- मनस्विनी प्रभुणे-नायक
गिरीश प्रभुणे नावाच्या बापाची लेक म्हणून मिरवताना अभिमान तर आहेच पण त्याहून अधिक जबाबदारीची जाणीव आहे. त्यांनी आयुष्यात नुसते उपदेश कधीच दिले नाहीत तर प्रत्यक्ष कृतीवर त्यांचा भर असायचा. त्यांनी भटके- विमुक्तांसाठी ज्या पोटतिडकीने, आत्मीयतेने काम केले आहे, ते बघून कोणी सवर्ण वर्गातली व्यक्ती असं काम करू शकते हे खरं वाटत नाही. प्रभुणे त्यांच्यातलेच एक वाटतात.’ बाबांना त्यांच्या कामाबद्दल अशी पावती मिळणं यातच त्यांच्या कामाचा आणि निःस्वार्थी स्वभावाचा तळ समजतो
मी बाबांची म्हणजेच गिरीश प्रभुणे यांची मुलगी नसते? तर कदाचित माझ्यामध्ये आजच्या इतकी सामाजिक प्रगल्भता आली नसती. अगदी माझ्या नावाच्या वेगळेपणापासून मला माझी स्वतंत्र ओळख मिळाली ती त्यांच्यामुळे. माझ्या आयुष्यात आईला अनन्यसाधारण महत्त्व आहेच पण त्याहून अधिक बाबांना आहे. मीच काय पण आम्हा तिघा भावंडांच्या (मुकेश, मयुरेश यांच्याही) जडण-घडणीत समतोलपणा आणण्याचं काम आई-बाबा दोघांनीही केलंय. ’आईचा मुलगा अन बापाची लेक’ असं म्हणलं जातं मी अशीच बापाची लाडकी लेक आहे. या बापाची लेक म्हणून मिरवताना अभिमान तर आहेच पण त्याहून अधिक जबाबदारीची जाणीव आहे. अगदी लहानपणापासून बाबांनी आमच्यावर कधी जाणीवपूर्वक तर कधी नकळतपणे वेगळे संस्कार केले. त्यांनी सांगितलेल्या काही गोष्टी आज मिथक वाटतात. बालवयात त्या गोष्टींचा अर्थ समजणारही नव्हत्या, अशा अनेक गोष्टी अनाहूतपणे मनावर बिंबत गेल्या. आज वयाच्या मध्यान्हीला आल्यानंतर आजूबाजूच्या गोष्टींचे आकलन करत असताना त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचं महत्त्व अधिक प्रकर्षानं पटतंय.
लहान होते तेव्हा मनात अनेक न्यूनगंड बाळगून होते. रंगाने सावळी असल्याने कधी घरातले (आई-बाबा सोडून अन्य) तर कधी मित्र मैत्रिणी ’काळूबाई’ म्हणून चिडवायचे. मी चौथीत असतानाची गोष्ट. खेळत असताना असंच कोणीतरी मला माझ्या रंगावरून चिडवलं. मी रडत रडत बाबांकडे गेले. ’बाबा मी काळी का आहे? नकोय मला हा रंग. मलापण गोरं व्हायचंय.’ असं म्हणू लागले. बाबांनी त्यावेळी मला छान समजावून सांगितलं जे मला आयुष्यात पुढेही उपयोगी पडलं. ते म्हणाले, ’बघ मी पण काळा आहे, तुझी आईपण काळी आहे आपल्या घरातले सगळेच रंगाने काळे आहेत. तू आमचीच म्हणून तुही काळी. तू गोरी नाही म्हणून काय झालं? तू छान गाणं म्हणतेस, छान नाच करतेस. ते कुठे तुला चिडवणार्यांना जमतं. बघ कृष्णसुद्धा काळा होता. तू तुझ्या रंगरूपाने-दिसण्याने ओळखली जाण्यापेक्षा तू तुझ्यातील गुणांनी ओळखली गेलीस तर ते मला जास्त आवडेल.’ असं बराच काही त्यांनी समजावून सांगितलं. त्या सांगण्यामागचे अर्थ समजावून घेण्याइतकी माझ्यात समज नव्हती. पण हळूहळू माझ्यातील हा न्यूनगंड दूर होत गेला. न्यूनगंडांवर मात करायला त्यांनी चांगल्या पद्धतीने शिकवलं.
