मन लागो यार फकिरी में

24 Feb 2025 12:22:28
- रमेश पतंगे

girishkaka prabhune 
 
भटके-विमुक्त समाजातील सर्व लढवय्या जातींना गुन्हेगार जाती ठरवून टाकले. त्यांना एकत्र केले पाहिजे आणि समाजातील मुख्यप्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, या ध्येयाने प्रभुणे यांना शांत बसू दिले नाही. हे खरे असले तरी या समाजाचे प्रश्न गुंतागुंतीचे असतात, शिवाय त्यांचे पुनर्वसन करणे हेदेखील एक मोठे आव्हान प्रभुणेंनी पेलले. मन फकिरीत लागल्याशिवाय असे जगावेगळे काम करता येत नाही.
साल बहुधा 1987-88 असावे. मोतीबागेत समरसता मंचाची बैठक होती. 1985 सालापासून समरसता मंच या नावाने महाराष्ट्रात काम सुरू झाले, काम नवीन असल्यामुळे दर तीन महिन्यांनी होणार्‍या बैठकीला नवीन कार्यकर्ते येत. अशाच एका बैठकीत गिरीश प्रभुणे आले.
 
सुखदेव नवले तेव्हा संघटनमंत्री होते. तेच त्यांना बैठकीत घेऊन आले. त्यांनी गिरीशची माझ्याशी ओळख करून दिली. ’हे गिरीश प्रभुणे, चिंचवडला राहतात, संघाचे काही काळ प्रचारक होते आणि ग्रामायण प्रकल्पात निमगाव म्हाळुंगी या गावी ते सहा-सात वर्षे होते.’
 
गिरीश प्रभुणे यांचा माझा हा पहिला परिचय. प्रथमदर्शनी स्मरणात रहावे असे व्यक्तिमत्त्व. लांब वाढविलेली दाढी, मानेवर रुळणारे केस, पँट आणि त्यावर झब्बा, खांद्यावर एक झोळी, बैठकीत शांत बसणारे, परंतु बैठकीच्या कामात लक्षपूर्वक रस घेणारे, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व मनावर ठसले.
 
संघ कार्यकर्ता म्हणून असंख्य कार्यकर्ते भेटत राहतात. सगळ्यांच्या औपचारिक ओळखी होतात, पण त्यांतील फारच थोडे मनात ठसतात. गिरीश प्रभुणे त्यांपैकी एक.
 
त्यांची औपचारिक ओळख तर झाली, पण पुढे हळूहळू एक कार्यकर्ता, एक चिंतक, एक संघटक, एक लेखक, एक चित्रकार, एक संगीतकलाप्रेमी, अशी विविध अंगांनी ओळख व्हायला अनेक वर्षे जावी लागली.. विवेकानंद म्हणत की, जन्माला येणार्‍या प्रत्येक माणसाचे एक जीवनकार्य असते. विवेकानंद असे म्हणाले खरे, परंतु जन्माला येणार्‍या प्रत्येकाला आपले जीवनकार्य समजते असे नाही. स्मशानघाटावर जाईपर्यंत आपण या जगात कां आलो, येऊन काय केले, लोकसंख्या वाढविण्यापलीकडे काही केले का याचा बहुसंख्यांना बोध होत नाही. ग. दि. माडगूळकरांच्या शब्दांत, ”उंबरातले किडे-मकोडे करिती उंबरी लीला” अशी अवस्था सर्वसामान्य माणसाची असते.
 
 
गिरीश प्रभुणे त्याला अपवाद आहेेत. आपल्याकडे असा समज आहे की, जन्मलेल्या मुलाचे किंवा मुलीचे भविष्य सटवाई पाचवीला येऊन त्यांच्या कपाळावर लिहून जाते. त्याला भाग्य म्हणतात. ते बदलता येत नाही, असा आपला समज आहे. पण ते बदलता येते, अशा आपल्या लोककथा आहेत.
 
 
गिरीशच्या कपाळावरही सटवाईने लिहून ठेवले असावे ’भटके-विमुक्तांचे काम’. शाळेत असतानाच हा लहानगा गिरीश, एकदा भटक्यांच्या तांड्याबरोबर भटकंती करायला गेला. कैक महिने भटकंती चालू होती. एके दिवशी पोलिसांची धाड पडली. सर्वांना पोलीस चौकीत आणण्यात आले. प्रत्येकाची चौकशी सुरू झाली. बाया म्हणाल्या, हा आमच्यातला नाही, हा बामणाचा पोर आहे.
पोलिसांना आश्चर्य वाटले. बामणाचा पोर यांच्यात कसा काय? याला पळवून तर आणलेले नाही ना? पोलिसांनी चौकशी केली आणि गिरीशला पुन्हा आपल्या घरी पाठवून दिले. पुढे शिक्षण झाले. दरम्यान ’लाटाखाली संथ पाणी’ ही गिरीशची कादंबरी प्रकाशित झाली. माणूस साप्ताहिकात लेखनही सुरू झाले. लेखक, पत्रकार म्हणून आपली कारकीर्द सुरू करण्याची संधी होती, अंगात क्षमता होती, गुणवत्ता होती, परंतु नियतीने जे कपाळावर लिहिले, ’भटके-विमुक्तांचे काम’ गिरीशला स्वस्थ बसू देत नव्हते किंवा नियती त्याला कामात खेचून आणत होती.
 
