पशुसंवर्धन - मेळघाटासाठी आशेची नवी वाट

20 Dec 2025 11:52:50
@ डॉ. व्यंकटराव घोरपडे  9422042195
मेळघाटातील गावांचा विकास करायचा असेल तर स्थानिकांच्या हाताला शाश्वत काम द्यावे लागेल. उत्पन्नाचे साधन म्हणून पशुसंवर्धनाकडे लक्ष द्यावे लागेल. मेळघाटातील कुपोषणावर पशुसंवर्धन हा नक्कीच उपाय होऊ शकतो. येथील अनेक गावांत कुपोषित मुले आढळली. पशुसंवर्धनाच्या माध्यमातून प्राणिजन्य उत्पादने म्हणजेच दूध, अंडी, मांस यांच्या माध्यमातून या कुपोषणाचे प्रमाण कमी करता येऊ शकते.
krushivivek
खरं तर खूप दिवसापासून मेळघाट फिरायचं होतं. पर्यटक म्हणून होतच, पण तेथील दैनंदिन जीवन जवळून पाहण्याची इच्छा होती. त्यातच डॉ. निलेश शिंदे या पशुवैद्यकीय अधिकार्‍याचा एक लेख वाचनात आला. त्यांनी जवळजवळ चार वर्षे मेळघाटात पशुवैद्यक म्हणून तेथील दवाखान्यात काम केलं होतं. सध्या ते सातारा जिल्ह्यात कार्यरत आहेत. त्यांच्याशी संपर्क झाला, त्यांना विनंतीही केली आणि मग मेळघाट फिरायचं नक्की ठरलं. सोबत सांगलीतील पशुवैद्यक मित्र डॉ. बबन सावंत, डॉ. रावसाहेब चौगुले हे देखील होते. जाण्यापूर्वी तशी संबंधितांशी चर्चा केली होती आणि त्याचा आढावाही घेतलेला होताच. पण प्रत्यक्ष तेथे जाऊन पाहण्यात एक वेगळी मजा होती. त्यामुळेच तेथील वास्तव कळणार होतं.
 
 
धारणी, अमरावती येथे सकाळी उतरून ठरल्याप्रमाणे हरिसाल या 26 किलोमीटर अंतरावरील एका गावात आम्ही गेलो आणि तेथे मुक्काम केला. त्या ठिकाणाहूनच मेळघाट, चिखलदरा, बहिरागड यासह छोटी-मोठी गावं आम्ही प्रत्यक्ष पाहिली. अनेक बाबी मोबाईलमध्ये चित्रित केल्या. अनेक पशुपालकांशी, स्थानिक दुकानदारांशी, खाजगी दूधसंकलन करणार्‍या गवळ्यांशी चर्चा केली. एकूण परिसरात फिरत असताना तेथील कोरकू समाजातील जनजातींनी, गवळी समाजाने शेतीमध्ये केलेली प्रगती पाहून खूप आश्चर्यदेखील वाटले. ते घेत असलेले मक्याचे पीक, हळद, सोयाबीन, भाजीपाला, खरबूज, टरबूज, लिंबू हे पाहून त्यांच्यातील शेतकरीदेखील डोळ्यांसमोर उभा राहिला.
 
 
krushivivek
 
या पिकांचे वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी झटका यंत्राचा वापर केला जातो. काही ठिकाणी ठिबक सिंचनाचा वापर देखील येथील शेतकरी करत होते. नोव्हेंबर महिन्यातच आम्ही भेट दिली होती. त्यामुळे मका पीक काढणी सुरू होती. मोठ्या प्रमाणात मक्याचे उत्पादन सगळीकडे दिसत होतं. अनेक व्यापार्‍यांच्या दारात मोठ्या प्रमाणात मका पडलेला दिसला. शेतात देखील राशीच्या राशी पाहायला मिळाल्या. जेव्हा चर्चा केली त्यावेळी मक्याच्या दराबाबत मात्र नाराजी देखील दिसून आली. याच मक्याची वैरण म्हणून पीक घेतले आणि त्याच्यापासून मुरघास बनवला आणि वर्षभर चारा म्हणून वापर केला तर निश्चितपणे दूध धंद्याच्या माध्यमातून चार पैसे जास्तीचे मिळतील, असं मनाला वाटलं.
 
