डॉ. अविनाश भोंडवे
9823087561

लठ्ठपणा किंवा स्थूलत्व ही दिवसेंदिवस गंभीर समस्या होत चालली आहे. भारतामध्ये आजमितीला 40 टक्के लोकांमध्ये अतिरिक्त वजनवाढ आढळते. या गंभीर समस्येची दखल केंद्र सरकारने घेत 'FSSAI' सारख्या उपक्रमांद्वारे ’फिट इंडिया मूव्हमेंट’, ’पोषण अभियान’ राबवित आहे. हा लठ्ठपणा म्हणजे उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी एक मोठा अडसर असतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग अशा आयुष्य पोखरून टाकणार्या आणि संसर्गजन्य नसलेल्या असंख्य आजारांना ते निमंत्रणच असते. निरामय आरोग्यासाठी अडसर असणार्या लठ्ठपणाला रोखण्यासाठीच्या उपाययोजना, जीवनशैली इ.च्या माध्यमातून आरोग्यक्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असणार्या डॉ. अविनाश भोंडवे यांच्या ‘चला वजन कमी करू या’ या पाक्षिक सदरातून आपण जाणून घेणार आहोत.
एकदा चतुर बिरबलाला तीन प्रश्न विचारले गेले होते - भाकरी का करपली? घोडा का अडला? पान का सडलं?
बिरबलाने एका वाक्यात उत्तर दिलं - न फिरवल्याने...
याच चालीवर जर विचारलं, मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार, हाडांचा ठिसूळपणा का वाढतो? तरुण मुलींमध्ये पाळी नियमित का येत नाही? ताणतणाव नाही तरी मानसिक नैराश्य का येते?
याचेही उत्तर एका वाक्यात आहे, खूप वजन वाढून लठ्ठपणा आल्यामुळे...
लठ्ठपणा किंवा स्थूलत्व म्हणजेच खूप जास्त वजनवाढ. हा लठ्ठपणा म्हणजे उत्तम आरोग्य प्राप्त करण्यासाठी एक मोठा अडसर असतो. मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, काही प्रकारचे कर्करोग अशा आयुष्य पोखरून टाकणार्या आणि संसर्गजन्य नसलेल्या असंख्य आजारांना ते निमंत्रणच असते.
गेल्या तीस वर्षांत जगभरातल्या लोकांच्या आरोग्यावर नजर टाकली, तर लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्व वयोगटांत स्थूलपणा आणि त्यामुळे होणारे विविध विकार खूपच वाढू लागले आहेत. भारतामध्ये आजमितीला 40 टक्के लोकांमध्ये अतिरिक्त वजनवाढ आढळते. त्यामुळे मधुमेही रुग्णांच्या संख्येबाबत भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. साहजिकच स्थूलपणा हा आरोग्याचा शत्रू मानला जाऊ लागला आहे.
लठ्ठपणा म्हणजे नेमके काय असते?
आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्या हालचाली करतो, जी शारीरिक कामे करतो त्यासाठी आपल्या शरीरातील ऊर्जा खर्च होत असते. आपल्या बोलण्यात, अभ्यास, वाचन, आणि इतर बौद्धिक कामे करण्यातसुद्धा आपली उर्जा वापरली जात राहते. एवढेच काय आपण झोपतो, त्यामध्येही कमी प्रमाणात, पण उर्जा ही वापरली जातेच. या सर्व कामासाठी आपल्याला जी शक्ती लागते, ती कॅलरीजच्या स्वरूपात मोजतात. कॅलरीजलाच मराठीत उष्मांक म्हणतात. आणि हे उष्मांक आपल्याला आपण रोज जे खातो, पितो त्यातून म्हणजेच आपल्या आहारातून मिळतात. थोडक्यात, आपल्या शरीरातली शक्ती किंवा ऊर्जा हालचालींनी खर्च होते आणि ती आहारातून जमा होते.
आपल्या शरीराला दैनंदिन व्यवहारातल्या कार्यासाठी आपल्याला जी शक्ती लागते, म्हणजेच जेवढे उष्मांक (कॅलरीज) लागतात, त्यापेक्षा जास्त उष्मांक असलेला आहार आपण जर घेत गेलो, तर जमा जास्त आणि खर्च कमी होऊन आपल्या शरीरात जास्त उष्मांक शिल्लक राहतात. हे खर्च न झालेले उष्मांक आपल्या शरीरात चरबीच्या रूपाने जमा होतात. आणि ही वाढलेली चरबी हातापायांवर, पोटावर, कंबरेवर, चेहर्यावर म्हणजे एकंदरीत सर्व शरीरावर जमा होते आणि परिणामी, आपण लठ्ठ होतो. थोडक्यात सांगायचे म्हणजे हालचालीसाठी लागणार्या गरजेपेक्षा जास्त आहार घेतला की वजन वाढत जाते. वजन वाढून माणसे जाडजूड होण्यामागचे हेच कारण असते.
