वनयोगी बाळासाहेब देशपांडे आणि वनवासी कल्याण आश्रम

20 Dec 2025 15:49:40
 
सुहास अंबादास पाठक
9421259386
वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांनी लावलेले वनवासी कल्याण आश्रमाचे छोटेसे रोपटे आज एका विशाल वटवृक्षात रूपांतरित झाले आहे. ’नगरवासी, ग्रामवासी आणि वनवासी - आपण सर्व आहोत भारतवासी’ हा मंत्र त्यांनी खर्‍या अर्थाने प्रत्यक्षात आणला. त्यांनी केवळ शाळा किंवा दवाखाने उघडले नाहीत, तर वनवासी समाजात ’स्व’त्वाची जाणीव आणि स्वाभिमान जागृत केला. त्यांचे कार्य हे केवळ समाजसेवा नसून ती एक अखंड राष्ट्रसाधना आहे. अ.भा.व.क.आश्रमाचे अध्यक्ष वनयोगी बाळासाहेब देशपांडे यांचा जन्मदिवस व कल्याण आश्रमाचा स्थापना दिवस (26 डिसेंबर 2025) हे औचित्य साधून बाळासाहेब देशपांडे यांचा जीवनपट आणि वनवासी कल्याण आश्रमाचा परिचय येथे देत आहोत.
 
rss
 
वनयोगी बाळासाहेब देशपांडे म्हणजेच रमाकांत केशव देशपांडे यांनी 26 डिसेंबर 1952 रोजी वनवासी बंधूंचा सर्वांगीण विकास या उदात्त उद्देशाने ’वनवासी कल्याण आश्रमाची’ स्थापना केली. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे 26 डिसेंबर 1913 साली झाला. त्यांचे शिक्षण एम. ए., एलएल.बी.पर्यंत झाले होते. त्यांना लहानपणापासूनच विविध पुस्तके वाचण्याची प्रचंड आवड होती. हायस्कूलमध्ये असताना त्यांनी रामकृष्ण मठातील अनेक पुस्तके वाचून आत्मसात केली. वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी स्वामी विवेकानंदांचे चरित्र वाचल्यानंतर त्यांच्या मनावर दरिद्री नारायणाची सेवा हीच ईश्वर सेवा हे वाक्य खोलवर रुजले, ज्यातून त्यांच्या भावी समाजसेवेच्या कार्याची बीजे रोवली गेली.
 
 
1926 मध्ये नागपूर येथे त्यांचा परिचय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्याशी झाला. या भेटीनंतर ते आणि त्यांचे बंधू संघाच्या शाखेत नियमितपणे जाऊ लागले, ज्यामुळे त्यांच्या राष्ट्रभक्तीच्या विचारांना अधिक बळ मिळाले. बाळासाहेब देशपांडे यांचा देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सक्रिय सहभाग होता. रामटेक येथे संघकार्यात सक्रिय असताना त्यांचा प.पू. श्रीगुरुजी (माधव सदाशिव गोळवलकर) यांच्या ’वुई’ या पुस्तकाच्या मुद्रितशोधनामुळे त्यांच्याशी जवळचा संबंध आला.
 
 
1942 साली महात्मा गांधींच्या आवाहनानंतर बाळासाहेबांनी ’भारत छोडो आंदोलना’त (Quit India Movement) सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी रामटेक येथे एका विराट मोर्चाचे नेतृत्व केले आणि तहसीलदार कचेरीवरील ब्रिटिशांचा ’युनियन जॅक’ खाली उतरवून तिथे मोठ्या धैर्याने तिरंगा ध्वज फडकावला. त्यामुळे त्यांना अटक करून कारागृहात टाकण्यात आले. तेथे त्यांना आचार्य विनोबा भावे, पं. रविशंकर शुक्ल आणि रामभाऊ रुईकर यांसारख्या थोर आणि प्रभावी व्यक्तींचा सहवास लाभला. ज्यामुळे त्यांच्या वैचारिक कक्षा रुंदावल्या.
 
