नाशिक ः- भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून शंकराचार्य न्यास, गंगापूर रोड येथे 26 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय संस्कृती व कलात्मक अभिव्यक्तीचे अद्वितीय दर्शन घडवणार्या संविधान मानचित्र रांगोळी प्रदर्शन उद्घाटनाचा भव्य सोहळा संपन्न झाला. भारतीय परंपरेचा, कला-संस्कृतीचा आणि संविधानाच्या विचारांचा सहभाव साकारणार्या या प्रदर्शनाचे उद्घाटन रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्त्रबुद्धे तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष, मराठा विद्या प्रसारक मंडळाचे सरचिटणीस अॅड. नितीन ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी संस्कार भारतीचे अखिल भारतीय भू-अलंकरण विधा प्रमुख रघुराज देशपांडे उपस्थित होते. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली रांगोळीच्या माध्यमातून भारतीय संविधान जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. याप्रसंगी मंचावर आशिष कुळकर्णी, अध्यक्ष शंकराचार्य न्यास उपस्थित होते.
दीपप्रज्वलन आणि नटराज पूजनाने कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. मंचावर मान्यवरांच्या आगमनानंतर संस्कार भारतीचे ध्येयगीत सादर झाले. त्यानंतर प्रास्ताविकात आशिष कुळकर्णी यांनी प्रदर्शनाची संकल्पना विशद करत, त्यामागील प्रेरणा आणि कलाकारांच्या सामूहिक प्रयत्नांचा उल्लेख केला. प्रमुख पाहुण्यांची ओळख सोनाली तेलंग यांनी करून दिली. यानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमाला विशेष रूपाने उपस्थित असलेल्या पश्चिम प्रांत दृश्य कला संयोजक कुडलय्या हिरेमठ यांचाही सत्कार करण्यात आला.
आपल्या मार्गदर्शनपर भाषणात रघुराज देशपांडे यांनी संविधानातील मानचित्रे रांगोळीच्या माध्यमातून साकार करण्यामागील विचार आणि तांत्रिक रचना स्पष्ट केली. संविधानातील भारतीय संस्कृतीचे समग्र दर्शन, सामाजिक-ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि कलाकारांची संवेदनशीलता यांचा उल्लेख त्यांनी केला. यानंतर सर्व कलाकारांना प्रशस्तिपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. अध्यक्षीय भाषणात अॅड. नितीन ठाकरे यांनी संविधानाचा आत्मा या महत्त्वपूर्ण विषयावर विचार मांडताना भारतीय संविधान हे समाजमनाची सामूहिक इच्छा आहे, असे प्रतिपादन केले.
डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांनी भारतीय संविधानातील मानचित्रे जगात अद्वितीय का ठरतात, याचे विवेचन केले. रामायण-महाभारतापासून बौद्धजातक कथांपर्यंतचा कलात्मक प्रवास इतर कोणत्याही देशात नसल्याने भारताचे संविधान सांस्कृतिकदृष्ट्या विलक्षण ठरते, हे त्यांनी स्पष्ट केले. रांगोळी ही सर्जन आणि विसर्जन यांची प्रतीकात्मक प्रक्रिया असून भारतीय तत्त्वज्ञानातील अनित्यत्व आणि सौंदर्यदृष्टी यांची सुंदर उकल यातून होते, असेही त्यांनी सांगितले. नाशिकच्या सांस्कृतिक भूमीत कार्यक्रम आयोजित झाल्याने कुसुमाग्रजांची आठवण त्यांनी विशेषत्वाने प्रकट केली आणि त्यांच्या कवितेच्या ओळींनी त्यांनी आपल्या भाषणाचा समर्पक शेवट केला.
भारतीय वैविध्य, परंपरा आणि मूल्यसंस्थांचे दर्शन घडवत प्रत्येक कलाकृती पाहुण्यांचे लक्ष वेधून घेत होती. परंपरेची जोड लाभलेल्या या प्रदर्शनातील संविधान मानचित्र रांगोळ्यांची सर्व पाहुण्यांनी पाहणी करताना मनापासून कौतुक केले आणि कलावंतांच्या श्रमांचे सार्थक झाले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन मनिषा अधिकारी यांनी केले. तसेच विविध सांस्कृतिक संस्थांचे मान्यवर, नागरिक, राजकीय नेते उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अवधूत देशपांडे, आशिष कुळकर्णी आणि राहुल वावीकर यांचे विशेष योगदान लाभले.
समारोप करताना अवधूत देशपांडे यांनी मनोगत व्यक्त करून सर्वांचे आभार मानले. शांतिमंत्राने कार्यक्रमाची सांगता झाली. ही भव्य प्रदर्शनी 26 ते 28 नोव्हेंबर, सकाळी 10 ते रात्री 9 या वेळेत शंकराचार्य संकुल, गंगापूर रोड येथे सर्वांसाठी खुली ठेवण्यात आली होती. संविधानातील भारतीय कला, मूल्ये आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन एका जागी घडवणार्या या प्रदर्शनास नाशिककरांनी मोठ्या संख्येने भेट दिली.