टिलिकमच्या भावविश्वात नेणारा ब्लॅकफिश

26 Dec 2025 16:54:04
 
blackfish movie
माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, जबरदस्तीनं पकडलेल्या, त्यांच्या कुटुंबियांपासून वेगळं केलेल्या, व्हेल माशांच्या दुःखाला ब्लॅकफिश या माहितीपटाने वाचा फोडली. माशाने केलेली माणसांची हत्या हा जरी विषय असला, तरी त्यामागची कारणं शोधून काढणं हा माहितीपटाचा केंद्रबिंदू होता. टिलिकमकडून मानवहत्या झाली तरीही जेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहता तेव्हा लक्षात येतं की, हा टिलिकम गुन्हेगार नाही; माणसांच्या स्वार्थाचा तोही एक बळी आहे.
चित्रपट हे केवळ कथाकथन किंवा मनोरंजनाचे माध्यम नाही. हे श्राव्य आणि दृश्य माध्यम आहे. त्यामुळे समाजमनावर होणारा त्याचा परिणाम तात्काळ आहे. अल्पावधीत मोठ्या समूहाला प्रभावित करणे, एखाद्या अनिष्ट गोष्टींबद्दल त्यांच्या मनात चीड निर्माण करणे, योग्य तो बदल घडवून आणण्यासाठी प्रेरणा देणे, समाजाची जागरूकता वाढवून त्याला सक्रिय करणे ही चित्रपटाची क्षमता असल्याने, समाजात योग्य तो बदल घडवण्यासाठी चित्रपट हे निश्चितच अत्यंत शक्तिशाली माध्यम आहे.
 
 
सर्वसामान्य माणसांना अज्ञात असलेले वास्तवदेखील चित्रपट समोर आणतात. सामाजिक अन्याय, पर्यावरणाचा र्‍हास, मानवी हक्काचे उल्लंघन, चुकीच्या परंपरा व त्यामुळे रुजलेली चुकीची मते अशा अनेक मुद्यांवर सत्य आणि कल्पिताची योग्य ती सांगड घालून, लोकांना समजतील आणि भावतील असे चित्रपट बनवल्याने, हे महत्त्वाचे मुद्दे लोकांपर्यंत पोचतात. त्यावर चर्चा होते, समाजमन ढवळून निघते आणि अनेक वेळा अपेक्षित बदल घडण्याची सुरुवात होते. खर्‍या अर्थाने असे सिनेमा वा माहितीपट सामाजिक परिवर्तनाचे उत्प्रेरक बनतात. तर, ब्लॅकफिश हा माहितीपट यात मोडतो.
बँकॉक, सिंगापूर, अमेरिका, कॅनडा येथील सी-वर्ल्डमधील माशांचे खेळ अनेकांनी पाहिले असतील. त्याचा आनंद घेतला असेल. प्रशिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली उडणार्‍या डॉल्फिन किंवा इतर माशांची कसरत पाहून अनेकांना प्रशिक्षक बनण्याची इच्छा सुद्धा झाली असेल, पण खरेच ते दिसते तसे असते का?
2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ब्लॅकफिश ह्या माहितीपटाने समुद्रीजीवांच्या जीवावर उभे असलेल्या मनोरंजन विश्वाचे खरे रूप लोकांच्या समोर आलं.
सिनेमाची सुरुवात एका खर्‍या प्रसंगाने होते. 24 फेब्रुवारी 2010 चा दिवस होता तो. ऑरलँडो येथील समुद्री जगात व्हेल माशांचे खेळ पाहण्यासाठी गर्दी जमली होती. स्टेडियम पूर्ण भरले होते. खेळ रंगात आला असतानाच, एक भीषण घटना घडली. डॉन ब्रैन्चो या ट्रेनरवर टिलिकम या व्हेल माशाने अचानक हल्ला केला. पाहता पाहता तिच्या चेहर्‍यावरचे स्मितहास्य पुसले जाऊन, त्याची जागा भीतीने घेतली. या भयानक, वेदनादायी हल्ल्यात डॉन ब्रैन्चोचा मृत्यू झाला.
या घटनेची जगाने नोंद घेतली. चौकशी सुरू झाली. टिलिकमने केलेला हा पहिला हल्ला नव्हता. आधीही त्याने दोन माणसांची हत्या केली होती. पण टिलिकमने असे का केले असेल, याचा शोध घेत असतानाच, समुद्रविश्वात कैद असलेल्या या माशांचे आयुष्य जगासमोर आले आणि समाजमन ढवळून निघाले. माणसाने आपल्या करमणुकीसाठी या निष्पाप जीवांना ओलीस धरणे हे कितपत योग्य आहे याचा विचार सुरू झाला.
ब्लॅकफिश या चित्रपटाची निर्मिती हे पहिले पाऊल होते.आइसलँडमध्ये जन्मलेल्या टिलिकम नावाच्या एक व्हेल माशाची ही गोष्ट. जेमतेम दोन वर्षाचा असतानाच त्याला आणि त्याच्या भावंडांना, आइसलँडमधल्याच एका प्राणिसंग्रहालयासाठी पकडण्यात येते. व्हेल मासे आपल्या कळपाशी संलग्न असतात. ते एकत्र राहतात. एकत्र खेळतात. कुटुंबप्रिय असलेल्या टिलिकमला त्याच्या आई आणि भावंडांचा विरह नक्कीच जाणवला असणार.
काही दिवसांनी त्याला कॅनडा येथील समुद्री प्राणिसंग्रहालयात पाठवतात. आइसलँड ते कॅनडा हा विमानप्रवास बराच मोठा. त्या छोट्या जीवानं कसा सहन केला याची कल्पना सुद्धा करवत नाही. आता इथला तलाव त्याच्या देहासाठी अतिशय लहान होता. मोठ्या समुद्रात राहायची सवय असलेल्या व्हेलसाठी हा तुरुंगवासच. त्यात त्याच्याहून मोठ्या अशा दोन माद्या आधीपासूनच या तलावात होत्या. त्यांच्याबरोबर जुळवून घेणे छोट्या टिलिकमला जमले नाही. त्यांच्या दादागिरीला सुद्धा त्याला तोंड द्यावे लागले. अनेकवेळा प्रशिक्षकाच्या मनासारखं वागलं नाही तर त्या तिघांना कमी अन्न दिले जात असे. त्यात वयाने लहान असल्याने टिलिकमची उपासमार होई. या माद्यांना पिल्ले झाल्यावर तर, त्यांच्या सुरक्षिततेसाठी टिलिकमला अजून एका लहान टँकमध्ये हलवण्यात आलं.
समुद्री जगात काम करणार्‍या कर्मचार्‍यांनी सांगितले आहे की, टिलिकमचे आयुष्य अतिशय कष्टाचे होते. रात्री डासांचे चावे आणि सकाळी सूर्याची प्रखर किरणे यामुळे त्याची कातडी सोलवटून जाई. कसरती मनासारख्या जमल्या नाहीत तर त्याला मारहाण होई. जिथे व्हेल मासे दिवसाला शंभर मैल पोहून जातात, तिथे त्यांना अतिशय छोट्या तलावात बंदिस्त आयुष्य घालवावे लागे. वेगवेगळ्या जातीचे, प्रवृत्तीचे मासे एकत्र असल्याने त्यांच्यात मारामारी होई. ह्यापासून सुटका नसे.
 
