दुर्गापूजा, गरबा नृत्य, छाऊ नृत्य यासारख्या अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आहे. यात आता दिवाळीची भर पडली आहे. या याद्यांमधील समावेशासाठी विविध देश त्यांच्या वैशिष्ट्यांचे नामांकन करतात तर युनेस्को वर्ल्ड हेरिटेज कमिटी यातून निवड करून त्या वैशिष्ट्यांचा यादीत समावेश करते.
 
 
अंधारावर प्रकाशाचा, अज्ञानावर ज्ञानाचा आणि वाईटपणावर चांगुलपणाचा विजय साजरा करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळीत प्रकाशणार्‍या दिव्यांच्या लखलखाटाने आळस, मरगळ आणि निराशा दूर होते, संपूर्ण भारतात आनंद आणि उत्साहाचे वातावरण निर्माण होते. घरादाराची स्वच्छता, सडासंमार्जन, रांगोळी, मातीचा किल्ला, दीपमाळांची रोषणाई, खाण्यापिण्याची रेलचेल, नवे कपडे, फटाके, कुटुंबियांच्या आणि मित्रमंडळींच्या भेटीगाठी, नववर्षाची आनंदी, आश्वासक सुरुवात... दिवाळी हा केवळ सण नाही तर एक आनंदोत्सव असतो.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
 
हिंदुंच्या श्रद्धाभावनेनुसार, चौदा वर्षाच्या वनवासानंतर प्रभू श्रीरामचंद्र, आपली पत्नी सीता आणि बंधू लक्ष्मण यांच्यासह अयोध्येला परत आले तेव्हा नगरवासियांनी दिव्यांची रोषणाई करत दिवाळी साजरी केली. आजही अयोध्येत दिवाळीच्या निमित्ताने होणारी लक्षावधी दिव्यांची आरास डोळ्यांचे पारणे फेडणारी असते. भगवान श्रीकृष्ण यांनी नरकासुराचा वध केला त्यादिवशी नरकचतुर्दशी साजरी केली जाते. जैन मान्यतेनुसार दिवाळीच्या दिवशी भगवान महावीरांनी निर्वाण प्राप्त केले. शीखधर्मीयही दिवाळी उत्साहाने साजरी करतात. अशा या दिवाळीला जगाचा एक महत्त्वाचा अमूर्त वारसा म्हणून मान्यता मिळावी ही भारतासाठी अत्यंत आनंदाची आणि अभिमानाची घटना आहे.
 
 
अशी प्रतीकं भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. कारण आधी ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी आणि नंतर डाव्या इतिहासकारांनी भारताची खरी ओळख पुसून टाकली आणि एक मागासलेला, अडाणी, अंधश्रद्ध, प्रत्येक बाबतीत पश्चिमेवर अवलंबून असलेला, नैतिकदृष्ट्या रसातळाला गेलेला, रानटी परंपरा पाळणारा, विषमता आणि शोषण यावर आधारलेली समाजव्यवस्था असलेला, एकमेकांत सतत भांडणार्‍या दरिद्री लोकांचा समूह अशी पूर्णपणे खोटी ओळख भारतावर लादली आणि हीच आपली ओळख असल्याचे भारतीयांनाही धूर्तपणाने पटवून दिले. यासाठी त्यांनी शिक्षण आणि इतिहास या भारताच्या दोन प्रमुख शक्तिस्थानांवर हल्ला केला. गुरुकुल शिक्षणव्यवस्थेला उद्ध्वस्त करण्याचे काम मेकॉलेने पार पाडले तर इतिहासाचे विकृतीकरण करण्याची जबाबदारी जेम्स मिल व मॅक्समुलर यांनी स्वीकारली.
 