 
मे 1943 मध्ये, तुरुंगातून बाहेर आल्यावर, त्यांचा वनमाला यांच्याशी विवाह झाला. त्यांनी काही काळ शासकीय नोकर्‍यांमध्ये काम केले. दुसर्‍या महायुद्धानंतर 1943 साली त्यांना रेशन दुकान तपासनीस (Ration Shop Inspector) ची नोकरी मिळाली. तेव्हा त्यांनी भ्रष्ट व्यापार्‍यांविरुद्ध तक्रार केली, परंतु शासकीय यंत्रणेने त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे त्यांनी तातडीने राजीनामा दिला आणि त्यानंतर भ्रष्ट व्यापार्‍याविरुद्ध वैयक्तिक केस (Private Case) दाखल केली. यात त्या व्यापार्‍याला दंडित केले गेले. पू. श्रीगुरुजींनी त्यांच्या या निर्भय आचरणाबद्दल आनंद व्यक्त केला. वृत्तपत्रांनीही त्यांच्या या धाडसाचे कौतुक केले, ज्यामुळे त्यांची नीतिमत्ता आणि निःस्वार्थ वृत्ती समोर आली.
 
 
आपला देश 1947 साली नुकताच स्वतंत्र झाला होता. मध्य प्रदेश त्यावेळचे सीपी अ‍ॅन्ड बरारचे मुख्यमंत्री पं. रविशंकर शंकर शुक्ला हे जशपुर भागात आले. त्यावेळी हजारो जनजातीय बंधूंनी काळ्या झेंड्यांनी स्वागत केले. जय झारखंड, गो बॅक रविशंकर हे दृश्य पाहून ह्या भागात काय चालले आहे याचा सर्व्हे करण्यासाठी पू. ठक्करबाप्पांनी क्षेत्रात भ्रमण केले. तेव्हा कळले की, रोमन कॅथॉलिक चर्च सरकारी कामांना विरोध करत होते. देश स्वतंत्र झाला आहे हे ते मान्य करत नव्हते. विदेशी फादर तेथे ठाण मांडून बसले होते. त्यामुळे तातडीने आदिवासी क्षेत्रात सरकारने काम करायचे ठरवले. त्यासाठी माणूस कोण तर श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांची निवड करण्यात आली.
 
 
मे 1948 मध्ये मध्यप्रदेश शासनाने त्यांना जशपूरमध्ये पिछडा वर्ग कल्याण विभाग (Backward Classes Welfare Department) अंतर्गत क्षेत्रीय संयोजक (area Organiser) पदावर नियुक्त केले. केवळ एका वर्षात, त्यांनी अतिशय कठीण परिस्थितीत, विशेषतः वनवासी (जनजाती) मुलांसाठी 100 शाळा स्थापन केल्या. अनेक सरकारी जागांवर ख्रिश्चन मिशनने अतिक्रमण केले होते. सर्वप्रथम त्याजागी सरकारी शाळा सुरू केल्या. देशपांडे यांचे कार्य बघण्यासाठी पूज्य ठक्कर बाप्पा रस्त्याने येत असतांना दुतर्फा हजारो लोक उभे होते. भारतमाता की जय, वंदे मातरम्, जयहिंद या घोषणांनी आसमंत दुमदुमून गेला होता. हे दृश्य पाहून ते खूश झाले. ठक्कर बाप्पा यांनी त्यांना 251/-ची भेट देऊन सन्मानित केले. सरकारी शाळा सुरू झाल्यामुळे मिशनरींनी चालवलेल्या शाळांची एकाधिकारशाही संपुष्टात आली. या शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास धर्मांतर करावे लागत असे, ती सक्ती बाळासाहेबांच्या प्रयत्नांमुळे बंद झाली.
 
 
जशपूर येथे कार्यरत असतानाच त्यांच्या कार्याला वेगळी दिशा मिळाली. ते शासकीय नोकरीत असताना, सायमन दुलार नावाचा एक जण जो मिशनरी शाळेत शिक्षक होता, त्यांना त्यांच्या कार्यालयात भेटायला आला. बाळासाहेबांनी त्याला ख्रिश्चन धर्मांतराचे परिणाम समजावून सांगितले. त्यांनी ’आपल्या पूर्वजांचा धर्म सोडून या स्वधर्मातील लोकांशी भांडणे करणे कसे चुकीचे आहे’, हे स्पष्ट केले. त्यांनी वनवासी समाजाच्या चंद्र, सूर्य, जलदेवता आणि निसर्गाची पूजा करण्याच्या मूळ सांस्कृतिक मूल्यांची आठवण करून दिली. हे ऐकून सायमन दुलारच्या डोळ्यांतून अश्रू आले आणि त्याने तत्काळ ख्रिस्ती धर्म सोडून स्वधर्मात परत येण्याचा (घरवापसी) निर्णय घेतला. नोकरी गमावण्याची भीती असतानाही सायमनने हा निर्णय घेतला. तेव्हा बाळासाहेबांनी त्याला आपल्या (शासकीय) शाळेत नोकरी दिली. बाळासाहेब देशपांडे यांचे मत होते की, ख्रिश्चन बनणे ही (Christianity) ही केवळ 'Skin Deep' (वरवरची) गोष्ट आहे. ठक्कर बाप्पा अशा लोकांना 'Rice Christians' (पोटासाठी धर्मांतर केलेले) म्हणत असत. त्यामुळे मोठ्या संख्येने होणार्‍या धर्मांतरामुळे ते कधीही विचलित झाले नाहीत, तर आपले मूळ सांस्कृतिक कार्य चालू ठेवण्यावर त्यांचा ठाम विश्वास होता.
 