girishkaka prabhune
 
ग्रामायण संस्थेच्या वतीने निमगाव म्हाळुंगी या गावात ग्रामविकासाचा एक प्रकल्प चालू होता. माणूसचे संपादक माजगावकर यांची ती संकल्पना, त्यात काम करणारे कार्यकर्ते समाजवादी चळवळीतील आणि माजगावकरांच्या आग्रहाखातर गिरीश प्रभुणे या कामात ओढले गेले आणि एक प्रसंग असा घडला, ज्यामुळे माजगावकरांनी गिरीशला विचारले, ”गिरीश, तूच कां हे काम पुढे नेत नाहीस? नाही तरी आता तुला सर्व माहिती झाली आहे. मला तरी वाटते हे तूच करावंसं.”
 
 
आणि एक नाही, दोन नाही, दहा वर्षे गिरीश प्रभुणे निमगाव म्हाळुंगीचे काम करीत होते. सावकाराच्या पाशातील जमिनी सोडविल्या, पाणलोट क्षेत्राचा विकास केला. नगदी उत्पन्न देणारी पिके काढली आणि या क्षेत्रात प्रभुणेंचा पारधी समाजाशी निकटचा परिचय होत गेला.
 
 
पारधी माणूस समजून घ्यायला तसा अवघड. पारधी समाज म्हणून पारध्याला समजून घेणे त्याहून अवघड. मी तर शहरात वाढलेला कार्यकर्ता. माझा तर पारधीच काय, पण कुठल्याच भटके-विमुक्तांशी कधीच संबध आला नाही. मुंबईत संबध येण्याचे काही कारणही नाही.
 
 
आज ’पारधी’ या विषयावरचे गिरीश प्रभुणे ज्ञानकोश आहेत. सुरुवात निमगाव म्हाळुंगीपासून झाली आणि तीही दणक्यात झाली. एक प्रसंग घडला आणि दहा वर्षांचे सगळे काम मातीमोल झाले.
 
 
गिरीश प्रभुणे यांच्याच शब्दात, ”मागच्या गुरुवारी राहूचे आमदार सुभाष कुल यांच्या नातेवाईकांच्या घरावर दरोडा पडला. अधिवेशन चालू असल्यामुळे, शिवाय आमदार असल्यामुळे तपास लगेच सुरू झाला. कुत्री आणण्यात आली. कुत्र्यांनी माग काढला. दिशा समजली नाही. पण त्या भागात तेवढी एकच पारधी वस्ती. पोलिसांनी लगेचच चहूबाजूंनी वस्तीला घेरलं. जागेवरच सर्वांना धरलं. दामा-शामा होते. रामदास व मुलं पळाली. शांताबाई बाजाराला गेली होती. म्हणून सुटली. दामानं स्वत:च्याच हातानं माल काढून दिला. पण पैसे चोरीचे नव्हते, असं तो म्हणत होता.”
 
 
माल काढून दिला म्हणजे दरोड्यातील सोनं काढून दिलं. त्यातील गंमत अशी की, या दरोड्यामध्ये दामाचा काहीच हात नव्हता. त्याच्या मुलाचे नाव होते रामलु. त्याच्या सासर्‍याने इतर लोकांना बरोबर घेऊन दरोडा घातला. त्यात रामलुलाही घेतला होता. दामा सांगत होता की, रामलु लहान आहे, या गुन्ह्यात त्याचे जीवन बरबाद होईल म्हणून मी हा गुन्हा माझ्यावर घेतला. आरोपीला सोडण्यासाठी पोलिसांनी दामूच्या बायकोकडे पन्नास हजार रूपये मागितले. ते पन्नास हजार रुपये गोळा करण्यासाठी रामलु अक्कलकोटला गेला. दरोडे घातले, लोकांच्या तावडीत सापडला आणि लोकांनी त्याला बेदम मारले आणि त्यात रामलु मेला.
प्रभुणेंच्या मुखातून दामा आणि रामलुची कहाणी ऐकताना आपण काहीतरी अद्भुत ऐकत आहोत असे वाटत होते. दहा वर्षे दरोडा न घालणारा पारधी, शेती करणारा पारधी, डाळिंब आणि कांद्याचे उत्पादन घेणारा पारधी एका मोहाच्या क्षणी दरोडा घालतो. त्यात सर्व कुटुंब उद्ध्वस्त होते आणि प्रकल्प?
 
 
”मी निमगावला पारधी वस्तीला सर्वांना भेटून आलो. सार्‍या प्रकल्पाची रयाच उडून गेली होती. गुरं मोकळी सुटली होती. पिकांना पाणी न दिल्यामुळे सुकायला लागली होती. पोलिसांनी सर्वत्र फेकाफेकी केली होती. सारं उद्ध्वस्त झालं होतं.” हे सांगत असताना होणारे दुःख गिरीश आतल्या आत पचवून टाकीत होते.
 
