द - एपस्टीन फाइल्स

26 Dec 2025 15:55:58
जेफ्री एपस्टीनची कथा ही केवळ वैयक्तिक गुन्ह्यांची गोष्ट नाही. ती आधुनिक समाजातील सत्तेची असमतोल रचना, पैशाचा प्रभाव आणि न्यायव्यवस्थेतील मर्यादा उघड करते. मात्र कागदपत्रे जाहीर करताना त्यातून पानेच्या पाने वगळण्यात आली. परिणामी, सत्ताधारी आणि सत्ताधार्‍यांना हव्या असलेल्या व्यक्तींचे संरक्षण तर होत नाही आहे ना? अशी शंका लोक घेऊ लागले आहेत. त्यामुळे पारदर्शकतेबाबत वाद निर्माण झाला आहे. एपस्टीन फाइल्स पूर्णपणे उघड होईपर्यंत आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत, ही कथा अपूर्ण सत्य म्हणूनच इतिहासात कायम राहील.

the
 
अमेरिकेतील आर्थिक आणि सामाजिक उच्चभ्रू वर्तुळात वावरलेला Jeffrey Epstein हा माणूस आज कुख्यात म्हणून ओळखला जातो. अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषण व सेक्स-ट्रॅफिकिंगच्या गंभीर आरोपांमुळे त्याचे नाव इतिहासात काळ्या अक्षरांनी लिहिले गेले. मात्र एपस्टीन प्रकरण केवळ एका गुन्हेगाराची कथा नाही; ते सत्ता, पैसा, राजकारण, प्रतिष्ठा आणि न्यायव्यवस्थेतील त्रुटी यांच्या गुंतागुंतीचा आरसा आहे. या प्रकरणातून निर्माण झालेल्या एपस्टीन फाइल्स आजही जगभर वादाचा विषय ठरत आहेत. जगभर अशासाठी कारण त्यात केवळ अमेरिकेतीलच नाही तर जगातील इतर देशातील व्यक्तींचा पण समावेश आहे.
 
 
एपस्टीनचा जन्म 1953 मध्ये न्यूयॉर्कच्या ब्रुकलिनमध्ये झाला. त्याचे बालपण मध्यमवर्गीय वातावरणात गेले. औपचारिक उच्च शिक्षण पूर्ण न करताही त्याने गणित आणि विज्ञानातील कौशल्याच्या जोरावर मॅनहॅटनमधील प्रतिष्ठित Dalton School मध्ये शिक्षक म्हणून नोकरी मिळवली. याच ठिकाणी त्याला श्रीमंत पालक, उद्योगपती आणि प्रभावशाली लोकांच्या वर्तुळात प्रवेश मिळाला-हा त्याच्या आयुष्यातील निर्णायक टप्पा ठरला.
 
 
काही वर्षांतच तो वॉल स्ट्रीटवरील Bear Stearns या गुंतवणूक बँकेत पोहोचला. येथे त्याने उच्च जोखीम-उच्च परतावा (High risk, high return) या गुंतवणूक पद्धती शिकल्या आणि श्रीमंत ग्राहकांचे विश्वासार्ह सल्लागार अशी प्रतिमा तयार केली. शिक्षक ते वित्त व्यवसायिक हा प्रवास जितका झपाट्याने झाला, तितकाच तो गूढही राहिला.
 
the 
 
एपस्टीनने पुढे J. Epstein Company नावाची खासगी फर्म स्थापन केली. तो स्वतःला अत्यंत श्रीमंत मोजक्या ग्राहकांसाठीच काम करणारा मनी मॅनेजर म्हणवत असे. मात्र त्याची संपत्ती नेमकी किती, ती कशी वाढली आणि कोणत्या व्यवहारांतून याबाबत स्पष्टता कधीच नव्हती. अनेक पत्रकारांनी आणि तपासकर्त्यांनी एपस्टीन खरोखर अब्जाधीश होता का? असा प्रश्न उपस्थित केला.
 
 
या संपत्तीच्या कथेत वारंवार येणारे नाव म्हणजे उद्योगपती Leslie Wexner. काही काळ एपस्टीनकडे वॅक्सनर यांच्या आर्थिक व्यवहारांचे व्यापक अधिकार होते, अशी नोंद सार्वजनिक कागदपत्रांत आढळते. नंतर वॅक्सनर यांनी एपस्टीनवर आर्थिक गैरवापराचे आरोप केले. तरीही, या संबंधांमुळे एपस्टीनला पैसा, प्रतिष्ठा आणि उच्चभ्रू नेटवर्क यांचा झपाट्याने विस्तार करता आला, हे निर्विवाद आहे.
 
