धुरंधरच्या निमित्ताने...

25 Dec 2025 18:31:49
आदित्य धर दिग्दर्शित धुरंधर या चित्रपटाची निर्मिती आणि त्याला मिळणारा प्रतिसाद जसा कुटील कंपूला खटकला तसाच हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने पाकिस्तानलाही मिरच्या झोंबल्या आहेत. या चित्रपटाने राष्ट्र प्रथम यावर भाष्य केले आहे. तसेच भारतीय चित्रपटाला यशस्वी होण्यासाठी स्वतःची ओळख पातळ करण्याची गरज नाही आणि हॉलीवूडचे अंधानुकरण करण्याचीही गरज नाही. धरने हे सिद्ध केले की, चित्रपट आपल्या मुळांशी जोडलेला राहूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सिनेमॅटिक असू शकतो.
 
dhurandhar movie
 
आदित्य धर यांनी दिग्दर्शित केलेला धुरंधर हा एका अर्थाने गुप्तहेराचा साहसपट त्याच्या निर्मितीमूल्यांमुळे, सादरीकरणामुळे आणि पात्रांच्या सुयोग्य निवडीमुळे तसेच त्यांच्या स्वाभाविक अभिनयामुळे जगभर गाजत आहे. पण त्याचबरोबर एक नवी चर्चा या चित्रपटामुळे हमरीतुमरीवर आलेली आहे आणि या चित्रपटावर टीका करणार्‍या कंपूचे असे म्हणणे आहे की, हा चित्रपट कमी आणि प्रोपोगंडापट जास्त आहे. कोणता प्रोपोगंडा हा चित्रपट राबवतो असा विचार केला तर, तो खर्‍या अर्थाने देशभक्तीचा प्रोपोगंडा होय. राष्ट्र प्रथम हा प्रोपोगंडा आहे. जर हाच प्रोपोगंडा असेल तर मग आदित्य धर यांनी जे केले ते योग्य म्हणावे की या कुटील कंपूचा विरोध योग्य म्हणावा? हे सुजाण नागरिकांनीच ठरवले पाहिजे.
 
 
या चित्रपटाची निर्मिती आणि त्याला मिळणारा प्रतिसाद जसा या कुटील कंपूला खटकला तसाच हा चित्रपट प्रदर्शित झाल्याने पाकिस्तानलाही मिरच्या झोंबल्या आहेत. हासुद्धा समसमासंयोग म्हणायला हरकत नाही. भारतात राहून भारताचीच मीठभाकरी खाणारे नतद्रष्ट विचारवंत या चित्रपटावर असा आरोप करतात की, भलेही हा पाकिस्तानची दहशतवादी काळी कृत्ये जगासमोर आणणारा आणि देशभक्तीची भलावण करणारा चित्रपट असेल तरीही तो केवळ त्या देशाचा एकच पैलू प्रकर्षाने समोर आणतो आणि फुटीच्या विचारांची पेरणी करतो. म्हणजे भारताचा द्वेष करून पाकिस्तानने जे काही दहशतवादाचे पीक घेतले आहे ते या कंपूच्या गावीही नाही की काय?
 
 
 
या नतद्रष्टांचा दुसरा आरोप असा आहे की, हा तर सरकारसमर्थित आणि सरकारप्रोत्साहित विचारसरणीचा नरेटिव्ह अगदी विश्वासपात्र सेवकाप्रमाणे मांडणारा चित्रपट आहे व ही गोष्ट आता भारतात सर्वसामान्य झालेली आहे. सरकारने या चित्रपटासाठी संशोधन करण्यासाठी काही कागदपत्रे उपलब्ध करून दिली असतील किंवा मुंबईवरील कसाबचा दहशतवादी हल्ला होत असताना तो घडवून आणणारे म्होरके व दहशतवादी यांच्यातील खरेखुरे संभाषण लोकांना ऐकण्यासाठी चित्रपटात उपलब्ध झाले आहे त्यामुळे जणूकाही सरकारनेच या चित्रपटाची निर्मिती करण्याचे पाप केले आहे असा या कंपूचा कांगावा आहे.
 