 
अनेक ठिकाणी खेड्यात, जंगलात मोबाईलला रेंज नव्हती. सोलरचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे. जंगलाच्या आसपास, कुरणात गवळी लोकांचे अनेक म्हैशींचे कळप दिसून आले. त्यांच्याशी चर्चा केली असता सरासरी म्हशीच्या दुधाला पन्नास रुपयापर्यंत प्रति लिटर भाव मिळतो असे कळले. देशी गाईचे कळपदेखील पाहण्यात आले. काही पशुवैद्यकीय दवाखानेदेखील पाहिले.
 
krushivivek 
 
अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हा तसा जनजातीबहुल प्रदेश आहे. विसाव्या पशुगणनेनुसार (सन 2019) अमरावती जिल्ह्यामध्ये सुमारे 12 लाखांहून अधिक पशुधन आहे. मेळघाटातील जनजाती समाजात शेळ्या, कोंबड्या या असतातच. गायी-म्हशीची संख्या देखील लक्षणीय आहे. अलीकडे जंगलात चराईबंदी असल्यामुळे त्यांचे संगोपन घराकडेच करून (स्टॉल फिडींग) दुग्धव्यवसाय करण्याकडे कल वाढत आहे. अचलपुरी (ईलिचपुरी) म्हशी काही भागात ‘नागपुरी म्हशी‘ या गवळी समाजाकडे आहेत. सोबत ‘मेळघाटी म्हशी‘ देखील मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मेळघाटी म्हशींची नोंद ब्रिटिश काळातील गॅझेटिअरमध्ये आहे. त्याच्या राष्ट्रीय पातळीवरील नोंदीसाठी महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर प्रयत्न करत आहे. देशी अवर्णित गायी म्हणजे गावठी गायी यांची संख्यादेखील मोठी आहे. स्थानिक मंडळी त्यांना ‘गावडी‘, ‘गावराणी‘, ‘खामगावी‘, ‘घाटजाती ‘ या नावाने ओळखतात. गवळाऊ गायीप्रमाणे या गावठी गायींचे दूध गोड आणि पौष्टिक असते. साधारण दोन ते तीन लीटर प्रतिदिन दूध उत्पादन आहे. शेळ्या, देशी कोंबड्या यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. अनेक भागांमध्ये ‘अशील’ जातीच्या कोंबड्यादेखील पाहायला मिळतात.
 
krushivivek 
 
असा एक अनुभव
 
गावागावांत तरुणांचे समूह गप्पा मारत असताना पाहिले. कुठेही जवळपास पेट्रोल पंप नसल्यामुळे खेडोपाड्यात दुकानातूनच पेट्रोलची सोय करावी लागत होती. एका पेट्रोल विक्रेत्याशी बोलताना त्यांनी शिक्षण, आरोग्य, जंगलातील गावांचे स्थलांतर, कामधंदा, वीज, वन्य प्राण्यांचे हल्ले अशा एक ना अनेक समस्या समोर मांडत असतानाच आम्ही बहिरागड येथे गेलो. त्या ठिकाणी पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे आणि पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांना भेटलो. त्यांच्याशी बोलणे झाल्यामुळे पूर्वीचा मेळघाट आणि आत्ताचा मेळघाट याबाबतीत खूप काही कळले. यावेळी त्यांनी तेथे केलेले कार्यदेखील जाणून घेतले.
 

krushivivek 
 
त्या काळातील मेळघाट, दळणवळणाची साधने, रस्ते, आरोग्य, शेती व शेती उत्पादन याबाबतीत सध्याची परिस्थिती काय आहे हेदेखील त्यांनी सांगितले. त्यांनी आपला जीवनपट उलगडत असताना अनेक बारीकसारीक गोष्टी आम्हाला सांगितल्या. सध्या त्यांनी शेतीतील केलेले नवनवीन प्रयोग दाखवले. आंब्याच्या बागा, आंतरपीक म्हणून घेतलेले हळदीचे पीक, लिंबूची बाग अगदी उत्साहाने आम्हाला दाखवली. त्यांच्या चिरंजीवांची शेती पाहण्यासाठी आम्ही गेलो होतो. त्यांनी लागवड केलेली केळी, खरबूज, टरबूज आणि इतर पिके, त्यांचं विपणन व्यवस्थापन हे त्यांच्याकडून आम्ही जाणून घेतले. त्यांचे हे वेगवेगळे प्रयोग पाहून अनेक शेतकरी अशा वेगवेगळ्या पिकांकडे वळत आहेत, हे त्यांनी सांगितले.
 

