@शैला वंजारवाडकर
9860353924
माझी बाग हा माझा छंद आहे, माझी आवड आहे. लहानपणी मनावर नकळत झालेल्या संस्कारामध्ये माझ्या या छंदाची बीजे रुजलेली आहेत. माझ्या आईला बागेची आवड होती, ती माझ्यामध्ये नकळत आली.
आम्ही पुण्यातील एका छान वाड्यामधे राहायचो. हा वाडा म्हणजे दोन मजली इमारत व मागेपुढे अंगण. दोनतीन खोल्यांची आठदहा बिर्हाडं या वाड्यात रहायची. वाड्यात पुढील भागात मोठे अंगण तर मागील भागात छोटे अंगण होते. घराच्या मागच्या अंगणात असलेले पारिजातकाचे झाड व गिरकी घेत घेत जमिनीवर पडणारी फुले तसेच पारिजातकाचा पांढराशुभ्र सडा पाहाणे हा आमचा नित्यक्रम असायचा. आईने याच पारिजातकाच्या फुलांचा शंकराला वाहिलेला लक्ष (एक लाख फुले वाहणे) आजही स्मरणात आहे. घराच्या पुढच्या अंगणात असलेले पांढर्या चाफ्याचे झाड खूपच मोठे, डेरेदार, ऐसपैस पसरलेले व छान सावली देणारे होते. झाडाच्या फांद्यांवर चिमण्या, कावळे, कोकिळा असायचे. सकाळी पक्ष्यांच्या किलबिलाटानेच जाग यायची. झाडाची वेचलेली फुले व त्यांचा गंध अजूनही मनात दरवळतो. गुढीपाडव्याला पांढर्या चाफ्याच्या फुलांचा हार असायचाच.
सुट्टीच्या दिवशी सकाळी व दुपारी आम्ही त्याच्याच सावलीत खेळायचो. घराच्या मोठ्या खिडकीत बसून झाडाकडे बघणे हा एक छंदच होता. आईने आमच्या पुढील अंगणाच्या बाजूच्या खिडकीखाली लाल जास्वंद लावली होती. हिरवीगार सुंदर वाढली होती. भरपूर कळ्या यायच्या. कळ्या मोजणे, जाता येता झाडावर लक्ष ठेवणे हे आईचे एक कामच होते. तरीसुद्धा काही कळ्या व फुले कोणी कोणी खुडून न्यायचे. जास्वंदच्या शेजारी पांढर्या व निळ्या गोकर्णीचा वेल होता.
आमच्या घराच्या समोर राहणार्या आईच्या मैत्रिणीची बाग होती. त्यांच्या बागेत पण भरपूर फुले यायची. पांढरा व पिवळा सोनटक्का, जाई, जुई, मोगरा, कुंद इत्यादी. त्या आम्हाला आवर्जून बोलावून फुले द्यायच्या. एवढी जवळपास फुले असली, तरी सुद्धा बाबा फुलाची पुडी आवर्जून आणायचे व छान हार ओवायचे.
रंगीबेरंगी फुलांनी भरलेले देवघर, शांतपणे तेवणारी समई व निरांजन, उदबत्तीचा पसरलेला सुवास, देवापुढे असलेली नाजूक छोटीशी रांगोळी, आणि छोट्याशा चांदीच्या वाटीत असणारा दूधसाखरेचा नैवेद्य व सोबतीला हळू आवाजात आई म्हणत असलेले स्तोत्र असे सात्विक, सोज्वळ व प्रसन्न वातावरण आमच्या जीवनाचा अविभाज्य भाग होता.
प्रत्येक श्रावण महिन्यातील शुक्रवारी आघाडा- दूर्वा यांचा केलेला हार, गणेशोत्सवात तसेच प्रत्येक संकष्टी चतुर्थीला तोडून आणलेल्या दूर्वा.. अशा वातावरणामुळे फुलांची व बागेची आवड निर्माण झाली. माझे लग्न झाल्यावर आम्ही नोकरीनिमित्त कोकणात होतो. तेथील सृष्टीसौंदर्य व भरपूर झाडे पाहून नारळ, आंबा, फणस, रातांबा (कोकम) अशा मोठ्या झाडांची पण आवड निर्माण झाली.
कोकणात एका ठिकाणी आम्ही रातांबा (कोकम) चे पूर्ण लालसर छोट्या फळांनी भरलेले झाड व झाडाखाली पडलेला रातांबा (कोकम) चा सडा अजूनही लक्षात राहिला आहे.
रवींद्र यांनाही बाग तसेच शेतीची खूप आवड आहे. त्यांच्या बालपणात गावी व आजोळी शेतमळा, वृक्षवेली, झाडेझुडपे असा परिसर होता. थोडक्यात आमच्या दोघांचीही मनापासून इच्छा म्हणजे आपली बाग असावी व काळी आई पण असावी.
मनापासून इच्छा असली की परमेश्वर ती पूर्ण करतोच असा माझा ठाम विश्वास आहे. ही संधी आम्हाला प्राप्त झाली त्यासाठी आम्ही कायम कृतज्ञ आहोत.
सुमारे पंचवीस वर्षांपूर्वी पुण्यात रहाण्यासाठी घेतलेल्या घराच्यामागे व पुढे थोडी जागा होती. तेव्हाच ठरवले की मस्त छोटीशी बाग करायची. ‘असावे घरटे आपुले छान’, या गाण्यात वर्णन केल्यासारखे.. स्वप्न सत्यात उतरवण्याचे ठरवले.
पुढच्या दारात हौसेने पारिजातक लावला व जाईचा वेल, दोन प्रकारची जास्वंद, शेवंती, सोनचाफा, तुळस, अबोली लावली. घराच्या मागच्या भागात नारळ, पपई, कढीपत्ता, जास्वंद, तगर, डबल तगर इ. झाडे लावली. मधील मोकळ्या जागेत आळू, आले, वांगे, मिरची, पालक, दोडक्याचा, कारल्याचा वेल लावला. नवीनच झाडे लावल्याने व ऊन पण भरपूर असल्याने फुले व भाज्या छान यायला लागल्या.
कुंपणाच्या भिंतीवर मी एका पसरट भांड्यात पाणी व दुसर्या भांड्यात पोळीचे तुकडे, भात, तांदूळ ठेवण्यास सुरुवात केली. हळूहळू बुलबुल, चिमण्या, कावळे, सातभाई, हनी बर्ड, साळुंक्या, खार, भारद्वाज, कोकीळ यांची आमच्या अंगणात लगबग सुरू झाली. त्यांच्या किलबिलाटाने आमचे अंगण भरून गेले. छोटी छोटी फुलपाखरे पण मधूनमधून दिसू लागली. या आमच्या नवीन छोट्याशा पाहुण्यांना पाहून आनंद वाटू लागला.
मी प्रारंभीच मनापासून ठरवले की, बागेत काम आपणच करायचे. त्यामुळेच मी बागेत खूप वेगवेगळे प्रयोग करू शकले व त्याचा मनापासून आनंदही घेऊ शकले व घेत आहे.