एक अविस्मरणीय,हृदयस्पर्शी सोहळा

08 Dec 2025 17:00:14
डॉ. गोखले आणि मी आमंत्रित होतो दि. 16 नोव्हेंबर रोजीच्या एका कार्यक्रमाला. तो कार्यक्रम होता 300+ यशस्वी कॉक्लीअर इंप्लांट surgeries उत्सव सोहळा. या कार्यक्रमाचे निमंत्रक होते, प्रख्यात E.N.T. Surgeon डॉ. अविनाश वाचासुंदर आणि त्यांची टीम. हा कार्यक्रम रामकृष्ण मोरे सभागृह, चिंचवड येथे संपन्न झाला. अतिशय सुनियोजित, भव्यदिव्य असा हा सोहळा होता.
 
vivek
 
ह्या सोहळ्यात अनेक मान्यवर उपस्थित होतेच, त्याबरोबर मोरया हॉस्पिटलचा सर्व स्टाफ, स्वर नाद संस्थेचा स्टाफ, संस्थेत पुनर्वसन केंद्रात राहणारी लहान लहान मुले, त्यांचे आईवडील, स्पेशल ट्रेनिंग देणारे शिक्षक, ऑडिओलॉजिस्ट, स्पीच थेरपीस्ट, सोशल वर्कर्स, समाजसेवी संस्थांचे कार्यकर्ते इ. उपस्थित होते. ज्या मुलांना जन्मतःच बहिरेपणा आहे, त्यामुळे शब्दच ऐकले नाही तर ते उच्चार करणार कसे, त्यामुळे आलेले मुकेपण.
 
 
ह्याचा लवकरात लवकर शोध घेऊन त्यांच्यावर Choclear Implant surgery करणे व त्यानंतर त्यांचे पुनर्वसन करणे यामुळे त्यांना सर्वसामान्यांसारखे आयुष्य जगता येते. ही मुले नॉर्मल मुलांच्या शाळेत प्रवेश घेऊन तेथे शालेय शिक्षण घेऊ शकतात, इतकेच नाही तर स्पर्धा-परीक्षांना बसून बरीच प्रगती करू शकतात. त्यांच्यात आत्मविश्वास येतो आणि ह्या स्पर्धेच्या जगात ते मागे पडत नाहीत. जितक्या लवकर बहिरेपणाचे निदान होते, मुलांवर उपचार होतात, तितकी ती मुले अधिकाधिक सर्वसामान्यांसारखे बोलू लागतात, आत्मविश्वासाने जगात वावरू लागतात. उपचार उशीरा झाले तर मुले भाषा तर शिकतात, बोलूही लागतात, पण काही काही उच्चार तितकेसे स्पष्ट नसतात. पण ते नॉर्मल शाळेत शिक्षण घेऊ शकतात.
 
 
साधारण 1000 बाळंतीणींमध्ये जन्मतःच बहिरेपण असणार्‍या बाळांचे प्रमाण 1:4 आहे. ह्यांना लवकर शोधून काढणे, हेच मोठे आव्हान आहे. शहरी भागात तरी 1 ते दीड महिन्याच्या वयात ऑडिओमेट्री करून शोध घेता येतो. पण ग्रामीण भागात, तळागाळातील कुटुंबातील बाळांमधून अशी बाळे शोधून काढणे व योग्य वेळी, त्यांच्यावर उपचार करून त्यांचे पुनर्वसन करणे, हे काम किती कठीण आणि कष्टाचे आहे.
 
 
नेमके हेच काम डॉ. अविनाश वाचासुंदर आणि त्यांचे सुपुत्र डॉ. अक्षय वाचासुंदर (कान, नाक, घसातज्ज्ञ) हे दोघेही करीत आहेत. आत्तापर्यंत त्यांनी 300 च्या वर अशा प्रकारच्या यशस्वी शस्त्रक्रिया केल्या. त्यांच्या पुनर्वसनासाठी ह्या बालकांची 6 वर्षांपर्यंत राहण्याची, जेवणाची सोय त्यांनी केली आहे. ही मुले लहान असल्यामुळे त्यांच्यासोबत, त्यांची आई किंवा एक पालक तेथे राहतात. पालकांचे ट्रेनिंग घेऊन त्यांना मुलांना भाषा शिकविण्यासाठी प्रशिक्षित केले जाते. हे एक टीम वर्क आहे. सध्या ह्या पुनर्वसन केंद्रात 50 पेक्षा जास्त मुले आहेत. किती मोठा, महान विचार आहे ह्यामागे. किती लोकांचे कष्ट आहेत.
 