 
अशी दुःखे नंतरच्या वाटचालीत पावलोपावली साथ देणारी होती. 1992 साली कुर्डुवाडी येथे मिनार एक्सप्रेसवर दरोडा पडला. सोलापूर ते कुर्डुवाडी हा रेल्वेचा पट्टा तसा असुरक्षितच. या दरोड्यात दोन पारधी ठार झाल्याची बातमी आली. जे मारले गेले ते दरोड्यात नव्हते. ते दोन पारधी पिंपळखुंटा या गावचे होते. ते दोन पारधी गावात घरातच राहत होते. दोघांची नावे होती, जेवद्या आणि वशा. प्रभुणे त्या गावी गेले सर्व चौकशी केली. गावकर्‍यांनी सांगितले, ”नाय... नाय, जेवद्या, वशा असं नव्हते. गावात समद्यांत मिळून-मिसळून असायचे. त्येंच्या वडिलांपासून त्ये इथं हायती. ल्हानाचं मोठं इथंच झालं. आजवर ऐकिवात न्हाई कधी चोरीमारी केल्याचं. सुगीला गावकरी गावच्या देवाला धान-दानं घालत्यात. त्ये आमी अडल्यानडल्यांना देतो. त्याच्यावर वर्षाला पोत्याला दोन पायल्या घेतो. जेवद्याला आणि वसंताला पण इतरांच्या बरूबर दिलं होतं. त्याला या वर्षी जामीन मीच हायं.”
 
 
girishkaka prabhune
 
म्हणजे पोलिसांनी दोन पारध्यांचा खून केला. त्याची दाद ना फिर्याद. पोलिस दफ्तरी गुन्ह्याची नोंद नाही. पुढील वीस वर्षांच्या काळात गिरीश प्रभुणे यांनी अशा पारधी हत्यांची अनेक प्रकरणे हाताळली. पण पोलिस, प्रशासन आणि शासन, पारधी म्हटले की गुन्हेगार, दरोडे, खून करणारा, त्यांच्या स्त्रियाही तशाच अशी सर्वांची ठाम भूमिका. मानवी हक्कांसाठी लढणारे काहीजण प्रभुणेंना भेटले. येथे तर मानवी हक्कांची रोजच राखरांगोळी होते. त्या सर्व कथा ऐकल्यानंतर मानवी हक्कांसाठी लढणार्‍यांचे ताबूतही थंड झाले.
 
 
’मिनार एक्सप्रेस दरोडा’ ही गिरीश प्रभुणे यांच्या जीवनाला आणखी एक वळण देणारी घटना ठरली. नियतीने त्यांना पारधी वस्त्या, तांडे यांच्यात पंधरा वर्षे फिरविले. सोलापूरचे सर्व तालुके, उस्मानाबाद जिह्यातील सर्व तालुके, लातूरचा खूप मोठा भाग, बार्शी, कुर्डुवाडी, तुळजापूर, नळदुर्ग, अनसरवाडा, अक्कलकोट, अणदूर अशी शे-सव्वाशे गावांची नावे लिहिता येतील.
दर तीन महिन्यांनी होणार्‍या बैठकीत आणि दोन बैठकांच्या दरम्यान होणार्‍या भेटीगाठीत प्रभुणेंच्या प्रवासाचे वृत्त समजे. पारध्यांची नावे समजत. कधीही न ऐकलेली नावे ऐकून गंमत वाटे. कांग्रेशा, टिळक्या, झम्या, बबर्‍या (बभ्रुवाहन), झंपन्या (म्हणजे जहाँपन्हा), कस्तुर्‍या, इंचा, जिलान्या, जांगिर्‍या (जहाँगीर). मी एकदा प्रभुणेंना विचारले की, ही अशी नावे कां ठेवतात? प्रभुणेंनी त्याचे उत्तर असे दिले होते- त्या-त्या काळात ज्या नावाचा बोलबाला असतो ते नाव ठेवले जाते. टिळकांच्या जमान्यातील टिळक्या होता. जहाँपन्हा, जहाँगीर ही नावे सिनेमातून आली.
 
 
पारधी वस्तीत जाणे आणि त्यांच्यात राहणे, त्यांच्याबरोबर जेवणे, हे येर्‍यागबाळ्याचे काम नव्हे. गिरीश प्रभुणेंना ते कसे जमले, हे त्यांचे तेच जाणो. नंतर सुरू झाले पारधी समाजाचे मेळावे. काही मेळावे एसपीबरोबर झाले, काही कलेक्टरबरोबर झाले. पारध्यांच्या दृष्टीने हा एक विलक्षण अनुभव होता. वस्तीजवळ पोलीस आला किंवा पोलिसांची गाडी आली की, दाही दिशांना पळून जायचे ही आजवरची सवय होती. त्यामुळे मुख्य पोलीस अधिकार्‍याच्या सोबत मेळावा म्हणजे काय होईल?
 
 
आपल्याला पोलिसांच्या ताब्यात देण्याचा हा प्रभुणेकाकांचा डाव तर नाही ना? एव्हाना गिरीश प्रभुणेचे नाव प्रभुणेकाका झाले आणि प्रभुणेकाकाचे पुढे नुसतेच काका झाले. काका जरी झाले तरी पारध्यांचा विश्वास संपादन करणे सोपे काम नव्हते. प्रारंभी होणारे पारध्यांचे मेळावे कसे असत? याचे उत्तर असे की, ते पारध्यांच्या मेळाव्यासारखे असत.
 