लठ्ठपणाचे मोजमाप
आपले आदर्श वजन किती असावे, याकरता बी.एम.आय. (बॉडी मास इंडेक्स) हे गुणोत्तर वापरले जाते. आपले किलोग्रॅममधील वजनाला मीटरमधील उंचीच्या वर्गाने भागल्यावर जे उत्तर येते त्याला बी.एम.आय म्हणतात.
बी.एम.आय.= वजनाचे किलोग्रॅम / मीटरमध्ये उंचीचा वर्ग
म्हणजे उदा. प्रकाशचे वजन 60 किलो आहे आणि उंची 150 सेंटीमीटर आहे. 150 सेंटीमीटर म्हणजे 1.5 मीटर. आता 1.5 गुणिले 1.5 = 2.25 येते. म्हणजे प्रकाशचा बी.एम.आय. काढण्यासाठी 60 ला 2.25 ने भागायचे. म्हणजे उत्तर येईल 26.66. तर हा असेल प्रकाशचा बी.एम.आय.
कुठल्याही व्यक्तीचा बी.एम.आय. जर 18.5 ते 25 पर्यंत असेल तर ते आदर्श वजन मानले जाते. 25 ते 30 पर्यंत असेल तर ती वजनवाढ आणि हे गुणोत्तर 30 पेक्षाही अधिक असेल तर त्याला स्थूलत्व किंवा लठ्ठपणा मानतात.
कंबरेचा घेर
स्थूलपणा हा शरीरात जास्त जमा झालेल्या चरबीमुळे येत असतो. ही चरबी मुख्यत्वे पोटाभोवती आणि कंबरेभोवती जमा होते. त्यामुळे पोटाचा आणि कंबरेचा घेर हे देखील स्थूलत्वाचे निर्देशक मानले जातात. पुरुषांमध्ये 90 सें.मी. आणि स्त्रियांत 80 सें.मी. यापेक्षा कंबर जास्त असेल तर त्याला लठ्ठपणा मानावे, असा वैद्यकशास्त्रीय संकेत आहे. पोटाचा घेर हा कंबरेच्या घेरापेक्षा थोडा तरी कमी असावा, असा नियम आरोग्यदृष्ट्या मानला जातो. एखाद्या व्यक्तीचे वजन प्रमाणात असेल पण त्याच्या पोटाचा किंवा कंबरेचा घेर जास्त असेल तर ती व्यक्ती ही शास्त्रीयदृष्ट्या स्थूलच मानतात. शरीरातील चरबीचे प्रमाण मोजण्याच्या उपकरणानेसुद्धा स्थूलत्वाचे प्रमाण ठरवता येते.
कंबर आणि नितंब
कंबरेचा घेर मोजून त्याला नितंबाच्या घेराने भागल्यावर मिळणार्या आकड्याला ‘वेस्ट-हिप रेशो’ म्हणतात. उदा. पुन्हा प्रकाशचे कंबरेचे माप 90 सेंटीमीटर आहे आणि नितंबांपाशी घेर 100 सेंटीमीटर आहे, तर त्याचा वेस्ट-हिप रेशो, 90 भागिले 100 म्हणजे 0.9 आहे.
‘वेस्ट-हिप रेशो’ हा पुरुषांमध्ये 0.9 आणि स्त्रियांमध्ये 0.8 पेक्षा कमी असावा लागतो. तो जास्त असल्यास, त्या व्यक्तीची मध्यवर्ती स्थूलता जास्त आहे असे मानले जाते. कंबर आणि नितंब हे शरीराच्या मध्यभागात असतात. या मध्यवर्ती भागात स्थूलता जेवढी जास्त असेल, तेवढी त्या व्यक्तीला स्थूलतेमुळे होणार्या आजारांची शक्यता जास्त असते.
अनेक आजारांचे मूळ
लठ्ठपणामुळे अनेक आजार होतात. यामध्ये टाईप-2 मधुमेह, कोलेस्टेरॉलचे प्रमाण खूप वाढणे, उच्च रक्तदाब, हृदयविकार, अर्धांगवायू किंवा स्ट्रोक, रक्तवाहिन्यांमध्ये कोलेस्टेरॉलचे थर निर्माण होऊन त्या अरुंद होणे, पित्ताशयातील खडे, सांध्यांचे आजार, यकृताचे काही आजार, काही विशिष्ट प्रकारचे कर्करोग अशा विविध आजारांचा समावेश आहे. हे सर्व आजार ताब्यात ठेवण्यासाठी वजन कमी करून ते आदर्श वजनापर्यंत आणावे लागतात. हे विकार प्राणघातक असल्याने, उत्तम आरोग्यासाठी बेसुमार वजनवाढ टाळणे अत्यावश्यक असते.
