भव्य मूर्ती ही श्रीरामांची कुशावतीचे तीरी....

विवेक मराठी    02-Dec-2025
Total Views |
@अजित पैंगीणकर
9423821504


jay shree ram
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशियातील सर्वात उंच प्रभू श्रीरामांचा पुतळा ठरलेल्या काणकोण येथील 77 फुटी मूर्तीचे अनावरण केले आणि एक अध्यात्मिक केंद्र बनलेला गोव्यातील श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ लोकांच्या चर्चेत आला. मठाचे विद्यमान स्वामीजी प.पू श्रीमद् विद्याधीश तीर्थ यांच्या शुभसंकल्पातून मठाच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने ही मूर्ती साकारली आहे. भावी काळातील एक आकर्षण आणि धार्मिक पर्यटन केंद्र ठरू पाहणार्‍या या मठाच्या प्रेरणादायी वाटचालीवर भाष्य करीत या भव्य मूर्ती निर्मितीचा प्रवास कथन करणारा हा लेख.

गोव्याच्या दक्षिणेकडील काणकोण तालुका. कर्नाटकाच्या सीमेवर वसलेला. गौड सारस्वत समाज या एका संप्रदायाचा श्री गोकर्ण पर्तगाळी जीवोत्तम मठ याच तालुक्यांतील पैंगीण गावातील पर्तगाळी येथे आहे. श्रीमन्मध्वाचार्याचे द्वैतमत मानणार्‍या अनेक मठांपैकी पर्तगाळचा श्री गोकर्ण जीवोत्तम मठ हा एक होय. या मठाची प्रत्यक्ष स्थापना भटकळ येथे शके 1398 म्हणजेच इ. सन. 1476 साली झाली. मध्वाचार्यानी जे आठ मठ बांधले त्यातील उडुपी येथील फलिमार मठाचे दहावे आचार्य रामचंद्रतीर्थ हे ब्रदिनारायण यात्रेस गेले असता आजारी पडले. त्यावेळी त्यांच्यासमवेत गौड सारस्वत समाजातील माधव नावाचा एक ब्रह्मचारी होता. त्याला रामचंद्रतीर्थानी संन्यास दीक्षा दिली तेच श्रीमद् नारायणतीर्थ आणि याच ठिकाणाहून समाजाची गुरूपरंपरा सुरू झाली.
 
 
श्रीमद् नारायणतीर्थ परतत असताना ते वाराणसीत आले आणि त्यांनी त्या ठिकाणी एक मठ स्थापन केला. या मठाचे श्री संस्थान गोकर्ण जीवोत्तम पर्तगाळी मठ असे लांबलचक नाव पडले यामागे देखील एक इतिहास असल्याची माहिती विद्यमान स्वामीजी प.पू श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामी महाराजांनी दिली. या मठाचे सर्वाधिक काळ मठाधिपती राहिलेल्या तपस्वी महंत, विचारवंत, अशा जीवोत्तमतीर्थ स्वामी महाराजांच्या निमित्ताने मठास श्री वीर विठ्ठल प्रतिमा प्राप्त झालेली असल्यामुळे त्या स्वामीजींच्या स्मरणार्थ मठाच्या नावात जीवोत्तम हा उल्लेख आला. भटकळचा एक मठ गोकर्ण येथे आहे. त्यामुळे या मठाच्या पुढे गोकर्ण असा उल्लेख आला. गोमंतकात या मठाचा गोकर्ण पर्तगाळी असा उल्लेख करतात तर उडुपीला फक्त जीवोत्तम मठ असा करतात आणि गोकर्ण व उत्तर कन्नड भागातील लोक गोकर्ण मठ असा करतात. मात्र मठ एकच आहे आणि स्वामीजींच्या नावापुढे वडेर असे बिरूद लावले जाते. तो एक मान आहे. हे बिरूद कर्नाटकातील केलदी संस्थानच्या अधिपतींनी मठाचे पहिले स्वामीजी श्री नारायणतीर्थ यांना समर्पण केले होते.
 

