पालघर जिल्ह्यातील शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी चंद्रकांत पाटील यांनी सेंद्रिय शेतीतंत्राचा अवलंब करून शेती फुलविली आहे. विशेषतः गेल्या दहा वर्षे सेंद्रिय शेतीतील सातत्य टिकवून ठेवले आहे. फळबाग, भातशेती, भाजीपाल्याची लागवड येथे पाहायला मिळते. याशिवाय गांडूळखत निर्मिती, दुग्धव्यवसाय व मधुमक्षिकापालन व्यवसायातून अधिकचे उत्पन्न ते मिळवत आहेत. त्यांच्या या शेतीचा लौकिक परिसरात पसरला आहे.
Farmer Chandrakant Patil
पालघर जिल्हा हा सह्याद्रीचा डोंगराळ प्रदेश व जंगलाने व्यापलेला आहे. शिवाय या जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात सागरी किनारा लाभला असून या भागात मासेमारी चालते. हाच प्रमुख व्यवसाय आहे तर भात हे या जिल्ह्यातील प्रमुख पीक. निसर्गसंपन्न पालघर जिल्ह्यात अजूनही गावपण टिकून आहे. मुबलक पाऊस, कसदार माती, काबाडकष्ट करणारा शेतकरी हीच पालघरची संपत्ती आहे. या जिल्ह्यात शेतीत प्रयोगशीलता जपत अधिक उत्पादन काढणारे व इतर शेतकर्यांसाठी प्रेरणा बनलेले अनेक शेतकरी पाहायला मिळतात. शेतीनिष्ठ पुरस्कारप्राप्त शेतकरी चंद्रकांत पाटील हे त्यातील एक. कायम उत्साही, प्रसन्न आणि शेतीत सातत्याने प्रयोग करणारे शेतकरी म्हणून त्यांची ओळख आहे. आगर (ता. डहाणू जि. पालघर) येथे पाटील आपल्या तीन एकर शेतात शंभर टक्के सेंद्रिय शेती करतात. त्यात रासायनिक खते, कीडनाशके वा अन्य रसायनांचा अंशही वापरला जात नाही. आज त्यात यशाचा पल्ला गाठत पुढील घोडदौड मोठ्या आत्मविश्वासाने सुरू ठेवली आहे.
पाटील यांचे वैशिष्ट्य असे आहे की, एका खाजगी कंपनीत व्यवस्थापक म्हणून नोकरी सांभाळतात. हा व्याप सांभाळत त्यांनी शेती आणि कौटुंबिक अर्थकारणाची घडी बसवली आहे. पाटील सांगतात, “माझी एकूण तीन एकर शेती आहे. त्यातील वडिलोपार्जित दीड एकर शेती आहे. पारंपरिक शेती करायची म्हटले तर नफा कमी आणि तोटा जास्त हेच लहानपणापासून पाहात आलो. त्यात रासायनिक खते, कीडनाशकांचा वापर केला तर निकृष्ट अन्न उत्पादन घेणे म्हणजे एकप्रकारचा शापच. हा बदल घडवण्याचा निश्चय केला. पैशाची बचत करून 2016साली दीड एकर शेती विकत घेतली. या कालावधीत कृषी विभागाकडून सेंद्रिय गट शेती योजना आणली. या माध्यमातून डहाणू तालुक्यात 29 शेतकर्यांचा संजीवनी सेंद्रिय शेती गट स्थापन करण्यात आला. यामुळे मला सेंद्रिय शेतीची आवड निर्माण झाली. पुढे या गटाचा मी खजिनदार झालो. कोसबाड येथील कृषी विज्ञान केंद्रामार्फत देण्यात आलेल्या सेंद्रिय शेती प्रशिक्षणातून सेंद्रिय शेतीतील ज्ञान वाढत गेले. सेंद्रिय कृषी निविष्ठा तयार करायला शिकलो. नोकरी सांभाळत उत्साह, उमेद बाळगून शेतीत दररोज ठरावीक वेळ देत त्यात कष्ट करतो. सुट्टीदिवशी मात्र अधिक वेळ शेतीला देणे शक्य होते. पत्नी कीर्तिका ही अर्थशास्त्राची पदवीधर आहे. ती शेतीसाठी अधिकचा वेळ देत असते.”
सेंद्रिय कृषी निविष्ठांची निर्मिती
शेतीतील उत्पादन खर्च कमी करणे व किफायतशीर उत्पन्न वाढविण्यासाठी आणि जमिनीचा पोत सुधारण्यासाठी सेंद्रिय शेती हा एकमेव मार्ग आहे, त्यासाठी सेंद्रिय कृषी निविष्ठा निर्मिती करणे गरजेचे आहे. हा हेतू लक्षात घेऊन पाटील यांनी गांडूळबीज, गांडूळखत, जीवामृत व दशपर्णी अर्क इत्यादी निविष्ठांची निर्मिती केली आहे. दोनशे किलो जीवामृतासाठी 10 किलो देशी गायीचे शेण, 10 लीटर गोमूत्र, 2 किलो गूळ, 2 किलो बेसन आणि 180 लीटर पाण्याचा वापर करतात. तर 100 किलो बीजामृतासाठी पाच किलो देशी गायीचे शेण, गोमूत्र, जीवाणू माती, कळीचा चुना इ. घटकांचा वापर करतात.
