@डॉ. श्रीहरी हसबनीस
9022651287 / 7588034068
आंबा व चिकू ही कोकणासह महाराष्ट्रातील अत्यंत महत्त्वाची, आर्थिकदृष्ट्या लाभदायक फळपिके आहेत. परंतु गेल्या काही वर्षांत या फळबागांमध्ये बांडगूळ या परजीवी वनस्पतीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढताना दिसत आहे. बांडगूळ हे झाडावरच वाढणारे परजीवी असून ते मुख्य झाडाचे अन्न, पाणी व पोषकद्रव्य शोषून घेत असल्यामुळे झाडाची वाढ खुंटते, फुलधारणा कमी होते, उत्पादन घटते आणि शेवटी झाड मरून जाण्यापर्यंत परिस्थिती ओढवू शकते. अनेक शेतकरी या बांडगुळाकडे गांभीर्याने पाहत नाहीत किंवा योग्य वेळी योग्य उपाययोजना करत नाहीत. त्यामुळे बागांचे मोठे नुकसान होत आहे. बांडगूळ म्हणजे नेमके काय, ते कसे पसरते, त्याचे दुष्परिणाम कोणते आणि शास्त्रीय पद्धतीने त्याचे वेळीच निर्मूलन कसे करावे, याबाबतची सविस्तर माहिती या लेखातून स्पष्ट होईल.
बांडगूळ हा शब्द अगदी सर्वांच्या चांगलाच परिचयाचा आहे. दैनंदिन बोलीभाषेत सुद्धा आपण बांडगूळ या शब्दाचा उपयोग करतो. याचा अर्थ असा की, स्वतः काहीही न करता पूर्णपणे दुसर्यावर विसंबून राहणे. अशाच प्रकारे निसर्गात विविध फळ पिकांच्यावर बांडगूळे येतात. नावाप्रमाणेच ते स्वतःच अन्न स्वतः पूर्णपणे तयार करत नाहीत. इथे मी पूर्णपणे हा शब्द वापरला. कारण, बांडगुळांमध्ये पण दोन प्रकार आहेत.
1. जे पूर्णपणे दुसर्या पिकांवर अन्नासाठी विसंबून असतात.
2. दुसरा प्रकार म्हणजे अन्नासाठी काही प्रमाणात दुसर्या फळझाडावर किंवा वनस्पतीवर विसंबून असतात.
उदाहरण द्यायचं झालं तर, बर्याच ठिकाणी आपल्याला अमरवेल वाढलेला दिसतो. विशेषतः कंपाउंडमध्ये खूप दिसतो. पिवळ्या रंगाच्या पोकळ तारा आपल्याला खूप प्रमाणात वाढलेल्या दिसतात. हे संपूर्णपणे दुसर्या वनस्पतीवरती विसंबून आहेत. आता इथे पूर्णपणे हा शब्द वापरला कारण, या पिवळ्या काड्यांना पाने नसतात. स्वतःचं अन्न ते स्वतः तयार करत नाहीत. ज्या झाडांच्या वर ते पसरतात त्यांच्याकडून संपूर्ण अन्न शोषून घेतात आणि जोरदारपणे वाढतात.
स्वरुप व व्याप्ती
या लेखाचा मूळ विषय आहे, आंबा व चिकू फळबागेवरील बांडगूळे. ही अमरवेलपेक्षा वेगळी असतात. या बांडगूळांना हिरवी पाने असतात. यांना फुलं आणि फळ म्हणजेच बिया पण येतात. यास पाने आहेत आणि पाने हिरवी आहेत. याचा अर्थ असा की, सूर्यप्रकाशात गर्भग्रहण करून म्हणजेच प्रकाश संश्लेषणातून हरितद्रव्यामार्फत अन्न तयार करतात. असे असूनही त्यांना बांडगूळ म्हणतात, कारण कोणत्याही पिकांची किंवा फळझाडांची मुळे जमिनीत जातात आणि जमिनीतून अन्न, पाणी म्हणजे पाण्यामध्ये विरघळलेली अन्नद्रव्ये शोषून घेतात आणि वाढतात. पण चिकू आणि आंबा इत्यादी फळपिकांवरील बांडगुळांना जरी हिरवी पाने असली तरी यांची मुळे जमिनीत जाऊन अन्नद्रव्ये शोषून घेत नाहीत. त्याऐवजी या बांडगुळांची मुळे झाडाच्या खोडामध्ये आत घुसतात. म्हणजे ज्या झाडांच्यावर हे उपजीविका करणार आहेत, विसंबून आहेत, त्याच्याच खोडामध्ये घुसतात. या बांडगुळांची मुळे चिकू व आंबा अशा फळपिकांच्या खोडामध्ये घुसतात आणि या खोडामधून वाहत असलेली अन्नद्रव्ये शोषून घेतात.