 
सोलापूरला हरिभाई देवकरण शाळेत पारधी समाजाचा पहिला मेळावा झाला. मेळाव्यासाठी शाळेचे काही वर्ग आणि एक हॉल घेतला होता. शाळेचे संचालक आमचेच, परंतु ते पारध्यांच्या मेळाव्यासाठी जागा द्यायला तयार नव्हते. पारध्यांनी जर गावात चोर्‍या-मोर्‍या केल्या तर शाळा बदनाम होणार. शेवटी त्यांची कशीबशी समजूत घालून दोन दिवसांच्या मेळाव्यासाठी जागा मिळविली. पोलिसांना विनंती केली की, पारध्यांना तुम्ही पकडू नका. त्यांना मुख्यप्रवाहात आणण्याचा हा प्रयत्न आहे.
मेळावा यशस्वी होण्यासाठी गिरीश प्रभुणे यांनी किती दिवस आणि किती रात्री प्रवास केला असेल हे तेच जाणोत. पाला-पालावर जाऊन मेळाव्याची माहिती देणं आणि मेळाव्यास यायचे आहे असा आग्रह त्यांनी कोणत्या भाषेत मांडला असेल हेही तेच जाणोत. या मेळाव्याचे वर्णन या मेळाव्यात सामील झालेल्या देवकाबाईच्या शब्दांतच वाचले पाहिजे. ’माज्या दिरानं समद्येस्नी आग्रेव क्येला. मंग त्येदिशी मी मांजा नवरा, प्वारं, दिरं, समदं ग्येलो, कसला म्येळावा हाय बगूं म्हटलं. मला तवां काय बी उमगत न्हवतं. लई पारधी एकठाव जमलं व्हतं. ही र्‍हीबाई द्येवकरान मंदी म्येळावा. आमी येड्या परमानं आयकून घट व्हतो. समदा गोंधूळ, कोनाची भांडणं चालल्येली. कोनाचं हागनं मुतनं तिठंच.’
 
 
...दुपारच्या वाक्ताला भांडनामागं भांडानं सुरू जाली. तिकडं स्टिजाव भासाना मागं भासानं आन पारध्याची भांडनं. धनजी-चंदू- जगन्नाथ आमच्या बाया. मग बेबी-वुलन-बाइसकी-धमवंती अश गड्या-बायांत भांडानं सुरू जाली. म्या भांडानं सोडवाय गिले त मला बी माराय सुरुवात क्येली. मंग मी बी भांडान सोडवता सोडविता मारू लागली... माज्या नंदेनं दिलप्याच्या पाठीत लाथ हाणली. बाईची लाथ लई घान. त्येनं मानूस अपमानित व्हतो. नरकात जातू. त्येंन दिलिप्या चिरडस गेल्या. त्येनं चाकू कहाडला. आन त्यो नंदेच्या मागं धावू लागला. तशी सर्व्यांनी आपापले च्याकू-जंबिये-तलवारी काहाडल्या, आन येकच हानामारी सुरू जाली. कोन कुनाला मारतयं ये बी समजना. परतेक बाई कंमर कसून यात लाथा मारू लागली. लाथाळ्या सुरू जाल्या. स्टिजावर समदी भासनं देयाचं थांबून भांवावून बगतच रायले. मायकावनं कोन वरडून वरडून सांगत व्हता...... शांत व्हा, शांत व्हा.” स्टेजवर जे अनेक जण बसले होते त्यात मी देखील होतो.’
 
 
देवकाबाई शिंदे हे प्रभुणे यांनी शोधलेले एक रत्न होते. बाई पारधी समाजाची, परंतु रंगरूपाने लाखात एक. अगोदर पारधी, त्यात गुन्हेगार जमातीची, पुन्हा पारधी जमातीत स्त्री म्हणजे पापाचे आगर. बाईला बाई न म्हणता, रांड म्हणण्याची पद्धत. अशा समाजातील ही देवका. बोलकी झाली, भाषणे करू लागली आणि समाजाने सुधारले पाहिजे, मुलांना शिक्षण दिले पाहिजे, चोर्‍यामार्‍या सोडल्या पाहिजे, काळाप्रमाणे आपल्यात बदल करून घ्यायला पाहिजे, असे सांगत वस्त्यापाड्यांत फिरू लागली.
ती जशी फिरू लागली तशी संकटे तिच्यामागे धावू लागली. गिरीशकाकांनी तिला सांभाळण्याचा खूप प्रयत्न केला. तोपर्यंत ’भटके-विमुक्त विकास परिषद’ ही संस्था जन्माला आली होती. आणि प्रभुणेकाका या संस्थेचे संघटनमंत्री झाले होते. सारा संघ संस्थेच्या मागे उभा होता. रमेश चाटुफळे यांनी यमगरवाडी येथील 18 एकर जमीन संस्थेला दिली. आणि 1993साली यमगरवाडी प्रकल्पाला सुरुवात झाली. पालापालांवरून पारधी मुला-मुलींना आणण्याचे काम गिरीश प्रभुणे यांच्यासोबत महादेवराव गायकवाड, मधुकर व्हटकर, तुकाराम माने इत्यादी कार्यकर्त्यांनी केले. देवकाबाई या सर्वांच्या मागे खंबीरपणे उभी राहिली.
परंतु जे निमगाव म्हाळुंगीला घडले ते देवकाबाईच्या बाबतीत घडले. तिच्या नवर्‍यानेच तिला ठार करण्याचा प्रयत्न केला. गंभीर जखमी अवस्थेत ती रुग्णालयात गेली, वाचली. पंखात बळ आणून उडणार्‍या देवकाचे पंखच छाटून टाकण्याचे काम पारधी समाजातील तिच्या जवळच्या नातलगांनी केले. जिला उभी करण्यासाठी आयुष्यातील अनेक वर्षे गेली. मनात प्रश्न येतो की, तिची आठवण झाल्यानंतर प्रभुणेंच्या मनात काय कालवाकालव होत असेल?
 