त्यांनी नुसते उपदेश कधीच दिले नाहीत तर प्रत्यक्ष कृतीवर त्यांचा भर असायचा. त्यांची ही कृती खूप बोलकी असते. त्या कृतीतून तुम्ही नकळतपणे अनेक गोष्टी शिकत जाता. चिंचवडगावातील चापेकर चौकात जुना बसस्टँड होता आणि या बसस्टँडमागे मनपा शाळेच्या भिंतीला टेकून एक म्हातारे आजोबा, तिथेच आडोसा करून एकटेच राहायचे. चप्पल शिवून द्यायचं ते काम करायचे. त्यांच्या अगदी अंगावरची हाडंच शिल्लक राहिली होती. बहुतेक वेळा उपाशीच झोपण्याची वेळ त्यांच्यावर यायची. चिंचवडगावात त्याकाळी चप्पल शिवून देणारे ते एकमेव होते. त्यामुळे गावातील अनेकजण त्यांच्याकडूनच चप्पल शिवून घ्यायचे. आजोबा उपाशीपोटीच झोपतात हे एकदा बाबांना समजलं. त्यानंतर बाबा त्यांना रोज पोळीभाजी देऊ लागले. मी आणि माझ्या पाठचा भाऊ मुकेश आम्ही दोघेही तिथल्याच मनपाच्या शाळेत जात असल्यामुळे बाबांनी आम्हाला त्या आजोबांना पोळीभाजी नेऊन द्यायला सांगितलं. त्या नंतर आम्ही दोघे रोज त्या आजोबांना पोळीभाजी देऊ लागलो. आमच्या वर्गातील एका मुलीने ते बघितलं. ’ते तुमचे कोण लागतात?’ असं तिने आम्हाला विचारलं आणि आम्ही अगदी ठामपणे आमचे आजोबा आहेत असं सांगून टाकलं. त्यानंतर त्या मुलीने सगळ्या वर्गात ही गोष्ट सांगून टाकली. चप्पल शिवणारे, रस्त्याच्या कडेला राहणारे गृहस्थ मनस्विनीचे आजोबा आहेत असं पूर्ण वर्गाला वाटू लागलं. मधल्या सुट्टीत आळीपाळीने जाऊन वर्गातील मुली त्या आजोबांना दुरून बघून यायच्या. पण खरंच ते रस्त्यावर राहणारे गृहस्थ आमचे कोणी नाही असं कधीच वाटलं नाही. बाबा त्यांना रोज जेवण घेऊन जातात म्हणजेच नक्की ते आपले कोणीतरी असणार अशीच आमची भावना. त्यांचं नाव देखील आम्हाला माहीत नव्हतं. त्यावेळी आमच्या पायात चप्पल नसायच्या. शाळेतील बहुतेक मुलंदेखील चप्पल न घालताच यायची. एकदा या आजोबांनी त्यांच्याकडे दुरुस्तीला आलेल्या आणि नंतर कोणीतरी तिथेच टाकून दिलेल्या चप्पलांमधून आम्हाला छान एक चप्पल शिवून दिली होती. दोन पायात दोन वेगळ्याच चप्पल शिवून दिल्या होत्या. पण त्याचं खूप अप्रूप वाटत राहिलं होतं. पुढे कितीतरी दिवस ती चप्पल मोठया प्रेमाने मिरवली होती. कोण होते ते आजोबा? आमचे आणि त्यांचे काय ऋणानुबंध होते? जातीच्या चौकटीपलीकडे विचार आणि कृती करायचा नकळतपणे बाबांनी आम्हाला दिलेला हा पहिलाच धडा असावा.
