जबलपुरात श्री दत्त जन्मोत्सव थाटात साजरा

08 Dec 2025 14:56:35
 
दत्त  जन्मोत्सव  
 
मार्गशीर्ष महिन्यातील शुद्ध पौर्णिमा तिथीला श्री दत्तांचा अवतार झालेला आहे. ब्रह्मा, विष्णू व महेश या तीन प्रमुख देवांचे आणि सत्व, रज व तम या तीन गुणांचे व सनातन परंपरांचे ऐक्य म्हणजे श्री दत्त अवतार होय.
 
 
पारतंत्र्याच्या काळात 1932 साली जबलपूरसारख्या हिंदी भाषक प्रांतात वंदे मातरम या जाज्वल्य मंत्रापासून प्रेरणा घेऊन श्री दत्त भजन मंडळाची स्थापना झाली. या भजन मंडळात श्री दत्ताची सुंदर विग्रह असलेली मूर्ती अत्यंत विलोभनीय असून हे मंदिर म्हणजे एक जागृत देवस्थान आहे. त्रिगुणात्मक स्वरूपात येथे श्री दत्त विराजमान आहेत. 94 वर्षांची अविरत परंपरा जपणारी ही संस्था असून दासनवमी, शैलगमनयात्रा, महाष्टमी खेळ, श्री गणेशोत्सव, श्री दत्त जयंती उत्सव आदी मोठ्या प्रमाणात साजरा करते. प्रवचन, कीर्तन, व्याख्यान, यांच्या माध्यमातून भक्तीचा आणि वैराग्याचा झरा येथे पाझरत असतो.
 
 
दत्त जयंतीला सायंकाळी सहा वाजता श्री दत्तजन्म सोहळा पार पडला. तत्पूर्वी ह.भ.प. प्राची व्यास, डोंबिवली यांचे दत्तजन्माचे सुश्राव्य कीर्तन झाले. अत्री-अनसूयेच्या पोटी या बह्मांड चालकांचा बालरूपात जन्म झाला आणि त्रिदेवींचे गर्वहरण झाले अशी कथा त्यांनी आख्यानातून सादर केली.
 
 
श्री दत्त यांनी 24 गुरू केले असून त्यांचा सर्वत्र संचार असतो. ते भक्तांची मनोरथे अवश्य पूर्ण करतात. ते आपल्या भक्तांना मलंग वेशातही दर्शन देत असत. श्री दत्तांनी रामदासांना समर्थ हे संबोधन आणि कुबडी दिली.
 
 
भजन मंडळाच्या सात दिवसांच्या नाम सप्ताहात अखंड पहारा, रुद्राभिषेक, गुरुचरित्र पारायण, कीर्तन, भक्तीमाला, रंग खेले रघुवीरा असे एकाहून एक सरस कार्यक्रम संपन्न झाले. दत्त जन्मानंतर सुंठवडा वाटण्यात आला. श्री बालदत्ताचा पाळणा गायला गेला, तसेच औक्षण आणि दृष्ट हे सोहळेही झाले.
 
 
याप्रसंगी मंदिरात विद्युत रोषणाई करण्यात आली. सुमारे दोन हजार भक्तांनी दर्शन घेतले. बँडवर भक्तीगीते सादर करण्यात आली. मग प्रसाद वितरणाने उत्सवाची सांगता झाली. मंदिराशेजारीच दीड एकर परिसरात भव्य वास्तू उभारलेली असून इथे अन्य प्रांतातून येणार्‍या लोकांची माफक दरात राहण्याची व्यवस्था होते. तसेच पायी नर्मदा परिक्रमा करणार्‍यांची देखील व्यवस्था करण्यात येते. या ठिकाणी वीस वातानुकूलित खोल्या आहेत. तीन भव्य हॉल आहेत. तसेच संस्था स्वतःचे मंगल कार्यालय चालवते.
 
 
या संस्थेस स्वातंत्र्यवीर सावरकर, शंतनू किर्लोस्कर, बाबासाहेब पुरंदरे, जितेंद्र अभिषेकी, विक्रम सावरकर, यशवंतराव चव्हाण, वसंत साठे, सुमित्राताई महाजन, देवेंद्र फडणवीस, प्रकाश आमटे, निनाद बेडेकर, शैलेश टिळक, विवेक घळसासी, विजयराव देशमुख यांच्यासारख्या अनेक नामवंतांनी भेटी दिलेल्या आहेत. सध्या विजय भावे - अध्यक्ष, शरद आठले - सचिव आणि मनीष वैद्य - कोषाध्यक्ष म्हणून कार्य पाहतात.
 
 
श्री दत्त भजन मंडळासारखी समृद्ध संस्था बृहन्महाराष्ट्रातील मराठी माणसासाठी गौरवाची बाब आहे.
- अभय गोरे, पूर्व सचिव श्री दत्त भजन मंडळ
Powered By Sangraha 9.0