शिशिरातील अतीव थंडीचा शरीर-मानस स्वास्थ्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठीच जणू आपण संक्रमण एका विशिष्ट पद्धतीने साजरे करतो. आपण तिळगूळ देऊन ‘तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे एकमेकांना आवर्जून सांगतो. ऋतूशी म्हणजे काळाशी निगडीत आवश्यक बदल सणांच्या माध्यमातून सहजतेने पेरले गेलेले आहेत. संक्रमणाचा परमोच्च बिंदू शिशिर त्याचा निरोप असा ’गोड’ करत आपल्याला उत्तरायणाच्या दारी अलगद सोडतो.
या वर्षी पावसाळा जरा जास्तच रेंगाळला. निसर्गचक्रातील शरद ऋतूचे म्हणजे ऑक्टोबर हीटचे दिवस कमी भरले पण हेमंताने मात्र अगदी पहिल्या दिवसापासून आपला प्रभाव दाखवायला सुरुवात केली आहे. वर्षादि सहा ऋतूंचे आपापले वैशिष्ट्य असले तरी ‘हिवाळा’ आपले खास स्थान राखून आहे.
ऋतुचक्रातील दोन संक्रमणापैकी ’ऋततो दक्षिणायन:’ म्हणजे उत्तम बळ देणारे असे श्रेष्ठ संक्रमण म्हणजे ’दक्षिणायन’! आणि या दक्षिणायनाचा परमोच्च काळ म्हणजे ’हेमंत आणि शिशिर’!
कमी घाम, कमी थकवा, उत्तम भूक, व्यायाम करण्यास येणारा उत्साह यामुळे शरीर आणि मन यांचे स्वास्थ्य वाढवण्यासाठी अतिशय उत्तम ऋतू. जे पदार्थ इतर ऋतूंत पचायला जड असतात ते या ऋतूची खास ओळख असतात. निसर्गातील थंड वातावरणाशी जुळवून घेताना शरीराच्या आत उष्मा कोंडला जातो आणि अनेक जड पदार्थ सहजतेने पचतात. याचाच फायदा घेत काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत घराघरांत हिवाळ्यासाठी अनेक खास पारंपरिक पदार्थ बनू लागतात. डिंकाचे अथवा मेथीचे लाडू असोत किंवा पंजाबातील प्रसिद्ध सरसों का साग आणि मक्के दि रोटी, पंजाबी पिन्नी, खानदेशातील कळण्याची भाकरी असो, गुजराती उंधियो खाण्याची अशी चविष्ट आणि पौष्टिक रेलचेल इतर ऋतूत आपल्याला क्वचितच सापडेल.
उत्तम पौष्टिक पदार्थ पचविण्यासाठी, व्यायाम करण्यासाठी उत्साही वातावरण, एकंदरीतच कमी थकवा अशा गोष्टींमुळे दक्षिणायनाचा हा परमोच्च काळ - स्वास्थ्य कमावण्यासाठी अतिशय उत्तम!
शिशिराची दुसरी बाजू
हळूहळू वाढणारी थंडी हेमंताकडून शिशिराकडे जात हवा कोरडी करू लागते. झाडाची पाने देखील कोरडी होत झाडापासून वेगळी होत झडू लागतात. ‘यथा लोके, तथा देहे’, या न्यायाने निसर्गात झालेले बदल शरीरावर देखील होऊ लागतात. बोचरी थंडी किंवा रुक्षता ही शिशिराची ओळख पटू लागते. शरीर देखील फक्त बाहेरूनच नव्हे तर आतून देखील कोरडे कोरडे होऊ लागते. शरीराची त्वचा, ओठ फक्त नाही तर आतले स्नायू, सांधे, हाडे देखील कोरडी पडू लागतात आणि मग हवीहवीशी थंडी सर्वांना नकोनकोशी होऊ लागते.
रुक्षता - विविध आजारांची नांदी
आपल्या शरीरात सातत्याने विविध कार्ये सुरू असतात. जराही विश्रांती न घेता कार्यरत राहणारे शरीर रोज थोडे थोडे झिजत राहते. नियमित व्यायाम, स्निग्ध आहार, वेळेवर झोप आणि क्षमतेएवढीच कामे करणे यामुळे ही झीज होण्याचा दर कमी होतो. या गोष्टी जितक्या साध्या आणि सोप्या वाटतात तितक्याच त्या प्रत्यक्षात आणणे कठीण आहे. रुक्षता वाढते म्हणजे काय, तर स्निग्धता कमी होते. सांधे, हाडांच्या आतील मज्जा, यातले वंगण (स्निग्धता) आपल्याला माहीत असते, पण या व्यतिरिक्त केसांपासून टाचेपर्यंत सगळ्या देहात ’स्निग्धता’ व्यापून असते.
आपल्यापैकी अनेक जण सातत्याने शरीर सतत खेचत असतात. अपुरी झोप, अजिबात स्निग्धता नसलेला आहार, व्यायामाचा अभाव अथवा अतिरेक किंवा चुकीचा व्यायाम, आणि क्षमतेच्या बाहेर अधिक काम करत राहाणे यामुळे शरीराचा झिजण्याचा दर वाढतच राहतो. जितकी रुक्षता अधिक तितके घर्षण जास्त, जेवढे घर्षण जास्त तेवढा कामांचा वेग कमी. मग सुरू होतो थकवा येणे, चिडचिड होणे, केस गळणे, त्वचा निस्तेज होणे, झोप नीट न लागणे, अकाली सांधे दुखणे, मणक्यांचे दुखणे सुरू होणे, पुढे पुढे रक्तवाहिन्या देखील कोरड्या आणि टणक होऊन रक्तावरचा भार वाढतो, हृदयाचे स्नायू कोरडे पडून त्यांची लवचीकता जाते आणि पर्यायी त्याच्या स्पंदनाला अडथळे येऊ लागतात. वर वर दिसणारा कोरडेपणा असा भयंकर रूप धारण करू शकतो. ज्यांच्या शरीरात रुक्षता आधीच वाढलेली असते त्यांच्यासाठी शिशिराचा काळ थोडा कठीणच जातो. अशा कोरडेपणासाठी फक्त शिशिरातच नाही तर वर्षभर आपण काळजी घेणे अत्यावश्यक आहे.