 
हिृतिक रोशन या भोंगळ नटाने आपल्या सुमार अकलेचे प्रदर्शन या चित्रपटावर भाष्य करताना केले आणि त्यामुळे त्याच्यावर टीकेची झोड स्वाभाविकपणे उठली, हेदेखील कंपूला खटकले आहे. त्याला मुस्कटदाबीला सामोरे जावे लागत आहे याबाबत या लोकांना खेद वाटत आहे. या नटाने जोधा अकबर या चित्रपटातून अकबराचे उदात्तीकरण केले होते. त्यामुळे प्रेक्षकांनी स्वाभाविकपणे असे मत व्यक्त केले की, बर्बर वृत्तीच्या अकबराचे तू अक्षरश: उदात्तीकरण केलेस आणि आज धुरंधर चित्रपटाला तू प्रोपोगंडा संबोधतोस. तुला लाज वाटली पाहिजे. असे म्हटल्यामुळे सदर प्रेक्षक कंपूच्या दृष्टीने हिंदुत्ववादी पर्यायाने तिरस्करणीय ठरलेला आहे. तसेच धुरंधर चित्रपट हिंदू राष्ट्रवादाकडे प्रेक्षकांना घेऊन जातो आणि सध्याच्या भारत सरकारच्या धोरणाचेच खुले समर्थन करतो असे यांचे म्हणणे आहे. आता, हा आरोप समजावा की प्रशंसा हेच लक्षात येणे अवघड झाले आहे. या चित्रपटामुळे प्रेक्षकांच्या मुस्लीम पाकिस्तान आणि हिंदू भारत असे विभाजन माथी मारण्यात आले आहे, असाही स्वयंघोषित समीक्षकांचा दावा आहे. पण याच लोकांना हवस का पुजारी यासारखा शब्दप्रयोग कसा खटकत नाही? या चित्रपटावर टीका करणारे लोक या चित्रपटाने जे घडवून आणले आहे त्याने अस्वस्थ झाले आहेत. कारण चित्रपट काय घडवतो हे या बेरकी लोकांना पक्के माहीत आहे. शोले हा बहुचर्चित चित्रपटदेखील कसा प्रोपोगंडापट होता हे त्यांना माहीत आहे. गावात राहण्याला कंटाळून आणि आपल्या अंध पित्याला एकटे सोडून जो शहरात नोकरीसाठी पलायन करू इच्छितो अशा अहमदची भूमिका अभिनेते सचिन यांनी रंगविली आहे. पण शहरात राहण्याचे स्वप्न पाहणार्‍या अहमदचा गावाबाहेर पडताना गब्बरच्या हातून अकाली अंत होतो. तेव्हा रहिमचाचा चतुराईने नरेटिव्ह सेट करतात तो असा, या गावावर कुर्बान होण्यासाठी मला आणखी मुले का दिली नाहीत हे मी खुदाला विचारेन. वास्तविक पाहता जय आणि वीरू हे गावावर कुर्बान होण्यासाठी लढा देत असतात, पण शहीद मात्र अहमद ठरतो. याला म्हणतात फेक नरेटिव्ह.
 