200 लीटर दशपर्णी अर्क बनविण्यासाठी पाच लीटर गोमूत्र, 15 लीटर पाणी, सीताफळाचा पाला, पपईचा पाला, पालापाचोळा, शेणखत, लिंबोळी इ. उपयोग करतात. हे सर्व मिश्रण एका टाकीमध्ये ठेवले आहे. दररोज तीन दिवस काठीने ढवळतात. दशपर्णी कीडनाशक म्हणूनही कार्य करते. पाटील म्हणाले,“ही निविष्ठा तयार करण्याठी प्रत्येकाच्या घरी गाय असली पाहिजे. सध्या माझ्याकडे 14 गायी आहेत. या गोमूत्र व गायींच्या शेणापासून कृषी निविष्ठा तयार करतो. याखेरीज जमिनीचा पोत सुधारावा यासाठी गांडूळबीज व गांडूळखत निर्मितीकडे माझा कल आहे. माझ्याकडे एपिजिक अनसिक फोटिडा, एडोजिक या जातीची गांडूळ बीज आहेत. तर पाच बेडवर गांडूळखताची निर्मिती करत आहे. प्रत्येक बेडमध्ये 2 किलो गांडूळ सोडतो. सेंद्रिय घटक लवकर कुजण्यासाठी 3 ते 4 किलो गूळ अधिक दोन लीटर दही, बेसन पीठ, 25 ते 30 लीटर जीवामृत बेडवर नियमित शिंपडतो. महिन्याला एका बेडमधून जवळपास आठशे किलो गांडूळखत तयार होते. 14 बेडमधून महिन्याला एक लाख टन खतापैकी तीन टन खताचा वापर घरच्या शेतीला करतो आणि उर्वरित 10 रूपये किलो दराने (प्रतिबॅग चारशे रुपये) विक्री करतो. याशिवाय गोमूत्र महिन्याला 130 लीटर तयार होते. दहा रुपये लीटरने विकतात. दशपर्णी लीटर 10 रुपये जीवामृत लीटर 10 रुपये दराने आणि गांडूळबीज पाचशे रुपये किलो दराने विक्री करतो. अशाप्रकारे मी सेंद्रिय शेती पद्धत विकसित केली आहे. विशेषतः आज माझ्या शेतीचा सेंद्रिय कर्ब 0.9 टक्के आहे. यातून माझ्या शेतीची यशस्विता लक्षात येईल.”
सेंद्रिय भात, भाजीपाला व फळबाग
विषमुक्त जमीन आणि विषमुक्त शेतमाल निर्मिती करणे हे पाटील यांच्या शेतीचे मुख्य सूत्र आहे. भात हे त्यांचे मुख्य पीक आहे. 2024-25 या हंगामात सेंद्रिय भाताचे सरासरी 30 क्विंटल उत्पादन निघाले. भात काढणीनंतर चवळी, टोमॅटो, मिरची, वांगी, हरभरा, वाल, पापडी अशा पिकांचे आंतरपिक पद्धतीने उत्पादन घेतात. यातून महिन्याला 15 हजाराचे रुपयांचे उत्पन्न मिळते. शासनाच्या फळबाग योजनेचा लाभ घेतला आहे. सध्या त्यांच्याकडे 90 चिकू, 90 आंबा, तर जाम व जांभळाचे प्रत्येकी सहा झाडे आहेत. गतवर्षी आंब्याचे चार टन उत्पादन निघाले. त्यांच्या हापूस, केसर, तोतापुरी, राजापुरी या आंब्यांना अहमदाबाद, वलसाड, मुंबई व सुरत या बाजारपेठेत मोठी मागणी असते. चिकूचे वार्षिक 18 टन उत्पन्न मिळाले. फळबागेतून वर्षाकाठी 8 ते 9 लाख रुपयांचे उत्पन्न मिळवत आहेत.
शेतीला पूरक व्यवसायाची जोड
पाटील केवळ शेतीवर अवलंबून न राहता, शेतीला पूरक व्यवसायाची जोड दिली आहे. आज त्यांच्याकडे 13 होल्स्टीन (युरोपियन गोवंश) गायी आहेत. एक गाय दिवसाला 16 लीटर दूध देते. गाय व्याली की सात लीटर दूध विक्रीसाठी तर उर्वरित दूध वासराला देतात. याबरोबर सातेरी व ट्रायगोना जाती मधुमक्षिका व्यवसायाची जोड दिली आहे. त्यांच्याकडे सातेरीच्या तीन व ट्रायोगाना जातीच्या एक अशा चार मधपेट्या आहेत. एका पेटीतून महिन्याला एक किलो मधाचे उत्पादन मिळत आहे. या मधाची औषध कंपन्यांना विक्री करतात. या पूरक व्यवसायातून त्यांना वर्षाला तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळते. पाटील यांच्या सेंद्रिय शेतीचा लौकिक परिसरात पसरला असून अनेक शेतकरी व विद्यार्थ्यांनी त्यांच्या शेतीला भेट दिली आहे.
सेंद्रिय शेतीचा प्रचार
पाटील यांचे सेंद्रिय शेतीतील योगदान मोलाचे आहे. आपल्या शेतीतून मिळालेल्या ज्ञानाच्या व इतर माहिती शेतकर्यांना व्हावी यासाठी आतापर्यंत आठ ते दहा हजारांहून शेतकर्यांना सेंद्रिय शेतीचे प्रशिक्षण दिले आहे. पाटील यांना सेंद्रिय शेती कार्यासाठी विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्र शासनाचा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार व राष्ट्रीय स्तरावरील कृषी सेवक पुरस्कार हे त्यातील महत्त्वाचे पुरस्कार आहेत.
पाटील यांनी नोकरीचा व्याप सांभाळत सेंद्रिय शेतीची धरलेली कास निश्चितच अनुकरणीय आहे. येत्या काळात त्यांच्या कामाच्या वेगळेपणामुळे असंख्य संधी मिळणार आहेत आणि संधीचे सोने करण्याची हातोटी त्यांच्याजवळ आहे. त्यामुळे या शेतकर्याची गाथा आदर्शवत आहे.