तेजस्वी संघकार्याचे ओजस्वी व्यक्तिमत्व - दुर्गानंद नाडकर्णी

26 Dec 2025 17:35:40

durganand-nadkarni
दुर्गानंदजीच्या नसानसांत संघाचा संचय होता. संघनिष्ठेने वेढलेले ते तेजस्वी नेतृत्व होते. त्यांची वाणी प्रेरणादायी होती. हिंदुविचार मनावर ठसणारे होते. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वांना आधार वाटणारे असे ते संघनेता होते. 2013साली संन्यास घेण्याचा विचार केला आणि संन्यासानंतर त्यांचे नामकरण दुर्गानंदगिरी असे झाले. संघप्रचारकांच्या मांदियाळीतील दुर्गानंदजी यांचे यज्ञकुंड आता शांत झाले आहे.
20 डिसेंबर 2025ला संघप्रचारकांच्या मांदियाळीतील एक यज्ञकुंड शांत झाले. ऐन तारुण्यात सर्व प्रलोभनांचा त्याग करून संघप्रचारक म्हणून कार्य करणारे दुर्गानंद वासुदेव नाडकर्णी कैलासवासी झाले. अंकोला या छोट्याशा गावातून बालस्वयंसेवक म्हणून ते संघामध्ये आले. 1960 साली आपल्या घराच्या उंबरठ्याला नमस्कार करून संघकार्यासाठी बाहेर पडलेले दुर्गानंदजी अखेरपर्यंत आपल्या घरी परतले नाहीत. 20 डिसेंबरला लातूर येथे उमाकांत होनराव यांच्या निवासस्थानी त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
 
1960 साली संघप्रचारक म्हणून कार्यास आरंभ केल्यानंतर सांगली, कोल्हापूर, रायगड, मुंबई महानगर व सर्वांत जास्त कालावधी म्हणजे एक तप संघदृष्ट्या सावंतवाडी जिल्हा, सध्याचा सिंधुदुर्ग व गोवा प्रांत या ठिकाणी ते कार्यरत होते. तालुका प्रचारक, जिल्हा प्रचारक, विभाग प्रचारक म्हणून तरुणांची एक समर्पित पिढी त्यांनी संस्कारीत केली व अनेक तरुण स्वयंसेवकांना प्रचारक होण्यासाठी उद्युक्त केले. यात दुर्गानंदजींचा सिंहाचा वाटा आहे. मनोहर पर्रिकरांसारखे अनेक संघसंस्कारित स्वयंसेवक त्यामुळे कार्यरत राहिले.
 
 
दुर्गानंदजीच्या नसानसांत संघाचा संचय होता. संघनिष्ठेने वेढलेले ते तेजस्वी नेतृत्व होते. त्यांची वाणी प्रेरणादायी होती. हिंदुविचार मनावर ठसणारे होते. तरुणांना वेड लावणारे, मोहिनी टाकणारे व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे सर्वांना आधार वाटणारे असे संघनेता होते. त्यांचा बौद्धिक वर्ग म्हणजे मातृभूमी भारतमाता, हिंदू संस्कार या विषयांवर बोलताना श्रोत्यांच्या हृदयावर ठाव घेणारा असावयाचा. क्रांतिकारक, त्यांचे राष्ट्रासाठी दिलेले बलिदान व कार्य ऐकताना श्रोत्यांच्या डोळ्यांत नकळत पाणी तरळत असे.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
 
दुर्गानंदजी मनस्वी व्यक्ती होती. हृदयाच्या तळापासून संघकार्य करत, मनापासून कार्यकर्त्यांवर प्रेम करत व चुकलेल्या वाटसरूला तेव्हढ्याच निष्ठेने रागवत पण त्यांच्याविषयी कटूपणा येत नसे. कारण आत व एक बाहेर एक असे त्यांचे वागणे नसे. अत्यंत शिडशिडीत शरीरयष्टी, दुटांगी धोतर नेसलेले अशा दुर्गानंदजींना बघितल्यावर पू. गुरुजींची मूर्ती डोळ्यांसमोर येत असे. प. पू. गोळवलकर गुरुजींनी दुर्गानंदजींना आपल्या कुडत्याला असलेली सोन्याची चेन व बटने दिली होती. त्यामुळे ते म्हणत - हनुमंताच्या हृदयात दिसणार्‍या प्रभू रामचंद्रांसारखे गुरुजी माझ्या हृदयात कायम वसलेले आहेत. त्यांच्याकडूनच माझ्यात संघकार्याची ऊर्जा प्राप्त होते. त्यांनी ज्या वेळी प्रचारक म्हणून सेवेला विराम दिला त्यावेळी ती बटने पू. सरसंघचालक मोहनजी भागवत यांच्याकडे सुपूर्त केली.
 