 
एपस्टीनला राजकारणाची विशेष आवड होती. तो स्वतःला भविष्यातील कल्पनांमध्ये गुंतवणूक करणारा (a visionary investor in future ideas) म्हणवून घेत असे. यात विज्ञान, शिक्षण आणि धोरणे यांचा समावेश असे. त्याने अमेरिकन राजकीय व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर देणग्या दिल्या. सार्वजनिक नोंदींनुसार, त्याच्या देणग्या प्रामुख्याने डेमोक्रॅटिक वर्तुळात गेल्या, तर काही प्रमाणात रिपब्लिकन उमेदवारांनाही मिळाल्या.
 
 
राजकीय देणग्या म्हणजे केवळ आर्थिक पाठबळ नसते; त्या ओळखी, आमंत्रणे, कार्यक्रम आणि फोटो-ऑप्सचे दरवाजे उघडतात. एपस्टीनने या सामाजिक भांडवलाचा कुशल वापर करून स्वतःला बौद्धिक आणि धोरणात्मक चर्चांच्या केंद्रस्थानी आणले आणि त्यामुळे त्याची प्रतिष्ठा अधिक मजबूत झाली.
 
 
एपस्टीनचे सामाजिक वर्तुळ अत्यंत व्यापक होते. राजघराण्यांपासून माजी राष्ट्राध्यक्षांपर्यंत, उद्योगपती, शास्त्रज्ञ, कलाकार-अनेक प्रसिद्ध व्यक्ती त्याच्या संपर्कात होत्या. सार्वजनिक झालेल्या कागदपत्रांत, फ्लाइट लॉग्समध्ये किंवा साक्षीदारांच्या जबाबांत Prince Andrew, Bill Clinton यांसारखी नावे उल्लेख म्हणून दिसतात.
 
 
मात्र येथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्यावी लागते: नाव उल्लेखात येणे म्हणजे गुन्हा सिद्ध होणे नाही. अनेकांनी आरोप नाकारले आहेत; काही प्रकरणे न्यायालयीन सेटलमेंटपर्यंत गेली आहेत; तर काही ठिकाणी थेट आरोप करण्यात आलेलेच नाहीत. तरीही, या नावांनीच एपस्टीन फाइल्सची चर्चा अधिक स्फोटक बनवली.
 
the 
 
2005 मध्ये फ्लोरिडातील पाम बीच येथे अल्पवयीन मुलीच्या तक्रारीनंतर एपस्टीनविरोधात तपास सुरू झाला. 2008 मध्ये त्याने राज्यस्तरीय दोन आरोपांवर दोष स्वीकारला. त्याला तुरुंगवास आणि लैंगिक गुन्हेगार नोंदणी अशी शिक्षा झाली. परंतु ती शिक्षा अत्यंत सौम्य असल्याचा आरोप मोठ्या प्रमाणावर झाला. त्याला वर्क-रिलीजसह सुमारे 13 महिनेच शिक्षा भोगावी लागली. या करारामुळे फेडरल खटला टळला, आणि याच कारणाने न्यायव्यवस्थेवर तीव्र टीका झाली.
 
 
जुलै 2019 मध्ये न्यूयॉर्कमध्ये एपस्टीनला पुन्हा अटक झाली-या वेळी sex trafficking of minorsआणि conspiracy अशा गंभीर फेडरल आरोपांवर. खटला सुरू होण्यापूर्वीच, 10 ऑगस्ट 2019 रोजी, न्यूयॉर्कच्या Metropolitan Correctional Center मध्ये तो मृत अवस्थेत आढळला. अधिकृत अहवालानुसार, ती आत्महत्या होती. तथापि, तुरुंगातील सुरक्षेतील त्रुटी, कॅमेरे न चालणे, रक्षकांची अनुपस्थिती या सर्वांमुळे संशयाची दाट छाया पडली. ती खरोखर आत्महत्या होती का? हा प्रश्न आजही अनेकांच्या मनात अनुत्तरित आहे.
 