 
ह्या सर्व टीमने ह्या मुलांवर इतकी मेहनत घेतली की, ह्या मुलांमध्ये स्टेजवर इतक्या लोकांसमोर येऊन बोलण्याचा आत्मविश्वास आला आहे. त्या मुलांना इतर सामान्य मुलांसारखे बोलताना पाहून अक्षरशः डोळे पाणावले. एका मुलीचे, जी जन्मतःच बहिरी होती, त्याचे लवकर निदान झाल्यामुळे, तिच्यावर 14 व्या महिन्यात शस्त्रक्रिया केली. तेव्हा ती फक्त 6 वर्षांची होती. तिने मोठ्या संख्येनेे उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमोर गीतेचे श्लोक स्पष्ट उच्चारांसह तोंडपाठ म्हणून दाखवले. त्याच कार्यक्रमात एका पाच वर्षाच्या मुलाने मराठी व इंग्रजी दोन्हीही भाषांत कविता म्हणून दाखविल्या. आपल्या वडिलांशी स्टेजवर सुसंवाद केला. त्याच्या बाबांना किती कृतकृत्य झाले असेल, ह्याची कल्पनाच रोमांचित करणारी आहे. व्यासपीठावर एक 22-23 वर्षांची मुलगी आली, तिचेही शालेय शिक्षण सामान्य शाळेतच झाले व पुढे इंजिनीअरिंगचे शिक्षण COEP मध्ये झाले आणि आता तिचे लग्न ठरले आहे व तेही पूर्णपणे सामान्य मुलाशी!
 
 
ही शस्त्रक्रिया मोठ्या माणसांवरही करता येते. ज्यांना Hearing aid ने ऐकू येईनासे होते, त्यांच्यासाठी हे वरदानच आहे. Adult Choclear implantची अंदाजे 48-50 वयोगटातील एक महिला जिच्यावर ही शस्त्रक्रिया झाली, तिलाही सरांनी स्टेजवर बोलावले. त्यांनी सांगितले की, मी गमावलेला आत्मविश्वास ह्या ऑपरेशननंतर परत मिळविला. आता मला सोसायटीत वावरताना लेफ्टआऊट फीलिंग येत नाही. मी पूर्वीसारखी सर्वांमध्ये मिसळू शकते, पूर्वीसारखी सगळीकडे एकटी जाऊ येऊ शकते. मी पूर्णपणे स्वावलंबी झाले आहे.
 
 
हे सर्व प्रत्यक्ष पाहिल्यामुळे ह्या शस्त्रक्रियेबद्दलचा विश्वास दुणावला. वयोवृद्ध व्यक्तींना येणार्‍या बहिरेपणावर उपचार आहेत. कानाच्या यंत्राने ऐकू येत नाही म्हणून हताश, निराश होण्याची गरज नाही. रोज नवीन नवीन उपचारपद्धती येत आहेत, संशोधन होत आहे. डॉक्टरकडे जायला घाबरता कामा नये, चालढकल करता कामा नये. योग्य वेळी, योग्य डॉक्टरकडून घेतलेला उपचार आपल्या जीवनमानात आमूलाग्र बदल घडवू शकतो, हे लक्षात ठेवावे.
 
असा उपचारांचा लाभ योग्य वेळेत आणि योग्य वयात घेतला तर देशाला सशक्त, सुजाण नागरिक मिळतील. डॉ. अविनाश वाचासुंदर, डॉ. अक्षय वाचासुंदर आणि सूनबाई डॉ. जया वाचासुंदर (भूलतज्ज्ञ) यांच्याकडून आरोग्यक्षेत्रात असेच भरीव काम व्हावे, ही सदिच्छा!
 
- डॉ. अपर्णा गोखले
Powered By Sangraha 9.0