 
टिलिकमची रवानगी नंतर ऑरलँडोमधील समुद्रीविश्वात झाली. परत एकदा मनाविरुद्ध करावा लागणारा विमानप्रवास. जागा बदलली पण यातना कमी झाल्या नाहीत. इथंही सक्तीचं शिक्षण, खेळाचे प्रदर्शन, अनैसर्गिक प्रजननासाठी वापर, बंदिस्त आणि अपुर्‍या जागेत निवास, सह व्हेल माशांकडून अत्याचार... यामुळे कधीतरी त्याचाही तोल गेला आणि त्याच्याकडून तीन माणसांची हत्या झाली. तेव्हा सी-वर्ल्डवर निष्काळजीपणाचा आरोप ठेवला गेला. प्रशिक्षकाच्या सुरक्षिततेबाबत पुरेशी काळजी घेतली नाही म्हणून मोठा दंड सुनावण्यात आला आणि तसेच टिलिकमकडून असं का व्हावं याचा मानवतेच्या नजरेतून शोध सुरू झाला.
माणसांनी स्वतःच्या स्वार्थासाठी, जबरदस्तीनं पकडलेल्या, त्यांच्या कुटुंबियांपासून वेगळं केलेल्या, व्हेल माशांच्या दुःखाला ब्लॅकफिश या माहितीपटाने वाचा फोडली. माशाने केलेली माणसांची हत्या हा जरी विषय असला, तरी त्यामागची कारणं शोधून काढणं हा माहितीपटाचा केंद्रबिंदू होता.
 
 
टिलिकमकडून मानवहत्या झाली तरीही जेव्हा तुम्ही हा सिनेमा पाहता तेव्हा लक्षात येतं की, हा टिलिकम गुन्हेगार नाही; माणसांच्या स्वार्थाचा तोही एक बळी आहे. या माहितीपटाच्या प्रदर्शनानंतर अनेक निदर्शनं झाली. प्राण्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य, त्यांना त्यांचे नैसर्गिक अधिवासातील राहणीमान मिळावं म्हणून केलेल्या सोयी असे चांगले निर्णय या माहितीपटानंतर घेण्यात आले.
 
 
2013 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांनी सी-वर्ल्डवर उत्स्फूर्तपणे बंदी आणली. येथील कर्मचार्‍यांनी दिलगिरी व्यक्त केली आणि अनेकांनी या अमानुष खेळांविरुद्ध मोहीम सुरू केली. मार्च 2016 नंतर कंपनीने व्हेल्स माशांचे अनैसर्गिक प्रजनन थांबवण्याचा निर्णय घेतला. अर्थात हे पुरेसे नाहीच, पण या मुक्या जीवांच्या दुर्दशेची नोंद तरी घेतली गेली...
 
 
खरं तर, मानवसुद्धा इतर प्राणी, पक्षी, वनस्पती यांसारखाच निसर्गाचा एक घटक आहे. त्याचा मालक नाही. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे... हे जाणणार्‍या प्रत्येक संस्कृतीनं मानव, प्राणी आणि पर्यावरण यांच्यातील सामंजस्याचे महत्त्व विशद केलं आहे. मात्र आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर माणूस सामर्थ्यशाली झाला आणि त्याची भूक वाढत गेली. आपल्या शक्तीच्या उन्मादात त्याने निसर्गातील सर्व घटकांचा केवळ स्वतःच्या सुखासाठी वापर करायला सुरुवात केला आणि निसर्गाचा समतोल उध्वस्त केला. शेवटी सहन करण्यालासुद्धा मर्यादा असते. जे काही तुम्ही दुसर्‍याला देता त्याची सव्याज परतफेड होते. ब्लॅकफिश हे सत्य अधोरेखित करतो. अत्यंत संवेदनशील, अस्वस्थ करणारा, बांधीव असा हा माहितीपट मानवाने निसर्गाकडे, त्याचाच घटक असलेल्या इतर सजीव सृष्टीकडे कसे पाहावे हे आपल्याला शिकवून जातो.
समाप्त
Powered By Sangraha 9.0