 
याच लोकांचा असाही दावा आहे की, जणू हा चित्रपट सध्याच्या भारत सरकारनेच पडद्यामागे राहून निर्माण केलेला आहे. कारण यात योगी आदित्यनाथ यांचा राष्ट्रवादी मुख्यमंत्री असा पुसट उल्लेख आहे आणि या चित्रपटाने आपला शेवट या उक्तीने केलेला आहे की, यह नया भारत है, घर में घुस के मारता है... जे नरेंद्र मोदी यांचेच प्रसिद्ध झालेले वाक्य आहे. आता यात भारतीयांनाच खटकण्यासारखे काय आहे? ज्याला हे शब्द खटकतील तो देशभक्त तर सोडाच पण भारतीय म्हणवून घेण्याच्याही लायकीचा आहे का याचा विचार केला पाहिजे. पण टीकाकारांची हौस इतक्यातच भागत नाही. पाकिस्तान हा सैतानी वृत्तीचा देश आहे व जगातील सर्व दहशतवादाची मायभूमी आहे हे चित्रपटातील पात्र म्हणते ही गोष्टही या लोकांच्या पचनी पडत नाही. यांचा असा विलाप आणि प्रलाप आहे की, मुंबईवर हल्ला झाला होता तेव्हा पाकिस्तानातील वृत्तपत्रांनी त्याचा निषेध व्यक्त केला होता व इस्लामच्या नावाखाली गैरकृत्ये केली जाण्याबाबत खेद दर्शविला होता, भारतीयांची यात हिंसा घडून आल्याबाबत क्षमायाचनाही केली गेली होती... हे काहीच या चित्रपटातून दिसून येत नाही यासाठी कुटील कंपूला मनस्वी खेद वाटतो. दिग्दर्शकाने हे हेतुपुरस्सर दाखविण्याचे टाळलेले आहे असे त्यांचे मत आहे. असे जर यांचे ठाम मत असेल तर हे लोक पाकिस्तानचे नागरिकत्व मिळविण्यासाठी अर्ज तरी का बरे करीत नाहीत? त्याच भूमीवर या लोकांचा यथोचित सन्मान केला जाईल. यांची दुखरी नस पुढे सांगते की, भाजपा सरकारवर कंदहार विमान अपहरण प्रकरणी केलेली सौम्य टीका वगळता, संपूर्ण चित्रपटभर काँग्रेस व बिगरभाजपा सरकारवर मनसोक्त दोषारोपण केले आहे. एवढे की, बनावट नोटांच्या प्रकरणात 2005 मध्ये एक केंद्रीय मंत्री गुंतलेला दाखविले आहे. तत्कालीन उत्तर प्रदेश सरकार आणि तेथील कत्तलखाने यांचीही टीकेतून सुटका झालेली नाही. लोकांना माहीत नाही कत्तलखाने कोण लोक चालवितात ते? देशशत्रू बाहेर नसून देशांतर्गतच आहेत, असे हा चित्रपट सांगतो. म्हणजे अस्तनीतील निखार्‍यांना कुरवाळण्याचा सल्ला या कंपूला द्यायचा आहे का?
 
खरे म्हणजे मनोरंजनाच्या मामल्यात राजकारण आणू नये. पण मौजेची गोष्ट अशी की, भारतीय जनता पार्टीला आपले हिंदुत्त्ववादी किंवा कट्टर राष्ट्रनिष्ठ असे ब्रँडिंग करण्याची सांप्रत गरजच उरलेली नाही. विरोधी पक्षातील अनेक बोलघेवडे लोक आणि त्यांची तळी उचलून धरणारे टीकाकार आपल्या बोलण्यातून हे ब्रँडिंग अधिक कुशलपणे करत चालले आहेत.
 
--------------
 
 रामगोपाल वर्मा यांच्या मते, सर्व चित्रपट निर्माते धुरंधरकडून शिकू शकतील असे काही आगळेवेगळे धडे या चित्रपटाने दिलेले आहेत.
 