jay shree ram
 
स्वामी महाराज भटकळला असताना तेथील समाजबांधवांनी केलदीच्या राजाला आमंत्रण दिले. स्वामीजींच्या आमंत्रणावरून राजा मठात आला. त्यावेळी त्याचा सत्कार आणि आदरातिथ्य करण्यात आले. तेथे राजाचे आगमन होताच कन्नड भाषेत वडेरियगे जयवागले असा जयघोष समाजबांधवांनी केला. त्यावेळी राजांनी सांगितले की, आपण वडेर नसून गुरू महाराज हे वडेर आहेत आणि राजांनी त्याच वेळी वडेर हे बिरूद स्वामी महाराजांना दिले व गुरू महाराजांना समर्पित केले. आणि त्यावेळेपासून आजपर्यंत प्रत्येक स्वामी महाराजांचा जयघोष वडेर स्वामी असाच केला जातो, अशी माहिती विद्यमान स्वामी महाराजांनी दिली.
 
या मठाचे प्रमुख दैवत श्री रामदेव असून 550 वर्षांपूर्वी फलिमार मठाचे दहावे मठाधिपती यांनी सारस्वत समाजाच्या प्रथम स्वामीस दीक्षा दिली आणि त्यांच्या नित्य पूजेसाठी रामदेवाची प्रतिमा दिली. मठाचे तिसरे स्वामी महाराज श्रीमद् जीवोत्तम तीर्थ स्वामी हे अत्यंत तपस्वी होते. त्यांनी तब्बल 70 वर्षे मठ परंपरेत पीठाधिपती म्हणून कार्य केले. ज्यावेळी ते गंडकी यात्रेला गेले त्यावेळी त्यांना विठ्ठलाच्या तीन मूर्ती सापडल्या. त्यातील श्री भूविजय ही मूर्ती गोकर्ण, श्री दिग्विजय मूर्ती उडुपी बसरूर आणि श्री वीर विठ्ठलाची प्रतिमा त्यांनी आपल्याजवळ ठेवली. म्हणून या मठात दोन आराध्यदैवते आहेत.
 
24 स्वामींची परंपरा
 
यंदा श्री गोकर्ण पर्तगाळी मठ आपल्या स्थापनेचा 550 वा सार्ध पंचशताब्दी महोत्सव साजरा करीत आहे. या मठाच्या परंपरेत आजवर 24 स्वामींची परंपरा आहे. त्यात श्री नारायण तीर्थ, श्री वासुदेव तीर्थ, श्री जीवोत्तम तीर्थ, श्री पुरुषोत्तम तीर्थ, श्री अणुजीवोत्तम तीर्थ, श्री रामचंद्र तीर्थ, श्री दिग्विजय रामचंद्र तीर्थ, श्री रघुचंद्र तीर्थ, श्री लक्ष्मीनारायण तीर्थ, श्री लक्ष्मीकांत तीर्थ, श्री रमाकांत तीर्थ, श्री कमलाकांत तीर्थ, श्री श्रीकांत तीर्थ, श्री भूविजय रामचंद्र तीर्थ, श्री रमानाथ तीर्थ, श्री लक्ष्मीनारायण तीर्थ, श्री आनंद तीर्थ, श्री पूर्णप्रज्ञतीर्थ, श्री पद्मनाभ तीर्थ, श्री इंदिराकांत तीर्थ, श्री कमलनाथ तीर्थ, श्री द्वारकानाथ तीर्थ, श्री विद्याधिराज तीर्थ आणि 24 वे विद्यमान श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजी हे आहेत. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली यंदाचा सार्ध पंचशताब्दी महोत्सव या ठिकाणी साजरा होत आहे.

jay shree ram 
श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजी यांचा जन्म 1995 साली झाला. त्यांचे मूळ नाव उदय लक्ष्मीनारायण भट असे होते. ते बेळगावला मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असताना 2014 साली या शहरात गुरुस्वामी श्रीमद् विद्याधिराज तीर्थ स्वामी महाराज चातुर्मासाला आले होते. तेव्हा स्वामीजींनी या तरुण मुलामधील प्रज्ञा पाहून त्याचा शिष्य म्हणून स्वीकार केला. आपल्या शैक्षणिक कारकिर्दीला तिलांजली देऊन त्यांनी संन्यासाश्राचा स्वीकार केला. त्यांच्या बुद्धिमत्तेचे तेज त्यांच्या मुखावर दिसते. आपल्या दूरदर्शीत्वाने तीन वर्षांपूर्वी त्यांनी मठाच्या जीर्णोद्धाराचा संकल्प सोडला आणि मठाच्या अनुयायांच्या सहकार्याच्या बळावर तो संकल्प तडीसही नेला. हा मठ म्हणजे गोव्यातील आदर्शधाम बनावे, असा त्यांचा मानस आहे.
 