 
पण एकटीच देवका नाही. शाहिर्‍या आणि बेबी, जयश्री आणि कस्तुर्‍या, राजश्री आणि तिचा भाऊ ज्ञानेश्वर यांच्या कथा एकेका कादंबरीचा विषय आहेत. प्रत्येकाची जीवघेणी शोकांतिका आहे. भावाला तुरुंगातून बाहेर काढण्यासाठी पैसा हवा म्हणून स्वत:ला विकून ’धंद्याला’ बसणारी बहीण आहे. अशा अनेक देवका, शाहिर्‍या, कस्तुर्‍या, धनाजी यांना उभे करण्यासाठी गिरीशजींनी आपल्या उमेदीची अनेक वर्षे खर्च केली, पण शेवटी शोकांतिका झोळीत पडली. शंकराने शांतपणे हलाहल पचविल्याची कथा आपण जाणतो, पण सामाजिक काम करताना हलाहलाचे किती घोट घशाखाली उतरावे लागतात, हे प्रभुणेच सांगू शकतात.
यमगरवाडीचा प्रकल्प एक प्रयोगच होता. मुला-मुलींचे वसतिगृह चालविणे, तसे अवघड काम नाही. परंतु भटके आणि विमुक्तांच्या मुलामुलींना सांभाळणे हे सर्वांत कठीण काम आहे. त्यांच्या जगण्याच्या सवयी, खाण्याच्या सवयी, स्वच्छतेच्या सवयी, प्रत्येकाच्या बोलीभाषा, छोट्या-मोठ्या कारणांवरून भांडण करण्याचा स्वभाव, मारामारी करण्याचा स्वभाव, स्त्री-पुरुष भेदाची फार लहान वयातच जाणीव, सगळेच काही अजब. यमगरवाडी हे गिरीश प्रभुणेंचे पहिले घर झाले. दुसरे घर चिंचवड, जिथे पत्नी आणि मुले आहेत. महिनोन्महिने या प्रकल्पात राहाणे, मुलांवर आईच्या ममतेने प्रेम करणे, त्यांना जवळ करणे, त्यांचे नाक पुसण्यापासून शी धुण्यापर्यंत सगळे आपुलकीने करणे. हे लिहायला खूप सोपे जाते, परंतु तसे जगणे हे गिरीशसारखा एखादाच करू शकतो.
 
 
यमगरवाडीला वसतिगृह सुरू झाले पारधी मुलांसाठी. परंतु हळूहळू यमगरवाडीत जवळजवळ भटके-विमुक्तांतील पंचवीस जातिजमातींची मुलेमुली दहा वर्षाच्या काळात आली. प्रत्येक जात आणि जमातीला एक स्वतंत्र अस्तित्व असते, त्यांची देव-देवकं वेगळी, चालीरीती वेगळ्या, सामाजिक कायदे वेगळे, जातपंचायती वेगळ्या, अलिबाबाची गुहा उघडावी तशी ही समाजाची अज्ञात गुहा उघड झाली. आणि त्यातून जे दर्शन होत गेले ते डोके चक्रावून टाकणारे ठरले.
 
 
पुढील दहा वर्षांतच नाथजोगी, भातू समाज, कोल्हाटी समाज, नंदीबैलवाले, मरिआईवाले अशा विविध जातिजमातींचे प्रकल्प उभे राहात गेले. त्यासाठी प्रभुणेकाकांनी केलेली धावपळ, पायाला भिंगरी बांधून पळण्याची होती. अशा, वार्‍याबरोबर धावणार्‍या आपल्या पतीला अरुंधती वहिनींनी कसे समजून घेतले असेल, आणि संसाराचा गाडा कसा रेटला असेल, याचीदेखील प्रदीर्घ कहाणी आहे. नियतीने घडविलेली ही प्रकृती आणि पुरुषाची जोडी आहे.
 
