घरगुती चव ते दमदार ब्रँड - अवंतिकाची ‘जयंतिका’ उभारणी

20 Dec 2025 13:16:06
jayantika foods
 
avantika  
उद्योजकतेचा प्रवास मोठ्या भांडवलाने नव्हे, तर धडपड, कौशल्य आणि संधी ओळखण्याच्या दृष्टीकोनातून घडतो. याच गोष्टींचा समन्वय पुणे येथील अवंतिका विजय सुकळकर यांच्या यशकथेत दिसून येतो. हैदराबादमध्ये शिकलेले लोणचे बनवण्याचे कौशल्य, पुण्यात आल्यानंतर घरगुती अन्नप्रक्रिया उद्योगाची सुरुवात, ग्राहकांचा वाढलेला विश्वास आणि कोरोना काळात वाढलेल्या मागणीने त्यांच्या उद्योगाने आधार घेतला ‘जयंतिका’ या ब्रँडनेमचा. आज त्यांची उत्पादने पुणे-मुंबईसह अनेक ठिकाणी लोकप्रिय होत आहेत. यामुळे घरगुती उद्योगाला नवे बळ मिळाले आहे.
 
कँडी वाफविण्यासाठी ठेवलेले आवळे उतरवणे, मिक्स लोणच्यासाठी गाजर, कोबी, हिरव्या मिरच्या निवडणे, चटणीसाठी आणलेल्या कडीपत्त्याची पाने निवडून ती धुणे, डिंक लाडूसाठी कोणता सुकामेवा आहे व कोणता नाही, याची नोंद घेऊन काजू, बदाम आपल्या पतीला आणायला सांगणे, त्याचवेळी एका ग्राहकाचा ऑर्डरसाठी आलेला फोन उचलून त्यांची व्यवस्थित ऑर्डर घेणे, शिवाय मुंबई येथील प्रदर्शनासाठी दुसर्‍या दिवशी जायचे असल्याने त्यासाठी बॅगा भरण्याची तयारी... ही सगळी कामे एकाच वेळी अवंतिका सुकळकर करीत असताना पाहिले की आपणही थक्क होऊन जातो. विशेष म्हणजे त्यांचा व्यवसाय घरातून एका छोट्या प्रक्रिया उद्योगात संक्रमण होण्याच्या काळात ही सर्व कामांची गडबड आणि त्यांची धावपळ जरा अधिकच होती. निर्मिती, ब्रँड प्रमोशन, विक्री हे सर्व तुम्ही एकटे करत असाल तर तुम्ही व्यवसाय चालवत नाहीत, तर व्यवसाय तुम्हाला चालवतो, असे म्हटले जाते. परंतु ग्रामीण भागातील एखाद्या सर्वसामान्य कुटुंबातील महिलेला व्यवसायात उतरायचे म्हटले तर सुरुवातीला ही सर्व कामे तिला एकटीलाच करावी लागतात, असे अवंतिका यांचे स्पष्ट मत आहे. 
 
धडे हैद्राबादमध्ये, व्यवसाय पुण्यात
 
किनवट-माहूर यासारख्या अत्यंत दुर्गम भागात जन्म, व्यवसाय-उद्योगासाठीचे वातावरण माहेरी अथवा सासरी असे कुठेही नाही, व्यवसाय सुरू करण्यासाठी कुठलेही प्रशिक्षण घेतले नाही, गुंतवणुकीसाठी फारसा पैसादेखील नाही, अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये अवंतिका यांनी पुण्यामध्ये घरगुती अन्नप्रक्रिया उद्योग सुरू केला. कष्ट, कल्पकता आणि जिद्द हेच अवंतिका यांच्या आतापर्यंतच्या यशाचे गमक म्हणावे लागेल. आज साठाहून अधिक प्रक्रियायुक्त पदार्थ करून त्यांची विक्री पुणे, मुंबईसह त्या देशभर करतात.
 
Jayantika Foods  
 
अवंतिका यांची आई सुगरण होती. त्यामुळे विविध पाककृती करण्याचा छंद अवंतिका यांना लहानपणापासूनच होता. अवंतिका यांचे पती विजय यांना लग्न झाल्यानंतरच हैद्राबादमध्ये एका ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली. तेथे त्यांच्या शेजारच्या महिला विविध लोणची घरीच बनवत होत्या. हे पाहून कैरी, लिंबू, टोमॅटो, अंबाडी, लाल मिरच्या अशी विविध लोणची घालण्याचे एकप्रकारे प्रशिक्षणच अवंतिका यांना मिळाले. 2012 मध्ये विजय यांना पुण्यात नोकरी मिळाली. तेथे आल्यावर आपल्या छंदाचे व्यवसायात रूपांतर करण्याचा विचार अवंतिका आणि विजय या दोघांच्याही मनात घोळत होता. पुण्यात अवंतिका यांच्या मैत्रिणी, शेजारील महिला, मुलीच्या शाळेतील शिक्षिका ह्या, आपल्या हाताला चव असल्याने पैसे घ्या पण आम्हाला चटण्या, लोणची, मसाले करून द्या, असा आग्रह करीत होत्या. अखेर 2017 मध्ये अगदी घरातूनच लोणची, चटण्या, मसाले, लाडू तयार करून त्यांनी विक्री सुरू केली.
 
