- अॅड. सतिश नानासाहेब गोरडे
9822197186
देशातील नागरिकांना जाज्वल्य अभिमान वाटेल अशा अतिभव्य स्वरूपातील ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा त्यांनी मनोमन कृतनिश्चय केला. त्यासाठी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून सुमारे अर्धशतकाहून अधिक काळ आपले जीवन समर्पित केले आहे गिरीशकाका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती म्हणजे जणूकाही एक दुग्धशर्करायोगच आहे. चित्रकार, पत्रकार, कवी, लेखक, संपादक अशा विविध भूमिकांतून वाड्.मयीन सृष्टीत रमणारे गिरीशजी प्रभुणे हे मानवतावादी समाजसुधारकही आहेत.
भारतीय इतिहासात 22 जून 1897 हा दिवस मूर्तिमंत शौर्यदिन म्हणून गणला जातो. या दिवशी दामोदर हरी चापेकर यांनी जुलमी ब्रिटिश अधिकारी वॉल्टर चार्ल्स रॅण्डचा पुण्यातील गणेशखिंड येथे वध केला. या धाडसी कृत्यात त्यांचे बंधू दामोदर आणि बाळकृष्ण तसेच मित्र महादेव विनायक रानडे यांनी साथ दिली होती. याची परिणती म्हणजे या सर्व क्रांतिवीरांना फासावर चढविण्यात आले. विशेषत: देशासाठी एकाच कुटुंबातील तीन सख्ख्या भावंडांनी हौतात्म्य पत्करण्याची ही जगाच्या इतिहासातील दुर्मीळ घटना होय. अर्थातच जनमानसात या घटनेनंतर खूप खळबळ माजली आणि स्वातंत्र्यसंग्रामाची सुप्त रूपातील ठिणगी धगधगू लागली. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यासह तत्कालीन अनेक तरुणांनी या प्रसंगातून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेतला. भगिनी निवेदिता यांच्यासह देशभक्तीने प्रेरित झालेल्या अनेक व्यक्तींनी चिंचवड गावातील चापेकर बंधूंच्या निवासस्थानाला भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांच्या भावना जाणून घेतल्या.
आता इतिहासातून थोडे अलीकडे येऊ. गिरीश यशवंत प्रभुणे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे तरुण प्रचारक म्हणून थांबल्यानंतर 1972मध्ये उदरनिर्वाहासाठी पिंपरी येथील एका कारखान्यात नोकरीला लागले. कारखान्यापासून जवळपास घराचा शोध घेत असताना चिंचवड गावात पुरंदरे वाड्यातील एक जुनाट बंद खोली मित्राने दाखवली. मागील बाजूने खोलीत प्रवेश केला. उंदीर - घुशींचा सुळसुळाट, घाण अन् कुबट वासाचे साम्राज्य असलेल्या त्या खोलीची एक खिडकी उघडताच बाहेरचा लख्ख प्रकाश आत आला. खिडकीतून नारळ, सीताफळ, रामफळ, कडुलिंब अशा हिरवाईत एक पडका वाडा दिसत होता. सहज चौकशी केल्यानंतर क्रांतिवीर चापेकर बंधूंचा तो वाडा आहे, हे कळताच चित्रकार अन् कविमनाचे प्रभुणे अंतर्बाह्य थरारून उठले; आणि त्याचक्षणी अनेक गैरसोयी असूनही ती खोली भाड्याने घेण्याचा निर्णय त्यांनी घेतला. एका महिन्याचे बावीस रुपये भाडे देऊन लगेच खोली ताब्यात घेतली. गावातील जैन महाविद्यालयात प्रवेश घेतला. गावात राहणारे स्वयंसेवक, महाविद्यालयातील मित्र यांच्या सहभागातून विद्यार्थी परिषदेची स्थापना केली. अर्थात कार्यालय