पिंपरी-चिंचवड भाग तसा कामगार वस्तीचा. मोठमोठ्या कंपन्या या भागात आहेत. माझ्या वर्गातील अनेकजणीचे वडील टेल्को, बजाज, एसकेएफ, कायनेटिक अशा कंपन्यांमध्ये कामाला होते. माझी आई त्याच शाळेत शिक्षिका होती ज्या शाळेत मी शिकत होते. त्यामुळे बाईंची मुलगी म्हणून शाळेत माझ्याकडे बघितलं जायचं. तर वर्गातील अनेक मैत्रिणींना माझे बाबा काय नोकरी करतात याची उत्सुकता वाटायची. या मुलींच्या दृष्टीने अशा कोणत्या तरी कंपनीत काम करणं म्हणजेच नोकरी असं पक्क डोक्यात बसलं होतं. मला त्या कायम खोदून खोदून विचारायच्या. मला जसं समजायला लागलं तसं मी बाबांना वेगवेगळ्या आंदोलनात-चळवळीत काम करताना बघितलं होतं, रात्री जागरण करून लिहिताना बघितलं होतं, चापेकर वाड्यासाठी लढताना, संघांच्या बैठकांना जाताना, भीमनगरमधील वस्तीत घराघरात जाऊन लोकांशी बोलताना बघितलं होतं. आपले वडील काय करतात हे मैत्रिणींना समजावून सांगणं आणि त्यांना ते उमजणं कठीण होतं. बाबा काही काळ संघाचे पूर्णवेळ प्रचारक होते, ’माणूस’ सारख्या प्रतिष्ठित मासिकात काही काळ पत्रकारिता केली होती, श्री.ग.माजगावकर यांच्यामुळेच पत्रकारिता आणि सामाजिक काम याची सांगड त्यांना घालता आली. एका अर्थाने खूप वास्तव जग ते जगत होते. त्यातच ते खरे रमले, खूप फिरले आणि आम्हाला मुलानांही त्यांनी नेहमी वास्तवात जगायला शिकवलं.

बाबांना नेमकं जे करायचं होतं ते केव्हाच मागे पडलं. अनेकांना माहीत नाही पण बाबांना चित्रपट दिग्दर्शक बनायचं होतं. चित्रपटांसाठी लेखन करायचं होतं. हे चित्रपटाचं वेड त्यांच्या वडलांकडून आलं होतं. माझे आजोबादेखील चित्रपटांचे शौकीन होते. विद्युत मंडळातील नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर आजोबांनी चक्क सातार्यातील चित्रा टॉकीजमध्ये नोकरी पकडली. का तर भरपूर सिनेमे बघायला मिळतील. सातार्यात त्या काळात अनेक चित्रपटांचं चित्रीकरण व्हायचं. गीतकार वसंत पवार हे बाबांचे शेजारी होते. संगीतकार राम कदम, वसंत पवार अशी त्याकाळी जोडी होती. एखाद्या सिनेमाचं चित्रीकरण सुरू असेल तर वसंत पवार बाबांना बरोबर घेऊन जायचे. शाळकरी वयातील बाबा त्या वातावरणात रमून जायचे. मग कोणाकडून तरी त्यांना समजलं की, पुण्यात फिल्म इन्स्टिट्यूट आहे जिथे चित्रपटाचं सगळं शिक्षण मिळत. दहावी पास झाल्यावर बाबांना आजोबांच्याच ऑफिसमध्ये नोकरी मिळत होती. दहावीला मार्कही चांगले पडले होते. डिस्टिंक्शन मिळाली होती. पण चित्रपटांच्या ध्यासाने पछाडलेले बाबा घरातून पळून गेले. धनगरांच्या तांड्याबरोबर मुक्काम करत ते पुण्याला फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये जाण्यासाठी निघाले. फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेश घ्यायला गेले तर पदवी शिक्षणानंतर तिथे प्रवेश मिळतो असं समजलं. हे तर नुकतेच दहावी परीक्षा पास करून आले होते. पदवीची परीक्षा पास करायची म्हणजे अजून पाच वर्ष आणि आता घरी परत गेलो तर वडिलांचा मार खावा लागणार म्हणून संघ कार्यालयात, नारायण पेठेतील मोतीबागेत गेले. तिथेच त्यांची निवासाची सोय झाली. नुसतीच निवासाची नाहीतर पुढच्या शिक्षणाचीदेखील सोय झाली. शिक्षण, अर्धवेळ नोकरी आणि बाकीच्या वेळेत संघकाम अशी दिनचर्या बनली. हे करत असताना समाजाचं वास्तवही समोर आलं. कदाचित यामुळेच चित्रपटाचं अभासी जग मागे पडलं असेल. चित्रपटाचे दिग्दर्शक बनायचं म्हणून पुण्याला पळून आलेले बाबा ’समाजाचे दिग्दर्शक’ बनले. चित्रपटांची आवड मात्र त्यांनी कायम जोपासली. माझ्या एका मित्राने बाबांना एकदा ’मुंबई फिल्म फेस्टिव्हल’मध्ये बघितलं. संघाचा कार्यकर्ता आणि मुंबई फिल्म फेस्टिव्हलमध्ये! याचं त्याला आश्चर्य वाटलं. यापूर्वी त्याने संघाच्या व्यक्तीला असं चित्रपट महोत्सवात कधी चित्रपट बघताना बघितलं नव्हतं. बाबांची सिनेमाविषयी असणारी आवड त्याला माहीत नव्हती. बाबा खरंच फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये गेले असते तर कदाचित आज त्यांचं आयुष्य खूप वेगळं असतं.
बाबा महाविद्यालयीन शिक्षण आणि त्याबरोबर नोकरी यानिमित्ताने चिंचवड गावात आले आणि इथेच स्थायिक झाले. चिंचवड गावातील भीमनगर या दलितवस्तीत त्यांनी पुढे प्रिंटिंग प्रेस सुरू केला तो इथल्या तरुणांना रोजगार मिळावा म्हणून. त्यासाठी ते भीमनगरमधील घराघरात जाऊन मुलांच्या पालकांशी बोलायचे. भीमनगरमधील मुलांना आधी प्रशिक्षण देऊन प्रिंटिंग प्रेसमध्ये त्यांनी नोकरी दिली. याच काळात त्यांनी पिंपरी-चिंचवडमधील ’असिधारा’ नावाचं पाहिलं साप्ताहिक सुरु केलं. भीमनगरमधील मुलं इथे कामाला येऊ लागली, वाचन करू लागली. या निमित्ताने तिथे काहीनाकाही कार्यक्रम होऊ लागले. सामाजिक अभिसरणाची ती एक प्रक्रियाच होती. गो.नी.दांडेकर, दुर्गाबाई भागवत, शिवाजी सावंत, पु.भा. भावे, नामदेव ढसाळ, बाबासाहेब पुरंदरे, शिवाजीराव भोसले साहित्य क्षेत्रातील नामवंत मंडळी त्या काळात असिधारासाठी चिंचवडला येऊन गेली. आम्ही लहान होतो आम्हाला यातलं काही कळत नव्हतं. मनपाच्या शाळेत झोपडपट्टीतल्या मैत्रिणींची सोबत आणि शाळेतून आल्यावर सांभाळायला कोणी नसल्यामुळे उरलेला वेळ भीमनगरच्या वस्तीत जाऊ लागला. तेव्हा आम्ही चिंचवडमधील ब्राह्मण गल्लीत ’राम आळी’त राहायला होतो. आमच्या वाड्यातील मैत्रिणींच्या आयांनी माझ्याशी न खेळण्याची तंबी दिलेली आज आठवतेय. आमच्या वाड्यातील आणि ब्राह्मण आळीतील अनेकांना बाबांचं काम आवडत नव्हतं हे त्यांच्या अशा वागण्यातून कळायचं.
