@मकरंद कुलकर्णी 9422112720
वनविभागाच्या नोकरीनिमित्त मारुती चितमपल्ली यांनी जवळपास तीन तपे जंगलात घालविली, या कालावधीत अरण्यरूपी ग्रंथाचे वाचन केले, जंगलातील वनवासींशी मैत्री करून त्यांच्याकडून वृक्ष-वेली, वन्य पशुपक्षी यांविषयी सखोल ज्ञान प्राप्त केले. हे अगाध ज्ञान त्यांनी पुस्तकरूपात मांडले. मारुतरावांच्या या लिखाणामुळे निसर्ग पर्यटनाचा विकास झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. कारण त्यांच्या साहित्यामुळेच वाचकांचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. भारत सरकारनेही त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे.
सर्वसाधारणपणे प्रत्येकच माणसाची काही स्वप्ने असतात. त्यातील कॉमन फॅक्टर म्हणजे सरकारी नोकरी मिळणे हा होय. त्याकरिता मेहनत करणारेही अनेक असतात तर काहींचं नशीबच असं असतं की, सरकारी नोकरी चालून येते. एकदा का ते स्वप्न पूर्ण झालं की, मग आनंदीआनंद. सरकारी नोकरी म्हणजे सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत कार्यालयात जाऊन कसाबसा वेळ काढायचा, चालढकल करीत जमेल तसे काम करायचे आणि घरी परतायचे. असे करत करत एक दिवस निवृत्त होऊन निवृत्ती वेतनावर आयुष्य काढायचे. मात्र काही मंडळी त्यांना वेडंच म्हणावं लागेल अशी असतात की, इमानेइतबारे सरकारी नोकरी करताना त्यातूनच काही अफाट निर्माण करण्यासाठी धडपडत असतात. असेच एक अफलातून व्यक्तिमत्त्व म्हणजे मारुती चितमपल्ली.
मारुती चितमपल्ली यांचा आणि माझा परिचय कधी झाला ते आठवत नाही. ते घरी येत असत. वास्तविक पाहाता माझा आणि साहित्याचा काही एक संबंध नाही. मी वाणिज्य शाखेचा विद्यार्थी आणि शालेय जीवनापासूनच क्रिकेट खेळण्याकडे कायम ओढा. असे असले तरी शिक्षण झाल्यावर बाबांनी अतिशय कष्टाने उभा केलेला ग्रंथ व्यवसाय सांभाळायचा आहे हे मनाच्या एका कोपर्यात पक्के बसले होते.
त्यामुळे हळूहळू व्यवसायात लक्ष घालू लागलो. त्यातूनच काही कामानिमित्त मारुतरावांकडे जात असे. पुढे त्यांच्या पुस्तकांची मुखपृष्ठे तयार करू लागलो. मारुतरावांना त्याचे कौतुक वाटत असे. मुखपृष्ठ आवडत असे.
याच दरम्यान बाबांना हृदयविकाराचा आजार जडला, बायपास झाली आणि त्यांचे केंद्रात येणे कमी झाले. सर्व जबाबदारी माझ्याकडे आली. तेव्हाच मारुतरावांच्या पक्षिकोशाचे काम सुरू होते.
बाबांचा आणि मारुतरावांचा परिचय 1980-81 च्या दरम्यान झाला. बाबांनी त्यांची वर्तमानपत्रातील व दिवाळी अंकातील कात्रणे वाचली त्यातून काही लेख निवडून पक्षी जाय दिगंतरा हे मारुतरावांचे पहिले पुस्तक प्रकाशित केले. या पुस्तकात सुप्रसिद्ध चित्रकार आलमेलकरांची चित्रे होती. आंतरबाह्य सुंदर असलेले हे पुस्तक वाचकांना मनापासून आवडले. त्याचे सर्वत्र कौतुक होऊ लागले. पहिल्याच वर्षात आवृत्ती संपली. पाठोपाठ जंगलाचं देणं, रानवाटा ही दोन पुस्तके प्रकाशित केली. या पुस्तकांना अनेक पुरस्कार मिळाले. रानवाटा या पुस्तकाला खुद्द व्यंकटेश माडगूळकरांनी चित्रे काढून दिली. या तीन पुस्तकांनी मराठी साहित्यात निसर्ग लेखनाचे नवे दालन निर्माण झाले. आणि मारुतराव लेखन समृद्धीची वाट चालू लागले. बाबांनी त्यांना आश्वासन दिले होते की, त्यांचे सर्व लेखन साहित्य प्रसार केंद्र प्रकाशित करेल.