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
स्वातंत्र्यानंतरही याच विचाराचे राज्यकर्ते सत्तेवर असल्यामुळे आणि त्यांनी शिक्षण, मीडिया, इतिहास, करमणूक ही मानवी मनावर प्रभाव टाकणारी सगळी क्षेत्रे डाव्यांना आंदण म्हणून देऊन टाकली आणि त्यामुळे भारताची खरी ओळख प्रस्थापित करण्याचे काम झालेच नाही. यामुळे भारताने कितीही प्रगती केली तरी प्रत्येक विषयाकडे बघण्याची दृष्टी आणि त्याचे विश्लेषण करण्याची फूटपट्टी अजूनही पाश्चात्यच आहे. वसाहतवादातून सुटका झाली तरी वसाहतवादी मानसिकतेचा प्रभाव मात्र तसाच आहे. त्यातून निर्माण होणारा आत्मबोधाचा आभाव आणि न्यूनगंड यामुळे भारतीयांच्या खर्‍या क्षमतेचा आविष्कार अजून पूर्णपणे होऊ शकलेला नाही. यामुळेच, गूगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या कंपन्यांचे प्रमुख भारतीय असले तरी स्वतःच्या अशा कंपन्या उभ्या करणे भारतीयांना अजून जमलेले नाही. हे साध्य करायचे तर पाश्चात्यांनी दिलेले वसाहतवादी मानसिकतेचे चष्मे आणि फूटपट्ट्या फेकून देऊन स्व-बोध जागृत करून घेणे अत्यंत गरजेचे आहे.
 
 
स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी, मेकॉलेचा प्रभाव झुगारून देऊन वसाहतवादी मानसिकतेतून मुक्त होण्याचे महत्त्व वारंवार अधोरेखित करत असतात. यासाठी त्यांनी अनेक पावलं उचलली आहेत.
 
UNESCO 
 दिल्लीतील राजपथाचे कर्तव्यपथ असे नामकरण.
भारतीय नौदलाच्या ध्वजावरून सेंट जॉर्ज क्रॉसची हकालपट्टी व त्याजागी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेची स्थापना.
दिल्लीतील इंडिया गेट येथील किंग जॉर्जचा पुतळा हटवून त्याजागी देशाला स्वातंत्र्य मिळवून देणार्‍या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याची उभारणी.
 
 नॅशनल वॉर मेमोरियलची उभारणी.
 
लष्कराच्या ’बीटिंग द रिट्रीट’ या समारंभाच्या वेळी वाजणारी ’अबाइड विथ मी’ ही पाश्चात्य सुरावट बदलून त्याऐवजी ’ऐ मेरे वतन के लोगो’ या सुरावटीचा वापर
पाश्चात्य जगतातील संग्रहालयांमध्ये ठेवलेल्या प्राचीन भारतीय मूर्ती व इतर प्रतीके परत आणण्यासाठी यशस्वी प्रयत्न.
 वसाहतवादाच्या काळातील पंधराशे जुनाट, अप्रस्तुत कायदे रद्द.
 
 भारतीयांना गुन्हेगार ठरवून शिक्षा देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या ’इंडियन पीनल कोड’ऐवजी ’भारतीय न्यायसंहिता’ तर ’क्रिमिनल प्रोसिजर कोड’ ऐवजी ’भारतीय नागरिक सुरक्षा संहिता’ या नव्या कायद्यांची सुरुवात.
 
नव्या शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश, तसेच मातृभाषेतून शिक्षणाला प्राधान्य.
 
संसदेत सेंगोलची स्थापना. तसेच परदेशी पाहुण्यांना भगवद्गीता भेट म्हणून देण्याची प्रथा.
 
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
यावर अनेक मेकॉलेपुत्र अशी मखलाशी करत असतात की जागतिक महासत्ता होण्यासाठी या प्रतीकात्मक गोष्टींचा काही उपयोग नाही. त्याऐवजी अर्थव्यवस्थेकडे लक्ष दिले गेले पाहिजे. अर्थव्यवस्था महत्त्वाची आहे हे खरेच. म्हणूनच मोदी सरकारने या आघाडीवर मोठी कामगिरी बजावली आहे. पण आर्थिक व लष्करी शक्ती ही झाली देशाची ’हार्ड पॉवर,’ जी महत्त्वाची असतेच. पण सांस्कृतिक प्रतीकं ही देशाची ’सॉफ्ट पॉवर’ असते, जी जागतिक पातळीवर देशाचा प्रभाव निर्माण करण्यात फार महत्त्वाची भूमिका पार पाडते. कारण या प्रतीकांमधूनच दिसून येतो देशाचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान. स्वतःच्या अस्तित्वाबद्दल न्यूनगंडाची आणि ओशाळलेपणाची भावना बाळगणार्‍या देशाबद्दल इतरांना आदर वाटणे शक्यच नसते. गुलामगिरीतून निर्माण झालेली ही मानसिकता बदलण्याचे महत्त्वाचे कार्य ही प्रतीकं करतात. आपल्या दिवाळीला ’जागतिक अमूर्त वारसा’ म्हणून मिळालेलं स्थान यासाठीच महत्त्वाचं ठरतं.
Powered By Sangraha 9.0