पर्तगाळचे आदर्श धाम

पर्तगाळच्या कुशावती नदीच्या काठावर डोंगराचे नैसर्गिक वरदान लाभलेल्या 130 एकर इतक्या विस्तीर्ण भूमीवर हा मठ आहे. विद्यमान स्वामीजींनी मठाच्या जीर्णोद्धाराचा विषय समोर मांडताना हा मठ अद्वितीय आणि नावीन्यपूर्ण बनला पाहिजे व इतर समाजाच्या लोकांनी या ठिकाणी आले पाहिजे आणि हा परिसर पाहून त्यांच्या मनात मंदिर आणि धर्माविषयी आस्था निर्माण व्हायला हवी, असे मत व्यक्त केले. त्यांनी याची जबाबदारी संदीप शिक्रे या वास्तुविशारदाकडे सोपविली. यासंबंधी बोलताना संदीप शिक्रे म्हणाले की, माझ्या दृष्टीने तो सर्वोच्च सन्मान होता. त्यानुसार पर्तगाळचे सर्वेक्षण करून जमिनीचा चढउतार, भौगोलिक रचना याचा अभ्यास करण्यात आला व त्यासाठी करताना अनेक तज्ज्ञांचे सहकार्य व मार्गदर्शन घेण्यात आले.
 
मंगळूरचे वास्तुविशारद व्यंकटेश पै, बांधकाम सल्लागार अभय कुंकळयेकर, दत्तप्रसाद प्रियोळकर, बांधकाम समितीमधील हांगयो आईस्क्रीमचे मालक दिनेश पै, आयडीयल आईस्क्रीमचे मुकुंद कामत, मुंबईतील कोहिनूर ग्रुपचे मुकुंद कामत, हुबळीचे वास्तुविशारद सदानंद नायक, आर्थिक बाजू सांभाळणारे योगीश कामत या सर्वांच्या सहकार्याने मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हातात घेण्यात आले.
 
येथील मंदिरातील कावी चित्रकला तशी पुनर्जिवित ठेवली पाहिजे असे ठरले. हे मंदिरही मठाइतकेच 370 वर्षे जुने आहे. त्यातील मूर्ती व मठ परंपरेनुसार 550 वर्षे जुन्या आहेत. या सर्वांचा विचार करुन छप्परामध्ये शुद्ध तांब्याचा वापर करण्यात आला.
 
 
पुनर्निर्माणात पायर्‍यापासून विद्युतीकरणापर्यंत प्रत्येक गोष्टींचा बारकाईने विचार करून श्री राम मंदिर, श्री वीर विठ्ठल मंदिर, श्री इंदिराकांत भवन, प्रदक्षिणा मार्ग, मंदिराना जोडणारी मार्गिका आणि मुख्य दालन परिसर, याचप्रमाणे एकाच वेळी 2000हून अधिक लोकांना भोजनसेवा देऊ शकेल असे स्वयंपाकघर, वरच्या मजल्यावर पाठशाला, त्या पाठशालेत वर्ग खोल्या आणि ऑनलाईन शिक्षणाची सुविधा करण्यात आली आहे. विद्यमान स्वामीजींचा पांढरा रंग हा आवडता आहे. त्यामुळे साधेपणा आणि सात्विकता दिसून येते. याचा विचार करुन मठाच्या पुनर्बांधणीमध्ये पांढर्‍या रंगाच्या दगडाचा वापर, होन्नाई गावातील उच्च दर्जाचे लाकूड, अतिशय सुंदर कोरीवकाम, राम मंदिर, विजयस्तंभावरील प्रवेशद्वार आणि मुख्य प्रवेशद्वार, पितळी कलश या सर्वच गोष्टी लोकांचे चित्त आकर्षित करणार्‍या आहेत.