 
कोरोना ः संकट अन् संधी
 
घरातून चाललेल्या व्यवसायात त्यांचा चांगला जम बसत होता. छोट्या-मोठ्या प्रदर्शनातूनही घरगुती उत्पादनांना चांगली मागणी होती. ग्राहकांच्या प्रतिक्रिया मनाला उभारी देणार्‍या होत्या. हळूहळू त्यांचा व्यवसाय वाढत असतानाच 2019 च्या शेवटी आलेल्या कोरोना आपत्तीत त्यांना आपल्या गावी (रुई, ता. माहूर जि. नांदेड) जावे लागले. त्यामुळे व्यवसाय पूर्णपणे बंद होता. जून 2020 मध्ये ते परत पुण्याला आले असता लॉकडाउन सुरू होते. त्यानंतर 2020 च्या उन्हाळ्यात कोरोनाची दुसरी लाट आली. त्यावेळी सर्व दुकाने वगैरे बंद असल्याने आधीच्याच ग्राहकांकडून उत्पादनांना ऑनलाइन मागणी होतच होती. कोरोना झाल्यावर रिकव्हरीसाठी पौष्टिक डिंक लाडूची मागणी या काळात वाढली. कोरोना काळात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये विविध उत्पादनांची निर्मिती आणि विक्री हे खूप जिकिरीचे होते. परंतु अवंतिका अत्यंत तत्परतेने सर्व ऑर्डर्सची पूर्ती वेळेत करीत होत्या. याच काळात खर्‍या अर्थाने त्यांचा व्यवसाय वाढला. तीन महिलांना त्यांनी या व्यवसायातून हंगामी रोजगार दिला.
 
Jayantika Foods  
 
उत्पादने विक्रीची माध्यमे
 
2020 मध्ये माणदेशी फाउंडेशनशी अवंतिका जोडल्या गेल्या. या संस्थेने त्यांना व्यवसायासंबंधित विविध विषयांचे प्रशिक्षण दिले. तसेच सिप्ला, अ‍ॅमडॉक, एचडीएफसी बँक, यशराज बायोटेक या कॉर्पोरेट कंपन्यांच्या पुणे, मुंबई येथील कार्यालयात तसेच माणदेशी महोत्सव, मुंबई येथेसुद्धा स्टॉल लावण्याची संधी दिली. सर्व उत्पादनांची गुणवत्ता आणि तत्पर सेवा यामुळे त्यांना येथील चांगला प्रतिसाद मिळाला. यशवंतराव चव्हाण सेंटर आणि रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर यांच्या संयुक्त विद्यमाने रिलायन्स मॉलमध्ये सुद्धा काही दिवस उत्पादने विक्री त्यांना करता आली. उत्पादने विक्रीसाठी समाजमाध्यमांचा वापर त्या अत्यंत खुबीने करतात. फेसबुक पेज, व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप, इन्टाग्राम यावर व्हिडीओ पोस्ट केल्या केल्या अनेक ऑर्डर्स त्यांना येतात. आयएफई स्टोअर्स या वेबसाईटवरूनही त्यांची उत्पादने मागविता येतात. पुण्यात पाच तर सुरतमध्ये एक महिला त्यांची उत्पादने रि-सेल करतात. भीमथडी जत्रा, गावरान खाद्य महोत्सव, माणदेशी महोत्सव अशा मोठ्या प्रदर्शनाबरोबर पुण्यात विविध भागांत भरणार्‍या छोट्या प्रदर्शनांतूनही जयंतिका उत्पादने घरोघरी पोहोचत आहेत. 15 हजार ग्राहकांचा डाटा बेस त्यांनी तयार केला आहे.
 