मात्र बाबांच्या बायपासमुळे मारुतराव चिंतित झाले की आता पक्षिकोशाचे पुढे कसे होणार. त्यावेळी मी मारुतरावांना विश्वास दिला की पक्षिकोशाचे काम साहित्य प्रसार केंद्र पूर्ण करणारच. त्यानुसार पक्षिकोशाकडे लक्ष केंद्रित केले. हे काम वाटले होते तेवढे सोपे नव्हते. त्यात पक्ष्यांची मराठी, इंग्रजी आणि लॅटिन भाषेतील नावे तर होतीच पण त्या व्यतिरिक्त पाली, प्राकृत, हिंदी, संस्कृत, गुजराती, तेलुगू, कन्नड, तमिळ व कोंकणी भाषांतील नामावली तसेच गोंडी, माडिया गोंड, कोरकू, पारधी, कचारी, नेपाळी, बंगाली, भूतानी, मल्याळी, लेपचा, सिक्किमी, सिंहली इत्यादी बोली भाषांतील पर्यायही दिले आहेत. त्याशिवाय पक्ष्यांची ओळख, व्याप्ती आणि निसर्गनिवास दिलेले आहेत. अशा प्रकारचा हा जगातील एकमेव कोश असावा. या कोशाची निर्मिती हे खरंच एक मोठं आव्हान होतं. काहींना कोशाच्या निर्मितीचे श्रेय आपल्याला मिळावे असे वाटत होते, तसा प्रयत्नही झाला. मारुतरावांना मोहात अडविण्याचा प्रयत्नही झाला, परंतु मारुतराव मोहाला बळी पडले नाहीत. त्यांनी साहित्य प्रसार केंद्रावर विश्वास दाखविला. मारुतरावांचे सहकार्य व साहित्य प्रसार केंद्राचा निर्धार यामुळे कोश पूर्ण झाला. निम्मी आवृत्ती प्रकाशनपूर्व सवलतीतच संपली. या आवृत्तीत कृष्ण-धवल रेखाटने आणि निवडक पक्ष्यांची रंगीत छायाचित्रे होती. कोशाला मिळालेल्या उत्तम प्रतिसादामुळे आमचा विश्वास दुणावला. पहिली आवृत्ती संपल्यावर दुसरी आवृत्ती संपूर्णपणे रंगीत छायाचित्रांसह काढण्याचा मानस मी मारुतरावांजवळ बोलून दाखविला. त्यांनीही संमती दिली. 2014 साली कोशाची दुसरी आवृत्ती पूर्णपणे रंगीत स्वरूपात प्रकाशित केली. याही आवृत्तीला वाचकांचा भरभरून प्रतिसाद मिळाला.
आजवर साहित्य प्रसार केंद्राने मारुतरावांची 16 पुस्तके प्रकाशित केली आहेत. पक्षिकोशानंतर आता त्यांचा वन्यप्राणीकोश प्रकाशनाच्या उंबरठ्यावर आहे. त्यानंतर मत्स्यकोश व वृक्षकोश याचेही काम सुरू आहे. अलीकडे स्मार्ट फोनच्या विळख्यात अडकलेल्या पिढीतही वाचक मारुतरावांचे नवीन काही पुस्तक आलंय का ते आवर्जून विचारतात. यातच सगळं आलं.
