रणवीरच्या निमित्ताने...

13 Feb 2025 19:26:47
 रणवीर अलाहाबादिया याचे कृत्य पाहून या चोरालाही लाज वाटली असती. कारण जे शब्द चुकूनही ओठांवर येऊ नयेत ते शब्द उच्चारताना तो चांगलाच खिदळताना दिसतो आणि नंतर त्याने मागितलेल्या माफीत आपण कोणती चूक केली आहे याची त्याला अजिबात जाणीव झालेली नाही हे स्पष्ट होते.
 
vivek
एका सुभाषितात असे म्हटलेले आहे की,
घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात् कुर्यात् रासभरोहणम् ।
येन केन प्रकारेण प्रसिद्धः पुरुषो भवेत् ॥
  
म्हणजे, जर एखाद्याला प्रसिद्धी मिळवायची असेल तर मडके फोडा, आपले कपडे फाडा किंवा थेट गाढवावर बसून फिरा. मात्र आज आहे त्यापेक्षा जर जलद गतीने अधिक प्रसिद्ध व्हायचे असेल तर सुभाषितकाराने न सांगितलेला मार्ग आधुनिक बुभुक्षितांना गवसला आहे आणि तो म्हणजे दुसर्‍याचे कपडे फाडा आणि त्याला आपल्याप्रमाणे वस्त्रविहिन करा. या कृतीला ते गोंडस भाषेत ‘रोस्ट’ करणे असे म्हणतात. मराठीत याला होरपळ असेच म्हणावे लागेल. मात्र आगीशी खेळ करणाराच होरपळावा अशी समयोचित गोष्ट घडलेली आहे. रणवीर अलाहाबादिया नामक यू ट्यूबरने हा आगीशी खेळ खेळला आणि तो त्याच्या अंगाशी आलेला आहे. एका निढार्वलेल्या चोराला जेव्हा फाशी दिली जात असते तेव्हा तो आपल्या आईच्या कानात काहीतरी सांगण्याचा आव आणून तिच्या कानाचा चावा घेतो आणि त्याचे कारण सांगताना म्हणतो - जर लहानपणी योग्य वेळी आईने माझा कान धरला असता तर माझ्यावर ही पाळी ओढवली नसती. पण रणवीर अलाहाबादिया याचे कृत्य पाहून या चोरालाही लाज वाटली असती. कारण जे शब्द चुकूनही ओठांवर येऊ नयेत ते शब्द उच्चारताना तो चांगलाच खिदळताना दिसतो आणि नंतर त्याने मागितलेल्या माफीत आपण कोणती चूक केली आहे याची त्याला अजिबात जाणीव झालेली नाही हे स्पष्ट होते. कथेतील चोराला चूक उमगते, पण रणवीरला आपली चूक अजिबात उमगलेली नाही. याउलट शिरजोरपणे विनोदनिर्मिती हे आपले क्षेत्र नसल्याबद्दल पश्चात्ताप व्यक्त करताना तो दिसतो.
 
 
रणवीर, आपले आईबाप हे विनोदनिर्मितीचा विषय असतात का? भरीस भर म्हणून हा तथाकथित विनोद आपला नसून एका विदेशी कार्यक्रमातून आपण त्याची उचलेगिरी केलेली आहे, असा रणवीरचा दावा मान्य केला तर तो काहीतरी ‘ओरिजिनल कन्टेन्ट’ लोकांसमोर प्रस्तुत करीत असतो, या दाव्यातील हवाही निघून जाते. विदेशी मंचावरील कार्यक्रमातून कल्पना आणि कन्टेन्ट यांची उचलेगिरी करून लोकांसमोर अस्सल प्रस्तुतीचा दावा करणारा आणि स्वत:ला उत्कृष्ट यू ट्यूबर व इन्फ्लुएंसर मानणारा हा असा कसा नवतरुण पिढीचा हा आदर्श?
 