 
सामाजिक संवेदना, सामाजिक कणव, सहृदयता असणे वेगळे. सामाजिक काम करण्याच्या त्या जबरदस्त प्रेरणा असतात. परंतु प्रभुणे इथेच थांबलेले नाहीत. हे सगळे समाजगट हिंदू समाजचे अंग आहेत, हजारो वर्षांपासून त्यांचे अस्तित्व आहे. ते मूळचे कोण आहेत? आर्य आहेत, अनार्य आहेत, द्रविड आहेत, मूलनिवासी आहेत? त्यांच्या भाषा कोणत्या आहेत? पारध्यांसहित सर्व जातिजमातीच्या प्रश्नांना हात घालता घालता प्रभुणे काकांनी याचाही शोध सुरू केला. मग त्यांच्या लक्षात आले की, पारधी मूळचे महाराष्ट्राचे नाहीत, ते राजस्थानचे आहेत. राणाप्रताप यांच्याबरोबर स्वातंत्र्यसंग्राम करणारे स्वातंत्र्यवीर आहेत. त्यांची भाषा राजस्थानी भाषेशी मिळतीजुळती आहे. मोगली आक्रमणाच्या काळात ते परागंदा झाले आणि सर्व देशभर पांगले. प्रत्येक जातिजमातीची अशी स्वतंत्र कहाणी आहे. रामोशी म्हणजे रामाचे वंशज, बेरड म्हणजे बेडर, विजयनगर आणि देवगिरीचे राज्य यांच्या शौर्यावर उभे राहिले. आम्हांला हा इतिहास माहीत नसतो. तो माहीत नसावा यासाठी इंग्रजांनी खूप प्रयत्न केला. त्यांनी या सर्व लढवय्या जातींना गुन्हेगार जाती ठरवून टाकले. त्यांना एकत्र केले आणि त्यांच्या सेटलमेंट उभ्या केल्या. तारांच्या कुंपणाआड त्यांना बंदिस्त करून टाकले. रोजची हजेरी अनिवार्य केली.
 
 
या सर्व जमातींच्या कर्तृत्वाचा लेखाजोखा मांडणारे लेखन प्रभुणेकाकांनी केले. सलग दहा-बारा वर्षे विवेकच्या दिवाळी अंकात एका एका भटक्या जमातीविषयी विस्तृत लेख प्रकाशित झाला. आणि पुढे त्याचे ’पालावरचं जिणं’ या शीर्षकाचे पुस्तक तयार झाले. प्रभुणे यांच्यातील अभ्यासक, चिंतक या लेखांतून प्रकट झाला. कोणे एके काळी भारत सुवर्णभूमी होता, जागतिक उत्पादनात तेव्हा भारताचा हिस्सा 30 टक्के होता. आज एक टक्क्याच्या आसपास आहे. घिसाडी, वडार, लमाण, ओतारी, शिकलकरी, अशा असंख्य जाती उत्पादनाच्या कामात व्यग्र असत. वेरूळचे लेणे मी अनेक वेळा पाहिले. एका अखंड डोंगरात खोदलेले कैलास लेणे एक चमत्कारच आहे. हे लेणे खोदण्याचे काम ओतारी, गाडीलोहार, वडार, या समाजाने केले. हे प्रभुणेकाकांच्या अभ्यासातूनच माझ्यासारख्याला समजले. संपत्ती निर्माण करणारी ही सर्व मंडळी आज संपत्तिहीन आहेत. भूमिहीन आहेत, भारताचे ते नागरिक आहेत, कारण त्यांचा जन्म भारतात झाला आहे. परंतु नागरिकत्वाचे एकही कागदपत्र त्यांच्याकडे नाही. लाखो लोकांकडे रेशनकार्ड नाही की कसली ओळखपत्र नाहीत. मतदार यादीत त्यांचे नाव नसते. ’भारत माझा देश आहे, सर्व भारतीय माझे बांधव आहेत....’, असे शाळेत आपण म्हणतो. रोजच्या जीवनात त्याचा अनुभव नसतो. या जाणिवा प्रभुणेंच्या कामामुळे जाग्या झाल्या आणि प्रगल्भ झाल्या.
 
 
यमगरवाडीला दरवर्षी महाशिवरात्रीला भटके आणि विमुक्तांचा मेळावा भरतो. मेळाव्यासाठी शेकडो बांधव येतात. शहरातूनही प्रबुद्ध नागरिक येतात. अशाच एका मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून लोकसंस्कृतीचे गाढे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे आले होते. डॉ. प्रभाकर मांडे यांनी आपले संपूर्ण जीवन भटके आणि विमुक्तांच्या अभ्यास आणि संशोधनासाठी खर्च केले आहे. या विषयावरील त्यांची पुस्तके विद्यापीठात अभ्यासासाठी लावलेली असतात. पीएच.डी मिळविण्यासाठी त्यांनी केलेला हा अभ्यास नाही. आपला समाज आणि राष्ट्र समजून घेण्यासाठी त्यांनी केलेला हा अभ्यास आहे.
 
