मुंबई महापालिकेसाठी दोन भावांमध्ये झालेली युती हा प्रीतीसंगम आहे की भीतीसंगम, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
आपल्या आजोबांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीत दिलेले योगदान आणि वडिलांनी राजकीय पक्ष उभारून मराठी माणसांसाठी केलेले काम या भांडवलावरच आपली राजकीय पोळी भाजू पाहणारे ठाकरे बंधू अखेर मुंबई महापालिकेचे निमित्त साधून एकत्र आले. पहिल्याच्या हातून वडिलांचा अधिकृत राजकीय पक्ष गेला आणि महाविकास आघाडीत काही केल्या जम बसला नाही. ‘हाती राहिले धुपाटणे’, अशी अनवस्था आपल्या कर्माने ओढवून घेतलेले हे ठाकरे कुलभूषण. तर दुसर्याला काकांविरोधात बंडाचा झेंडा उभारून खटकेबाज भाषणांपलिकडे आणि एक डाव नाशिक महापालिका घेण्यापलिकडे गेल्या 19 वर्षांत काही म्हणता काही भरीव साध्य झाले नाही. नाही म्हणायला, या बंधुद्वयांच्या दोन भव्य वास्तू याच कालखंडात उभ्या राहिल्या. थोडक्यात, व्यक्तिगत भौतिक उत्कर्षापलिकडे दोघांनीही ना मराठी माणसाच्या हितासाठी काही ठोस काम केले ना महाराष्ट्रासाठी. भर सभेत सत्ताधार्यांना व्हिडीओच्या धमक्या देण्यात धन्यता मानणारा धाकटा तर सत्तेच्या लोभापायी सतत असंगाशी संग करणारा थोरला.
पक्ष संपायला येण्याएवढी गळती दोघांच्याही पक्षांना लागल्यानंतरही, ‘आजही महाराष्ट्रात आपलीच वट चालते‘, या भ्रमातून दोघेही बाहेर पडायला तयार नाहीत. सभांना होणारी (की आणलेली?) गर्दी म्हणजे आपले मतदार नव्हेत याची जाणीव इतक्या सभा आणि निवडणुकांनंतरही दोघांना झालेली नाही.
मुंबई आणि नाशिक महापालिकेसाठी उद्धवसेना आणि मनसे यांच्यात युती झाल्याची घोषणा पत्रकार परिषद घेऊन करण्यात आली. मात्र जागावाटपाबद्दल आपण इतक्यात काही सांगणार नाही, हे (कसनुसे) हसत उद्धव यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यात काही गोड गुपित नाही, तर अजून जागावाटपाचा तिढा सुटलेला नाही, असा याचा अर्थ आहे हे जनतेलाही कळून चुकले आहे.
वास्तविक अशी युती करावी लागणे ही दोघांवरही ओढवलेली नामुष्की आहे, हे त्यांनाही कळून चुकले आहे. तरीही आव असा आणला आहे की जणू, यांच्या एकत्र येण्यावरच मराठी जनतेचे हित अवलंबून आहे. ‘यह जो पब्लिक है, वो सब जानती है...’ या सुप्रसिद्ध हिंदी चित्रपट गीताचा बहुदा त्यांना विसर पडला असावा.
थिल्लर आणि पोरकट विनोद करणे हे थोरल्याचे आणि चमकदार कोट्या करून टाळ्या मिळवणे हे धाकट्याचे हेच आणि एवढेच दोघांचे अनुक्रमे भांडवल. सत्तेच्या राजकारणात सरशी होण्यासाठी वा प्रभाव पाडण्यासाठी यापलिकडचे गुणविशेष अंगी असावे लागतात, नसल्यास अंगी बाणवावे लागतात. एवढ्या गांभीर्याने राजकारणाकडे पाहिले असते तर हे जमणे अवघड नव्हते. पण इतके कष्ट कोण घेईल, हा प्रश्न आहे.