 
rss
 
कल्याण आश्रमाची स्थापना
 
वनवासी समाजाच्या सेवेसाठी पूर्णवेळ देण्यासाठी बाळासाहेबांनी 1952मध्ये शासकीय नोकरीचा राजीनामा दिला. जशपूरचे राजे श्रीमंत विजय भूषण सिंह जु देव यांनी त्यांना निवास करण्यासाठी बालाजी मंदिराच्या जवळ मातीचे एक मोठे घर दिले, जिथे ते शेवटपर्यंत राहिले. त्यांनी जशपूर नगरला वकिलीचा व्यवसाय सुरू केला, जेणेकरून आश्रमाच्या कार्यासाठी आर्थिक आधार मिळू शकेल. कल्याण आश्रमाच्या कार्यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोरुभाऊ केतकर (खंडवा जिल्हा प्रचारक) यांना बाळासाहेबांच्या मदतीला पाठवले. मोरुभाऊ हे त्यांचे पहिले व निष्ठावान सहकारी ठरले. बाळासाहेब आणि मोरुभाऊंनी माध्यमिक शाळा व छात्रावास (वसतिगृह) सुरू करण्याचा निर्णय घेतला. जशपूर महाराजांनी बालाजी मंदिराजवळील जुन्या राजवाड्याच्या काही खोल्या निवासासाठी दिल्या. मोरुभाऊंनी या खोल्यांची साफसफाई केली. पुढे 26 डिसेंबर 1952 (पौष शुक्ल दशमी, विक्रम संंवत 2008) या शुभमुहूर्तावर बाळासाहेबांनी राजवाड्याच्या अंगणात होमहवन केले. आसपासचे वनवासी बंधू आणि जशपूरचे नागरिक उपस्थित होते. याच वेळी मुलांचे वसतिगृह व माध्यमिक शाळा सुरू करण्याची घोषणा त्यांनी केली. 1952-53 या पहिल्या सत्रात पाचवी इयत्तेचा वर्ग सुरू झाला. वसतिगृहात एकूण 13 विद्यार्थी दाखल झाले. मोरुभाऊ केतकर हे शाळेचे एकमेव शिक्षक आणि वसतिगृह प्रमुख होते. सर्वजण त्यांना प्रेमाने ’गुरुजी’ म्हणत. मोरुभाऊंनी मुलांसाठी कठोर दिनचर्या निश्चित केली (सकाळी 4:30 ते रात्री 10:00), ज्यात भारतभक्ती स्तोत्र, सूर्यनमस्कार, व्यायाम, खेळ, रामायण पाठ, भजन, शाळा, शाखा आणि स्वाध्याय यांचा समावेश होता. मुलांमध्ये स्वावलंबन, अनुशासन आणि नेतृत्व विकास यांवर विशेष लक्ष दिले जाई. ही परंपरा आजही कल्याण आश्रमात चालू आहे.
 
बाळासाहेबांनी आश्रमाच्या आर्थिक व्यवस्थेसाठी एक कठोर नियम निश्चित केला होता.
 
स्वाभिमानाचे तत्त्व: कुणाजवळही आर्थिक मदतीसाठी जायचे नाही; कार्य असे व्हावे की दानदाता स्वतःहून धन देईल.
 
स्वयं-निर्भरता: ते स्वतःच्या वकिलीच्या उत्पन्नातून आश्रमासाठी आवश्यक पैसे मोरुभाऊंना देत असत.
 
प्रथम देणगी आणि आश्रयदाते: जशपूरचे राजे श्रीमंत विजयभूषणजी यांनी बाळासाहेबांना सुमारे 6,000/- (सहा हजार) ची रक्कम दिली. अशा प्रकारे राजेसाहेबांचे लक्ष कल्याण आश्रमाकडे होते आणि ते आश्रयदात्याची भूमिका निभावत होते.
 
संस्थेचे नामकरण : 1953 साली श्रीमंत विजयभूषणजी, वनयोगी बाळासाहेब आणि मोरुभाऊ यांच्या सहमतीने संस्थेला अधिकृतपणे कल्याण आश्रम हे नाव दिले गेले.
 
