@अर्चित गोखले
व्यंकटेश केतकरांंनी 1930 साली गणित मांडून नेपच्यूनपलीकडे दोन ग्रह असण्याचा अंदाज वर्तविला. या दोन ग्रहांना ब्रह्मा आणि विष्णू अशी नावे दिली. विष्णू ग्रहाबद्दल अद्याप कुठलेही पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले नसले तरी केतकरांनी अंदाज वर्तविलेला ब्रह्मा ग्रह म्हणजेच प्लुटो आहे. ग्रहाच्या गणिताबरोबर खगोलशास्त्रातील इतर पैलूंमध्येदेखील व्यंकटेश केतकरांचे महत्त्वाचे योगदान होते. अशा या थोर खगोलशास्त्रज्ञांच्या योगदानाबद्दल माहिती देणारा लेख..
प्लूटो या बटुग्रहाचा 18 फेब्रुवारी 1930 रोजी शोध लागला. अर्थात त्याचा शोध लागला तेव्हा तो सौरमालेतील नववा ग्रह म्हणून ओळखला जात असे. त्यानंतर 2006 मध्ये इंटरनॅशनल ऍस्ट्रॉनॉमिकल युनिअनने प्लुटोचे बटुग्रहांमध्ये वर्गीकरण केले. क्लाईड टॉमबॉ हे प्लुटोचा शोध लावण्यासाठी ओळखले जातात. परंतु 1930च्या सुमारे 19 वर्षे आधी म्हणजेच 1911 मध्ये एका भारतीय खगोलशास्त्रज्ञानी नेपच्यूनच्या पलीकडे असलेल्या नवव्या ग्रहाचा खगोलशास्त्रीय संकल्पनांच्या आणि गणिताच्या आधारे अंदाज वर्तविला होता. ते थोर खगोलशास्त्रज्ञ होते व्यंकटेश बापूजी केतकर.
केतकर यांचा जन्म 18 जानेवारी 1854 रोजी झाला. त्यांचे वडील बापूशास्त्री केतकर हेदेखील खगोलअभ्यासक होते. व्यंकटेश केतकरांच्या वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचे वडील बापूशास्त्री यांचे निधन झाल्यामुळे व्यंकटेश केतकारांवर संपूर्ण घराच्या आर्थिक जबाबदारीचा भार आला. नाईलाजाने त्यांना मॅट्रिक परीक्षेनंतर पुढील शिक्षण न घेता वयाच्या एकविसाव्या वर्षी शाळेत शिक्षक म्हणून नोकरी स्वीकारावी लागली. परंतु त्यांना खगोलशास्त्राची प्रचंड आवड असल्याने ते सातत्याने खगोलशास्त्राचा अभ्यास करत राहिले. नवव्या ग्रहाचे गणित मांडण्यापलीकडे देखील व्यंकटेश केतकरांनी खगोलशास्त्रात अतिशय महत्वाचे योगदान दिले आहे.
नवव्या ग्रहाचे गणित केतकरांनी लॅप्लेस रेसोनन्स ह्या खगोलशास्त्रातील संकल्पनेच्या आधारावर मांडले. गुरू ग्रहाचे तीन मोठे उपग्रह लॅप्लेस रेसोनन्सचे नियम समजावण्यासाठी उपयुक्त ठरतात. गुरू ग्रहाचा उपग्रह गॅनिमेड गुरूभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या कालावधीत गुरुचा उपग्रह युरोपा दोन प्रदक्षिणा पूर्ण करतो तर गुरूचा उपग्रह आयो (lo) चार प्रदक्षिणा पूर्ण करतो. त्याच प्रकारे हे नियम नेपच्यून आणि त्याच्या पलीकडच्या प्लुटिनोस या खगोलीय वस्तूंनादेखील लागू पडतात. अर्थात त्याचे गुणोत्तर गुरुच्या उपग्रहांसारखे 1:2:4 नसून ते 2:3 आहे. म्हणजेच नेपच्यून सूर्याभोवती तीन प्रदक्षिणा पूर्ण करण्याच्या कालावधीत प्लुटो सूर्याभोवती दोन प्रदक्षिणा पूर्ण करतो. याच सूत्राच्या आधारे गणित मांडून व्यंकटेश बापूजी केतकर ह्यांनी नवव्या ग्रहाचे सूर्यापासून असलेले अंतर आणि त्याचा सूर्याभोवतीचा प्रदक्षिणा काळ याचा अंदाज वर्तविला. केतकरांनी गणित मांडून नेपच्यून पलीकडे दोन ग्रह असण्याचा अंदाज वर्तविला.