jay shree ram
या ठिकाणी येणारे भाविक आणि वैदिक यांच्यासाठी तीन प्रकारची निवास स्थाने, वैदिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी पंधराशे चौ.फुटांचे दोन बेडरूमयुक्त सुसज्ज अशी 12 निवासस्थाने, अतिथींसाठी 18 अतिथीगृहे, मध्यवर्ती उद्यान, रस्ते, आधुनिक सुखसोयींनी युक्त निवासी विभाग, तरुण साधकांसाठी 9 स्टुडिओ अर्पाटमेंटस, 100 लोकांची सोय होऊ शकेल अशी स्त्री-पुरूषांसाठी प्रशस्त डॉर्मेटरी, 20 गोमातांची सोय होऊ शकेल अशी गोशाळा, त्याचबरोबर रामनवमी उत्सवासाठी रथबिदीसाठी मोठी जागा उपलब्ध करतानाच तेथे रथ ठेवण्यासाठी नवीन संकुल उभारण्यात आले आहे. शनिवार-रविवार, सुटीच्या आणि सणासुदीच्या काळात अत्याधुनिक प्रॉजेक्शन मॅपिंगची सुविधा तयार करण्यात आली आहे. भावी पिढीचा विचार करून अत्याधुनिक अशी संस्कृत पाठशाला आहे. या सगळया परिसराच्या सुरक्षेचा विचार करून डिलिंक कंपनीने 550 सीसीटीव्ही कॅमेर्‍याद्वारे नियंत्रण कक्ष या ठिकाणी उभारला आहे. एकंदर विकासकामांमध्ये उत्तमोत्तम आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हे आदर्श धाम या ठिकाणी उभारण्यात आले आहे.
 
77 फूट उंच राम प्रतिमा
 
पर्तगाळी मठाचे विद्यमान स्वामीजी हे दूरदर्शी आणि द्रष्टे असे व्यक्तिमत्त्व होय. या मठात 500 वर्षे जुनी प्रभू श्री रामचंद्राची मूर्ती आहे. या ठिकाणी 77 फूट उंचीची भव्य अशी मूर्ती सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने उभी राहायला हवी असा प्रस्ताव स्वामी महाराजांनी मांडला आणि त्यासाठी पद्मश्री राम सुतार यांचे चिरंजीव अनिल सुतार यांनी पुढाकार घेतला. यापूर्वी त्यांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली गुजरातमध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी, हैदराबादला डॉ. बाबासाहेब आंबेडकर, बेंगळूरला केंपंनगौडा, पुण्याजवळ छत्रपती संभाजी महाराजांची प्रतिमा, आसामात लाचीद बडफुकानची प्रतिमा अशा भव्य मूर्ती बनविल्या आहेत. तसेच आसामात श्रीरामाची 250 मीटर आणि बरेलीमध्ये 51 फूट उंचीची मूर्ती उभारण्याचे काम सुरू आहे.
 
मात्र पर्तगाळच्या सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने कास्य प्रतिमा उभारण्यात आली आहे. त्यात 85 टक्के तांबे आणि पाच टक्के शिसे, पाच टक्के जस्त, पाच टक्के कथील वापरण्यात आले आहे. येथील हवामानाचा विचार करून ही मूर्ती उभारण्यात आली आहे. या मूर्तीचे काम दिल्ली जवळच्या नोएडा येथील सुतार यांच्या फाऊंड्रीमध्ये झालेले आहे. ही मूर्ती तयार करण्यापूर्वी प्रथम थर्मोकोलच्या प्रतिकृती तयार करण्यात आल्या. मग मेणाचे साचे तयार करण्यात आले आणि 1100 अंश सेंटिग्रेड तापमानात हे सगळे ओतकाम करण्यात आले आहे. विशेष म्हणजे मूर्तीच्या बाह्य अंगावर हवामानाचा परिणाम होऊ नये यासाठी पीयू रंग वापरण्यात आला आहे. या ठिकाणच्या खार्‍या हवामानाचा मूर्तीवर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. दोन-तीन वर्षांनंतर मूर्तीचा रंग हिरवट होण्याची शक्यता असल्यामुळे परत नवा रंग लावावा लागेल, असे मत अनिल सुतार यांनी व्यक्त केले आहे.
 