कार्याचा विस्तार आणि प्रमुख टप्पे
 
कल्याण आश्रमाच्या कार्याचा विस्तार बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली वाढत गेला आणि अनेक महत्त्वपूर्ण टप्पे गाठले.
1954 : नियोगी कमिशन - या आयोगाने ख्रिस्ती मिशनरींच्या देशद्रोही षडयंत्राचा भांडाफोड केला आणि धर्मांतर रोखण्याच्या कार्याला वैचारिक बळ मिळाले.
 
1962-63 : श्रद्धा जागरण प्रकल्प - वनवासी समाजाच्या मूळ श्रद्धा आणि संस्कृतीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी 114 ठिकाणी रामायण व भजन केंद्रे सुरू झाली. विष्णुयाग व शतचंडी यांसारखे धार्मिक कार्यक्रम संपन्न झाले.
 
1965 : स्वास्थ्य प्रकल्प - वनवासी भागातील आरोग्यसेवा सुधारण्यासाठी दवाखाना सुरू करण्यात आला.
 
1975 : आणीबाणी आणि तुरुंगवास - जून 1975 मध्ये देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हा बाळासाहेबांना अटक करून रायपूरच्या जेलमध्ये 19 महिने ठेवण्यात आले.
 
1977 : अखिल भारतीय कार्याचा श्रीगणेशा - कल्याण आश्रमाचे कार्य अखिल भारतीय स्तरावर सुरू झाले.
 
ऑक्टो. 1981 : प्रथम अ. भा. संमेलन - निजामुद्दीन, दिल्ली येथे पहिले अखिल भारतीय संमेलन संपन्न झाले. यामध्ये विविध राज्यांतील प्रतिनिधींनी भाग घेतला.
 
1981 : नागालँडचे जेलियांगजींचे मतपरिवर्तन - या संमेलनात इंदिरा काँग्रेसचे महामंत्री एन.सी. जेलियांगजी उपस्थित होते. ते म्हणाले की, ते हिंदू नाहीत, परंतु मिशनरींच्या कार्याला विरोध करण्यासाठी आले आहेत. संमेलन समाप्तीनंतर त्यांनी बाळासाहेबांना सांगितले, मला असे वाटते की आम्हीपण हिंदू आहोत. विभिन्न क्षेत्रातील वनवासी लोकांशी वार्तालाप, कार्यक्रम आणि नृत्ये पाहून त्यांना आपल्या मूळ सांस्कृतिक संकल्पनांमध्ये समानता आढळली, ज्यामुळे त्यांना आपल्या शुद्ध स्वरूपाची जाणीव झाली.
 
 
1987-88 : एकलव्य खेलकूद प्रकल्प - 14 जानेवारी 1987 ला प्रकल्पाचा शुभारंभ झाला आणि जानेवारी 1988ला मुंबई येथे प्रथम अखिल भारतीय खेलकूद स्पर्धा संपन्न झाली, ज्यामुळे वनवासी युवकांना राष्ट्रीय स्तरावर संधी मिळाली.
 
बाळासाहेबांनी राष्ट्रीय स्तरावर वनवासींच्या समस्यांची दखल घेण्यासाठी महत्त्वपूर्ण पावले उचलली.
 
युनो षडयंत्रावर निवेदन (2 जुलै 1992): बाळासाहेबांनी तत्कालीन पंतप्रधान नरसिंह राव यांना इंडियन कौन्सिल ऑफ इंण्डिजनस अँड पीपुल्स या संघटनेच्या भारतविरोधी गतिविधीबद्दल निवेदन दिले. युनो (UNO) द्वारा मूळ निवासींच्या आत्मनिर्णयाच्या अधिकारावर चर्चा होणार होती. या चर्चेच्या आडून भारतातील जनजातींना भारतापासून वेगळे करण्याचे षडयंत्र रचले जात होते. बाळासाहेबांनी ठामपणे सांगितले की, भारतातले सर्व निवासी हे मूळ निवासीच आहेत. त्यांनी भारत सरकारला युनोमध्ये भारताच्या हिताचे रक्षण करण्याचा आग्रह केला, कारण भारतीय संविधानाने जनजाती समुदायासाठी सर्वतोपरी चिंता केली आहे. भारत सरकारने त्यांचे म्हणणे मान्य केले आणि त्यानुसार भूमिका घेतली.
 