तीच खोली. रात्री बैठका होऊ लागल्यावर खिडकीतून चापेकर वाड्यातील दुसर्या मजल्यावर काहीतरी पेटल्यासारखा उजेड दिसायचा. कुतूहलापोटी चौकशी केल्यावर तिथे दारूची भट्टी लावली जाते, असे कळले आणि संतापाची तिडीक मस्तकात गेली. सकाळी महाविद्यालयात मित्रांबरोबर या विषयावर चर्चा झाली. दारूची भट्टी उद्ध्वस्त करायची असा पंधरा-वीस जणांनी मिळून निर्णय घेतला. जीर्ण अवस्थेतील चापेकर वाड्याजवळ पोहोचेपर्यंत एकेक जण गळत गेले. गिरीश प्रभुणे, कांता जाधव, शाम उदास, विजय पोरे, अशोक पारखी, गोविंद मुणगेकर, अरविंद देशपांडे, राम कुलकर्णी, चंदू गुजर, विलास घारगे, भाऊ बावळे, शिरीष देशपांडे, अरविंद माढेकर, मुकुंद ठिपसे, प्रकाश जाधव असे सर्व माडीवर गेले. दारूची भट्टी धगधगत होती. सर्वांचा संताप अनावर झाला. त्यातून काही वेळातच भट्टी उद्ध्वस्त केली. भट्टीवरच्या काही महाभागांनी पोबारा केला; तर जे हातात सापडले त्यांना चौदावे रत्न दाखवले. ज्या वास्तूत क्रांतिवीर चापेकर बंधूंचा जन्म झाला, शिक्षण झाले. ज्यांच्या मनात प्रखर देशभक्तीचा जागर झाला; आणि त्यातून देश अन् धर्माच्या रक्षणार्थ अतुलनीय धैर्याने त्यांनी हौतात्म्य स्वीकारले. त्यांच्या पश्चात त्यांच्या कुटुंबीयांनी त्यागाची परिसीमा गाठली, त्याच वास्तूची ही दुर्दैवी अवस्था पाहून त्या सर्व भारलेल्या तरुणांनी तो वाडा ताब्यात घेऊन त्याचे पुनरुत्थान करून त्याला पूर्ववैभव प्राप्त करून देण्याचा दृढनिश्चय केला.
1972मध्ये क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीची स्थापना करण्यात आली. गिरीश प्रभुणे यांच्या सातत्यपूर्ण पुढाकारातून विख्यात साहित्यिक प्रा. द. मा. मिरासदार यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिवीर चापेकर व्यायाम मंदिर सुरू करण्यात आले. प्रकाश जाधव, अप्पा विपट यांनी व्यायामपटू घडविण्याची जबाबदारी अंगावर घेतली. ज्या वास्तूत समाजविघातक धंदे सुरू होते, तिथे पहाटे पाच ते रात्री आठ या वेळेत व्यायामपटूंच्या घामाचे सिंचन होऊ लागले. एका दमात हात न उचलता हजार जोर मारणारे तरुण निर्माण झाले. व्यायाम आणि विविध कसरतींच्या स्पर्धा संपन्न होऊ लागल्या. अर्थातच त्यामुळे काही समाजकंटकांचे पित्त खवळले. स्मारक समितीच्या कार्यकर्त्यांवर सामूहिक हल्ले होऊ लागले. गिरीश प्रभुणे, अरविंद माढेकर, मामा जाधव, मोहन गुपचूप, आगज्ञान, कांता जाधव यांनी धैर्याने दोन हात करून या गोष्टींचा प्रतिकार केला. रोज सायंकाळी गावातून एक तास सामुदायिक फेरी मारण्याचा परिपाठ सुरू केला. 18 एप्रिल 1972रोजी क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांचा स्मृतिदिन मोठ्या धूमधडाक्यात साजरा करण्यात आला. अल्पावधीतच क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या कार्यामुळे महासाधू मोरया गोसावी यांच्या नावासोबत ’क्रांतिवीर चापेकर बंधूंचे चिंचवड’ असेही म्हटले जाऊ लागले.

