ब्राह्मण सभेचा शतकमहोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न

विवेक मराठी    22-Feb-2025
Total Views |
 
vivek

ठाणे : ब्राह्मण ज्ञातीची संस्था म्हणून ओळख असलेल्या ठाण्यातील ब्राह्मण सभेचा शतकमहोत्सवी सोहळा मोठ्या उत्साहाने गुरुवार दि. 13 फेब्रुवारी 2025रोजी संपन्न झाला. सदर कार्यक्रम ब्राह्मण सभा, स्टेशन रोड, कौपिनेश्वर मंदिराशेजारी, ठाणे (पश्चिम) येथे पार पडला. सुप्रसिद्ध खगोल शास्त्रज्ञ दा.कृ.सोमण यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषविले. त्यांच्या उपस्थितीत शतकमहोत्सवाच्या निमित्ताने ब्राह्मण सभेच्या नवीन लोगोचे अनावरणही करण्यात आले.
 
 

शतकमहोत्सवी निमित्ताने संपूर्ण वर्षभर धार्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, इ. चे सादरीकरण वर्षभरात घेण्यात येणार आहे, असे संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कराडकर यांनी सांगितले. संस्थेचे प्रमुख विश्वस्त विलास जोशी यांनी ब्राह्मण सभेच्या इतिहासाला उजाळा दिला आणि संस्थेच्या वाटचालीत ब्राह्मण समाजातील व्यक्तींबरोबर अन्य ज्ञातींमधील लोकांनीही योगदान दिल्याचे आवर्जून सांगितले.
 

शतकमहोत्सवी सोहळ्यादरम्यान दिव्यांग कला केंद्र, ठाणे निर्मित व उद्यमी महाराष्ट्र प्रस्तुत ’अरेरे ते अरेव्वा’ या किरण नाकती दिग्दर्शित एक कार्यक्रम सादर झाला. जगण्याची योग्य दिशा दाखवणारा विशेष मुलांचा हा विशेष कार्यक्रम पाहून उपस्थित भारावून गेले.
दा. कृ. सोमण यांनी जपानमधील एका शतायुषी गावातील दीर्घायुष्याची सूत्रे सांगितली. ती अशी, ‘सतत कामात रहा, घाबरायचे नाही, निवांत रहा-स्वतः:साठी जगा, 80%पोट भरेल एवढेच जेवा, चांगली संगत ठेवा, व्यायामात सातत्य ठेवा, निर्विकारपणे हास्यविनोद करा - ताण घेऊ नका, निसर्गभ्रमण करा, आभार माना - कृतज्ञता ठेवा, वर्तमानात जगा, चेहरा हसरा ठेवा.’ ही सर्व सूत्रे आपण अंगीकारली तर आपणही निरोगी दीर्घायुषी होऊ असे नमूद केले.
 
vivek

या कार्यक्रमास ब्राह्मण सभा ठाणेचे प्रमुख विश्वस्त विलास जोशी यांनी सर्व ब्राह्मण ज्ञाती संस्थास आवाहन केले की, ब्राह्मण सभा आपल्या ठाणेकरांची भूषण असलेली जुनी संस्था आहे. या संस्थेने आपल्या ब्राह्मण ज्ञातीबांधवांचे सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक सांस्कृतिक कार्यक्रम व विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा आणि कलाक्षेत्रातीलही मंडळींना योग्य दरात सभागृह उपलब्ध करून दिला जाईल. तरी आपले कार्यक्रम या सभागृहामध्ये करावे. आभारप्रदर्शन संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कराडकर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनिता फडके यांनी केले. दिव्यांग मुलांच्या रामरक्षा स्तोत्रपठणाने कार्यक्रमाची सांगता झाली आहे.