 
खडतर कष्ट सहन केलेले, अतोनात कष्ट करण्याची क्षमता. अखंड प्रवास, अथक परिश्रमाची तयारी त्यामुळे त्यांच्याबरोबर काम करणार्‍यांची दमछाक होत असे. कोणताही विषय योग्यपणे तडीस लावण्याची वृत्ती होती. मग बघूया, नंतर बघू असा व्यवहार त्यांना ठाऊक नव्हता. त्यामुळे भलाभल्यांना संघकामात खेचण्याची त्यांची क्षमता होती. एखाद्या व्यक्तीचे स्वभाववर्णन ते मोजक्या शब्दांत करावयाचे.
 
 
मैदानावरील कवायत म्हणजे दुर्गानंदजींचा हातचा मळ होता. सैनिकी संचलनाच्या तोडीस तोड असे स्वयंसेवकांकडून संचलन करून घ्यायचे. खणखणीत आवाजातील आज्ञेमुळे सर्वजण सतर्क असावयाचे. कसरतीदेखील बघण्यासारख्या असावयाच्या. मैदानावर त्यांची हुकूमत जबरदस्त असावयाची. जेमतेम वजन असलेले नाडकर्णी मैदानावर मात्र कसलेले मल्ल असावयाचे.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
 
बैठक म्हणजे उगीचच चेहर्‍यावर गंभीर आव आणून बसून खल करणे असे त्यांचे धोरण कधीच नसे. दुर्गानंदजींच्या बरोबर बैठक म्हणजे हास्याचा धबधबाच असावयांचा. सर्व विषय पुढे जात असताना चेष्टामस्करी, हास्यविनोद बैठकीत होत असे. ती एक आनंदयात्राच असावयाची, एखादा प्रश्न किंवा विषय संघविचाराला योग्य आहे किंवा नाही हे ठरवत व त्वरित त्याचे उत्तर देत, तेथे भीडेला थारा नसे. गोव्यात प्रचारक असताना तेथे शंभर शाखा केल्या. तेथे शाखा सुरू करण्याचा धडाकाच त्यांनी लावला. त्याचा फायदा आणीबाणीत झाला. दुर्गानंदजी भूमिगत होते आणि सत्याग्रह करण्याचा विषय आला. त्यांच्यावर 25000/- बक्षीस ठेवले होते. अशा परिस्थितीत तो सत्याग्रह गोवामुक्ती सत्याग्रहापेक्षाही मोठा झाला असे म्हणावे लागते.
 
 
संघकार्य करताना दुर्गानंदांनी फक्त स्वयंसेवकच डोळ्यासमोर न ठेवता ते सर्व घर आपले मानले. त्यामुळे घरातील सर्वांचेच त्यांच्याशी जिव्हाळ्याचे संबंध निर्माण होत असत. त्या परिवाराच्या सुखदुःखाच्या प्रसंगी ते आपलेपणाने जात. कोणतीही मदत म्हणजे आपलेच कार्य समजून ते आनंदाने करणार. त्यामुळे दुर्गानंदजी स्वयंसेवकापुरते न राहाता संपूर्ण कुटुंबाचे होत. त्यांनी महाराष्ट्रात अशी कुटुंबे संघाशी जोडून ठेवली होती. त्यांची कार्य करण्याची अशी विलक्षण किमया होती. संघाने 1990च्या दरम्यान त्यांना ’हिंदू एकजूट’च्या कार्याची जबाबदारी सोपविली. ब.ना. जोगांच्या सोबतीने त्यांनी 8-9 वर्षे चांगल्या तर्‍हेने कार्य केले. काही आंदोलने त्याच पद्धतीने यशस्वी केली. टिपू सुलतानाचे महिमामंडन करणार्‍या मालिकेच्या विरुद्ध आंदोलन, संभाजीमहाराजांच्या 300व्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम यशस्वी रितीने हाताळले.
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
 
