विनाशाच्या मार्गाकडे घेऊन जाणारा - रोड टू पर्डिशन

02 Dec 2025 15:10:47


आपण सर्वच खुनी आहोत आणि आता या मार्गावरून कितीही परतायचे म्हटले तरी ते अशक्य आहे हेही मायकेलला आतून कळून चुकलेले असते. तेव्हा आपल्या मुलाला मात्र हिंसाचार आणि मृत्यूपासून वाचवणे हे वडील म्हणून त्याचे कर्तव्य असते. मुलाचा निरागसपणा कायम ठेवण्यासाठी स्वतःचा मृत्यू सुद्धा त्याला मान्य असतो. मी प्रयत्न करूनसुद्धा गोळी झाडू शकलो नाही, मुलाचे हे उद्गार ऐकून तो आपले प्राण समाधानाने सोडतो.

गॉड फादर सिरीज, गुड फेलोज, कॅसिनो यासारखे संघटित गुन्हेगारीवरील सिनेमा हॉलीवूडमध्ये लोकप्रिय आहेत. समाजजीवन सुरळीत चालण्यासाठी कायद्याची आवश्यकता असते पण ह्या सिनेमांचे नायक कायद्याला न जुमानता आपले साम्राज्य स्थापन करतात. ते साहसी असतात, त्यांचे आयुष्य रोमांचकारी घटनांनी भरलेले असते आणि अनेकदा नीतिमत्तेच्या कल्पना, त्यांच्या वर्तनाला जी पार्श्वभूमी असते, ती पाहिली, तर फोल ठरतात. मग ह्या खलनायकांना, नायकाचा दर्जा मिळतो.
रोड टू पर्डिशन हा एका गँगस्टरच्या आयुष्यावरील सिनेमा आहे.सुरुवातीलाच समुद्राच्या लाटांकडे टक लावून बघत असलेला एक बारा वर्षाचा पाठमोरा मुलगा प्रेक्षकांना दिसतो.

पडद्यावर आवाज येतो... मायकेल सलीवनबद्दल अनेक कथा जनमानसात प्रसिद्ध आहेत. काहींसाठी तो अतिशय सभ्य गृहस्थ होता. काहींना त्याच्यात चांगला गुण नसल्याची खात्री आहे. मी 1931च्या हिवाळ्यात त्याच्याबरोबर सहा आठवडे प्रवास केला आहे.

आता पडद्यावर काळोखाचे राज्य पसरते. पडद्यावर परत आवाज येतो, ही आमची कथा आहे... सिनेमा आता फ्लॅशबॅकमध्ये जातो.

1931 च्या जागतिक आर्थिक मंदीचा काळ. मायकेल सलीवन, त्याची पत्नी आणि शाळेत जाणारे दोन मुलगे असे मायकेल सलीवनचे छोटेसे मध्यमवर्गीय कुटुंब आहे. मायकेल एका गुन्हेगारी सिंडिकेटमध्ये काम करतो. या सिंडिकेटच्या बॉसचा तो उजवा हात आहे.

मायकेलचे बालपण अत्यंत गरिबीत गेले होते. अशावेळी सिंडिकेटचा प्रमुख जॉन रुनी त्याला आधार देतो. त्याला बापाचे प्रेम देतो. त्याच्या संघटनेत काम करणे ह्यात मायकेलच्या आवडीपेक्षा, कृतज्ञतेचा भाग जास्त आहे.

मायकेलचे घरातले रूप वेगळे आहे. त्याचा अबोल स्वभाव आणि बहुतांश वेळ घराबाहेर असल्याने मोठ्या मुलाला, मायकेल ज्युनिअरला तर त्याचा बराचसा धाक आहे. आपले वडील काय करतात याचे त्याला कुतूहल आहे. याच उत्सुकतेपोटी जे पाहायचे नाही ते दृश्य त्याच्या नजरेला पडते. सिंडिकेटच्या कामासाठी, एका व्यक्तीला जाब विचारायला गेले असताना, जॉन रुनीचा मुलगा, कॉनेर रुनीच्या हातून एक खून होतो. त्याच्याबरोबर मायकेल सुद्धा असतो. मायकेल ज्युनिअर हे पाहून हादरतो. त्याच्या मनात असणार्‍या वडिलांच्या प्रतिमेला मोठा तडा जातो.

