डॉक्टरांनी निर्माण केलेल्या परंपरेप्रमाणे संघाचे संपूर्ण कार्य वरपासून खालपर्यंत लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. प्रत्येक स्तरावर विचारविमर्श, चर्चा, मुक्त मतप्रदर्शन, वैयक्तिक उपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य, सामूहिक निर्णय व त्याची एकमताने अंमलबजावणी असे संघ कार्यपद्धतीचे स्वरूप असते. ‘सभी हिंदू सहोदर हैं। यह जन-जन को सभी कहना॥’ अशी शाखेत म्हटल्या जाणार्या एका गीताची पंक्ती आहे.
26 नोव्हेंबर हा ‘संविधान दिवस’ म्हणून मानला जातो. कारण 26 नोव्हेंबर 1949 या दिवशी स्वतंत्र भारताचे संविधान स्वीकारले गेले. भारत स्वतंत्र, सार्वभौम आणि प्रजासत्ताक राष्ट्र म्हणून स्वाभिमानाने जगातील राष्ट्रसमूहामध्ये उभे राहिले.
संविधानाची प्रास्ताविका ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी सुरू होते. गर्दीला ‘लोक’ ही संज्ञा प्राप्त होत नाही. लोक म्हणजे एका दिशेने आपल्या स्वभावगत पद्धतीने जाणारा समूह.
आपला देश राज्यघटनेमुळे प्रजासत्ताक झाला, असे नसून आम्ही भारताचे लोक प्रजासत्ताक मानसिकतेचेच प्राचीन काळापासून असल्यामुळे आपली राज्यघटना प्रजासत्ताक राजवट देणारी झाली आहे. प्रजासत्ताक म्हणजे लोकशाही. लोकशाही म्हणजे निरंतर विचारविनिमय, चर्चा, मतप्रदर्शनाचे पूर्ण स्वातंत्र्य, उपासना पद्धतीचे पूर्ण स्वातंत्र्य, दुसर्याचे मत ऐकून घेण्याची मानसिकता आणि केवळ परमत सहिष्णुताच नाही तर परमताचा आदर असे वर्णन केले जाते. भारताच्या लोकजीवनात ही लोकशाही जीवनमूल्ये खोलवर रुजलेली दिसतात.
वेदकाळापासून भारतात ‘लोकसभ्यता’ विकसित होत गेली आहे. या काळात असंख्य मतमतांतरे झाली. अनेक पंथ-उपपंथ आणि संप्रदाय निर्माण झाले. वेगवेगळी दर्शने निर्माण झाली. अनेक भाषांचा व कलांचा विकास झाला. हे सर्व आपले आहे असे आपल्याला वाटते. तीर्थयात्रा करताना ही विविधता बाधा बनत नाही.
भारतीय समाज हजारो वर्षांपासून ‘लोकशाही जीवनमूल्ये जगणारा समाज’ आहे. या ‘समाजाचे लोकशाही जगणे’ घटनाकारांनी शब्दबद्ध केले. गुलामीच्या प्रदीर्घ कालखंडानंतर संविधान रूपाने भारतीय जीवनमूल्ये जगासमोर आली. हे युगप्रवर्तक काम झाले आहे. घटना समितीतील सर्व विद्वान बंधू-भगिनींची सामूहिक बुद्धिमत्ता त्यासाठी पणास लागली आहे.
आपली राज्यघटना स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तीन सूत्रांवर आधारलेली आहे. भारताला स्वातंत्र्य प्राप्त व्हावे म्हणून अथक परिश्रम करणार्या डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विस्तार व विकास करताना ही तिन्ही जीवनमूल्ये संघटनेत रुजवण्याचा प्रारंभापासून प्रयत्न केलेला दिसतो.
1. स्वातंत्र्य आंदोलनात सक्रिय असलेल्या अनेक नेत्यांशी विचारविनिमय करून मगच संघ सुरू करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.
2. संघटन कार्याचे नाव सहा महिन्यांनी ठरले. 26 जण बैठकीला होते. तीन नावांच्या सूचना आल्या. 1. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, 2. जरीपटका मंडळ, 3. भारतोद्धारक मंडळ. मुक्त चर्चा आणि विचारविनिमय झाला; मतदान झाले. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ हे नाव हवे, असे म्हणणारे 20 जण होते. ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या तीन शब्दांचे महत्त्व विशद करणारी दोघा-तिघांची भाषणे झाली. या नावाची निवड झाल्यानंतर डॉक्टरांचे छोटेसे भाषण झाले.
3. नामकरण झाल्यानंतर डॉक्टरांनी एक प्रयोग केला. काही प्रमुख स्वयंसेवकांना संघाचे ध्येयधोरण काय असावे, नियमावली काय असावी, संघात प्रवेश कोणाला असावा, आपल्यालाच संघ वाढवायचा आहे, असे समजून प्रबंध लिहून आणावयास सांगितले.