काही काही गोष्टींमध्ये बाबा माझ्याबाबत कमालीचे आग्रही होते. माझ्या न कळत्या वयात तर हा आग्रह जरा जास्तच होता. कालांतराने तो कमी होत गेला. पण मीच काय माझ्या दोन्ही भावंडांवर त्यांनी कधीही स्वतःचे विचार लादले नाही. असं म्हणतात मुलगी वयात आली की ती बापापासून दुरावते. तिला आईची अधिक गरज भासू लागते. त्यांच्या नात्यात नकळतपणे अलिप्तपणा येतो. पण माझ्याबाबत उलट झालं. बाबांचं आणि माझं नातं मित्रत्वाचं झालं. नवनवीन गोष्टी समजल्या पाहिजेत, सुरक्षित-चौकटीबाहेरच जग कळायला हवं म्हणून ते मला त्यांच्या सोबत दूरवरच्या प्रवासाला घेऊन जाऊ लागले. कधी पारध्यांच्या, नंदीबैलवाल्यांच्या पालांवर घेऊन जायचे. पारधी महिलांवर अत्याचार-बलात्काराच्या घटना घडल्यावर बाबा तातडीने त्याभागातील पोलीस स्टेशनवर जायचे, पोलिसांशी भांडून त्या महिलेची तक्रार नोंदवून घ्यायला लावायचे, वेळ प्रसंगी पोलिस स्टेशनच्या बाहेर उपोषणालाही ते बसले. त्या त्या प्रसंगात धाडसाने कसं वागलं पाहिजे हे सगळं त्यांच्याबरोबर केलेल्या प्रवासामुळे समजू शकलं. पोलीस स्टेशनवर पोलिसांशी तासतासभर चर्चा... समोरच्या खाकी वर्दीतील माणसालाही बदलविण्याची त्यांच्यात असलेली क्षमता त्यांच्या कार्यपद्धतीमुळे अनुभवायला मिळाली. आधी यमगरवाडी आणि आता समरसता पुनरुत्थान गुरुकुलम् यांच्या उभारणीतली बाबांची तळमळ आम्ही सर्व कुटुंबीयांनी जवळून अनुभवली. त्या काळात घरी आम्हाला सर्वात जास्त बाबांची गरज होती तो काळ बाबांनी भटके-विमुक्तांच्या कामासाठी दिला. मी विशीत पदार्पण करत असताना डोळ्यात नवनवीन स्वप्नं घेऊन स्वतःचा रस्ता शोधत होते तर बाबांनी चाळीशी पार केली होती. त्या वयातही ते रूढार्थाने रुळलेल्या वाटांवर चालत नव्हते. ते देखील नव्या वाटा धुंडाळत होते. नवनवीन उपक्रमांमध्ये स्वतःला व्यस्त ठेवायचे. तशी स्थिरता त्यांनी कधीच अनुभवली नाही. भटक्यांचं जगणं ते स्वतः जगत राहिले आणि आजही ते त्यांच्यातलेच होऊन जगत आहेत. मला आठवतंय भटके-विमुक्त परिषद आणि समरसता मंचची स्थापना होताना दामूअण्णा दाते यांच्याबरोबर झालेल्या बैठका, दूरध्वनीवरून तासनतास चालणार्या चर्चा, स्वतःचा मुद्दा देताना बाबांचा वाढणारा आवाज त्यातून त्यांची त्या विषयासंबंधीची तळमळच दिसून यायची. भटके-विमुक्तांच्या समस्या जाणून घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्रभर केलेला प्रवास, त्यातून उभा राहिलेला यमगरवाडीसारखा प्रकल्प, या सगळ्यासाठी त्यांनी आपल्या आयुष्यातील ऐन उमेदीची सर्व वर्ष दिली. ज्या समाजाला वेशीबाहेर जागा नाही अशा समाजाला त्यांनी मुख्यप्रवाहात आणण्यासाठी अविरत धडपड केली. ज्या वयात निवृत्तीचं जीवन जगतात त्या वयात बाबांनी भटके-विमुक्त समाजातील मुलांसाठी समरसता गुरुकुलम् हे भारतीय पद्धतीने शिक्षण देणारं गुरुकुल सुरु केलं आणि पहिल्यापेक्षा अधिक कार्यमग्न झाले.