कधी हिंदू कार्ड वापरायचे तर कधी मराठीचे कार्ड वापरायचे. शब्दश: ही कार्डे वापरायची, ती स्वत:च्या भल्यासाठी. नुकत्याच लागलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निकालांनी तर महाराष्ट्रातील राजकारणाची सद्यस्थिती सर्वांसमोर उघड झाली. काही काळापासून भाजपाची लाट ओसरल्याचे जे चित्र विरोधक रंगवत होते ते खोेटे असल्याचे निकालांनी दाखवून दिले. या निकालात जनतेच्या अपेक्षांचे प्रतिबिंब आहे. जो याकडे दुर्लक्ष करेल तो स्वत:च्याच पायावर कुर्हाड मारून घेईल. राज्यातल्या नगरपालिकांच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी प्रचार सभाच घेतल्या नाहीत तर आदित्य ठाकरेंनी ग्रामीण भागाकडे दुर्लक्ष केले. एकीकडे बोलघेवडेेपणा करत महाराष्ट्राला उमाळा दाखवायचा आणि दुसरीकडे मुंबई म्हणजेच महाराष्ट्र असे मानत वर्तन ठेवायचे. ते ही उघडपणे. शिवसेना फुटल्यानंतर आणि मूळ शिवसेना शिंदेंकडे गेल्यानंतरही बाळासाहेबांवरच्या निष्ठेपोटी जे ग्रामीण भागातले शिवसैनिक उद्धव यांना धरून राहिले होते. त्यांच्याकडे उद्धव आणि त्यांच्या चिरंजिवांनी पाठ फिरवली आणि डॅमेज कंट्रोल करण्याऐवजी पक्ष सोडून गेलेल्यांना शेलकी दूषणे देण्यात धन्यता मानली.
मुंबई महापालिकेसाठी दोन भावांमध्ये झालेली युती हा प्रीतीसंगम आहे की भीतीसंगम, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. अगदी काहीच महिन्यांपूर्वी बेस्टच्या निवडणुकीसाठी दोन भाऊ एकत्र आले होते. तिथेही भ्रमाचा भोपळा फुटला. ती निवडणूक पेपर बॅलटवर होऊनही हे दोघेही हरले.
विधानसभा निवडणकीच्या वेळी मुस्लीमबहुल वस्त्यांमध्ये जाऊन मतांचा जोगवा मागताना उबाठा गटाने हिंदुत्व खुंटीला टांगून ठेवले. छत्रपती संभाजीनगर इथे ज्यांनी नामांतराला विरोध केला अशांना मातोश्रीवर उबाठा गटात प्रवेश दिला गेला. तामिळनाडूत कार्तिगाई दीप प्रकरणात हिंदूंच्या बाजूने निर्णय देणार्या न्यायाधीशांवर महाभियोग दाखल करण्यासाठीच्या अर्जावर सही करणारे उबाठा गटाचे हिंदू खासदार होते. हे सगळे हिंदू मतदार पाहात आहे. त्याचा हिशेब वेळोवेळी चुकताही करत आहे. तरीही हे भाऊ बदलण्याचे नाव घेत नाहीत. ‘सत्तातुराणां ना भयं, ना लज्जा...‘ हेच सिद्ध करण्याचा दोघांनी जणू विडा उचलला आहे.
तिकडे मविआतले राहुल गांधी मतचोरीचे तेच तुणतुणे विदेशातही वाजवत आहेत तर ठाकरे बंधू माणसे पळवणार्या टोळ्या अशी सत्ताधार्यांची संभावना करत सभांमध्ये हशा आणि टाळ्या घेण्यात धन्यता मानत आहेत. मूर्खांच्या नंदनवनात राहणारे हे तथाकथित राजकारणी. ना यांना जनहिताची चाड आहे ना मनाची. त्यातूनच ज्याच्याशी काडीमोड घेतला त्याच्याशीच पुन्हा जमवून घेण्याची नामुष्की ओढवली आहे. ज्याच्या वरचष्म्यामुळे शिवसेना सोडून 19 वर्षांपूर्वी धाकट्याने वेगळा राजकीय संसार थाटला त्याच दोघांना आज परिस्थितीने(की नियतीने?) एकत्र येणे भाग पाडले आहे.