@मल्हार कृष्ण गोखले
7208555458
राजकारणाच्या पटावर एकाच वेळी अनेक खेळाडू आपापल्या खेळ्या करत असतात. इथे भारत आणि नव्याने जन्मलेल्या पाकिस्तानच्या या राजकीय पटावर, दिल्लीत बसलेले गव्हर्नर जनरल लॉर्ड लुई माऊंटबॅटन आणि कराचीत बसलेले महंमद अली जीना जबरदस्त खेळ्या करत होते. त्यांना त्यांच्याच भाषेत उत्तर द्यायला भारताकडे होते फक्त एकटे सरदार पटेल. उपपंतप्रधान आणि गृहमंत्री या अधिकारात पटेल प्रयत्नांची पराकाष्ठा करत होते; पण भारताचे मुख्य कर्णधार जे पंतप्रधान पंडित नेहरू होते, ते मात्र जागतिक शांतता, प्रेम, सद्भाव, अहिंसा इत्यादी शब्दभ्रमात अडकून पडलेले दिसत होते. काश्मीरचे विलीनीकरण ही समस्या बनली ती त्यामुळेच. जाणून घेऊ या, तो राजकीय पट आजच्या कथेत.
15 ऑगस्ट 1947 या दिवशी भारत स्वतंत्र झाला आणि बरोबर सव्वा दोन महिन्यांनी म्हणजे 22 ऑक्टोबर 1947 या दिवशी पाकिस्तानने भारताच्या काश्मीर प्रांतावर आक्रमण केले. हे अधिकृत आक्रमण नव्हते आणि ते भारताच्या भूभागावर नव्हते. म्हणजे काय?
म्हणजे पाकिस्तानी सैन्याने, गणवेशधारी सैनिकांनी हे आक्रमण केलेले नसून पठाणी टोळीवाल्यांनी काश्मीर प्रदेशावर हल्ला चढवला होता. टोळीवाल्यांमध्ये अर्थातच पाकिस्तानी सैनिक होतेच आणि या सगळ्या कारवाईचे सूत्रसंचालन रावळपिंडीच्या पाकिस्तानी सेना मुख्यालयातूनच केले जात होते. सूत्रधार होता मेजर जनरल अकबर खान. एक कडवा आणि महत्त्वाकांक्षी पठाण सेनापती.
राजनैतिकदृष्ट्या हे आक्रमण भारताच्या भूभागावर नव्हतेच मुळी, कारण काश्मीर अजून भारतात सामील झालेलेच नव्हते. ते एक स्वतंत्र संस्थान होते. राजनैतिक स्थिती अशी होती की, बहुसंख्य नागरिक मुसलमान असलेल्या जम्मू-काश्मीर या संस्थानचे हिंदू अधिपती महाराणा हरी सिंग यांनी पाकिस्तान किंवा भारतात सामील होण्यास नकार दिल्यामुळे, पठाण टोळीवाल्यांनी आपल्या काश्मिरी भाऊबंदांना स्वतंत्र करण्यासाठी काश्मीरवर सशस्त्र हल्ला चढवला आहे. याला भारताने आक्षेप घेण्याचे कारणच नव्हते.
पार्श्वभूमी
दुसरे महायुद्ध 15 ऑगस्ट 1945 या दिवशी जपानच्या शरणागतीने संपले; परंतु ब्रिटनमधील विन्स्टन चर्चिल यांचे हुजूर पक्षीय सरकार या आधीच निवडणुकीत हरले होते. क्लेमंट अॅटली यांचे मजूर पक्षीय सरकार जुलै 1945 मध्येच सत्तारूढ झाले होते. ऑगस्ट 1945 मध्ये ब्रिटन-अमेरिका-रशिया-फ्रान्स ही दोस्त राष्ट्रे महायुद्धात विजयी झाली; पण ब्रिटनचा भयंकर शक्तिपात झाला होता. जवळपास तीन पिढ्या रणांगणावर कापल्या गेल्या होत्या. ब्रिटनला आता आपल्या साम्राज्याचे ओझे पेलवेनासे झाले होते. त्यातच फेब्रुवारी 1946 मध्ये मुंबईत नौदल सैनिकांनी बंड पुकारले. हे बंड मोडून काढण्यात ब्रिटिश राजसत्ता यशस्वी झाली; पण आता आपल्याला भारत सोडल्याशिवाय गत्यंतर नाही, हे त्यांना कळून चुकले. 16 ऑगस्ट 1946 या दिवशी कलकत्ता शहरात मुस्लीम लीगने योजनापूर्वक दंगा घडवून 10 हजार हिंदूंना ठार मारले. भारताचा व्हाइसरॉय लॉर्ड आर्चिबाल्ड वेव्हेल काहीही करू शकला नाही. तेव्हा त्याला लंडनला परत बोलावून लॉर्ड लुई माऊंटबॅटन याला व्हाइसरॉय बनवण्यात आले. जुलै 1947 मध्ये ब्रिटिश संसदेने ’इंडीपेन्डन्स टु इंडिया 1947’ हा प्रस्ताव पारित केला. माऊंटबॅटनला आदेश देण्यात आला की, उशिरात उशिरा जून 1948 पर्यंत इंग्रजी सत्ताधार्यांनी भारत सोडावा. तत्पूर्वी भारत आणि पाकिस्तान असे देश निर्माण करून अनुक्रमे काँग्रेस आणि मुस्लीम लीग या राजकीय पक्षांच्या हाती राज्यशकट सोपवावा.