 
एपस्टीन फाइल्स हा शब्द पोलीस तपास नोंदी, न्यायालयीन कागदपत्रे, साक्षीदारांचे जबाब, प्रवासनोंदी, संपर्क यादी आणि जप्त केलेल्या डिजिटल पुराव्यांचा एकत्रित उल्लेख म्हणून वापरला जातो. या फाइल्स महत्त्वाच्या ठरण्याचे कारण म्हणजे एपस्टीन एकटा नव्हता; त्याच्यामागे कोण होते, त्याला कोण मदत करत होते, आणि कोणत्या शक्ती त्याला संरक्षण देत होत्या हे प्रश्न.
 
 
2024 नंतर काही कागदपत्रे सार्वजनिक ( unsealed) झाली. त्यातून अनेक नावे, आरोपांचे संदर्भ आणि तपासातील तपशील समोर आले. पण संपूर्ण फाइल काही सार्वजनिक केली गेली नाही. आज, एपस्टीन प्रकरणाचा मुख्य आरोपी, स्वत: एपस्टीन जरी मृत असला, तरी त्याची निकटवर्तीय Ghislaine Maxwell हिला 2021 मध्ये दोषी ठरवून 20 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. एपस्टीन फाइल्स अधिक खुल्या व्हाव्यात, दोषींवर कारवाई व्हावी आणि पीडितांना न्याय मिळावा अशी मागणी अजूनही सुरू आहे.
 
 
ह्या प्रकरणातील सर्व कागदपत्रे ही अमेरिकन कायदा आणि सुरक्षा यंत्रणेच्या अखत्यारीत म्हणजे डिपार्टमेंट ऑफ जस्टीस आणि त्याअंतर्गत फेडरल ब्यूरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन (एफबीआय) कडे होती. आताच्या काळात ही सरकारी खाती राष्ट्राध्यक्ष ट्रम्प म्हणजे रिपब्लिकन्सच्या नियंत्रणात असल्याने, इथले डेमोक्रॅट्सनी आवाज उठवायला सुरुवात केली. एकूणच या केसचे गांभीर्य आणि या आवाजी आंदोलनाला जर टोकाचा विरोध केला तर त्याचा परिणाम पुढील निवडणुकीत होवू शकतो, ह्या काळजीने रिपब्लिकन्स पण पाठिंबा देऊ लागले. त्यातूनच डेमोक्रॅटिक कॉँग्रेसमन रो खन्ना आणि रिपब्लिकन कॉँग्रेसमन थॉमस मॅसी यांनी The Epstein Files Transparency नावाने कायद्याचा प्रस्ताव अमेरिकन प्रतिनिधी सभागृहात मांडला. त्याला फक्त एकाच काँग्रेसमनकडून विरोध झाला आणि 427 विरुद्ध एक अशा मताने हा प्रस्ताव संमत झाला.
 
 
ह्या कायद्यामुळे अमेरिकेच्या Attorney General यांना ही कागदपत्रे जाहीर करणे भाग पडले. जाहीर झालेल्या व्यक्तींमध्ये अनेक प्रतिष्ठित व्यक्ती होत्या. त्यातील काही ठळक नावे म्हणजे, माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिटंन, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, मायकल जॅकसन, ब्रिटनचा प्रिन्स अँड्रयू, ब्रिटिश राजघराण्यातील सारा फर्ग्युसन, हॉलीवूड कलाकार केविन स्पेसी, व्हर्जिन अटलांटिक ग्रुपचा संस्थापक रिचर्ड ब्रानसन आदि आहेत. अर्थात ह्यांचे एपस्टीनबरोबर अथवा त्यांच्या इस्टेटमध्ये फोटो आहेत यांचा अर्थ त्यांनी गैरव्यवहार केला असे सिद्ध होत नाही अथवा ते गुन्हेगार ठरत नाहीत.
 
