वसंतराव देवधर - खाजगी साखर कारखान्याचे आर्थिक शिल्पकार

02 Dec 2025 15:00:07


@ कृषिरत्न बी.बी. ठोंबरे

साखर उद्योग व प्रामुख्याने महाराष्ट्रातील खाजगी साखर उद्योगाचा भक्कम पाया उभा करण्यामध्ये वसंतराव देवधरांचा सिंहाचा वाटा आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना कर्ज पुरवठ्याचे एक नवे दालन उपलब्ध करून देणे व त्या माध्यमातून अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांची सुद्धा भरभराट होण्यासाठीची संधी निर्माण करण्याचे शिल्पकार म्हणून वसंतराव देवधरांचे नाव अग्रस्थानी राहील यात मुळी शंका नाही. वसंतराव देवधरांच्या आठवणींना उजाळा देणारा लेख.

वसंतराव देवधर यांचे वयाच्या 91 व्या वर्षी दीर्घ आजाराने निधन झाल्याची बातमी कळली आणि अत्यंत दु:ख झाले. वसंतराव देवधरांचा आणि माझा परिचय 1998-1999 मध्ये पहिल्यांदा झाला. मी, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यकारी संचालक म्हणून कारखान्याचे उभारणी करत असताना त्या कारखान्याला काही अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांच्या माध्यमातून अर्थसहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या नेतृत्वाखाली बैठक होती. त्या निमित्ताने देवधर वैद्यनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेचे सल्लागार म्हणून बैठकीत उपस्थित राहायचे. तेव्हापासून त्यांच्याशी स्नेह वाढत गेला. पुढे नॅचरल शुगर या महाराष्ट्रातील पहिल्या खाजगी साखर कारखान्याचा माझा प्रस्ताव त्यावेळचे पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने साखर उद्योगाचे डीलायसनिंग केल्याने मंजूर झाला आणि त्यानंतर या माझ्या नॅचरल शुगर कारखान्याच्या आर्थिक जुळवाजुळमध्ये वसंतरावजी देवधरांचे लाख मोलाचे योगदान राहिले.

संघपरिवारातील जवळपास 25 बँकांना भेटी देणे, त्यांच्या व्यवस्थापनाला आमच्या कारखान्यासाठी कर्ज देणे किती योग्य आहे व ते कर्ज कसे सुरक्षित राहील व त्या माध्यमातून ग्रामीण भागाच्या अर्थकारणाला कशा पद्धतीने चालना मिळेल व अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांसाठी एक नवे कर्जवितरणाचे दालन निर्माण होईल या सर्व बाबी त्यांनी अत्यंत कौशल्याने या सर्व 25 नागरी बँकांच्या व्यवस्थापनाला समजावल्या. त्यासाठी स्वत: वसंतराव देवधर यांनी अनेक बँकांच्या भेटीसाठी माझ्याबरोबर मुंबई, जळगाव, संभाजीनगर, परळी या ठिकाणी प्रवास केला आणि 1999 मध्ये आमच्या कारखान्यासाठी 25 बँकांचे कन्सोरसिएम करून आम्हास नऊ कोटी रुपयांचे दीर्घ मुदत कर्ज आणि 25 कोटी रुपयांचे खेळते भांडवली कर्ज या सर्व 25 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकानी मंजूर केले.

नॅचरल शुगरच्या उभारणीमध्ये शेतकर्‍यांचा सहभाग अत्यंत उत्स्फूर्तपणे मिळाला. जवळपास दहा कोटी रुपयांचे भागभांडवल जमा झाले. मात्र जवळपास एक वर्ष कुठलीही राष्ट्रीयकृत अथवा अर्बन बँक आम्हास अर्थसहाय्य करण्यास तयार नव्हती. कारण त्यावेळेस रिझर्व्ह बँकेची साखर उद्योगासाठी नकारात्मक भूमिका होती आणि त्यामुळे कोणतीही बँक सहजासहजी साखर कारखान्याला कर्ज देण्यास तयार होत नव्हती. अशा परिस्थितीमध्ये वसंतराव देवधर यांच्या अथक प्रयत्नातून आम्हास संघपरिवारातील 25 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांनी वरील प्रमाणे अर्थसहाय्य केले आणि त्यानंतर कारखान्याच्या उभारणीस खर्‍या अर्थाने गती मिळाली.