क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने 1 ते 10 मे 1972 या कालावधीत चापेकर स्मृती व्याख्यानमाला उत्साहात संपन्न झाली. ग. वा. बेहरे, वि. रा. पाटील, दुर्गा भागवत, सु. ह. जोशी, विष्णू क्षीरसागर, सु. ग. शेवडे, द. मा. मिरासदार, व्यंकटेश माडगूळकर, बाबासाहेब पुरंदरे, यदुनाथ थत्ते, ना. ग. गोरे, रामभाऊ म्हाळगी, विठ्ठलराव गाडगीळ, बिंदुमाधव जोशी, शरद वाघ अशा वेगवेगळ्या विचारसरणीच्या नामवंत व्याख्यात्यांनी प्रबोधन करून व्याख्यानमाला संस्मरणीय केली.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने 9 जून 1975 रोजी डॉ. एस. व्ही. कुलकर्णी यांच्या हस्ते बालवाडी सुरू करण्यात आली. आदरणीय मोरोपंत पिंगळे यांच्या आग्रहाखातर प्रसिद्ध उद्योजक माननीय कांतिलाल खिंवसरा यांनी गणेशनगर, थेरगाव येथे वीस गुंठे जागा आणि बांधकामासाठी एक लाख रुपये देणगी देऊन खिंवसरा - पाटील विद्यामंदिर या इयत्ता सातवीपर्यंतच्या शाळेची मुहूर्तमेढ केली. आदरणीय दामूअण्णा दाते, अप्पासाहेब कुलकर्णी, राजाभाऊ देव, सुभाष जोशी, शाम उदास यांच्या प्रयत्नांतून विघ्नहरी महाराज देव यांच्याकडून चिंचवड देवस्थानाकडील पांढरीचा मळा येथील जागा क्रांतिवीर चापेकर विद्यामंदिर या शाळेसाठी मिळवली; आणि आदरणीय सुदर्शनजी यांच्या हस्ते इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर वाचनालय आणि वैद्य गणेश विनायक चापेकर आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले.
23 मे 1979 रोजी क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती अंतर्गत पुतळा समितीच्या समन्वयातून पिंपरी - चिंचवड नगरपालिकेच्या वतीने तिन्ही चापेकर बंधूंचे समूहशिल्प उभारण्यात आले. अशोकराव गुमास्ते पुतळा समितीचे अध्यक्ष होते; तर स्वातंत्र्यसैनिक सदाशिवराव सायकर हे उपाध्यक्ष होते. पहिले नगराध्यक्ष अण्णासाहेब मगर आणि त्यांचे सहकारी नगरसेवक यांचा भक्कम पाठिंबा तसेच मुख्याधिकारी लिमये यांचे परिश्रम यासाठी लाभले होते. 22 जून 1997 रोजी रॅण्ड वधाच्या शंभरीनिमित्त ज्येष्ठ विचारवंत दत्तोपंत ठेंगडी यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिवीर चापेकर बंधू स्मृतिशताब्दी समारोह समिती स्थापन करून महाराष्ट्रातून क्रांतिकारकांच्या जन्मस्थानापासून क्रांतिज्योत यात्रा संपन्न झाली. तसेच 18 एप्रिल 1998 रोजी क्रांतिवीर दामोदर हरी चापेकर यांच्या स्मृतिशताब्दी सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले होते.
क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या वतीने क्रांतिवीर चापेकर वाड्याचे सहा मजली भव्य स्मारक उभारण्याची महत्त्वाकांक्षी योजना आखण्यात आली आहे.
वाड्याचे पुनरुज्जीवन करताना क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या मूळ घरातील अनेक गोष्टी राष्ट्रीय संग्रहालयात जतन केल्या आहेत. वाड्यात प्रवेश केल्यावर चौक, त्यात तुळशीवृंदावन आणि त्याला पाणी घालणारी एक घरातील गृहिणी, चौकाच्या दोन्ही बाजूला ओसरी, त्यात डाव्या बाजूला आयुर्वेदिक औषधे देणारे चापेकर बंधूंचे आजोबा, उजव्या बाजूस त्याकाळातील घरातील वस्तू, लाकडी जिना तसेच आत गेल्यावर उजव्या हाताच्या खोलीत संगीत शिकवताना व त्यासमोरील खोलीत देवपूजा करताना घरातील सर्व महिला तर आतील खोलीत तत्कालीन स्वयंपाक घर आणि त्यासमोर स्वयंपाकासाठी लागणारे भाजीपाला, फळे व इतर आवश्यक सामग्री दाखविण्यात आले आहेत. त्यामागे क्रांतिवीरांनी लपविलेली जी शस्त्रे इंग्रजांना सापडली, ती परसातील मूळ विहीर असे तळमजल्याचे स्वरूप आहे; तर पहिल्या मजल्यावर येरवडा कारागृहातील फाशीच्या वेळेचा लोकमान्य टिळकांच्या सोबतीचा