साईबाबांची सम्यक ओळख करून देणारा आशयपूर्ण पुस्तक

02 Dec 2025 13:13:49

शिर्डीचे साईबाबा हे महाराष्ट्राच्या भूमीतील आज जगविख्यात झालेले सर्वाधिक भक्तप्रिय संत-सत्पुरुष आहेत. साईबाबांएवढी देशविदेशात ख्याती झालेली आणि त्यांची मंदिरे निर्माण झालेली व त्यांच्या प्रेरणेने असंख्य सामाजिक सेवाकार्याचे उपक्रम राबवले जातात अशी विभूती क्वचितच अन्य असेल असे मला वाटते. ’विश्वमानवधर्माचा नंदादीप’ म्हणून एकीकडे साईबाबांचा विश्वगौरव होत आहे तर दुसरीकडे काही संकुचित सांप्रदायिक त्यांना एका विशिष्ट समाज-जातीचा ठरवत नसत्या आरोपांनी उगीच वाद निर्माण करून सामाजिक एकता-समरसता नष्ट करण्याचा हास्यास्पद प्रयत्न करीत आहेत. अशा काळात साईबाबांची सम्यकपणे, नेमकेपणाने, साद्यंत ओळख करून देणारे पुस्तक ‘साई माझा सांगाती‘ साप्ताहिक विवेकच्या पुस्तक प्रकाशन विभागाने प्रकाशित करून मोठे औचित्य साधलेले आहे. श्री साईबाबा संस्थान शिर्डीच्या ’साईलीला’या अधिकृत मासिकाचे, सुमारे 15 वर्षे संपादकपद भूषवलेले, संतसाहित्याचे साक्षेपी, व्यासंगी अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार विद्याधर माधव ताठे यांनी या पुस्तकाचे लेखन केलेले आहे.

ग्रंथाचे नाव - साई माझा सांगाती
लेखक - विद्याधर माधव ताठे
साप्ताहिक विवेक प्रकाशन, मुंबई
पृष्ठे 130; मूल्य 250 रू.
https://www.vivekprakashan.in/books/sai-maza-sangati/

(संपर्क शितल खोत 9594961767)


गुरुपौर्णिमेच्या उत्सवात श्रीक्षेत्र शिर्डी येथे विख्यात प्रशासक व महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव द. म. सुकथनकर यांच्या शुभहस्ते विद्याधर ताठे लिखित या पुस्तकाचा साई समाधीवर अर्पण सोहळा आणि प्रकाशन समारंभ झाला. सुकथनकर (वय 94 वर्षे) हे 10 वर्षे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष होते, त्यामुळे त्यांच्या हस्ते प्रकाशनास वेगळेच महत्त्व होते. या अनौपचारिक प्रकाशन समारंभास माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, अ‍ॅड. मोहनराव जयकर, सी.ए.श्री. रोहम, साईबाबांचे सांगाती काशीराम शिंपी यांचे वंशज, माजी विश्वस्त मिराणे गुरुजी आदी 21 माजी विश्वस्त आणि संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी, गोरक्ष गाडिलकर उपस्थित होते. या समारंभात सुकथनकर यांनी ‘साई माझा सांगाती‘ पुस्तकाची वैशिष्ट्ये सांगून, विवेक प्रकाशन व लेखक ताठे यांचे विशेष कौतुक केले. ‘साईबाबां‘बद्दल सध्या उलटसुलट वक्तव्ये करून सामाजिक वातावरण बिघडवले जात आहे, अशा काळात कोणत्याही वादात न पडता सकारात्मकपणे साईबाबांच्या थोरवीचे-कार्याचे सम्यक दर्शन ताठे यांच्या या पुस्तकाने लोकांपुढे ठेवलेले आहे, असे मत व्यक्त करून सुकथनकर पुढे म्हणाले, हे पुस्तक मी साद्यंत वाचले व त्यास प्रस्तावना दिली, हे पुस्तक साईबाबांचे चरित्र वा लीलासंग्रह, आठवणी, चमत्कार यांचे संकलन नाही तर साईबाबांवरील प्रमुख साहित्याचा परिचय करून देत, साईबाबांच्या विविध पैलूंचे रसाळ, प्रासादिक दर्शन घडवणारा आहे. एक छान दस्तावेज आहे. शेवटी बाबांवरील आरोपांना थेट प्रत्युत्तर न देता, बाबांचे छोट्या-छोट्या लेखातून दर्शन घडवलेले आहे. आजकाल ग्रंथ-पुस्तकं वाचन नव्या पिढीकडून होत नाही. केवळ व्हॉटसअप, इन्स्टाग्राम, फेसबुक पाहण्याचीच सवय आता सररास दिसते. अशा नव्या पिढीतील तरुण, जिज्ञासू वाचकांना डोळ्यांपुढे ठेवून ताठे यांनी साई माझा सांगाती हे ‘शॉर्ट बट इनफ एक्स्प्लेनरी‘ लेखन केलेले आहे. सुकथनकर यांचे हे मत पुस्तकाचे नेमके परीक्षण आहे. या पुस्तकात छोटे-छोटे, एक हजार शब्दमर्यादेत लिहिलेले 25 लेख आहेत. ‘विवेक प्रकाशन‘ने पुस्तकाची उत्तम दर्जेदार कागद, सुंदर मांडणी, ठळक आकर्षक छपाई आणि आकर्षक मुखपृष्ठाद्वारे दर्जेदार निर्मिती केलेली आहे. पुठ्ठा बांधणीमुळे पुस्तकाचे सौंदर्य अधिक देखणे झालेले आहे. विवेकच्या पुस्तक निर्मिती परंपरेला शोभेसे हे पुस्तक ’साईबाबा’ भक्तांना, संतसाहित्यप्रेमींना एक अक्षर पर्वणी आहे.