मागे म्हटल्याप्रमाणे मारुतरावांच्या लेखनाने मराठी साहित्यात निसर्ग लेखनाचे नवे दालन निर्माण झाले यात काहीच शंका नाही. मला अजून आठवतंय की, 1984-85 साली आम्ही मित्र मोटारसायकलने नागझिर्याला गेलो होतो. तिथे पोहोचल्यावर पाच रुपयांचे शुल्क भरून जंगलात प्रवेश केला होता आणि जंगलात भटकंती करून आलो. तात्पर्य असे की, त्यावेळी किमान महाराष्ट्रात तरी जंगल भ्रमंती फारशी प्रचलित नव्हती. मात्र जसजशी मारुतरावांची पुस्तकं बाजारात येऊ लागली, त्यांचे वाचक वाढू लागले तसतसे महाराष्ट्रातील निसर्गप्रेम वाढू लागले. पर्यटक, पक्षिमित्र, अभ्यासक यांची पावले जंगलाकडे वळू लागली. आता तर सहा-सहा महिने आधी बुकिंग केल्याशिवाय जंगलात प्रवेश अशक्य झालाय. मारुतरावांच्या लिखाणामुळे निसर्ग पर्यटनाचा विकास झाला असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. त्यांच्या लिखाणाचे वाचकांचा निसर्गाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला.
मारुतरावांनी आपले शिक्षण पूर्ण करून वनविभागात नोकरी पत्करली. त्यानिमित्ताने त्यांनी जवळपास तीन तपे जंगलात घालविली, मात्र या अवधीत त्यांनी अरण्यरूपी ग्रंथाचे वाचन केले, जंगलातील वनवासींशी मैत्री केली, त्यांच्याकडून अनेक गोष्टी जाणून घेतल्या, वृक्ष-वेली, वन्य पशुपक्षी यांविषयी सखोल ज्ञान प्राप्त केले. आणि केवळ एवढे करून ते थांबले नाहीत तर हे अगाध ज्ञान आपल्या पुस्तकांतून वाचकांना उपलब्ध करून दिले. त्यांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे शब्दांत सांगता येणार नाही. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक पैलू आहेत. जसे वनाधिकारी, लेखक, संशोधक, पक्षिशास्त्रज्ञ, वन्यजीव निरीक्षक, भाषा अभ्यासक. अपार कष्ट करून मारुतरावांनी आजवर मराठी साहित्यात हजारो नवीन शब्दांची भर घातली आहे.
मारुतरावांबरोबर मी अनेकदा प्रवास केला आहे. त्यांच्याबरोबर पवईच्या माधवराव पाटलांकडेही अनेकदा जाण्याचा योग आला. माधवराव आणि मारुतरावांच्या गप्पा ऐकताना, काही गूढरम्य वास्तव ऐकताना मी अनेकदा अचंबित होत असे. अशा थोरामोठ्यांचा सहवास मला लाभला हे मी माझे भाग्य समजतो.
मारुतरावांना आजवर अनेक पुरस्कार लाभले आहेत. त्यापैकी महाराष्ट्र शासनाचा सर्वोच्च असा विं. दा. करंदीकर जीवनगौरव पुरस्कार, वेणू मेनन लाइफटाईम अचीव्हमेंट अवॉर्ड इत्यादी पुरस्कार स्वीकारताना मला त्यांच्याबरोबर राहण्याचे भाग्य लाभले. त्यांनी आजवर केलेल्या कार्याची दखल घेत अनेक संस्थांनी त्यांचा गौरव केला आहे. भारत सरकारनेही त्यांच्या या कार्याची दखल घेऊन नुकतेच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. त्याबद्दल मारुतरावांचे मनापासून अभिनंदन! मारुतरावांचा बहुप्रतीक्षित वन्यप्राणी कोश लवकरच निसर्ग प्रेमींच्या भेटीला येतोय. या कोशाचेही स्वागत वाचक, अभ्यासक मोठ्या आनंदाने करतील यात शंका नाही.
लेखक साहित्य प्रसार केंद्र, नागपूरचे प्रकाशक आहेत.