ज्युनिअर मायकेलकडून ही गोष्ट सर्वांपर्यंत जाईल या शंकेने कॉनेर रुनी त्याला मारायचे ठरवतो. कॉनेर रुनी, अतिशय हेकेखोर, संशयी, व्यसनी, लोभी असतो. संघटना चोरांची असली तरी, त्यांचीही काही मूल्ये असतात पण याला कसलाच विधिनिषेध नसतो. ह्या अपरिपक्व वागण्यामुळे वडिलांशी त्याचे सतत खटके उडत असतात, पण त्याच वेळी ते मायकेलला महत्त्व देतात, याचाही मत्सर वाटत असल्याने तो मायकेलचाही काटा काढायचे ठरवतो. ही योजना असफल होते. मायकेल निसटतो पण घरी आल्यावर त्याला समजते की, कॉनेरने त्याचे विश्व उद्ध्वस्त केले आहे. त्याची पत्नी आणि लहान मुलगा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला असतो. मायकेल ज्युनिअर मात्र घरी नसल्याने वाचतो.


आता इथे राहणे धोक्याचे आहे हे ओळखून मायकेल आपल्या मुलाला घेऊन तिथून पळ काढतो. शिकागोला येऊन, दुसर्‍या संघटनेच्या प्रमुखाकडे, फ्रँक निट्टीकडे मदत मागतो पण फ्रँक मदत नाकारतो.

तेव्हा, कॉनेरला मारण्याचा विचार सोडून दे. तुला भरपूर पैसे देतो, ते घेऊन तुझ्या मुलाबरोबर तू एक चांगले आयुष्य सुरू कर... हा फ्रँकचा प्रस्ताव मायकेल नाकारतो. जॉन रुनीचे मायकेलवर प्रेम असते पण कॉनेर त्याचा सख्खा मुलगा असतो. जॉनच्या आज्ञेने मायकेलला मारण्यासाठी रक्तरंजित पाठलागाची सुरुवात होते. मुलाच्या सुरक्षिततेची मायकेलला काळजी वाटू लागते. त्याच्यातील पिता जिवंत होतो.

मुलाचे गुन्हेगारी विश्वाकडे जाणारे पाऊल अडवणे हा सिनेमाचा मुख्य विषय असल्याने सिनेमा ह्या छोट्या मुलाभोवती फिरतो. आई आणि भावाच्या मृत्यूनंतर छोट्या मायकेलचे आयुष्य बदलते. घराच्या चार भिंती सुरक्षित नसल्याची जाणीव होते. उघड्या रस्त्यावर आश्रयाच्या शोधात भटकत असताना, पडलेले पाऊल कुठल्या दिशेने घेऊन जातेय याचे भान सतत ठेवावे लागते. त्याच्या शोधात फिरणारी एक गोळी, एका चुकीच्या प्रतीक्षेत असते.

जेमतेम बारा वर्षाचा असलेला मायकेल, आता वडिलांना साथ देण्याएवढा प्रगल्भ होतो. त्याचे कोवळेपण संपून जाते. आता आतापर्यंत सायकलवर बसून शाळेत जाणारा मायकेल, गाडीचे स्टिअरिंग आपल्या हातात घेतो. कॉनेर विरुद्ध पुरावे गोळा करण्यासाठी मायकेलला गुन्हेगारी कामाचीच मदत घ्यावी लागते आणि मनात नसूनही त्याला आपल्या मुलाला हाताशी धरावे लागते. वडील खरे मुलाच्या आयुष्याला वळण देतात पण जेव्हा त्यांचेच आयुष्य घसरलेले असते तेव्हा मुलाची घसरण अटळ असते.

जॉन रुनी हे या सिनेमातील सर्वात महत्वाचे आणि गुंतागुंतीचे पात्र. तो गुन्हेगारी विश्वाचा राजा. खुनाची सुपारी देणे, खंडणी मागणे, वैश्यागृहे, कॅसिनो यांना संरक्षण देणे हा त्यांच्या कामाचा एक भाग आहे. सलिवनच्या मुलांसाठी तो एक प्रेमळ आजोबा आहे. मायकेल सलिवनचा तो केवळ आश्रयदाता नाही तर त्याने मायकेलला मुलासारखे वाढवले आहे. मुलाच्या बाबतीत मात्र त्याचा धृतराष्ट्र होतो. मायकेलच्या कुटुंबाचा खून केल्यावर सुद्धा तो आपल्या मुलाला क्षमा करतो आणि वर मायकेलच्या खुनाची सुपारी देतो.