Jayantika Foods  
 
‘जयंतिका’ ब्रँडची कहाणी
 
उत्पादनांची विक्री वाढत असताना ती एखाद्या ब्रँडखाली आणणे गरजेचे होते. यावर विचार सुरू झाला असता विजय आणि अवंतिका यांच्या नावातील शेवटच्या दोन अक्षरांतून जयंतिका हे अर्थपूर्ण नाव त्यांना सुचले. त्यानंतर या नावाचा लोगो त्यांची मोठी लेक वसुंधरा यांनी स्वत: डिझाइन केला. त्यात सुरवातीच्या J अक्षरासाठी लाल मिरचीचा अत्यंत खुबीने वापर वसुंधराने केला. हा लोगो वर्षभरापूर्वी रजिस्टरही करून घेतला आहे. पण अत्यंत दुःखद बाब म्हणजे 24 ऑक्टोबर 2023 ला दुर्धर आजाराने वयाच्या केवळ 21व्या वर्षी वसुंधराचे निधन झाले. यातून सुकळकर दाम्पत्याला सावरणे कठीण होते. परंतु त्यांच्या लेकीचीच व्यवसायवृद्धीची प्रबळ इच्छा असल्याने त्याच्या पूर्तीसाठी लवकरच अवंतिका जोमाने कामाला लागल्या.
 
Jayantika Foods  
 
प्रक्रिया युनिट येते आकाराला
 
आतापर्यंत घरातूनच केला जात असलेला व्यवसाय छोट्या प्रक्रिया युनिटमध्ये स्थलांतरित होत आहे. व्यससायाची व्याप्ती वाढत असल्याने घरातून व्यवसाय करणे अवघड जात आहे. त्यांचे स्वत:चे घर (फ्लॅट) खराडी-आव्हाळवाडी परिसरात झाल्याने त्याच परिसरात प्रक्रिया युनिट आकाराला येत आहे. ही त्यांची खूप मोठी उपलब्धी म्हणावी लागेल. आतापर्यंत तरी बहुतांश त्यांची उत्पादने होम मेड म्हणण्यापेक्षा हँड मेड आहेत. पुढे प्रक्रियेसाठी लागणारी छोटे-मोठे यंत्रे त्यांना घ्यायची आहेत. परंतु पुण्यासारख्या ठिकाणी जागेची अडचण त्यांना येत आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत त्यांनी प्रक्रिया व्यवसायासाठी कोणतेही कर्ज अथवा योजना अनुदानाचा लाभ घेतला नाही. हळूहळू व्यवसायातील पैशांचीच गुंतवणूक ते यांत करीत आल्या आहेत. कष्ट हेच त्यांच्या व्यवसायाचे मुख्य भांडवल आहे.
 
 
शेतीमालाची नासाडी कमी करून त्यास अधिक भाव मिळावा, शिवाय ग्राहकांनाही भेसळ, अवशेषमुक्त शुद्ध सात्विक प्रक्रियायुक्त पदार्थांची चव चाखता यावी, हा त्यांच्या अन्नप्रक्रिया व्यवसायाचा मुख्य हेतू आहे. अन्नप्रक्रिया व्यवसायात अनेक संधी आहेत. ग्रामीण भागातील महिला, युवकांनी या व्यवसायात उतरायला पाहिजे. आपल्या भागात उपलब्ध शेतीमालावर प्रक्रिया केली तर त्यास चांगला भाव मिळेल, शिवाय रोजगार निर्मिती होईल, असा सल्ला अवंतिका सुकळकर देतात.
 
Jayantika Foods  
 
व्यवसायातील अडचणी व वैयक्तिक दुःखाला न जुमानता अवंतिका यांनी हार मानली नाही. उलट प्रत्येक संकटाला संधी मानत त्यांनी स्वतःचा मार्ग अधिक ठामपणे आखला. आज प्रक्रिया युनिटकडे वाटचाल करत असलेला ‘जयंतिका‘ब्रँड ग्रामीण महिलांसाठी प्रेरणादायी ठरतो आहे. इच्छाशक्ती, मेहनत आणि जिद्द असेल तर छोट्या पातळीवरुनही शाश्वत उद्योग उभा राहू शकतो, हे अवंतिका सुकळकर यांचे यश ठळकपणे सिद्ध होते.
 
 
उद्योजकतेचा प्रवास मोठ्या भांडवलाने नव्हे, तर धडपड, कौशल्य आणि संधी ओळखण्याच्या दृष्टीकोनातून घडतो. याच गोष्टींचा समन्वय पुणे येथील अवंतिका विजय सुकळकर यांच्या यशकथेत दिसून येतो. हैदराबादमध्ये शिकलेले लोणचे बनवण्याचे कौशल्य, पुण्यात आल्यानंतर घरगुती अन्नप्रक्रिया उद्योगाची सुरुवात, ग्राहकांचा वाढलेला विश्वास आणि कोरोना काळात वाढलेल्या मागणीने त्यांच्या उद्योगाने आधार घेतला ‘जयंतिका’ या ब्रँडनेमचा. आज त्यांची उत्पादने पुणे-मुंबईसह अनेक ठिकाणी लोकप्रिय होत आहेत. यामुळे घरगुती उद्योगाला नवे बळ मिळाले आहे.
Powered By Sangraha 9.0