साचते ते जाचते
हेमंताच्या आधी येणार्या शरद ऋतूत म्हणजे बोलीभाषेत ऑक्टोबर हीटमध्ये साचलेली उष्णता काढून टाकली नाही तर अर्थातच पुढे हिवाळ्यात कोरडेपणा जास्त प्रमाणात वाढीस लागतो. आधी साचून ठेवलेले प्रमाण पुढे त्रास वाढवू लागते.
शिशिरात वाढणारी रुक्षता वेळीच कमी केली नाही तर शरीरावर दूरगामी परिणाम तर होतातच, पण त्याच्या पुढच्या ऋतूत म्हणजे वसंतात त्याचा त्रास जास्त होतो. उत्तरायण सुरू झाले की हळूहळू वाढणार्या उष्णतेमुळे शरीरात कफ पातळ होऊ लागतो. चिकट असा कफ वाताच्या कोरडेपणामुळे चिकटून बसतो. फुफ्फुसांना घट्ट चिकटून बसलेला कफ मग काही सुटता सुटत नाही आणि म्हणूनच वसंत ऋतूत सर्दी, खोकला आणि श्वास लागण्याचा त्रास जास्त होतो. मग हा कोरडेपणा वर्षागणिक वाढीस लागून अनेक आजारांची पार्श्वभूमी तयार होत राहते.
ऋतुचर्या
आयुर्वेदातील शाश्वत आणि सर्वत्र लागू होणार्या अनेक सूत्रांपैकी एक महत्त्वाचे सूत्र म्हणजे चयेदेव जयेत दोषान्! म्हणजे साचत असतानाच दोषांवर काम करून त्यांचा तिथेच अटकाव करायचा म्हणजेच ऋतूनुसार वागायचे.
गारठ्यामुळे शरीरात कोरडेपणा वाढू लागला की गार आणि रुक्ष या गुणांच्या विरुद्ध उष्ण आणि स्निग्ध गुणाची उपाययोजना करायची.
खरं तर आपल्या संस्कृतीत स्वास्थ्याशी आणि आहाराशी निगडीत गोष्टींची रेलचेल आहे. जानेवारीतील संक्रांतीला वाटण्यात येणारे तिळाचे लाडू, उडीदाचे घुटं अथवा बाजरीची भाकरी त्यातलाच एक भाग समजला पाहिजे. स्निग्ध आणि उष्ण अशा दोन्ही गुणांनी उत्तम असलेले तीळ आणि गूळ यांचा आहारात केलेला वापर, अंगाला उष्ण तीळ तेलाचे स्नेहन, स्वयंपाकात लाकडी घाण्याचे तीळ तेल वापरणे, अभ्यंग करून झाल्यावर यथाशक्ती योग्य तो व्यायाम करणे अशा सगळ्याच गोष्टींनी रुक्षता वाढीस लागतानाच ती पुरेशी आटोक्यात येऊ शकते.
या ऋतूत निसर्ग देखील भरभरून देत असतो. या काळात शेतातून बाजारात येणारा ऊस, ताजा हरभरा, ताजा मटार, चिंच, आवळे, बोर, सफरचंद, अंजीर, भुकेच्या वेळी या गोष्टी आहारात असाव्यात. या सगळ्या गोष्टींनीच तर आपण लहान बाळांचे बोर नहाण करतो - यात देखील आहाराचे स्वास्थ्याशी निगडीत ज्ञान पक्के करणे हाच उद्देश!
संक्रमण सांधणारा शिशिर
दक्षिणायण आणि उत्तरायण या दोन महत्त्वाच्या संक्रमणांना जोडणारा शिशिर खूप खास असतो. उत्तर गोलार्धात उन्हाळा सुरू होण्याआधीचा थंड काळ. अती थंड आणि रुक्ष वातावरणात मनाची अवस्था देखील रुक्ष होत जाते. कमी सूर्यप्रकाश अथवा सूर्यप्रकाश अजिबात नसणे या गोष्टीचा प्रभाव शरीरातील सेरोटोनिन नामक ‘हॅप्पी केमिकल’वर होतो. त्याचे घटलेले प्रमाण चिडचिड, नैराश्य, झोपेची समस्या, भूक नीट न लागणे अशी लक्षणे दाखवू लागते. यालाच अर्वाचीन शास्त्रात ’डशरीेपरश्र अषषशलींर्ळींश ऊळीेीवशी ेी ुळपींशी लर्श्रीशी’ म्हटले जाते.
शिशिरातील या अतीव थंडीचा शारीर-मानस स्वास्थ्यावर होणारा परिणाम टाळण्यासाठीच जणू आपण संक्रमण एका विशिष्ट पद्धतीने साजरे करतो - तिळगूळ देऊन ’तिळगूळ घ्या, गोड गोड बोला’ असे एकमेकांना आवर्जून सांगतो. ऋतूशी म्हणजे काळाशी निगडीत आवश्यक बदल सणांच्या माध्यमातून सहजतेने पेरले गेलेले आहेत. संक्रमणाचा परमोच्च बिंदू शिशिर त्याचा निरोप असा ’गोड’ करत आपल्याला उत्तरायणाच्या दारी अलगद सोडतो.
मग होताय ना सज्ज शिशिरासाठी?
शुभ शिशिर...