4. रामटेकच्या यात्रेत सुव्यवस्थेसाठी जावे, असे काही स्वयंसेवकांच्या मनात आले. यात्रेची सुव्यवस्था हा काही एकट्या संघाचा विषय नाही. डॉक्टरांनी अनाथ विद्यार्थिगृहाचे विश्वस्त, बजरंग मंडळाचे पदाधिकारी आणि संघाचे स्वयंसेवक अशी संयुक्त बैठक बोलावली. रामटेकच्या यात्रेच्या व्यवस्थेत लक्ष घालणे आवश्यक आहे, यावर एकमत झाले. काही वेशही ठरला.
5. काम वाढू लागले; तसे संघटनेची व्यवस्था लावणे आवश्यक झाले. प.पू. सरसंघचालक डॉ. हेडगेवार व त्यांना साहाय्यक म्हणून मा. सरकार्यवाह बाळासाहेब हुद्दार व सरसेनापती म्हणून मार्तंडराव जोग असे त्या वेळच्या संघचालकांच्या बैठकीत ठरवण्यात आले. शाखेवर डॉक्टरांना ‘सरसंघचालक प्रणाम’ देण्यात आला. त्याच दिवशी डॉक्टरांच्या नोंदवहीतील नोंदी पाहण्यासारख्या आहेत.
* संघाचा जन्मदाता मी नसून तुम्ही लोकच आहात, याची मला पूर्ण जाणीव आहे. * तुमची इच्छा असेल व आज्ञा असेल तोपर्यंत हे काम मी करीत राहीन.
* परंतु मी या कामाला लायक नसून माझ्यामुळे संघाचे नुकसान होत आहे, असे आपणास वाटत असेल, तर दुसरा योग्य माणूस या जागेकरिता निवडून काढावा.
6. 1929 च्या सुमारास शाखांची भरभराट होत होती. तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह सारखा वाढत चालला होता. कार्यकर्ते मोठा मेळावा भरवावा म्हणून डॉक्टरांच्या मागे लागले. शिवराज्याभिषेकाच्या दिनी विराट शक्तिप्रदर्शन करावे. स्वयंसेवकांचा आत्मविश्वास व उत्साह वाढेल. डॉक्टरांचे मन सांगत होते, परकीय इंग्रज सरकारच्या डोळ्यावर येईल असे घाईने काही करू नये; पण त्यांनी तरुणांना स्वतः नकार दिला नाही. माननीय संघचालकांना पत्र लिहून मोठा कार्यक्रम घेणे कितपत हितकारक ठरेल याची विचारणा केली. सध्या मोठा मेळावा घेऊ नये असे ठरले.
7. डॉक्टर आजारी पडले; मृत्यू जवळ आल्याची जाणीव सर्वांनाच झाली. डॉक्टरांनाही झाली असणारच! जवळ बसलेल्या यादवराव जोशींना त्यांनी विचारले, संघाचे वरिष्ठ अधिकारी दिवंगत झाल्यावर त्यांचा अंत्यसंस्कार लष्करी थाटात कराल काय? संघ हे एक मोठे कुटुंबच आहे. कुटुंबप्रमुखासारखे साधे व नेहमीचे स्वरूप असावे.
डॉक्टरांच्या जीवनातील सात निवडक प्रसंग सांगण्याचा हेतू संघटनेमध्ये लोकशाही मूल्ये रुजवण्यासाठी डॉक्टरांनी किती सतर्कता राखली ते आपल्या लक्षात यावे.
डॉक्टरांनी निर्माण केलेल्या परंपरेप्रमाणे संघाचे संपूर्ण कार्य वरपासून खालपर्यंत लोकशाही मूल्यांवर आधारित आहे. प्रत्येक स्तरावर विचारविमर्श, चर्चा, मुक्त मतप्रदर्शन, वैयक्तिक उपासनेचे पूर्ण स्वातंत्र्य, सामूहिक निर्णय व त्याची एकमताने अंमलबजावणी असे कार्यपद्धतीचे स्वरूप असते.
अखिल भारतीय कार्यकारी मंडळ व अखिल भारतीय प्रतिनिधी सभा अशा दोन बैठका न चुकता दरवर्षी होतात. संपूर्ण कामकाजाची नोंद ठेवली जाते. मागच्या वर्षीच्या बैठकीची नोंद वाचली जाते व अनुमोदित करून घेतली जाते. प्रस्तावावर मुक्त चर्चा होते. कोणालाही थांबवले जात नाही. प्रस्ताव प्रसिद्धीला दिले जातात. दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात.
1948 साली महात्मा गांधींच्या हत्येचा धादांत खोटा आरोप ठेवून स्वतंत्र भारताच्या सरकारने संघावर बंदी आणली होती. कायद्याचे काटेकोर पालन करून बंदी सहन केली. सत्याग्रह करावा लागला. कुठेही हिंसा झाल्याचे अपवाद म्हणूनदेखील उदाहरण नाही.