 
महाशिवरात्रीच्या त्या मेळाव्यात प्रभाकर मांडे अतिशय भावूक झाले. त्यांचा कंठ दाटून आला. डोळ्यांतून अश्रुधारा वाहू लागल्या. ते म्हणाले, ’गेली अनेक वर्षे मी भटके-विमुक्तांच्या वसतिपाड्यावर गेलो. त्यांची स्थिती पाहून खूप दु:ख होई. त्यांच्यासाठी काहीतरी भरीव काम केले पाहिजे. त्यांना शिक्षण दिले पाहिजे, त्यांना सर्व समाजाच्या बरोबरीने आपण आणले पाहिजे असे वाटत राही. परंतु आज मी इथे माझ्या मनातील संकल्पना प्रत्यक्ष साकार झालेली पाहातो आहे. गिरीश प्रभुणे आणि त्यांच्या सहकार्‍यांनी जे काम इथे उभे करण्याचा प्रयत्न चालविला आहे. हेच काम या समाजाची उन्नती घडवून आणेल. मी अगदी भारावून गेलो आहे. ’
महाशिवरात्रीच्या मेळाव्यास डॉ. दाभोळकर आले होते. हे दाभोळकर म्हणजे पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते. महाराष्ट्रातील एक थोर विचारवंत अशी त्यांची ओळख आहे. ते म्हणाले, ’महात्मा गांधी यांच्या जीवनावर ’अन टू धिस लास्ट’ या पुस्तकाचा खूप मोठा प्रभाव आहे. आपण जेवढे खाली वाकावे तेवढा तळातील माणूस आपल्याला दिसतो. मी येथे समाजातील तळातील माणूस पाहातो आहे.’ या तळातील माणसाला यमगरवाडीत आणण्याचे काम गिरीश प्रभुणे यांनी केले.
 
 
नियतीची इच्छा अशी असावी की, प्रभुणेकाका यांनी एकाच प्रकल्पात स्वतःला जीवनभर अडकवून घेऊ नये. भटके-विमुक्त यांचे प्रश्न जसे गुंतागुंतीचे आहेत, तसेच त्यांचे पुनर्वसन करणे हा देखील एक जबरदस्त आव्हानाचा विषय आहे. पुनर्वसन दोन प्रकारे होत असते. प्रत्येकाला पोट असते आणि ते माणसाला स्वस्थ बसू देत नाही. त्याला काही ना काही उद्योग करावा लागतो. पारंपरिक उद्योग संपले, वैदूकडून आता कोणी औषधे घेत नाहीत. लोकं डॉक्टर किंवा वैद्याकडे जातात. म्हणून वैदू समाजाने काळानुरूप नवीन व्यवसाय स्वीकारलेले आहेत. डोरलं, मणी, सुई, घेऊन या बाया आता खेडोपाडी विक्री करतात. परंतु यांच्याकडे असलेल्या पारंपरिक ज्ञानाचे काय? ते असेच नष्ट होऊ द्यायचे का? ते नष्ट झाले तर, ज्ञानाचा प्रचंड साठा नाहीसा होईल. ज्ञान एका पिढीत प्राप्त होत नाही त्यासाठी अनेक पिढ्यांना कष्ट करावे लागतात.
 
 
वैदूकडे नाडीपरीक्षेचे अफाट ज्ञान आहे. केवळ नाडीपरीक्षा करून तुम्हांला कोणता विकार झाला आहे, हे तो बरोबर सांगतो. याचा प्रत्यक्ष अनुभव विवेकच्याच एका फार मोठ्या कार्यक्रमात आम्ही घेतला. नंदीबैल घेऊन येणारा अचूक भविष्यकथन करतो, याचाही अनुभव घेतला. वडार समाजाला दगडाचे फार सूक्ष्म ज्ञान असते. देशात एकेकाळी अप्रतिम पोलाद तयार केले जात असे. दिल्लीचा अशोकस्तंभ त्याची साक्ष आहे. या पारंपरिक ज्ञानाचे जतन झाले पाहिजे.
 
 
यमगरवाडीचे काम आता स्थिरावले. नवीन कार्यकर्ते जोडले जात होते. गिरीश प्रभुणे यांना या कामातून मुक्त करण्याचा निर्णय करण्यात आला. ते पुन्हा चिंचवडला आले आणि चापेकर शिक्षणसंस्थेच्या प्रांगणात ’समरसता गुरुकुलम्’ या नावाचे एक नवीन काम सुरू झाले. भटके-विमुक्त मुला-मुलींसाठी गुरुकुलम् सुरू झाले. तेथे जे आपले औपचारिक शिक्षण आहे, ते तर दिले जातेच पण त्याशिवाय वेगवेगळ्या जातिजमातीची जी पारंपरिक कौशल्ये आहेत, त्यांच्या विकासाचेही शिक्षण दिले जाते.
या गुरुकुलम्लाही आता वीसेक वर्षे झाली... या वर्षांत तेथील शाळेचे वर्ग म्हणजे त्यांच्या भिती मुलांनीच उभ्या केल्या. एकावर एक वीट रचून भिंत तयार करण्याचे अनेक प्रकार आहेत. त्याची मॉडेल्स या गुरुकुलम्मध्ये बघायला मिळतात. मुले आता रोजच्या जीवनातील आयुर्वेदिक उत्पादने तयार करतात. उदा. आवळ्यापासून तयार करण्यात आलेले विविध प्रकार, विविध प्रकारचे मुरंबे, धातुकामाचे प्रशिक्षण तसेच ओतकाम करून मूर्ती घडविण्याचे कामही केले जाते.
 