 
ही कागदपत्रे जाहीर करताना त्यात फक्त एकच सूट देण्यात आली ती म्हणजे ज्या मुलींवर अत्याचार झाले होते त्यांची म्हणजे पीडितांची नावे यातून अप्रकाशित ठेवण्यात येणार होती. त्यासाठी अमेरिकन पद्धतीत मूळ कागदपत्रांच्या सार्वजनिक होणार्‍या कॉपीज वर अशा प्रत्येक ठिकाणी जाड काळ्या रेषा ओढल्या जातात ज्यातून त्या खाली काय छापले होते ते वाचणे अशक्य होते. ह्याला redaction असे म्हणतात. मात्र कागदपत्रे जाहीर करताना जे redaction केले गेले त्यात पानेच्या पाने वगळण्यात आली. परिणामी, सत्ताधारी आणि सत्ताधार्‍यांना हव्या असलेल्या व्यक्तींचे संरक्षण तर होत नाही आहे ना? अशी अधिकच शंका लोक घेऊ लागले. त्यामुळे पारदर्शकतेबाबत वाद निर्माण झाला आहे. बिल क्लिटंन यांनी संपूर्ण फाइल आता जाहीर करावी म्हणून मागणी केली आहे. अमेरिकन प्रतिनिधीगृहाला पण दिशाभूल केली असे वाटू लागले आहे. त्यामुळे आता एटर्नी जनरलवर महाभियोग चालवून त्यांना पदच्युत करण्यावरून चर्चा चालू झाली आहे.
 
 
या सर्व अमेरिकन धुळवडीत काही भारतीयांनी पण राजकारणासाठी करण्याचा फुकाचा प्रयत्न केला. त्यात पंतप्रधान मोदी आणि त्यांच्या मंत्रिमंडळातील हरदीप सिंग पुरी ह्यांच्या बद्दल केलेले आरोप प्रामुख्याने येतात. आधुनिक काळात, बादरायण संबंध म्हणजे काय हे समजून घ्यायचे असेल तर हे आरोपसत्र वाचले तर कळेल. अमेरिकन प्रतिनिधी सभेच्या समितीने एपस्टीनच्या 18000 इमेल्स ह्या जाहीर केल्या. त्यातील 2019 मध्ये त्यांच्या अटकेच्या साधारण दोन महिने आधी एपस्टीन आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचे निकटवर्तीय स्टीव बॅनन यांच्यातील एका ईमेल संवादात एपस्टीनने बॅनन यांना सुचवले की, मोदींना जाऊन भेट आणि त्यासाठी एपस्टीन मदत करायला तयार होता. अर्थात तशी काही भेट झाली देखील नाही आणि एपस्टीनने काही प्रयत्न केले का ह्याचे देखील उरलेल्या ईमेल्समध्ये उत्तर नाही. शक्यता अशी आहे की, स्वत:ची पोच किती मोठी आहे हे दाखवण्याचा (शो ऑफ) प्रयत्न एपस्टीनने केला असावा. तसेच भाजपा नेते हरदीप सिंग पुरी यांच्या नावाने एपस्टीन ह्यांच्या कॅलेंडरवर काही appointments लिहिलेल्या दिसल्या. पण त्या खरेच झाल्यात का ह्याचा काहीच पुरावा दिसत नाही. ज्या काळात एपस्टीन अनेक प्रतिष्ठित लोकांना भेटला ते साधारण 2000च्या पहिल्या दशकातले होते. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री मोदींकडे अमेरिकन व्हिसा पण नव्हता. उद्योगपती अनिल अंबानी यांनी देखील एपस्टीनशी 2017 साली केलेला मोघम ईमेल संवाद बाहेर आला आहे. पण परत त्यातून देखील कुठलाच गैरव्यवहार दिसत नाही. तरी देखील संशयाचे जाळे विणणार्‍यांना ह्या निमित्ताने काही काळासाठी रोजगार मिळाला.
 
 
जर ह्या फाइल्स योग्य पद्धतीने सार्वजनिक केल्या तर काही घटनांवर प्रकाश पडेल तर बर्‍याच घटनांवर पडदा पडेल. ते जेव्हा होईल तेव्हा होईल. तूर्तास इतके नक्की म्हणता येईल की, जेफ्री एपस्टीनची कथा ही केवळ वैयक्तिक गुन्ह्यांची गोष्ट नाही. ती आधुनिक समाजातील सत्तेची असमतोल रचना, पैशाचा प्रभाव आणि न्यायव्यवस्थेतील मर्यादा उघड करते. एपस्टीन फाइल्स पूर्णपणे उघड होईपर्यंत आणि सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेपर्यंत, ही कथा अपूर्ण सत्य म्हणूनच इतिहासात कायम राहील.
Powered By Sangraha 9.0