वर्तमान सरसंघचालक मा. क्षेत्रसंघचालकांशी चर्चा करून नवीन सरसंघचालकांचे नाव ठरवतात. अधिकारी व स्वयंसेवक (बाल, शिशू, स्वयंसेवकदेखील) असा भेद संघात नसतो; सर्वच स्वयंसेवक असतात.
शाखा संघाचे प्रातिनिधिक स्वरूप आहे. संघशाखेला दरवाजा नाही. ओपन नॅशनल स्कूल. शाखेची आठ-दहा जणांची कार्यसमिती असते. संघात त्याला शाखा संच/टोळी म्हणतात. कार्यसमितीची साप्ताहिक वा पाक्षिक बैठक होते. चर्चेत, विचारविनिमयात व निर्णयप्रक्रियेत सर्व जण भाग घेतात. मागील आढावा आणि पुढील योजना यांचा विचार होतो. नवीन कोण स्वयंसेवक झाले, याची नोंद घेतली जाते.
वस्तीतील घरांशी संपर्क करणे व त्यांना संघाची माहिती देणे, हे काम सहजगत्या होत असते. शाखा आपला वार्षिकोत्सव करते. वर्षभराचे वृत्त सर्वांसमोर ठेवले जाते.
लोकशाही जीवनमूल्यांनुसार स्वयंसेवकांची जडणघडण सहज होत असते. त्याचा परिणाम आणीबाणीच्या (इमर्जन्सी) संकट कालखंडात दिसून आला. लोकशाही जीवनमूल्यांवर आधारित सर्व मानवी अधिकार कायद्याने रद्द करण्यात आले होते. अन्यायाबद्दल दाद मागण्यास न्यायालयामध्ये जाण्याचेही दरवाजे बंद होते. आणीबाणी हटावी व लोकशाही मूल्यांची पुनर्स्थापना व्हावी म्हणून ‘लोक संघर्ष समितीच्या’ वतीने सत्याग्रहास प्रारंभ झाला. सत्याग्रहात उडी घेणे म्हणजेच घोर अंधारात उडी घेण्यासारखेच होते. पुढे काय होईल? काहीच सांगता येत नव्हते. अशा अनिश्चित स्थितीमध्ये एक लाखाहून अधिक स्वयंसेवकांनी सत्याग्रहात भाग घेतला. आणीबाणी उठवावी लागली. तुरुंगातून सर्व मुक्त झाले. लोकशाही जीवनमूल्यांची पुनर्स्थापना झाली. काही जणांचा जेलमध्येच मृत्यू झाला. कुठेही सरकारी मालमत्तेची तोडफोड झाली नाही.
स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या तत्त्वत्रयीबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार मननीय आहेत. (संदर्भ: बोल महामानवाचे- पृष्ठ क्र. 125).
माझ्या तत्त्वज्ञानात स्वातंत्र्य आणि समतेच्या अतिक्रमणापासून संरक्षण मिळावे म्हणूनच फक्त कायदेकानूचे स्थान गृहीत धरलेले आहे; पण कायद्याचे स्थान मी फारच गौण मानतो, कारण स्वातंत्र्य व समतेच्या भंगाबाबतीत कायदा खात्रीने समर्थ ठरेल, असा मला विश्वास वाटत नाही. मी बंधुत्वाला सर्वोच्च स्थान देऊ इच्छितो, कारण स्वातंत्र्य आणि समता नाकारली जाण्याप्रसंगी बंधुभाव हाच खराखुरा रक्षक ठरतो. सहभाव हे बंधुभावाचे दुसरे नाव आहे आणि बंधुभाव अथवा मानवता हे धर्माचे दुसरे नाव आहे. कायदा हा धर्मातीत असल्यामुळे तो कोणीही मोडू शकतो. याउलट सहभाव अथवा धर्म हा पवित्र असल्यामुळे त्याला मान देणे हे प्रत्येकाचेच कर्तव्य समजले जाते.
बंधुभाव हे धर्मतत्त्व आहे, अशी श्रद्धा प्रत्येक व्यक्तीच्या अंत:करणात निर्माण करणे, हे एक फार मोठे राष्ट्रकार्य आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा, राष्ट्राची एकता व एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्प संविधानाच्या प्रास्ताविकेत व्यक्त केला आहे.
भावंड-भावनेचा विकासच स्वातंत्र्य व समता या जीवनमूल्यांचे आश्वासन देऊ शकतो.
संघशाखा चालवण्याचा उद्देश हिंदू समाजात बंधुभावना जागृत व मजबूत करण्याचा आहे. ‘सभी हिंदू सहोदर हैं। यह जन-जन को सभी कहना॥’ अशी शाखेत म्हटल्या जाणार्या एका गीताची पंक्ती आहे. समूहाने ‘भारतमाता की जय’ म्हणणे यात भावंड-भावनेचा विकासच आहे.