पण माऊंटबॅटनने ठरवले की, जून 1948 पर्यंत थांबायचे नाही. 15 ऑगस्ट 1947 या दिवशीच सत्तांतर करायचे. असे का? 15 ऑगस्ट हाच दिवस का? तर 15 ऑगस्ट या तारखेला माऊंटबॅटनच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यात महत्त्वाचे स्थान होते. भारतात व्हाइसरॉय म्हणून येण्यापूर्वी माऊंटबॅटन हा दोस्त राष्ट्रांच्या आग्नेय आशियाई कमांडचा सुप्रीम कमांडर होता. जर्मनीने मे 1945 मध्येच शरणागती पत्करली होती. त्यामुळे युरोपातले युद्ध संपले होते; पण जपान शरण येत नव्हता. म्हणून अमेरिकेने ऑगस्ट 1945 च्या पहिल्या आठवड्यात हिरोशिमा आणि नागासाकी या शहरांवर अणुबाँब टाकले. तेव्हा 15 ऑगस्ट 1945 या दिवशी जपानने शरणागती जाहीर केली, ती आग्नेय आशियाचा सर्वोच्च दोस्त सेनापती या नात्याने 4 सप्टेंबर 1945 या दिवशी माऊंटबॅटनने सिंगापूर येथे प्रत्यक्ष स्वीकारली. म्हणून 15 ऑगस्ट 1947 रोजी सत्तांतर करण्याचा निर्णय माऊंटबॅटनने घेतला.
पाकिस्तान 14 ऑगस्टलाच
काँग्रेस नेत्यांनी असे ठरवले की, सत्तांतराचा कार्यक्रम दिल्लीमध्ये 14 ऑगस्ट 1947 या दिवशी रात्री 11 वाजता सुरू होईल आणि बरोबर 12 च्या ठोक्याला म्हणजे 15 ऑगस्ट ही तारीख सुरू होता क्षणी माऊंटबॅटन सत्तांतराची घोषणा करून पंडित नेहरूंच्या हाती सूत्रे सोपवतील. ब्रिटनचा राष्ट्रध्वज युनियन जॅक हा उतरवला जाईल आणि भारताचा राष्ट्रध्वज तिरंगा याचे आरोहण केले जाईल.
पण मग पाकिस्तानचे काय? तिथली सत्तासूत्रे कोण कोणाला देणार? तेव्हा माऊंटबॅटननी महंमद अली जीनांना सूचना केली की, पाकिस्तानच्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम 14 ऑगस्ट 1947 रोजी सकाळीच ठेवावा. जीनांची याला काहीच हरकत नव्हती. मग 14 ऑगस्टच्या सकाळी पाकिस्तानची (तेव्हाची) राजधानी कराचीमध्ये माऊंटबॅटननी सत्तासूत्रे जीनांकडे सोपवली. भाषणे झाली. समारंभ झाला. मेजवानी झाली. मग ताबडतोब विमान पकडून माऊंटबॅटन, त्यांचा सगळा परिवार, कर्मचारी वर्ग हे दिल्लीला परतले. मग रात्री ठरल्याप्रमाणे दिल्लीत समारंभ होऊन पंडित नेहरूंचे ’नियतीशी करार’ हे अत्यंत प्रसिद्ध भाषण झाले.