1. इतर तथाकथित पॅन इंडिया मोठ्या चित्रपटांप्रमाणे, हा चित्रपट स्लो मोशन आणि कानठळ्या बसवणार्‍या पार्श्वसंगीताचा वापर करून नायकाला मोठे दाखवण्याचा व प्रेक्षकांना जबरदस्तीने नायकाची पूजा करायला लावण्याचा प्रयत्न करत नाही. उलट, तो नायकाच्या उणिवा आणि त्याचे परिणाम एकत्र अस्तित्वात राहू देतो, ज्यामुळे टाळ्यांचा कडकडाट होण्याऐवजी प्रेक्षकांमध्ये तणाव निर्माण होतो. हे अविश्वसनीय आहे की, स्टार असलेल्या रणवीरने अक्षयला फ्रेममध्ये जागा देण्यासाठी स्वतःला मागे ठेवले, कारण ती कथेची गरज होती आणि हे रणवीरला सिनेमाची किती समज आहे याचाच पुरावा आहे.
 
2. बहुतेक चित्रपट स्पष्टीकरण देत राहतात, त्याउलट धुरंधर काही गोष्टी अस्पष्ट ठेवतो. इतर चित्रपटांमधील पटकथेची पानेच्या पाने जे स्पष्टीकरण करू शकत नाही, ते शांततेचे लांबलेले क्षण येथे साध्य करून दाखवतात.
 
3. हा चित्रपट हिंसेकडे केवळ एक दृश्य म्हणून नाही, तर एक मानसिक आघात म्हणून पाहतो. एजाज गुलाब यांनी अ‍ॅक्शन दिग्दर्शक म्हणून उत्कृष्ट काम केले आहे, ज्यांना टाळ्या मिळवणार्‍या क्षणांची पर्वा नाही, तर त्यांनी पात्रांना आणि त्यांच्या वर्तमान मनःस्थितीला हिंसेच्या प्रत्येक बिंदूत साठवलेले आहे. त्यांचा प्रत्येक प्रहार आणि दृश्य चित्रपट संपल्यानंतरही, नैतिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचा भावनिक परिणाम मागे सोडतो.
 
4. हा चित्रपट तीन अंकांच्या साचेबद्ध रचनेचा त्याग करतो. कथा वास्तविक जीवनाप्रमाणे पुढे सरकते. असमान, आवेगपूर्ण, कधीकधी अचानक, व्यवस्थित चढ-उतार आणि समाधानकारक निष्कर्षांना नाकारणारी अशी ती आहे.
 
5. हा चित्रपट प्रेक्षकांच्या बुद्धिमत्तेवर निर्विवादपणे विश्वास ठेवतो. येथे कोणतेही सोपे स्पष्टीकरण नाही, भावनांचा अनावश्यक वापर नाही. अर्थ शोधावा लागतो, तो थेट सांगितला जात नाही.
 
6. हा चित्रपट ध्वनीसंयोजनाला एक प्रमुख पात्र बनवतो; पार्श्वभूमीतील आवाज, श्वासोच्छ्वास, दूरचा गोंधळ यांसारख्या गोष्टींसह संपूर्ण ध्वनी चित्रपटात केवळ साथसंगत न राहता एक मानसशास्त्र बनतो.
 
7. हा चित्रपट कोणत्याही विशिष्ट प्रकाराशी (जॉनर) प्रामाणिक राहत नाही, कारण तो राजकीय थ्रिलर, व्यक्तिरेखा अभ्यास, तीव्र अ‍ॅक्शन चित्रपट आणि नैतिक शोकांतिका यांसारख्या अनेक प्रकारांचे मिश्रण करतो, ज्यामुळे चित्रपटाचे क्षितिजच बदलून जाते.
 
8. पहिल्यांदाच मी असा अनुभव घेतला की पार्श्वसंगीत हे मुख्य संगीत बनते. कधी नायकत्वाची भावना अनुभवायची, कधी घाबरायचे, किंवा कधी सुटकेचा निःश्वास सोडायचा. सततची अस्वस्थता, पण भावनिक चढ-उतारांनी भरलेली, हाच या चित्रपटाचा खरा साउंडट्रॅक आहे, जो अकल्पनीय प्रतिभावान अशा शाश्वत यांनी साकारला आहे.
 