 
girishkaka prabhune
 
यमगरवाडीनंतर ‘समरसता गुरुकुलम्’ हे प्रभुणेकाकांचे नवीन घर झाले. गुरुकुलम्मधला त्यांचा दिवस सकाळी 6-6.30ला सुरू होतो आणि रात्री 11-12 ला संपतो. प्राचीन काळी आपल्या देशात गुरूच्या घरी राहून शिक्षण घेण्याची प्रथा होती. गुरू हीच माउली असे आणि तोच पिता असे. एकाच व्यक्तिमत्त्वात हा त्रिवेणी संगम असे. फीचा मोबदला देणारी शिक्षणप्रणाली तेव्हा नव्हती. तेव्हा शिक्षणप्रणाली होती ज्ञान देण्याची. विद्यार्थ्याला ज्ञानमय करण्याची, त्याला विविध कलांत प्रवीण करण्याची. आणि जीवनसंग्रमात स्वाभिमानाने कसे जगावे याची प्रेरणा देण्याची, त्याचबरोबर मी समाजाचा घटक आहे आणि समाजाचे मी देणे लागतो हा आत्मीयभाव निर्माण करण्याची होती. त्याचे पुनरुज्जीवन करण्याचा समरसता गुरुकुलम् हा एक प्रयोग आहे.
गिरीशजी मला आग्रहाने चिंचवडला अनेक वेळा बोलावतात. मी पण जातो. आणि गेलो की, एक-दोन दिवस तिथे राहातो. या काळात ते मला विविध विषयांवर भाषणे करायला लावतात. ती मी करतो, त्यांच्या समाधानासाठी. मला मनोमन माहीत असते की, माझ्या भाषणांचा येथे काही उपयोग नाही. येथे जी जीवनदृष्टी विकसित करण्याचा प्रयत्न चालला आहे, जे कौशल्य जतन करण्याचा प्रयत्न चालला आहे, तो माझ्या भाषणांपेक्षा लाखमोलाचा आहे. मी तेथे अनुभवतो की, प्रभुणेकाका आपल्या खोलीत बसले आहेत. मीही त्यांच्याशी गप्पा मारतो आहे, पण या एक तासाच्या गप्पांत पंधरावीस वेळातरी विघ्न येते. कुठल्यातरी कक्षेतील एखादी लहान मुलगी अथवा मुलगा रडत रडत काकांच्या कक्षेत येतो आणि आपली व्यथा सांगतो. कोणाच्या पोटात दुखत असते, कुणाचे डोकं दुखत असते. कुणीतरी कोणाला मारलेले असते, कुणीतरी कुणाची तरी वस्तू घेतलेली असते. त्या प्रत्येकाची नावं काकांना माहीत असतात. प्रत्येकाची व्यथा माहीत असते. घरची आठवण झाल्यामुळे कोणाचे पोट दुखत असते, हे काकांना बरोबर समजते. आणि मग त्याचे औषध म्हणून ते एखादी गोळी किंवा चॉकलेट देतात.
 
 
चॉकलेट किंवा गोळीने पोटदुखी बरी होत नाही, हे सर्वांना माहीत आहे. पण त्या मुलांचे पोट किंवा डोकं दुखायचं थांबतं. कारण या गोळीबरोबरच काकांचे प्रेम आणि आत्मीयता त्या मुलाला प्राप्त होत असते. ती त्याची गरज असते.
 
 
अशाच एका भेटीत त्यांचा निरोप घेण्यासाठी मी त्यांच्या खोलीत गेलो. तेव्हा त्यांनी अबिदा परवीन यांची कॅसेट लावली होती. अबिदा परवीन यांची गाणी मीदेखील अनेकवेळा ऐकत असतो. त्याने मन मोहून जाते. आणि एका शांतीचा अनुभव ही गाणी करून देतात. त्या दिवशी कबीराचे भजन त्यांनी लावले होते. भजनाचे बोल होते,
 
 
मन लागो यार फकिरी में।
जो सुख पावो नाम भजन में, सो सुख नाही अमीरी में
भला बुरा सब ये सुन लीजो, कर गुजरान गरीबी में.
प्रेमनगर में रहनी, भली बनी आयी सबुरी में.
हाथ में कुण्डी, बगल में सोट्टा, चारो दिशा जागीरी में;
आखिर ये तन खाक मिलेगा, कहा फिरत मगरूरी में
कहे कबीर सुनो भाई साधो, साहेब मिलें सबुरी में.
 
 
मन फकिरीत लागल्याशिवाय असे जगावेगळे काम करता येत नाही. आणि असे काम करताना कधी काळी आपल्या बरोबर काम केलेले, कधी उगाचच विरोध केलेले, कधी ईर्ष्या, मत्सर मनात ठेवणारे; काय बोलत राहतील याचा नेम नाही. ते सर्व सहन करीत आपल्याच धुंदीत ’मन लागो यार फकिरी में’ काम करीत रहावे लागते.
 
 
चतुरंग प्रतिष्ठान स्मरणिका (दैनंदिनी 2016) येथून साभार
Powered By Sangraha 9.0