 
उचलेगिरीच्या नादात विदेशातील ‘कल्चर’ आणि आपली ‘संस्कृती’ यातील फरक समजून घेण्याची सारासारविवेकबुद्धी आणि कुवत नसल्यामुळे रणवीरच्या हातून हा अक्षम्य गुन्हा घडलेला आहे. विदेशातील मान्यतेप्रमाणे विवाह हा दोन भिन्नलिंगी मनुष्यप्राण्यांतील करार आपल्याकडे समजला जात नसून त्याला पवित्र बंधन आणि एक संस्कार मानला जातो. रानटी पशूंमध्ये नाती जपली जात नाहीत, पण संस्कार आणि संस्कृतीमुळे मनुष्यप्राण्यांत आईवडील, भाऊबहिण, काका-काकी इत्यादी नाती ही पवित्र मानली जातात. ज्येष्ठ बंधू आणि त्याची पत्नी यांना तर वडील आणि आईचाच दर्जा येथे दिला जातो. रामायणातील दाखला द्यायचा तर, सीतामाईची केयूरकुंडले ही लक्ष्मणाला अजिबात ओळखता येत नाही व तो सांगतो की, मी मातेचे नियमित चरणवंदन करीत असल्यामुळे या पायातील साखळ्या मात्र मी नक्कीच ओळखू शकतो व या सीतामाईच्याच आहेत. केवळ मोठमोठे मान्यवर पाहुणे आपल्या शोमध्ये बोलावून आपल्या ‘क्रू’ने तयार केलेल्या प्रश्नावलीतील प्रश्न विचारल्याने शहाणपणाचा आणि संस्कारांचा लाभ होऊ शकत नाही. त्यासाठी आपला देश, आपली संस्कृती व आपली परंपरा यांचा स्वत:चा अभ्यास असावा लागतो. मात्र रणवीरसारख्या परोपजीवी प्रस्तुतिकाराला ते कसे उमगावे? उलट, विदेशात जी गोष्ट अधिक चालते ती चांगली आणि ‘कूल’ असे समजून त्या सर्व गोष्टींचे अंधानुकरण करण्याचा वसा ही मंडळी घेतात आणि तिथेच त्यांचा घात होतो. काही टिकाऊ गोष्टींबरोबर टाकाऊ गोष्टींची ही मंडळी आयात करतात आणि आपली विश्वासार्हता गमावून बसतात.
 
 
आपण मनोरंजनाच्या नावाखाली काही वैचारिक पोषणमूल्य असलेला आहार आपल्या प्रेक्षकांच्या थाळीत आणून वाढतो की अन्नात शेण कालवितो याचे भान या विनोदवीरांना उरलेले नाही. यामुळे सादरकर्ते आणि प्रेक्षक असा दोघांचाही दर्जा खालावत जातो व मग संत तुकाराम यांच्या वचनाप्रमाणे ‘सूकरास विष्ठा माने सावकाश’ या न्यायाने आपण किती खालचा स्तर गाठू शकतो याचीच अहमहमिका लागते. या स्पर्धेपोटीच अशा प्रकारचा विनोद कार्यक्रमात करण्याचे रणवीरने ठरवले आणि तो बेत पार पाडला. पण मुळात सारासारविवेक नसल्यामुळे त्याचा आडाखा चुकला व बूमरँगप्रमाणे हा विनोदबाण त्याच्यावरच उलटला.
सध्या महाकुंभ सुरू आहे. पण रणवीरने केलेले कृत्य व आईवडील या नात्याला फासलेला काळिमा इतका वज्रलेप आहे की , संत तुकाराम महाराजांच्या ‘रासभ धुतला महातीर्थामाजि, नव्हे जैसा तेजी श्यामकर्ण’ या वचनाप्रमाणे या महाकुंभात शंभर वेळा डुबक्या मारूनही तो कलंक त्याच्या चेहर्‍यावरून पुसून टाकता येणार नाही. इतका गाढवपणा रणवीरच्या हातून घडला आहे. आपल्याला मातृपितृऋण, ॠषिऋण आणि समाजऋण फेडावे लागते अशी आपली परंपरा मानते. ‘धन्यो गृहस्थाश्रम’ असे आपण म्हणतो. तेव्हा आपल्या नव्या पिढीचे भाषा-भूषा-भजन-भोजन-भ्रमण-भवन या सहा विषयांना धरून प्रबोधन करण्याची गरजच या पार्श्वभूमीवर अधोरेखित होते. आधुनिकतेचा पुरस्कार करणे यात काहीच वावगे नाही, पण तसे करताना आपल्या जुन्या आणि चांगल्या जीवनमूल्यांशी फारकत घेऊन चालणार नाही. मनोरंजनाचे अधिक चांगले पर्याय उपलब्ध असतात. हलक्या दर्जाच्या अशा विनोदाला मनोरंजनाची प्रतिष्ठा प्राप्त करून देण्याच्या विचाराची पाळेमुळे ही विस्कळित होणार्‍या कुटुंबव्यवस्थेत आहेत. जगभरात बहुतांश लोकांचा कल पाहून आपणही त्याच दिशेने वाटचाल सुरू करतो आणि प्रवाहपतित होतो. परिणामी, आपण कुटुंबाचे सुरक्षाकवच गमावून बसतो. भारताची एक अस्मिता आहे, एक विशिष्ट ओळख आहे. ‘मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्यदेवो भव’ हा आपला दृष्टिकोन आहे. आपला ‘स्व’ जगण्यात प्रतिबिंबित झाला पाहिजे. पण आपल्या संस्कृती व परंपरेविषयीची अनास्था असल्यामुळे हे सर्व घडताना दिसते. ही घसरगुंडी रोखण्यासाठी ‘कुटुंब प्रबोधन’ आणि ’स्व-जागरण’ हीच प्रभावी मात्रा ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0