9. धुरंधर सिनेमाकडे प्रेक्षक अनुभवाऐवजी एक संघर्ष म्हणून पाहतो. कारण त्याचे फक्त साडेतीन तास मनोरंजन होत नाही, तर चित्रपट संपल्यानंतरही आणि कदाचित कायमस्वरूपी प्रेक्षकाला त्यासोबत राहायचे आहे.
 
************************************************************************
 
दोन दिग्दर्शकांमधला अर्थपूर्ण संवाद 
 
dhurandhar movie
 
रामगोपाल वर्मा यांच्या मते, सर्व चित्रपट निर्माते धुरंधरकडून शिकू शकतील असे काही आगळेवेगळे धडे या चित्रपटाने दिलेले आहेत.
 
या चित्रपटाबाबत रामगोपाल वर्मा हे नामवंत दिग्दर्शक सांगतात - आदित्य धर फिल्म्सने संपूर्णपणे आणि एकट्याने भारतीय चित्रपटसृष्टीचे भविष्य बदलवून टाकलेले आहे... कारण ’धुरंधर’ हा केवळ एक चित्रपट नाही... तो एक क्वांटम लीप आहे.
 
 
’धुरंधर’ जे साध्य करतो ते केवळ भव्यता नाही, तर एक असा अभूतपूर्व दृष्टीकोन आहे, जो केवळ डोळ्यांनाच नाही, तर मनालाही जाणवतो. आदित्य धर येथे दृश्यांचे दिग्दर्शन करत नाहीत... ते पात्र आणि आपल्या प्रेक्षकांच्या मनःस्थितीची रचना करतात.
 
 
हा चित्रपट तुमचे अवधान मागत नाही... तो त्यावर हुकूम गाजवतो. पहिल्याच शॉटपासून, अशी भावना येते की काहीतरी अपरिवर्तनीय घडायला सुरुवात झाली आहे, आणि प्रेक्षक आता केवळ प्रेक्षक न राहता, पडद्यावर घडणार्‍या घटनांचे भागीदार बनतात. धर यांना हे समजते की, कथाकथनातील शक्ती मोठ्या ध्वनी परिणामात नसते... ती एक दडपण निर्माण करण्यात असते. प्रत्येक दृश्य आकुंचन पावत जाते जणू काही एखादी स्प्रिंग गुंडाळली जाते आणि ती कधी तुटेल हे आपण जाणत नाही. आणि जेव्हा ती तुटते, तेव्हा त्याचा परिणाम केवळ अंगावर येणाराच नसतो, तर तो एका सिम्फनीप्रमाणे भव्य आणि नाट्यमय असतो.
 
 
चित्रपटातील अभिनय केवळ मनोेरंजनासाठी साकारलेले नाहीत, तर थिएटरमधून बाहेर पडल्यानंतरही ते दीर्घकाळ स्मरणात राहावेत यासाठी साकारलेले आहेत. पात्रे आपल्या खांद्यावर इतिहासाचे ओझे घेऊन येतात, आणि पात्रांची पार्श्वभूमी त्यांच्या व्यथांसह प्रेक्षक सहजपणे वाचू शकेल एवढा विश्वास त्यांना आहे त्यामुळे चमचा घेऊन भरवण्याचा मोह टाळला आहे.. हा आत्मविश्वास, ज्याला सहजपणे अहंकार समजले जाऊ शकते, नेमकी हीच गोष्ट ’धुरंधर’ला भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरवते. धर असे मानतात की आपले प्रेक्षक हुशार आहेत. हा दिग्दर्शकाने प्रेक्षकांना दिला गेलेला सर्वोच्च सन्मान आहे.
 