येथे होतं काय? तर आंब्याच्या किंवा चिकूच्या खोडामध्ये वहन होणार अन्नद्रव्य हे आंबा किंवा चिकू फळझाड स्वतःच्या वाढीसाठी, फुले येण्यासाठी, आंबे किंवा चिकू तयार होण्यासाठी असतं. मात्र ते तयार अन्न ही बांडगूळे शोषून घेतात आणि वाढतात. गर्भग्रहण क्रियेतून सूर्यप्रकाशामध्ये हिरवी पाने अन्न तयार करतात; परंतु त्यासाठी लागणारे जे अन्नघटक आहेत, म्हणजे पाण्यामध्ये विरघळलेले मातीतच येणारे ते मात्र स्वतः न घेता आयते (रेडीमेड)आंब्याच्या किंवा चिकूच्या खोडातून घेतात आणि बहरतात.
अगदी छान आकर्षक अशी यांना फुले येतात. बिया पण येतात. पक्ष्यांना या बिया खूप आवडतात. हेच कारण आहे की बांडगूळे एका झाडाकडून दुसर्या झाडाकडे पसरतात. ती या पक्ष्यांच्यामुळे. या पक्ष्यांच्या वाटे बियांचा प्रसार होतो. मग ज्या ठिकाणी बिया पडतील. जसे की, झाडांच्या खोबणीत, फांदीच्या खोबणीत तेथे पावसाळ्यात ओल असली की रुजतात आणि त्यांची पुन्हा लागण होते.
आता वर सांगितल्याप्रमाणे, आंबा किंवा चिकूसारख्या फळझाडांनी तयार केलेले अन्न मोठ्या प्रमाणात बांडगुळेच वापरतात. परिणामी मुख्य पोशिंदा म्हणजे आंबा किंवा चिकू कमकुवत होतात. भरपूर फुल येणे, फळ येणे हे शक्य होत नाही. अशी झाड निस्तेज दिसून, कालांतराने मरूनही जातात. बर्याच ठिकाणी चांगल्या जातिवंत आंबा किंवा चिकूच्या झाडांमध्ये उत्पादन घटण्याचे बांडगुळांची लागण, हे एक महत्त्वाचे कारण आहे.
या बांडगुळांचा योग्य वेळी, योग्य रीतीने नायनाट केला पाहिजे. आता हा डिसेंबर महिना आहे. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात आंबा फळझाडांना मोहोर येण्याची वेळ असते. त्याची प्रक्रिया सुरू झालेली असते. मोहोर आल्यानंतर किंवा तत्पूर्वी आपल्याला ही बांडगुळे डिसेंबर महिन्यातच काढून टाकली पाहिजेत. थोड्या मोहराच्या फांद्या गेल्या तरी चालतील परंतु बांडगुळांचा नायनाट केलाच पाहिजे. यासाठी नोव्हेंबर-डिसेंबर हा कालावधी योग्य. यालासुद्धा शास्त्रीय आधार कारण आहे, आपण हेच जर जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर महिन्यांत म्हणजे मोहोर यायला अवकाश आहे म्हणून जर करायला गेलो तर फक्त बांडगुळांच्या ऐवजी आणखी एका मोठ्या उपद्रवी किडीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. ती कीड म्हणजे भिरूड किंवा खोडकिड. या भिरूड किंवा खोडकिडीची मादी, अंडी घालण्यासाठी आंब्याच्या फळझाडांच्या फांद्या, खोड शोधत असते. तिला खोडावरती जखम आहे याचा वास म्हणजे सुगावा लागला की, तिथे ती अंडी घालते. मग ती अंडी उबतात. त्यातून अळी बाहेर येते. ते खोड पूर्ण पोखरते. म्हणजे बांडगूळ निर्मूलन करायचा असेल तर आपल्याला जुलै-ऑगस्ट महिन्यामध्ये करायचे नाही ते एवढ्यासाठी. तसेच जुलै-ऑगस्ट महिना हा पावसाचा असतो. आपण झाडांच्या केलेल्या जखमा लवकर भरून येत नाहीत. पाऊस असल्यामुळे, ओलावा असल्यामुळे त्या जखमा कुज होण्यामध्ये रूपांतरित होतात व फांदी कुजते. म्हणूनच नोव्हेंबर-डिसेंबर हा बांडगूळे निर्मूलन करण्यासाठी योग्य कालावधी आहे.