 
बाळासाहेबांचा परमेश्वरावर अत्यंत विश्वास होता. ते मानत असत की कल्याण आश्रमाचे कार्य हे ईश्वरीय कार्य आहे. त्यांची कार्याबाबतची मते अशी होती:
 
धर्मांतर: ख्रिश्चन मिशनरी जनजाती समाजाच्या अज्ञान, गरीबी आणि दुर्बलतेचा फायदा घेऊन धर्मांतर घडवून आणतात, जे पूर्णपणे अनुचित आहे.
 
 
घरवापसी: घरवापसी तेव्हाच केली पाहिजे जेव्हा व्यक्ती स्वप्रेरणेने व विचारपूर्वक तयार असेल. लोभ, लालूच किंवा दबाव यासाठी धर्मांतर किंवा घरवापसी उचित नाही (उदा. सायमन दुलारचे उदाहरण).
 
राष्ट्रीय कार्य: कल्याण आश्रमाचे कार्य हे राष्ट्रीय कार्य आहे आणि वनवासी क्षेत्राची समस्या ही राष्ट्रीय समस्या आहे, जी सर्वांनी मिळून दूर केली पाहिजे.
 
भारत सरकारने 15 नोव्हेंबर हा जनजाती गौरव दिवस म्हणून घोषित करून जनजाती वीर-वीरांगनांचा उचित सन्मान केला आहे. भारताला विकसित आणि आत्मनिर्भर बनविण्यासाठी जनजातीय युवकांबरोबर सर्व क्षेत्रातील युवकांमध्ये राष्ट्रीय भाव समोर ठेवून नेतृत्व देण्याची आवश्यकता आहे. युवकांनी या कार्यात येण्याचे आवाहन कल्याण आश्रम करीत आहे.
 
कर्मभूमीत अंतिम श्वास
 
1993 मधील कटक, ओडिशा येथील संमेलन बाळासाहेबांचे शेवटचे अखिल भारतीय संमेलन ठरले. शरीर साथ देत नसल्याने त्यांनी कल्याण आश्रमाची धुरा आदरणीय जगदेवराम उरांवजींना कार्यकारी म्हणून सोपवली. वनवासी बंधूंच्या सर्वांगीण विकासाचे कार्य निरंतर, अविरत आणि अथकपणे करत कर्मयोगी श्रद्धेय बाळासाहेब देशपांडे यांनी 21 एप्रिल 1995 रोजी जशपूर नगर या त्यांच्या कर्मभूमीत अंतिम श्वास घेतला.
 
कल्याण आश्रमाचे विविध कार्य आयाम
 
वर्तमान अध्यक्ष सत्येंद्र सिंह यांच्या नेतृत्वाखाली आज कल्याण आश्रम आसेतुहिमाचल (काश्मीर ते कन्याकुमारी) पर्यंत विस्तारित झाला आहे. आज कल्याण आश्रम केवळ शिक्षण आणि आरोग्यापुरता मर्यादित नसून, वनवासी जीवनाच्या प्रत्येक अंगाला स्पर्श करत आहे.
 
आर्थिक स्वावलंबन: ग्रामविकास प्रकल्पांच्या माध्यमातून वनवासी भागात शेती सुधारणा, कौशल्य विकास आणि गृहउद्योगांना चालना दिली जाते.
 
महिला सक्षमीकरण: वनवासी महिलांसाठी बचत गट आणि स्वयंरोजगार प्रशिक्षण केंद्रे चालवली जातात.
 
संस्कृती रक्षण: ’हितरक्षा’ आयामांतर्गत वनवासींच्या जमिनीचे रक्षण, त्यांच्या पारंपरिक अधिकारांची जपणूक आणि लोककलांचे संवर्धन केले जाते.
 
आपत्ती व्यवस्थापन: नैसर्गिक आपत्तीच्या काळात वनवासी भागात तत्काळ मदत पोहोचवण्यात आश्रम नेहमीच अग्रेसर असतो.
आज वनवासी कल्याण आश्रम ही जगातील सर्वात मोठी गैर-सरकारी (स्वयंसेवी) संस्था मानली जाते जी केवळ जनजातींच्या कल्याणासाठी समर्पित आहे. भारतातील 50,000 पेक्षा जास्त गावांमध्ये प्रत्यक्ष कार्य असून 20,000 पेक्षा अधिक प्रकल्प
 
(शिक्षण, आरोग्य आणि ग्रामविकास) सुरू आहेत. हजारो पूर्णवेळ कार्यकर्ते आणि लाखो हितचिंतकांचे जाळे देशभर आहे.
 लेखक वनवासी कल्याण आश्रमाचे पश्चिम क्षेत्र शिक्षण आयाम प्रमुख आहेत.)
Powered By Sangraha 9.0