 
पण कौशल्याच्या पलीकडे, ’धुरंधर’ला खर्‍या अर्थाने उंचावणारी गोष्ट म्हणजे त्याचा हेतू. हा चित्रपट ट्रेंड्सचा किंवा मान्यतेचा पाठलाग करणारा नाही. ही एक गंभीर घोषणा आहे की, भारतीय चित्रपटाला यशस्वी होण्यासाठी स्वतःची ओळख पातळ करण्याची गरज नाही आणि हॉलीवूडचे अंधानुकरण करण्याचीही गरज नाही. धरने हे सिद्ध केले की, चित्रपट आपल्या मुळांशी जोडलेला राहूनही आंतरराष्ट्रीय स्तरावरचा सिनेमॅटिक असू शकतो.
 
जेव्हा चित्रपटाची अंतिम श्रेयनामावली पडद्यावर दिसते, तेव्हा तुम्हाला फक्त मनोरंजन झाल्यासारखे वाटत नाही, तर तुम्हाला स्वतःमध्ये बदल झाल्यासारखे वाटते. आणि हीच एका अशा चित्रपट निर्मात्याची ओळख आहे,
 
***
राम गोपाल वर्मा यांना आदित्य धर यांनी अतिशय समर्पक उत्तर दिले आहे - सर, आपले जर हे ट्विट एखादा चित्रपट असता, तर मी तो पहिल्या दिवशी पहिला शो पाहिला असता, शेवटच्या रांगेत उभा राहिलो असतो आणि मी स्वत: बदलूनच बाहेर आलो असतो. मी वर्षांपूर्वी एक सूटकेस, एक स्वप्न आणि राम गोपाल वर्मा यांच्या हाताखाली एके दिवशी काम करेन या एका अतार्किक विश्वासाने मुंबईत आलो होतो. तसे कधी घडले नाही. पण कुठेतरी, नकळत, मी तुमच्या सिनेमाच्या आतच काम केले. तुमच्या चित्रपटांनी मला चित्रपट बनवायला शिकवले नाही तर त्यांनी मला धोका पेलून विचार करायला शिकवले...आता मी पुढे जे काही करेन, ते या ट्विटच्या तोडीचे असले पाहिजे.
 
तुम्ही माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहात. जर मी प्रेक्षकांना हुशार मानले असेल, तर ते तुमच्यामुळेच. माझ्या आतला चाहता भारावून गेला आहे. माझ्या आतल्या चित्रपट निर्मात्याला आव्हान मिळाल्यासारखे वाटत आहे. आणि राम गोपाल वर्मा यांच्या हाताखाली काम करण्यासाठी मुंबईत आलेला तो मुलगा... अखेर स्वतःची ओळख मिळाल्याचे अनुभवत आहे.
 
***
 
राम गोपाल वर्मा यांनी आदित्यचे उत्तर वाचून त्याला कळविले की- अरे, नेमक्या याच कारणामुळे सिनेमा पुढे जातो, जेव्हा एक दूरदृष्टी असलेला माणूस दुसर्‍याला आणखी पुढे जाण्यासाठी प्रेरणा देतो. तू माझ्या सिनेमाच्या चौकटीत काम केले नाहीस. तू त्यातून बाहेर पडलास. आणि ते असंच असायला हवं. जर एखादा चित्रपट निर्माता फक्त त्याच्यावर झालेल्या प्रभावांचीच पुनरावृत्ती करत असेल, तर तो फक्त एक चाहता असतो. पण जेव्हा तो ते प्रभाव आत्मसात करतो आणि नंतर त्यातून बाहेर पडून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करतो, तेव्हा तो एक नवीन शक्ती बनतो आणि तू तीच बनला आहेस. ’धुरंधर’ने मला प्रभावित केले कारण त्याने मला माझ्या कोणत्याही कामाची आठवण करून दिली नाही. त्याने मला प्रभावित केले कारण त्याने कोणाच्याही मान्यतेची अपेक्षा केली नाही. हे दुर्मीळ आहे. हेच धैर्य आहे. हाच नवीन सिनेमा आहे. जो मुलगा मुंबईत आला होता, तो आता ’धुरंधर’मुळे सुपरमॅन बनला आहे. अशीच उंच भरारी घेत राहा.
Powered By Sangraha 9.0