पण कॉनेरने तुलाही फसवले आहे, तुझ्याशी बेईमानी केली आहे मायकेल त्याला पुराव्यानिशी शाबीत करतो. तो खुनी आहे असे कळवळून सांगतो. या प्रसंगी जॉन जे बोलतो ते मात्र मायकेलसाठी त्याचे डोळे उघडणारे असते.
तो म्हणतो... डोळे उघडून बघ मायकेल. या खोलीत मारेकरी आहेत. हे आयुष्य आपण निवडलेले आहे आणि यातून एक निश्चित आहे की, आपल्या पैकी कुणासाठीही स्वर्गाचे दार उघडणार नाही. मुखवट्याखाली दडलेला आपलाच चेहेरा भेसूर असतो याची जाणीव आता मायकेलला होते.

सिनेमाच्या अखेरीस मात्र, कॉनेरला वाचवणे अशक्य आहे हे जॉन रुनीच्या लक्षात येते. त्याच्या मनाला सर्व कळत असते. मायकेलची बाजू त्याला समजते की, आपला मुलगा एवढा अपरिपक्व आणि दुष्ट आहे की कुणाच्या न कुणाच्या हातून त्याचा मृत्यू अटळ आहे. शेवटी भर पावसात मायकेल जेव्हा कॉनेरवर शस्त्र रोखून उभा राहतो, तेव्हा एका हताश व हरलेल्या बापाच्या तोंडून शब्द येतात... मायकेल, त्याला तुझ्या हातून मृत्यू येत आहे ही चांगली गोष्ट आहे.
सिनेमात एक महत्त्वाचा सीन आहे. पाठलागावर असलेल्या गुंडापासून वाचवण्यासाठी मायकेल, आपल्या मुलाला त्याच्या मावशीकडे सोडणार असतो. योगायोगाने या भागाचे नाव असते झशीवळींळेप.
ठेरव ीें झशीवळींळेप मधला झशीवळींळेप या शब्दाचा अर्थ आहे, अधोगती, विनाश, नरक.
माफियापासून स्वतःला मोकळे करून घ्यायचे आणि आतापर्यंत जो अन्याय आपल्या हातून घडला, एक गुन्हेगार म्हणून आणि पिता म्हणून, त्याचे प्रायश्चित घ्यायचे, या दुहेरी हेतूने मायकेल इथे येतो. याचवेळी त्याच्या शोधात, त्याचा मारेकरी सुद्धा तेथे आलेला असतो.

मायकेल प्राणांतिक जखमी झालेला असताना, त्याचा मुलगा वडिलांना वाचवायला, त्या मारेकर्‍यावर पिस्तूल रोखतो. तेव्हा त्याच्या हातून सुटलेली एक गोळी आपल्या मुलाच्या नरकाकडे होणार्‍या प्रवासाची नांदी ठरणार असते हे मायकेल ओळखतो आणि तो याचवेळी जिवाच्या आकांताने गोळी झाडतो आणि मारेकर्‍याची हत्या करतो. त्याची हत्या करणे हा हेतू नसतो तर आपल्या मुलाला हत्येपासून रोखणे हा मायकेलचा खरा हेतू असतो.
जॉनने म्हटल्याप्रमाणे, आपण सर्वच खुनी आहोत आणि आता या मार्गावरून कितीही परतायचे म्हटले तरी ते अशक्य आहे हेही मायकेलला आतून कळून चुकलेले असते. तेव्हा आपल्या मुलाला मात्र हिंसाचार आणि मृत्यूपासून वाचवणे हे वडील म्हणून त्याचे कर्तव्य असते. मुलाचा निरागसपणा कायम ठेवण्यासाठी स्वतःचा मृत्यू सुद्धा त्याला मान्य असतो.
मी प्रयत्न करूनसुद्धा गोळी झाडू शकलो नाही, मुलाचे हे उद्गार ऐकून तो आपले प्राण समाधानाने सोडतो. हा मायकेल खरंच स्वर्गात जाईल का नरकात? ह्या प्रश्नाला काही महत्त्व नाही. त्याची कर्मे त्याचा हिशोब करणार आहेत. सिनेमाचा विषयही हा नाही. आपल्या मुलाला योग्य मार्गावर आणणे आणि त्याचे नैतिक अधःपतन थांबवून त्याच्यासाठी चांगला रस्ता आखणे हे वडिलांचे कर्तव्य पार पाडून, आपल्या मुलाची स्वर्गाची वाट मात्र मायकेल निश्चित करतो.
Powered By Sangraha 9.0