अथकपणे 35 वर्षे चाललेला हा दुर्गानंदजींचा कार्यरथ त्यांनीच 2013ला थांबविला व संन्यास घेण्याचा विचार केला. एका कार्यक्षम प्रचारकाने संन्यास घेण्याचा निर्णय का घेतला? त्याचे उत्तर त्यांनी एका कार्यक्रमात दिले. ते म्हणाले, ”उभे आयुष्य संघकार्य करताना कुटुंबासाठी काही केले नाही. मी प्रचारक जातो म्हटल्यावर माझ्या वडिलांनी माझ्याशी बोलणे बंद केले ते शेवटपर्यंत त्यांनी निभावले. कुटुंबासाठी काही करावे असा जेव्हा विचार आला त्या वेळी संन्यास घेतल्यावर कुटुंबाच्या मागील-पुढील सात पिढ्यांचा उद्धार होतो असे म्हणतात, असे कळल्याने आपण कुटुंबासाठी एवढे तरी करू म्हणून तो मी घेतला.” किती उदात्त भावना म्हणावी लागेल. संन्यासानंतर त्यांचे नामकरण दुर्गानंदगिरी असे झाले. हळूहळू संपर्क कमी झाला. संपूर्ण दिवस त्यांनी जपयज्ञात स्वतःला गुंतवून घेतले आणि संन्यासाश्रमी जीवन ते उत्तमपणे जगले. खर्‍या अर्थाने त्यांच्या जीवनाचे सोने झाले.
 
 
संघप्रचारक म्हणून त्यांची कामगिरी अप्रतिमच होती, त्याचबरोबर त्यांचा अध्यात्मावरील अभ्यास विलक्षण होता. वेद, उपनिषद, भागवत या ग्रंथाचा अभ्यास अचंबित करणारा होता. श्रीविद्या (श्रीयंत्र) वरील अभ्यास तर अप्रतिम होता, या विषयातील एका (अप्पा अळवणी) जेष्ठ संन्याशाने त्यांची ज्ञान घेण्याची तळमळ, निष्ठा व अभ्यासूवृत्ती पाहून त्यांना सखोल ज्ञान दिले होते. या सर्व विषयावर ते बोलायला लागले. प.पू. गोळवलकर गुरुजींच्या निधनानंतर अग्नीसंस्कार करण्यापूर्वी संघाची प्रार्थना सांगण्याचे भाग्य दुर्गानंदजींना लाभले. धनलाभ व प्रसिद्धीचा हव्यास यापासून ते अलिप्त होते. भारतमातेची सेवा करताना हे पथ्य आपण पाळले पाहिजे, असा त्यांचा कटाक्ष होता.
 
 
विश्वसंचार हिंदुत्वाचा ग्रंथ
https://www.evivek.com/hindutvacha-vishwasanchar/
 
2009 पासून म्हणजे संन्यास घेतल्यानंतर लातूर येथे उमाकांत होनराव यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम होता. आपला देश व त्यातील बांधव यांच्या कल्याणासाठी रोज 12500चा जप करूनच पाणी ग्रहण करीत असत. ही साधना शेवटच्या घटकेपर्यंत चालू होती. त्यांनी जोडलेल्या कुटुंबांची, स्वयंसेवकांची वर्दळ तेथे कायम असे. संघकार्य, राष्ट्रकार्य अखंडपणे करत राहा, हाच त्यांचा आशीर्वाद असावयाचा. संन्यस्त प्रचारक म्हणून कार्य केलेले पू. गुरुजींच्या नंतर दुर्गानंदगिरी हेच होत. त्यांना विनम्र आदरांजली...
 
- किशोर दीक्षित
9960115352
Powered By Sangraha 9.0