आता ही बांडगुळे काढायची कशी?
आपण जर झाडाकडे वर मान करून पाहिले तर बांडगुळांची पाने वेगळ्या प्रकारची असतात. ती आखूड व थोडीशी पिवळसर असतात. आंब्याच्या फांद्या ह्या उंच वर मान करून वाढत असतात. परंतु बांडगुळांची मात्र वाढ ही जमिनीकडे झुकलेली असते. त्यामुळे आपल्याला सहज अगदी दुरूनसुद्धा बांडगूळे वाढलेली लक्षात येतात.
अशा लागण झालेल्या म्हणजे बांडगुळांची लागण झालेल्या फांद्या निरखून, पाठीमागे म्हणजे जिथे बांडगुळाची मुळे फांदीत घुसलेली दिसतात तेथे एक ते दोन फूट फांदी कापावी लागते. लहान असेल तर एक फूट कापावी. बांडगूळ जर खूप वर्षांचा असेल, मोठा असेल तर दोन फूट किंवा त्यापेक्षा जास्त अंतरावर आपल्याला फांदी कापून टाकली पाहिजे म्हणजे बांडगुळांचे मुळासहित उच्चाटन होईल.
आणखीही तणनाशक फवारणीच्या उपाययोजना आहेत. परंतु त्या रासायनिक आहेत. निसर्गास धरून नाहीत. अपायकारक आहेत. म्हणून त्या करण्यापेक्षा प्राधान्याने वर सांगितल्याप्रमाणे बांडगूळे निर्मूलन नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात करावे. जेणेकरून आपल्या आंबा किंवा चिकू बागेचे आरोग्य उत्तम राहील आणि भरघोस उत्पन्न मिळेल.
येथे मी बांडगूळे कशी ओळखावी, याचं वर्णन मुद्दाम केले आहे. कारण मुंबईजवळ कर्जत परिसरात मोठमोठे फार्म आहेत. तिथे एका फार्मवर मी पाहिलंय की, बांडगूळे आहेत म्हणून शेंड्याजवळ असलेली सर्व ऑर्किड्स काढून टाकलेली होती. ऑर्किड ही दुर्मिळ वनस्पती आहे. कोकणातल्या दमट हवामानात मोठ्या प्रमाणात आंब्याच्या झाडावर दिसून येतात. ती बांडगूळे नाहीत. ती फक्त आंब्याच्या फांद्यांचा आधार घेतात आणि वाढतात. या ऑर्किडना (तशपवर ीि.) मे-जून महिन्यात अतिशय आकर्षक सुंदर अशी जांभळी फुले येतात. छान असा वास येत असतो. त्यामुळे निसर्गातील आपल्याला लाभलेली ही देणगी आपण बांडगूळे समजून काढून टाकू नये.
- निवृत्त कृषी अणुजीव शास्त्रज्ञ आणि विभाग प्रमुख, वनस्पती रोग शास्त्र कृषी महाविद्यालय, पुणे 411005
प्रस्तावित श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठ, डेरवण, चिपळूण, जि. रत्नागिरी
श्री विठ्ठलराव जोशी चॅरिटीज ट्रस्ट , डेरवण, चिपळूण, जि. रत्नागिरी 415606