वजनवाढीची कारणे
1. बालवयातील वजनवाढ- आपले मूल जितके गुटगुटीत दिसेल तेवढे ते ‘हेल्दी’ असते, असा अनेक मातांचा समज असतो. त्यामुळे मुलांवर खाण्याचा मारा करून त्याला जाडजूड बनवले जाते. उत्तरायुष्यात आढळणार्या लठ्ठपणाचे हे मुख्य कारण असते.काही बालकांचे वजन जन्मतःच जास्त असते. बाळाचे वजन जन्माच्या वेळेस 3000 ग्रॅमपेक्षा जास्त असेल, तरी उत्तरायुष्यात त्यांना स्थूलत्व प्राप्त होते.
2. कौटुंबिक वारसा - काही कुटुंबात स्थूलपणा सररास आढळतो. घरातील सार्या सदस्यात अतिरिक्त वजनवाढ आढळते. खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव हा कौटुंबिक वारसाही या व्यक्तीत आढळतो.
3. आईचे आजार- मातेला मधुमेह असल्यास तिचे बाळ जास्त वजनाचे भरते.
4. बेझल मेटॅबोलिक रेट कमी असणे- खाल्लेल्या अन्नातील उर्जेचा, शरीरांतर्गत चयापचय क्रियेत वापर कमी होऊन, त्याचे चरबीत रुपांतर होण्याचे प्रमाण जास्त असते. इतरांपेक्षा कमी खाऊनदेखील या व्यक्तींचे वजन जास्त भरते.
5. खाण्याच्या सवयी- जंक फूड्स, चरबीयुक्त खाणे, स्वयंपाकात अति तेलतुपाचा वापर, वरचेवर अतिगोड पदार्थ खाणे, शीतपेये, लोणी, चीज अशा सवयींनी आहारातल्या उष्मांकात वाढ होऊन त्याची चरबी बनते आणि शरीरावर ती जमा होते.
6. व्यायामाचा अभाव- बैठेे काम आणि अजिबात व्यायाम नसणे हा सद्यस्थितीतल्या जीवनशैलीचा महत्त्वाचा दोष आहे. त्यामुळे अगदी शाळेतल्या मुलांपासून थोरांपर्यंत खाल्लेल्या अन्नातील ऊर्जा पूर्ण वापरली जात नाही. सबब चरबीचे प्रमाण वाढून वजनवाढ होत राहते. तरुण आणि मध्यमवयीन लोकांत तासनतास टीव्ही आणि संगणकासमोर बसणे हे कारण आजकाल सर्वत्र दिसून येते आहे.
7. स्त्रियांचा स्थूलपणा- स्त्रियांमध्ये गरोदरपणात वाढलेले वजन हे प्रसूतीनंतर कमी करण्यासाठी विशिष्ट व्यायाम केले जात नाहीत. तसेच मासिक पाळी बंद झाल्यावर शरीरातील हार्मोन्समुळे वजनवाढ होते.
8. काही आजार- थायरॉइडचे प्रमाण कमी होणे, काही मानसिक आजार, काही औषधे यांनीसुद्धा अतिरिक्त वजनवाढ होऊ शकते.
9. प्रौढत्व- वयाच्या पंचविशीपर्यंत उत्तम तब्येत असलेल्या व्यक्तींना तिशी-चाळिशीनंतर वाढत्या वजनाचा त्रास होऊ लागतो. याचे कारण चाळिशीनंतर हळूहळू शरीराची ऊर्जेची गरज कमीकमी होऊ लागते. ऊर्जेची आवश्यकता कमी होते, मात्र लागणारी भूक तेवढीच असते, त्यामुळे आहार तेवढाच राहतो. त्यामुळे वजनवाढ होते. त्यामुळे मध्यमवयानंतर आहाराचे प्रमाण कमी करणे गरजेचे असते. साहजिकच ते होत नाही आणि म्हणूनच या वयात वजनवाढ होऊन मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचे त्रास होऊ लागतात.
थोडक्यात सांगायचे तर, वाढती अतिरिक्त वजनवाढ वेळेत रोखणे आणि संभाव्य लठ्ठपणा टाळणे उत्तम आरोग्यासाठी अत्यावश्यक असते. कारण वजनवाढ ही आरोग्याची शत्रू असते आणि लठ्ठपणा हा असंख्य आजारांचे मूळ असतो.
लेखक फॅमिली फिजिशियन आहेत.