ही प्रतिमा म्हणजे जनतेसाठी एक आकर्षण होय. त्या मूर्तीवर विविधरंगी रोषणाई करण्यात आल्यामुळे रात्रीच्या वेळी मूर्ती आकर्षक आणि मनमोहक अशी दिसते. 12 फूट उंचीचा चौथरा आणि 65 फुटांची मूर्ती असे याचे स्वरुप आहे. हा आशियातील सर्वात उंच असा प्रभू श्रीरामांचा पुतळा असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते श्रीराम पुतळा आणि थीम पार्कचे अनावरण करण्यात आले. पर्तगाळ मठ परिसर दक्षिण काशी बनली असून यापुढे आध्यात्मिक केंद्र म्हणून परिचित होतानाच एक पर्यटन स्थळ बनेल, असे मत मोदी यांनी व्यक्त केले. एकंदर परिसर आणि मठाची रचना पाहाता अल्प काळात हा मठ देशविदेशांत प्रसिद्धीच्या झोतात आल्याशिवाय राहणार नाही.
 
सार्ध पंचशताब्दी महोत्सवाच्या निमित्ताने स्वामी महाराजांनी 550 कोटी रामनाम जपाचा संकल्प सोडला. गोवा आणि कर्नाटकातील विविध भागांत मिळून 120 केंद्र व 104 उपकेंद्रांतून हा रामनामाचा जप सुरू झाला. त्या जपकेंद्राची नावे या चौथर्‍यावर कोरण्यात आली आहेत. त्याचबरोबर वाराणसी येथे चतुर्मासाला असताना श्री राम दिग्विजय रथयात्रेचा संकल्प स्वामीजींनी सोडला. बद्रिनाथ येथून सुरू झालेल्या या दिग्विजय रथ यात्रेने 39 दिवसांची वाटचाल करताना जवळजवळ 8000 कि.मी. इतका प्रवास केला आणि 120 जपकेंद्राना भेट देऊन पर्तगाळी मठात त्याचे आगमन झाले. त्यावेळी भाविक आणि मठानुयायांनी त्याचे उत्स्फूर्त स्वागत केले.
 
ज्यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प साकारला ते प.पू. श्रीमद् विद्याधीश तीर्थ स्वामीजी मठ आणि मंदिराविषयी असे सांगतात की, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष हे कुणा बहुराष्ट्रीय कंपनीत काम केल्याने मिळत नाहीत. ते मिळविण्यासाठी ज्ञान, भक्ती, वैभव या तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. देवाबद्दल भक्ती आणि ज्ञान प्राप्त करत जाल तर अंतिम लक्ष्य कोठे आहे ते आपल्याला प्राप्त होईल. त्याचबरोबर कोणताही स्वामी शाश्वत नाही. मात्र गुरुपरपंरा शाश्वत आहे. गुरुपीठ हे शाश्वत आहे. मठामध्ये ज्या ज्या साधन सुविधा आहेत त्या समाजासाठीच आहेत. आपल्याला केवळ मठ भव्य करावयाचा नाही. समाजामधील मुलांचे भविष्य उज्ज्वल करायचे आहे. हे सगळे झाले म्हणून आपण समाधानी नाही तर ज्यावेळी ही मुले आपले भवितव्य घडवतील आणि विद्वान होतील, त्यांच्या वागण्यातून आणि आचरणातून समाजास लाभ होईल त्यातून आम्हाला खरे समाधान लाभेल. मठाइतकेच विशाल असे स्वामी महाराजांचे मन आहे. केवढे प्रदीर्घ आणि समाजोपयोगी असे त्यांचे विचार आहेत. भविष्यात या मठाला कीर्ती मिळतानाच गोव्याच्या दक्षिण टोकाला असलेल्या आणि एकेकाळी काणकोण जाण कोण म्हणून हिणविले जायचे तोच काणकोण तालुका वैभवाच्या शिखरावर विराजमान झालेला असेल.
 
लेखक गोवा, काणकोण भागातील ज्येष्ठ पत्रकार आहेत.