त्यांनी ह्या दोन ग्रहांना ब्रह्मा आणि विष्णू अशी नावे दिली. विष्णू या केतकरांनी अंदाज वर्तविलेल्या ग्रहाबद्दल अद्याप कुठलेही पुरावे शास्त्रज्ञांना मिळाले नसले तरी केतकरांनी अंदाज वर्तविलेला ग्रह ब्रह्मा म्हणजे नेमका कोणता ग्रह हे आपल्या लक्षात आले असेलच, अर्थात हा ग्रह म्हणजेच प्लुटो! व्यंकटेश बापूजी केतकर यांनी प्लुटोचे सूर्यापासून अंतर 38.95 खगोलीय एकक (एक खगोलीय एकक म्हणजे पृथ्वी ते सूर्य ह्यांचे सरासरी अंतर म्हणजेच 15 कोटी किलोमीटर) असल्याचे सांगितले तर आधुनिक विज्ञानाने शोधलेले आणि मान्यताप्राप्त अंतर हे 39.482 खगोलीय एकक आहे. त्याचबरोबर सूर्याभोवती एक प्रदक्षिणा घालायला प्लुटोला 242.28 वर्ष लागतात असा अंदाज केतकरांनी वर्तविला तर आधुनिक विज्ञानाने शोधलेले आणि मान्यताप्राप्त कालावधी 247.94 वर्ष इतका आहे. एखादा ग्रह आकाशात दर दिवशी किती अंशाने विस्थापित होतो याला ग्रहाची अॅव्हरेज डेली मोशन असे म्हणतात. केतकरांनी प्लूटोची अॅव्हरेज डेली मोशन 14.6364 सेकंद वर्तविली तर आधुनिक विज्ञानाने शोधलेले आणि मान्यताप्राप्त संख्या 14.283 सेकंद इतकी आहे. यावरून आपल्या लक्षात आले असेल की व्यंकटेश केतकरांचा अंदाज हा वास्तवाबरोबर किती जवळीक साधणारा होता. यातूनच ते किती थोर खगोलशास्त्रज्ञ आणि गणिती होते हे आपल्या लक्षात आले असेलच!
केतकर मराठी, इंग्रजी, संस्कृत आणि फ्रेंच भाषेत पारंगत होते. त्यांनी फ्रेंच खगोलशास्त्रज्ञांशी पत्र व्यवहार करून त्यांचा हा शोध फ्रेंच खगोलशास्त्रज्ञांपर्यंत पोहोचवला आणि खगोलशास्त्रातील फ्रेंच जर्नल Societeastronomique de France यामध्ये त्यांनी शोध निबंध लिहिला. ब्रह्मा या ग्रहाच्या गणिताबरोबर खगोलशास्त्रातील इतर पैलूंमध्येदेखील व्यंकटेश केतकरांचे महत्त्वाचे योगदान होते. पंचांगाचा त्यांचा प्रचंड अभ्यास होता. सोळाव्या शतकातील भारतीय खगोलशास्त्रज्ञ गणेश दैवज्ञ ह्यांनी ग्रहलाघव हा ग्रंथ लिहिला होता. परंतु पृथ्वीची परांचन गती आणि अशा अनेक गोष्टींमुळे खगोलात कालांतराने बदल होत असतात. त्यामुळे विसाव्या शतकात प्रत्यक्ष घडणार्या ग्रहण, ग्रहांची युती अशा खगोलीय घटना आणि ग्रहलाघवाप्रमाणे निश्चित केलेला या घटनांचा काळ यामध्ये तफावत होती. हे खगोलशास्त्राचा अभ्यास असलेल्या केतकरांना लक्षात आले आणि त्यांनी योग्य ते बदल करून स्वतःचे केतकी पंचांग प्रकाशित केले. व्यंकटेश केतकर आणि लोकमान्य टिळक यांच्यात खगोलशास्त्रावर वारंवार चर्चा होत असे. पंचांग हा आकाशाचा आरसा हवा. म्हणजेच पंचागात ज्या ग्रहस्थिती दिल्या आहेत तसंच हुबेहूब आकाशात ग्रहस्थिती दिसायला हवी ह्या मताचे लोकमान्य टिळक होते. केतकरदेखील याच मताचे असल्याने त्यांनी पंचागात योग्य त्या सुधारणा केल्या.