कवी ग्रेस आणि बाबांची छान मैत्री होती. निवृत्त झाल्यानंतर ग्रेस अनेकदा गुरुकुलम्ध्ये येऊन राहून गेले. बाबाही अनेकदा नागपूरला त्यांच्या घरी जात. एकदा त्यांनी मला विचारलं, ’तुला बाबांचं कोणतं रूप आवडतं? लेखक बाबा की कार्यकर्ता बाबा?’ खरंतर या दोन्ही रूपांना बाबांमधून वेगळं करता येणार नाही. त्यांनी असं विचारण्यामागेही एक कारण होतं. बाबांनी लेखन अधिकाधिक करावं असं ग्रेस यांना वाटायचं. लिहा म्हणून ते बाबांच्या मागे लागायचे. ’प्रभुणे तुम्ही लिहीलं पाहिजे...’ असं ते कायम म्हणायचे. पण बाबांनी स्वतःला गुरुकुलम्च्या कामात इतकं गुंतवून घेतलंय की आता तेच त्यांचं आयुष्य होऊन बसलंय.
सामाजिक समरसता मंचाच्या स्थापनेत बाबांचा मोठा सहभाग आहे. दामूअण्णा दाते आणि पुढे मुकुंदराव पणशीकर हे मोठे आधारस्तंभ त्यांना लाभले. सामाजिक समरसता मंचाच्या कार्यकर्त्यांचा वैचारिक पाया घट्ट व्हावा यासाठी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं वाड्मय वाचलं पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजेत या विचारांनी त्यांनी दामूअण्णा दाते, रमेश पतंगे आणि भिकूजी इदाते यांच्या जवळ साहित्य संमेलन भरवलं जावं अशी इच्छा व्यक्त केली होती. संघातील अनेकांनी या कल्पनेला विरोध केला होता. ’साहित्य संमेलन घेणं हे संघाचं काम नाही’ अशी भूमिका घेतली होती. ’गिरीश त्याच्या अपूर्ण राहिलेल्या इच्छा यानिमित्ताने पूर्ण करायला बघतोय’ असंही काहींना वाटलं. दामूअण्णा दाते, रमेश पतंगे आणि भिकूजी इदाते यांचा मात्र संमेलन भरवण्यासाठी पाठिंबा होता. त्यावेळी बाबा समरसता मंचाचे संघटनमंत्री होते. त्यांची ही कल्पना उचलून धरण्यात आली आणि जळगावला डॉ. आनंद यादव यांच्या अध्यक्षतेखाली पहिले समरसता साहित्य संमेलन पार पडले. या संमेलनाची रूपरेषा ठरवण्यापासून बाबांचा असलेला सहभाग मी जवळून बघत होते. रात्र रात्रभर जागून, अनेकांशी चर्चा करून संमेलनाला साहित्य आणि वैचारिक चळवळीचे रूप देण्यासाठी ते धडपडत होते.
भटक्या समाजासाठी त्यांनी वेळोवेळी घेतलेली आग्रही भूमिका बघून अनेकांना ते याच सामाजातले आहेत असंच वाटतं. मराठीतील एका प्रसिद्ध लेखकाने जे राष्ट्र सेवा दलाशी संबंधित होते. त्यांनी मला एकदा विचारलं होतं, ’ बाबांची जात काय आहे गं?’ खरंतर प्रभुणे या आडनावातच जात कळते. त्यामुळे त्यांच्या प्रश्नाचं मला खूप आश्चर्य वाटलं. आपल्या या प्रश्नाला स्पष्ट करताना त्यांनी पुढे सांगितलं ’भटक्या विमुक्तांमध्ये अनेकजण आपली आडनावं बदलतात, दुसर्याचं आडनाव लावतात. त्यामुळे प्रभुणेनींदेखील आपलं आडनाव बदललं असावं असं वाटलं. गिरीश प्रभुणे भटके- विमुक्तांसाठी ज्या पोटतिडकीने, आत्मीयतेने काम करतात, ते बघून कोणी सवर्ण वर्गातली व्यक्ती असं काम करू शकते हे खरं वाटत नाही. प्रभुणे त्यांच्यातलेच एक वाटतात.’ बाबांना त्यांच्या कामाबद्दल अशी पावती मिळणं यातच त्यांच्या कामाचा आणि निःस्वार्थी स्वभावाचा तळ समजतो.