कारखान्याच्या उभारणीमध्ये दर तीन-चार महिन्याला सर्व अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांच्या बैठका घेणे, सवार्ंना कन्व्हिन्स करणे व या सर्व बँकांकडून कारखान्याच्या उभारणीच्या आवश्यकतेनुसार कर्ज पुरवठा उपलब्ध करून घेण्यामध्ये वसंतराव देवधर यांचा सिंहाचा वाटा राहिला. केवळ त्यांच्या अत्यंत सकारात्मक पाठिंब्यामुळेच नॅचरल शुगरची उभारणी पूर्ण झाली आणि त्या माध्यमातून ग्रामीण अर्थकारणाला वेगळी दिशा देण्याचं काम देवधर यांनी केले.

त्यानंतर महाराष्ट्रामध्ये प्रामुख्याने खाजगी क्षेत्रामध्ये किमान 30 साखर कारखाने उभे करण्याचे उद्दिष्ट गोपीनाथराव मुंडे साहेबांनी हाती घेतले व संघविचाराच्या प्रवर्तकांना साखर कारखाना उभारणीसाठी प्रोत्साहित करण्याचे काम मुंडे साहेबांच्या बरोबरच वसंतराव देवधर यांनी पुढाकाराने हाती घेतले. त्यामध्ये प्रामुख्याने नितीन गडकरी यांचा पूर्ती साखर कारखाना, हरिभाऊ बागडे नाना यांचा छत्रपती संभाजी राजे साखर कारखाना, सुभाष देशमुख यांचा लोकमंगल उद्योग समूह, गोपीनाथ मुंडे साहेबांचे योगेश्वरी व पनंगेश्वर साखर कारखाने असे जवळपास 20 ते 25 साखर कारखान्याला वसंतराव देवधरांच्या पुढाकाराने व त्यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या अनेक अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांच्या माध्यमातून अर्थ पुरवठा करण्यात आला व हे सर्व साखर कारखाने उभे राहिले.

खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या साखर उद्योगाच्या डिलायसनिंगच्या निर्णयानंतर अर्बन बँकांच्या माध्यमातून खाजगी क्षेत्रातील साखर कारखाना उभारणीची संकल्पना मूर्त स्वरूपात आणण्याचे काम वसंतराव देवधर यांच्या नेतृत्वामुळेच होऊ शकले व त्यामुळे आज आपण पाहतोय की, महाराष्ट्रामध्ये खाजगी क्षेत्रात व प्रामुख्याने अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकाचे अर्थसहाय्य केलेले जवळपास 75 साखर कारखाने कार्यान्वित आहेत व आज महाराष्ट्रातील खाजगी क्षेत्रातील साखर कारखान्याची संख्या 133 च्या वर गेलेली असून महाराष्ट्रातील एकूण साखर उत्पादनाच्या 50 टक्के वाटा हा खाजगी क्षेत्राचा आहे. एवढेच नव्हे तर राज्यातील इथेनॉल उत्पादनाच्या वाट्यामध्येही खाजगी क्षेत्राचा वाटा 75 टक्के पेक्षा जास्त आहे. या साखर उद्योगाबरोबरच इथेनॉल प्लान्टची निर्मिती या सर्व उद्योगांमध्ये आज जी भरभराट झालेली दिसते त्याचा भक्कम पाया वसंतराव देवधरांच्या अर्थनीतीमधूनच घातला गेला. त्यामुळेच आज महाराष्ट्रामध्ये ऊस उत्पादक शेतकर्‍यापासून ते साखर कारखानदारापर्यंत आर्थिक सुबत्तेचं एक नवं जग निर्माण झालं. त्याचबरोबर महाराष्ट्रातील अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांच्या कर्जवितरणाला सुद्धा एक वेगळा आयाम व नवीन संधी देण्याचं काम वसंतराव देवधरांच्या माध्यमातून झालं.