संस्थानांची समस्या
इंग्रजांच्या राज्यात प्रशासकीय कारभाराचे दोन प्रकार होते. ब्रिटिश इंडिया म्हणजे इंग्रजांनी जिंकलेला भारताचा जो भूप्रदेश होता, त्याचा राज्यकारभार इंग्रज गव्हर्नर चालवत असत, तर संस्थानांमध्ये राजा, नबाब किंवा जमीनदार आणि जहागीरदार हे राज्यप्रमुख या नात्याने राज्यकारभार पाहात. मात्र प्रत्येक संस्थानात इंग्रजांचा एक रेसिडेंट असे. त्याच्या सल्ल्यानेच या राज्यप्रमुखांना राज्य चालवावे लागे. थोडक्यात, इंग्रज सरकार हे सार्वभौम सत्ताधीश आणि संस्थानिक हे मांडलिक राजे, अशी ही अवस्था होती.
आता माऊंटबॅटननी सर्व संस्थानिकांना कळवले की, आम्ही ब्रिटिश इंडियाचा कारभार काँग्रेस आणि मुस्लीम लीगकडे सुपूर्द करीत आहोत. तुम्ही तुमचे संस्थान भारत किंवा पाकिस्तान यांच्यात सामील करायचे की स्वतंत्र ठेवायचे, हे ठरवायला मुखत्यार आहात.
या वेळी भारतीय उपखंडात एकूण 565 संस्थाने होती. पैकी कलात, चित्रल आदी दहा संस्थाने पाकिस्तान बनणार्या प्रदेशातच असल्यामुळे ती पाकिस्तानात सामील झाली. उरलेली 554 लगेच नव्हे, पण हळूहळू भारतात सामील झाली. हैदराबाद आणि जुनागड व जुनागडच्या अंतर्गत असणारी मांगरोल वगैरे संस्थाने सप्टेंबर 1948 पर्यंत पोलीस कारवाई करून भारतात विलीन करण्यात आली. उरले फक्त एक संस्थान- काश्मीर!
म्हणजे पाहा, ऑगस्ट 1947 पासून सप्टेंबर 1948 पर्यंत सतत प्रयत्न करून गृहमंत्री सरदार पटेल आणि त्यांचे आय.सी.एस. सहायक व्ही. पी. मेमन यांनी संस्थानांचा प्रश्न सोडवला.
पण महंमद अली जीनांना एवढा वेळ नव्हता. त्यांना काश्मीरचे महाराजा हरी सिंग यांच्याकडून ताबडतोब काश्मीर संस्थानचा पाकिस्तानातच विलय हवा होता. महाराजा हरी सिंग हे डोग्रा राजपूत वंशाचे असून तसे हिंदुत्वप्रेमी होते. त्यांना पाकिस्तानात नक्कीच सामील व्हायचे नव्हते; पण भारतात सामील होणे म्हणजे पंडित नेहरूंच्या स्वामित्वाखाली जाणे, हेही त्यांना नकोसे होते. भारतातल्या तमाम जनतेचे पंडित नेहरू हे अत्यंत लाडके नेते होते. खरोखरच नेहरूंची लोकप्रियता अफाट होती; पण नेहरूही मूळचे काश्मिरी आणि हरी सिंगही काश्मिरी. त्यामुळेच बहुधा महाराजांना नेहरूंचा वरचष्मा नको असावा.
तेव्हा महाराजांनी स्वतंत्र राहण्याचा निर्णय घेतला. आता जीनांनीही निर्णय घेतला. बर्या बोलाने येत नाहीस, तर मग तुला पळवूनच नेतो आणि खरे म्हणजे काश्मीरला अशा रीतीने पळवून आणण्याची तयारी रावळपिंडीतल्या पाकिस्तानी सेना मुख्यालयात 12 ऑगस्ट 1947 पासूनच सुरू झाली होती. म्हणजे बघा, पाकिस्तान निर्माण झाला 14 ऑगस्टला, तर यांची काश्मीरवर आक्रमणाची योजना दोन दिवस आधीच कार्यान्वित झालीसुद्धा. या योजनेचे सांकेतिक नाव होते ’ऑपरेशन गुलमर्ग ’आणि तिचा सूत्रधार होता जनरल तारीक म्हणजेच मेजर जनरल अकबर खान. 22 ऑक्टोबर 1947 रोजी पठाणी टोळीवाल्यांनी काश्मीरवर आक्रमण केले आणि ‘ऑपरेशन गुलमर्ग’ सुरू झाले.