krushivivek 
 
आम्ही सर्व सेवानिवृत्त पशुवैद्यक असल्यामुळे, या ठिकाणी पशुसंवर्धनाला किती आणि कसा वाव आहे? याची गाडीतच चर्चा करत होतो. तोच प्रश्न आम्ही डॉ. रवींद्र कोल्हे यांना विचारला. ते स्वतः वैद्यकीय क्षेत्रातील असल्याने त्यांनी या विषयावर विस्ताराने चर्चा केली. त्यांनी स्वतः पाळलेल्या एका गायीपासून सुरू झालेला संसार, त्यातून उभे राहिलेले हे प्रचंड काम सांगत असताना आजच्या घडीला या मेळघाटात पशुसंवर्धन या विषयाला प्रचंड वाव असल्याचे निदर्शनास आणले. त्यासाठी सध्या आवश्यक असणार्‍या पूरक गोष्टी विशद केल्या. पूर्वी बहिरागड येथे असणारा पशुवैद्यकीय दवाखाना, कृत्रिम रेतन याबाबतही विस्ताराने सांगितले. सध्याच्या पशुसंवर्धन विभागाची परिस्थिती विशद केली. पण जर काही याबाबतीत कुणी काम केले तर विदर्भाला दूधपुरवठा करण्याची क्षमता मेळघाटात आहे, हे त्यांनी चर्चेअंती स्पष्ट केले. मुळातच आम्ही सर्वजण पश्चिम महाराष्ट्रातील होतो. पशुसंवर्धनाने या भागाचा केलेला कायापालट जवळून पाहिला आहे. आम्ही अकोला, अमरावती येथील सेवानिवृत्त अधिकारी, तसेच सध्या कार्यरत असणार्‍या अनेक अधिकार्‍यांशी चर्चा केली. स्थानिक लोकांशी बोललो त्यावेळी अनेक बाबी स्पष्ट झाल्या.
 

krushivivek 
 
काही प्रश्न, काही उत्तरे
 
मेळघाटातील गावांचा विकास करायचा असेल तर स्थानिकांच्या हाताला शाश्वत काम द्यावे लागेल. उत्पन्नाचे साधन म्हणून पशुसंवर्धनाकडे लक्ष द्यावे लागेल. मेळघाटातील कुपोषणावर पशुसंवर्धन हा नक्कीच उपाय होऊ शकतो. अनेक गावात आम्हाला कुपोषित मुले आढळली. पशुसंवर्धनाच्या आधारे प्राणिजन्य उत्पादने दूध, अंडी, मांस यांच्या माध्यमातून कुपोषण कमी करता येऊ शकते. सोबत उपजीविकेचे साधन देखील मिळू शकते. ‘आयसीएमआर‘ने काही भागात दूधवाटपाच्या कार्यक्रमातून कुपोषित मुलांच्या वजनामध्ये 15 ते 20 टक्के वाढ होऊ शकते हे सिद्ध केले आहे.
 
 
कोरकू समाजात एकात्मिक शेती (इंटिग्रेटेड फार्मिंग)चे प्रयोग केले गेले आहेत. त्यामध्ये कुक्कुटपालन, शेळीपालन आणि दुग्धव्यवसाय एकत्रित करण्यात आले होते. पायविहीर गावातील काही महिला बचतगट, शेळीपालन व त्याची विक्री व्यवस्था देखील पाहतात असे सांगण्यात आले. धारणी तालुक्यातील कोरकू शेतकर्‍यांनी मांसल कोंबड्या (ब्रॉयलर) युनिट यशस्वीरित्या चालवलेले आहेत. या सर्वांना गरज आहे ती सातत्याने मार्गदर्शनाची आणि मर्यादित स्वरूपात अनुदानाची. त्यामुळे कुपोषण कमी होण्यासह त्यांच्यासाठी उपजीविकेचे साधन निर्माण होण्यास निश्चित मदत होईल.
 
 
विस्तारकार्यातून सर्व गवळी समाज, कोरकू जनजाती यांना कृत्रिम रेतनाचे महत्त्व समजावून त्यांना त्या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे लागेल. या विभागामध्ये कृत्रिम रेतनाचे काम फक्त वीस ते पंचवीस टक्केच आहे. जनजाती समाजात स्त्रीप्रधान संस्कृती जपली जाते. त्यामुळे महिला बचतगट व महिलांचा सहभाग वाढवून पशुसंवर्धन पुढे घेऊन जाता येईल. डॉ. श्रीराम कोल्हे ज्येष्ठ पशुवैद्यक आहेत. त्यांनी सरकारी सेवेत असताना कुक्कुटपालनाबाबत पुढाकार घेऊन उबवणुकीची अंडी, एक दिवसाची पिल्लीवाटप केले होते. त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला होता, असे कळले. यामुळे मेळघाटातील कुपोषणाचा प्रश्नदेखील काही प्रमाणात कमी होऊ शकतो. कुक्कुटपालन व्यवसाय करण्यासाठी वन विभागाची काहीही हरकत नाही किंबहुना वनविभाग सुद्धा अशा प्रकारच्या योजना राबवण्यासाठी पुढाकार घेतो. या भागामध्ये काही सेवाभावी संस्था, टाटा फाउंडेशन, महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ नागपूर, वनविभागाच्या अंतर्गत मेळघाट टायगर फाउंडेशन यांनी कुक्कुटपालनासाठी चालना देण्याचा प्रयत्न केला आहे. फक्त त्यामध्ये सातत्य असणे गरजेचे आहे, हे विशेष नमूद केले.
 