प्रसंग, भगिनी निवेदिता यांनी क्रांतिवीरांना फाशी दिल्यानंतरचा सांत्वनाचा प्रसंग, लिथोप्रेस व दुसर्या मजल्यावर ’गोंद्या आला रे आला’ हा जुलमी रॅण्ड वधाचा हा अंगावर रोमांच उभे करणारा प्रसंग तसेच इतर असे एकूण 17 प्रसंगांतून 54 छोटे-मोठे मूर्तिरूपातील प्रसंग प्रभुणे काकांनी साकारून वाडा पुन्हा जिवंत उभा केलेला आहे. मागील बाजूस वाड्यात महाराष्ट्र शासन आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्या सहकार्यातून सहा मजली अत्याधुनिक इमारत त्यात 45 हजार चौरस फुटाचे बांधकाम, भगवान गौतम बुद्धाच्या कालखंडापासूनची छायाचित्रे, ऐतिहासिक संदर्भांनी समृद्ध असलेले ग्रंथालय, 2000 क्रांतिकारकांची सचित्र माहिती, जुन्या पद्धतीचे सुविधायुक्त सभागृह, इतकेच काय पण भगवान गौतम बुद्ध यांच्या कालखंडापासून देशाच्या स्वातंत्र्यपूर्व कालखंडापर्यंतच्या ऐतिहासिक गोष्टींचे संग्रहालय, श्रीराम मंदिर निर्माणपर्यंतच्या महत्त्वपूर्ण घटना कालखंडानुसार संग्रहित केल्या जाणार आहेत. त्यामध्ये तत्कालीन शस्त्रसाठा याची माहिती देणारे दालन असेल आणि त्याला जोड म्हणजे ऑडिओ अत्याधुनिकची सुविधा देण्यात येणार आहे. त्यामुळे त्याची संपूर्ण माहिती मिळण्यास उपयोग होईल. सुमारे 70 कोटी रुपये खर्चून क्रांतितीर्थ चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय उभारण्याची तसेच त्याला डिजिटल माहितीची जोड देण्याची संकल्पना पद्मश्री प्रभुणे काका यांची आहे. सन 2008-09 पासून संघाचे विनायकराव थोरात, मिलिंद देशपांडे, मुकुंद कुलकर्णी, हेमंत हरहरे, अॅड. सतिश गोरडे, विनोद बन्सल, विलास लांडगे, माहेश्वर मराठे आणि तत्कालीन स्मारक समितीची पदाधिकारी यांनी राष्ट्रीय संग्रहालयाच्या प्रभुणे काकांच्या संकल्पना साकार करण्यासाठी साथ दिली आहे.
अतिशय संवेदनशील वृत्तीच्या गिरीश यशवंत प्रभुणे यांनी आपल्या तारुण्यावस्थेत क्रांतिवीर चापेकर बंधूंचा भग्न आणि जीर्ण अवस्थेतील वाडा पाहिला. देशातील नागरिकांना जाज्वल्य अभिमान वाटेल अशा अतिभव्य स्वरूपातील ऐतिहासिक स्मारक उभारण्याचा त्यांनी मनोमन कृतनिश्चय केला. त्यासाठी क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीच्या माध्यमातून सुमारे अर्धशतकाहून अधिक काळ आपले जीवन समर्पित केले आहे गिरीशकाका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती म्हणजे जणूकाही एक दुग्धशर्करायोगच आहे. चित्रकार, पत्रकार, कवी, लेखक, संपादक अशा विविध भूमिकांतून वाड्.मयीन सृष्टीत रमणारे गिरीशजी प्रभुणे हे मानवतावादी समाजसुधारकही आहेत. भटके-विमुक्त समाजातील मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात स्थान मिळावे यासाठी ग्रामायण, यमगरवाडी प्रकल्प, पुनरुत्थान समरसता गुरुकुलम् अशा संस्थांच्या माध्यमातून त्यांनी कायमस्वरूपी सामाजिक बांधिलकी पत्करली आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन केंद्र सरकारकडून त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान करून गौरविण्यात आले आहे. याशिवाय अनेक प्रतिष्ठित मानसन्मान त्यांच्या वाट्याला आलेले आहेत. आता वयाचा अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त मी आदरणीय ऋषितुल्य गिरीशकाका प्रभुणे यांना दीर्घायुष्य चिंतितो; तसेच त्यांच्या अध्यक्षतेखाली क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीने कार्याचे असीम अवकाश व्यापून टाकावे, अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद!
लेखक क्रांतिवीर चापेकर स्मारक समिती, चिंचवड येथे कार्यवाह आहेत.
***
पुस्तक खरेदी करण्यासाठी
क्रांती ऋचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या काव्याचे रसग्रहण