नॅचरल शुगरला 25 कोटी कर्ज देण्याची झालेली सुरुवात आज महाराष्ट्रातील जवळपास 75 साखर कारखान्याला अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांच्या माध्यमातून दोन हजार कोटींच्या पुढे अर्थसाह्य करण्यापर्यंत आलेली आहे. नागरी सहकारी बँकांना कर्ज पुरवठ्यासाठी एक नवीन दालन या माध्यमातून वसंतराव देवधरांच्या प्रयत्नातून निर्माण झालं. साखर कारखान्यांना कारखाना उभारणीसाठी व प्रामुख्याने साखरेच्या तारणावर/गोदामावर कर्ज देण्याची संकल्पना ही वसंतराव देवधरांनीच सर्व नागरी सहकारी बँकांच्या गळी उतरवली व ती आज अत्यंत यशस्वीपणे कार्यरत आहे. 100 टक्के शाश्वत व खात्रीशीर कर्जपुरवठा म्हणून या कर्जाकडे पाहिले जाते. त्यामध्ये कुठल्याही बँकेला कर्ज पुरवण्याची भीती नाही व आतापर्यंत असे कर्ज बुडण्याचे एकही प्रकरण साखर कारखान्याच्या बाबतीत नागरी बँकांना अनुभवास आलेले नाही. त्यामुळे साखर उद्योग व प्रामुख्याने महाराष्ट्रातील खाजगी साखर उद्योगाचा भक्कम पाया उभा करण्यामध्ये वसंतराव देवधरांचा सिंहाचा वाटा आहेच, पण त्याचबरोबर महाराष्ट्रातील नागरी सहकारी बँकांना कर्ज पुरवठ्याचे एक नवे दालन उपलब्ध करून देणे व त्या माध्यमातून अर्बन कोऑपरेटिव्ह बँकांची सुद्धा भरभराट होण्यासाठीची संधी निर्माण करण्याचे शिल्पकार म्हणून वसंतराव देवधरांचे नाव अग्रस्थानी राहील यात मुळी शंका नाही.

वसंतराव देवधरांनी नागरी सहकारी बँकांच्या कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देणे, व्यवस्थापनाला योग्य सल्ला देणे हे काम सहकार भारतीच्या माध्यमातून आयुष्यभर निष्काम सेवा म्हणून शेवटच्या श्वासापयर्ंत करत राहिले. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये संघविचारांच्या प्रवर्तकाने जास्तीत जास्त ग्रामीण उद्योग उभे करावेत, प्रामुख्याने ग्रामीण अर्थकारणाचा कणा असलेल्या साखर उद्योगांमध्ये यावे यासाठी त्यांनी कसोशीने प्रयत्न केले. त्यांच्या विशेष प्रयत्नातूनच पांडुरंग राऊतांचा श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना असेल, या व अशा संघविचाराच्या अनेक व्यक्तींना साखर उद्योगांमध्ये आणण्याचे आणि त्यांचे साखर कारखाने यशस्वीपणे उभे करून देण्याचे सारे श्रेय देवधरांना जाते आणि म्हणून वसंतराव देवधर हे खर्‍या अर्थाने महाराष्ट्रातील खाजगी साखर कारखान्यांचे आर्थिक नियोजनाचे शिल्पकार व नागरी सहकारी बँकांचे मार्गदर्शक म्हणून अजरामर राहतील, यात मुळीच शंका नाही.

लेखक नॅचरल शुगर कारखान्याचे अध्यक्ष व विस्मा पुणेचे अध्यक्ष आहेत.
Powered By Sangraha 9.0