 
स्वातंत्र्यपूर्व काळात 1924 मध्ये स्थापन झालेला आणि सध्या बंद पडलेला धारणी रस्त्यावरील ‘बोड फार्म‘ सुरू केला तरीदेखील मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल. बोड फार्म पुनर्जीवित करताना तेथील हवामानात तग धरणार्‍या नागपुरी म्हैशीचे प्रजनन व संवर्धन केले आणि स्थानिक देशी म्हशींना नागपुरीचे वीर्य वापरून त्यांच्यामध्ये जर अनुवंशिक सुधारणा केली तर फार मोठा बदल त्या विभागामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. सोबत अचलपुरी (इलीचपुरी) या म्हशीचे देखील प्रजनन व अनुवंशिक सुधारणा करता येऊ शकेल. या भागामध्ये 50% देशी गावठी गायी, 40% म्हशी आणि फक्त 10% संकरित गायी आहेत. या गावठी गायी फक्त दोन लीटर दूध प्रतिदिन देतात. स्वातंत्र्यपूर्व काळात स्थापन झालेला हा बोड फार्म सध्या भग्नावस्थेत आहे तो पुनर्जीवित करणे अत्यंत आवश्यक आहे. सेमाडोह, परतवाडा या ठिकाणी बंद पडलेले शासकीय दूध शीतकरण केंद्र सुरू करून मोठ्या प्रमाणामध्ये शासकीय स्तरावर दूधसंकलन करता येणार आहे. स्थानिक खाजगी दूधसंकलक दुधाला म्हणावा इतका दर देत नाहीत, असे अनेक पशुपालकांनी सांगितले. मुळात या ठिकाणच्या आहारामुळे गायी म्हशीच्या दुधाला फॅटदेखील भरपूर आहे. खवा-रबडी अनेक हॉटेलमध्ये सहज उपलब्ध होते.
 
 
गवळी आणि कोरकू समाजातील अनेक पशुपालक पारंपरिक दुग्धव्यवसाय करू लागलेत. त्यांना जर योग्य मार्गदर्शन मिळाले तर निश्चितच त्यांच्याकडे आधुनिक पद्धतीने दुग्धव्यवसाय करण्याची क्षमता आहे. पूर्वी वनखात्यात व सध्या पशुसंवर्धन विभागात काम करणारे डॉ. वैभव हागोणे यांनी नोंदवलेल्या निरीक्षणानुसार गवळी समाजासाठी दुग्धव्यवसाय व इतर जनजाती समाजासाठी कुक्कुटपालन, शेळी व बकरीपालन यासाठी प्रोत्साहित करावे लागेल. गवळी समाज उन्हाळ्यामध्ये स्थलांतर करतो. महिला स्थलांतरित गावात राहून वासराचे संगोपन करतात व कामाला हातभार लावतात. जनजाती समाजातील गोंड आणि कोरकू लोक स्थलांतर न करता, उन्हाळ्यात पुरुषमंडळी मजुरीसाठी इतरत्र जातात पण महिला स्थलांतर करत नाहीत. त्यांना मूळगावी कुक्कुटपालन सारख्या योजना प्रस्तावित केल्या तर निश्चित फायदा होऊ शकेल. जी विस्थापित गावे आहेत त्यांचा स्वतंत्र अभ्यास करून त्यांची गरज व आवड ओळखून त्यांना योग्य पर्याय दिला तर ते पुन्हा मूळ ठिकाणी परतण्यासाठी आग्रही राहणार नाहीत.
कोरकू, गोंड, निहाल, गावडी या जनजातींकडे औषधी वनस्पतींच्या माध्यमातून उपचार करण्याचे पारंपरिक ज्ञान असते.
 
 
गावातील वृद्धांकडे त्याचे ज्ञान असते. जे मौखिक परंपरेने त्यांच्याकडे आलेले असते. असे उपचार करणार्‍या आदिवासीला ‘भूमका’ किंवा ‘परिहार’ असे म्हणतात. ते मानव आणि जनावरांच्या दुखण्यावर देखील उपचार करतात. साधारणपणे उलटी, पातळ संडास, जखमा, फोड, सांधेदुखी, अस्थिभंग यावर ते उपचार करताना आढळतात. या भागातील महिला, महिला बचतगट यांना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना राबवता येतील. सरकारने याची दखल घेतली पाहिजे.
सेवानिवृत्त साहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, सांगली
Powered By Sangraha 9.0