साईबाबांचे शिर्डी आगमन; साईदीपोत्सव, साईबाबांचे स्वरूप दर्शन, श्रीक्षेत्र शिर्डी माहात्म्य, साईबाबांची रुग्णसेवा, साई उदीचे माहात्म्य, साईबाबांचे अन्नदान, शिर्डी माझे पंढरपूर आरती व संतकवी दासगणू बाबांनी सुरू केलेला रामनवमी उत्सव, साईबाबांचे गीता प्रवचन, साईबाबांचे नाथ भागवत प्रेम, साईंचा विष्णुसहस्रनाम अनुग्रह, श्रद्धा आणि सबुरी, साईंचे स्वप्नदृष्टांत, बाबांचे पूर्वजन्म कथन, साईसच्चरितची जन्मकथा, दासगणूंची साईस्तवनमंजरी, अभिनेते सुधीर दळवींचे साईबाबा, कादंबरीकार लीला गोळे यांची साईप्रचिती, कोकणातील सावंतांचे साईधाम, साईसेवेचा कृतार्थ भाग्ययोग इतक्या विविध विषयाद्वारे श्री साईबाबांच्या अनेकविध पैलूंचे विलोभनीय मनोवेधक शब्ददर्शन लेखक विद्याधर ताठे यांनी समर्थपणे घडवलेले आहे. द.म.सुकथनकरांची प्रस्तावना या ग्रंथास लाभलेली असून 130 पानांच्या या पुस्तकाचा समारोप साईबाबांच्या 11 अभयवचनांनी करण्यात आलेला आहे. चित्रकार रवी वेंगुर्लेकर यांच्या चित्रांनी पुस्तक अधिक संपन्न झाले असून मोहक मुखपृष्ठ विशेष आकर्षक आहे. विवेकचे सहयोगी संयोजक महेश वैद्य यांच्या प्रयत्नातून हे सुंदर पुस्तक निर्माण झालेले आहे.

साई माझा सांगाती पुस्तकाचे लेखक विद्याधर ताठे यांच्या देवर्षी नारद, रामदर्शन, संत जनाबाई, संतकवी श्रीधर, यशोगाथा गीता प्रेस गोरखपूरची, भेटवा विठ्ठला, समाजभूषण नामदेवराव रुकारी, महात्मा बसवेश्वर, शिवोपासना ः प्राचीनता व परंपरा या पुस्तकांप्रमाणेच प्रस्तुतचे पुस्तक वाचकांना खूप नवीन माहिती देणारे आहे. साईबाबांच्या संबंधित समग्र साहित्याची या पुस्तकातून आपणास अल्पाक्षर ओळख होते आणि साईबाबांविषयी कोणताही संदेह मनात रहात नाही. या दृष्टीने या पुस्तकाचे विशेष महत्त्व आहे. विवेक प्रकाशन आणि लेखक विद्याधर ताठे यांचे अभिनंदन व शुभेच्छा पुढील साहित्यसेवेसाठी!

- डॉ. न.म. जोशी

Powered By Sangraha 9.0