अवकाशात सूर्याच्या भासमान मार्गावर म्हणजेच आयनिक वृत्तावर असलेल्या राशींची सुरुवात, संपात बिंदूचं स्थान निश्चित करण्याविषयी दोन मते होती. लोकमान्य टिळक मीन राशीतील रेवती तार्याला सुरुवातीचा बिंदू मानत असत तर त्याच्या बरोबर 180 अंशावर असलेल्या कन्या राशीतील चित्रा तार्याला सुरुवातीचा बिंदू केतकर मानत असत. यावर त्यांच्यामध्ये बर्याच चर्चा होत असत. लोकमान्य टिळकांनी पंचागामागचे खगोलविज्ञान समजावणारे एखादे पुस्तक लिहिण्याची विनंती व्यंकटेश बापूजी केतकर यांना पत्रामार्फत केली होती. यावरून त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आणि केतकरांचे खगोलातील ज्ञान किती आदरणीय होते हे आपल्या लक्षात येईल. सध्याच्या काळात प्रसिद्ध असलेले दाते पंचांग तसंच भारतातील विविध ठिकाणी प्रकाशित होणारी अग्रगण्य पंचांग ही व्यंकटेश केतकरांच्या केतकी पंचांगाप्रमाणे चित्रा पक्षावर आधारित आहेत. (यामध्ये कन्या राशीतील चित्रा तारा सुरुवातीचा बिंदू गृहीत धरला जातो.)
व्यंकटेश बापूजी केतकर ह्यांनी खगोलशास्त्रावर अनेक पुस्तके लिहिली. ज्योतिर्गणित, केतकी ग्रहगणित परिशिष्ट, भूमंडलीय सूर्यग्रहण, सौर्य ब्रह्मतिथी गणित, मराठी ग्रहगणित, नक्षत्र विज्ञान, गोलद्वय प्रश्नविमर्ष, ग्रहनक्षत्र, इंडियन अँड फॉरेन क्रोनोलॉजि अशी महत्त्वाची पुस्तकं त्यांनी लिहिली. गोलद्वय प्रश्नविमर्ष हे पुस्तक न्यूटन यांच्या 'Principia Mathematica' या पुस्तकावर आधारित असून यामध्ये गुरुत्वाकर्षण समजावले आहे, नक्षत्र विज्ञान या पुस्तकात अवकाशातील तारकापुंजांबद्दल माहिती दिलेली आहे तर ग्रहनक्षत्र ह्या पुस्तकात केतकरांनी दुर्बिणीचे विविध प्रकार ह्यावर माहिती दिली आहे. 3 ऑगस्ट 1930 या दिवशी या थोर खगोलशास्त्रज्ञाचे निधन झाले. याच वर्षी प्लुटोचा शोध टॉमबॉ यांनी लावला. केसरी वृत्तपत्रात, तसेच देशातील तत्कालीन आघाडीच्या वृत्तपत्रात भारतीय खगोलशास्त्राच्या वाट्याला आलेले मोठे नुकसान अशा स्वरूपाचे शब्द व्यंकटेश केतकरांच्या निधनासंबंधित वापरले गेले. या थोर खगोलशास्त्रज्ञाला आजकालच्या पिढीने आदर्श मानून, त्यांच्याकडून प्रेरणा घेऊन खगोलशास्त्रात भरीव कामगिरी केली तर तीच व्यंकटेश बापूजी केतकरांना खरी आदरांजली ठरेल!